07 July 2020

News Flash

दिशाहीन शिक्षणदीक्षा?

प्रश्नोत्तरांची तयार चळत देणाऱ्या ‘गाइड’च्या माऱ्याने आदल्या पिढीतील विद्यार्थ्यांना कमकुवत केले.

संग्रहित छायाचित्र

 

रसिका मुळ्ये

येत्या काळात डिजिटल/ऑनलाइन अभ्यास साहित्याचा वापर अपरिहार्य ठरणार; मात्र, या साहित्याच्या दर्जावाढीसाठी शिक्षण विभागाच्या पातळीवर योग्य पडताळणी होऊन प्रशिक्षण, विचारमंथन आवश्यक आहे..

प्रश्नोत्तरांची तयार चळत देणाऱ्या ‘गाइड’च्या माऱ्याने आदल्या पिढीतील विद्यार्थ्यांना कमकुवत केले. आकलनाऐवजी घोकंपट्टीच्या उताऱ्यापेक्षाही अधिक भीषण परिस्थिती गाइड संस्कृतीने केली. आता अपरिहार्य बनलेल्या डिजिटल माध्यमांतील शिक्षणसाधनांचे स्वरूप पाहता विद्यार्थ्यांची वाटचाल ही आकलनाऐवजी पाठांतराकडेच सुरू झालेली दिसते. पूर्वीचे शाब्दिक पाठांतर सध्या चित्रांच्या-दृश्यांच्या स्वरूपात होताना दिसते. विद्यार्थ्यांना त्यांच्या भवतालातील अनुभव घेत संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक असल्याच्या चर्चा विविध स्तरांवर होतात. नेमकी या मूलभूत तत्त्वाशीच सध्याच्या ‘ई-अभ्यास साहित्या’ची फारकत दिसते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पडणार नाहीत, त्यांच्यातील कुतूहल जागृत होणार नाही असे या शिक्षण साधनांचे स्वरूप आहे. तयार उत्तरे, अध्यापनाअभावी संकल्पनांचे स्पष्टीकरण, हौशी  दृक्मुद्रणे यांतून विद्यार्थी मर्यादित ज्ञान ग्रहण करू शकेल. त्याच्या विचारक्षमता दिलेल्या साधनांपलीकडे विचार करू शकणार नाहीत.

उपलब्धता आणि ‘दर्जा’

ऑनलाइन किंवा डिजिटल शिक्षणाच्या चर्चा या विशेष करून साधनांची उपलब्धता या मुद्दय़ावर केंद्रित झालेल्या दिसतात. साधने नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची अनुपलब्धता हा मुद्दा खचितच महत्त्वाचा आहे. राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्य़ांत १८ ते ६५ टक्के मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असली; तरी ज्यांना ते उपलब्ध आहे त्यांची शिक्षणस्थिती उच्च पातळीवर आहे, असे ठामपणे सध्या म्हणताच येऊ  शकत नाही. कारण ई-साहित्याचा दर्जा.

एखादा चित्रपट, माहितीपट तयार होताना जसा प्रत्येक दृश्य, शब्द, संवाद, शब्दफेक, आवाज, हावभाव या सर्वाचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो; तसाच अगदी दोन किंवा तीन मिनिटांच्या ई-अभ्यासासाठी तयार केल्या जाणाऱ्या साहित्यासाठीही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार भावविश्व आणि आकलन पातळी लक्षात घेऊन त्यावर काम होणे आवश्यक आहे. दृक्मुद्रणांचा उद्देश अभ्यासातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असल्यामुळे अत्यंत बारकाव्यांनिशी त्या तयार होणे गरजेचे आहे. मात्र, शिक्षण विभाग प्रचार करत असलेल्या ‘दीक्षा’ अ‍ॅपवरील ई-अभ्यास साहित्यात एकतर पुस्तकीपणा किंवा दृश्यांत वाहवत जाऊन शब्दांकडेच काय पण आशयाकडेही दुर्लक्ष; बाजारकेंद्रितता, उद्देशहीनता यांपैकी एखादा तरी ढोबळ दोष दिसतो.

पुस्तकीपणा : चांगल्या कॅमेरा-क्षमतेचे मोबाइल फोन आणि हाताळणीस सोप्या अशा दृक्मुद्रणांच्या संपादन प्रणाली उपलब्ध झाल्यामुळे पुस्तकातच दिलेल्या चित्रांची छायाचित्रे काढून आणि त्याला निवेदनाची किंवा संगीताची जोड देत खोऱ्याने ई-पाठांची निर्मिती होऊ  लागल्याचे दिसते. बहुतेक साऱ्या साहित्यात पुस्तकातील मजकुराचेच वाचन, तेही अत्यंत कृत्रिम पद्धतीने केलेले आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर ‘बाजाराची ओळख’ हा पाठ. पुस्तकात बाजारात काय काय मिळते याची चित्रे आहेत. तीच चित्रे या साहित्यात वापरण्यात आली आहेत. ‘दोघी मैत्रिणी भाजी बाजारात गेल्या. तेथे त्यांना भाजीवाला दिसला, तो भाजी विकत होता. त्या पुढे गेल्या. फळवाला दिसला. तो फळे विकत होता..’ अशा स्वरूपातील निवेदन या दृक्मुद्रणाला आहे. जी चित्रे आणि मजकूर पुस्तकातही दिसतात, तीच मोबाइल किंवा संगणकावर पाहण्यात काय हशील? मुळात बाजाराची संकल्पना शिकवताना विद्यार्थ्यांना चलन, देवाण-घेवाण, व्यवहार ही संकल्पना स्पष्ट होणे ही साधी अपेक्षाही पूर्ण होत नाही.

शब्दांकडे दुर्लक्ष : तंत्रज्ञानाची सफाईदार हाताळणी असली तरी आशय व मांडणीचा विचार अनेक पाठांमध्ये दिसत नाही. संदीप खरेंची आणि सलील कुलकर्णी यांनी पाठय़पुस्तकात समावेश होण्यापूर्वीच चालबद्ध केलेली ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ ही कविता पहिलीला आहे. त्यावरील ‘दीक्षा’ साहित्य हे कल्पकता, सर्जनशीलता वा तत्सम कोणत्याही शब्दाशी विसंगत ठरणारे आहे. एका दृक्मुद्रणात पावसात भिजत नाचणारी मुले, दुसऱ्या दृक्मुद्रणाचे स्वरूप हे कवितेच्या ओळींशी फारसा संबंध नसलेली चित्रे आणि त्यावर उमटणाऱ्या कवितेच्या ओळी असे काहीसे आहे. कवितेतील शब्दांची मजा, ढगांचा ढुमढुम आवाज ही ध्वनीची शाब्दिक मांडणी, ‘डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार’ या कल्पनेतील गंमत अशी कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांच्या मेंदूला या साहित्यातून शिवणार का, याबद्दल शंकाच आहे.

दृश्य आणि आशयातील विसंगती : याचीही अनेक गमतीदार उदाहरणे देता येतील. ‘दशक’ आणि ‘एकक’ या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या पाठात सोफासेट, पुस्तकांची मांडणी, शोभेच्या वस्तू, गालिचा अशा घरातील आई मुलाला स्वयंपाकासाठी लाकडे आणायला सांगते! त्या लाकडांची मोळी बांधून दशक आणि एककाची संकल्पना स्पष्ट करते.

बाजारकेंद्रितता : ‘दीक्षा’वरील काही अपवादात्मक साहित्य वगळता उरलेले सर्व साहित्य हे नीरस म्हणावे लागेल. शासकीय प्रयत्नांपेक्षा खासगी प्रणालींवरील साहित्य तुलनेने अधिक सफाईदार आणि आकर्षक असले, तरी बाजारकेंद्रिततेमुळे निराळे दोष उद्भवतात. एका खासगी अ‍ॅपमध्ये पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे दृक्मुद्रण आहे. नातेवाइकांची ओळख करून देणे हा त्यातील प्रमुख भाग. मात्र, एका विशिष्ट ब्रँडचा केक. त्यानंतर पिझ्झा, शीतपेय अशी पार्टी ही मांडणी विशिष्ट वर्गातील मुलांसाठीच असू शकते. साधारण तीन वर्षांपूर्वी शासनाने विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याची सवय लागावी यासाठी उपक्रम राबवले. पैकी एक उपक्रम विशिष्ट सेकंदांत हात धुण्याची स्पर्धा असा होता. त्या खेळात प्रत्यक्ष उत्पादनाचे नाव घेतले नसले तरी विशिष्टच साबणाच्या जाहिरातीशी मिळत्याजुळत्या कृती आणि पाहिलेली जाहिरात मुलांना दोन्हीची सांगड घालण्यासाठी भाग पाडत होती. त्यातून हात धुण्यासाठी ठरावीक साबण हवा हा संदेश मुलांवर बिंबवला जात होता. सध्या खासगी अ‍ॅप्स अशाच स्वरूपाची तंत्रे ई-साहित्यात वापरताना दिसतात.

उद्देश धूसर : विद्यार्थ्यांच्या हाती साहित्य देताना त्यामागचा उद्देशही स्पष्ट असल्याचे दिसत नाही. ‘पाठय़पुस्तकाला पूरक साहित्य’ म्हणताना प्रत्यक्षात अतिरिक्त माहिती, किंबहुना पाठय़पुस्तकात आहे तेवढेही ज्ञान विद्यार्थ्यांला मिळेल असे हे साहित्य पाहून वाटत नाही. साहित्य तयार करताना ते विद्यार्थ्यांला स्वयंअध्ययनास किंवा कृती करण्यास उद्युक्त करण्यासाठी आहे, कृती करता येणार नाही अशी संकल्पना समजावून सांगण्यासाठी आहे, खेळातून शिकवण्यासाठी आहे असा कोणताही उद्देश या उपलब्ध साहित्यातून स्पष्ट होत नाही. राज्यातील वैविध्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचा भवताल, संस्कृती यानुसार साहित्य उपलब्ध होणे हा तर सद्य:स्थितीत लांबचाच पल्ला म्हणावा लागेल.

यात आणखी एक प्रश्न चिंता वाढवणारा. मुलांवरील दृश्यांच्या भडिमारात त्यांच्यातील कल्पकता खुंटण्याचा. ‘मोर रंगीबेरंगी असतो’ एवढय़ा तपशिलांवर तो नजरेस पडेपर्यंत कसा असेल याचे काल्पनिक चित्र रंगवत काही पिढय़ा मोठय़ा झाल्या. त्यातील ‘रंगीबेरंगी’ हा तपशील मनोमन रंगवताना त्या मोराची कल्पना अगदी लाल, पिवळ्या रंगातही होत होती. ‘काळा काळा कापूस पिंजला रे..’ म्हणताना- आभाळात खरेच कुणी कापूस पिंजत असेल का, या प्रश्नासह काल्पनिक चित्रे मेंदूत नकळत तरळून जात होती. दृश्ये ही ‘यथातथ्य’ माहिती पोहोचवतात. मोर जसा असतो तसाच त्यात दिसतो. हे खरे असले, तरीही आता बालवयापासून, अगदी शब्द-ओळख होण्यापासून समोर येणारी तयार दृश्ये ही कल्पनाविलास करण्याची क्षमता टिकवणार का?

शिक्षकांचे कौतुकच; पण..

कुणाला ठोस अंदाज बांधता येऊ  नये अशी अस्थिर परिस्थिती, बाजारपेठेचा रेटा यांत येत्या काळात डिजिटल किंवा ऑनलाइन अभ्यास साहित्याचा वापर हा अपरिहार्य ठरणारा आहे. मात्र, या साहित्यातून नेमके हाती काय लागते, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. या नव्या शिक्षण प्रवाहाचा हिरिरीने प्रचार करणाऱ्या शिक्षण विभागाने साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच दर्जाची जबाबदारी कुणी घ्यायची, याचे उत्तर शोधायला हवे. अन्यथा सध्या दिसणाऱ्या परिस्थितीनुसार उपलब्ध ई-साहित्याची निर्मिती आणि वापर हा वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय ठरेल.

उत्साहाने नवे काही करू पाहणाऱ्या, नव्या प्रवाहांबाबत नाक न मुरडता ते स्वीकारणाऱ्या राज्यातील शिक्षकांचे कौतुकच आहे. मात्र, तंत्रज्ञान वापरता येणे आणि आशय मांडणी या दोन्हीचा साकल्याने विचार होण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षणही द्यायला हवे. त्याचबरोबर वेळप्रसंगी त्रुटी दाखवून साहित्य नाकारण्याचे धारिष्टय़ही शिक्षण विभागाने दाखवायला हवे. नाही तर शिक्षणदीक्षा दिशाहीन होण्यास वेळ लागणार नाही.

rasika.mulye@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:08 am

Web Title: article on directionless teaching initiation abn 97
Next Stories
1 भाजपसाठी ‘हीच ती वेळ’..
2 आयुक्तांच्या नाना तऱ्हा..
3 लढाईत ढिलाई नको..
Just Now!
X