03 December 2020

News Flash

सामाजिक दरीचा संसर्ग!

करोना ही खरे तर एका विषाणूजन्य आजाराची साथ. पण तिच्या अक्राळविक्राळ रूपाने सबंध जग घायाळ, गलितगात्र झाले आहे

संग्रहित छायाचित्र

अभिजित बेल्हेकर

शहर जेवू घालत नाही आणि गाव आत येऊ देत नाही; कुटुंब बोलावते, पण गाव नाकारते – ही अवस्था समाजभावनाच कमकुवत असल्याची लक्षणे दाखविणारी आहे. तिची ही राज्यभरातील टिपणे..

‘‘गावात दुष्काळ पडला, पूर आला, मंदिराचा जीर्णोद्धार निघाला, मुंबईत कुणाचे तातडीचे काम निघाले, की आमची आठवण येते आणि आज आम्ही निरोगी असताना, आम्हाला आधाराची गरज असतानाही गावातले असूनही आम्हाला गावच्या वेशीबाहेर ठेवले जात आहे.’’

– विनायक, चिपळूण

‘‘‘लॉकडाऊन’ झालं आणि हातातलं काम गेलं. जिथं मजूर म्हणून काम करत होतो, त्या मालकानं चार पैसे हातावर देत गावी जा म्हणून सांगितलंय. गावी जायला साधन नाही. डोईवरचे ऊन आणि तापलेली सडक सोसत कालपासून बायको-लेकरासह चालतोय. वाटेत कुणाला दया आली तर प्यायला पाणी आणि दोन घास खायला देतायेत.’’

– राजू गौड (मूळ राहणार बिदर)

‘‘मी एका ‘आयटी’ कंपनीत काम करतो. कामासाठी परदेशात गेलो होतो. करोनाची साथ वाढली तसा भारतात परत आलो. खबरदारीचा उपाय म्हणून मी आल्यापासून स्वतंत्र राहतोय. तरीही आजूबाजूला राहणारे माझ्याकडे, माझ्या कुटुंबाकडे संशयाने बघत आहेत. दूध, भाजीसाठीही घरच्यांना अन्यत्र जावे लागत आहे.’’

– एक आयटी अभियंता

वरील तीनही प्रतिक्रिया या प्रातिनिधिक; पण सध्याच्या व्याधीग्रस्त समाजाच्या अंतरंगाचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.

करोना ही खरे तर एका विषाणूजन्य आजाराची साथ. पण तिच्या अक्राळविक्राळ रूपाने सबंध जग घायाळ, गलितगात्र झाले आहे. ज्यातूनच या अशा सामाजिक, आर्थिक प्रश्नाच्या नवनव्या साथींचाही जन्म झाला आहे. ज्यामध्ये या विस्कटलेल्या सामाजिक घडीचा प्रश्न तर जागोजागी सध्या ठसठसू लागला आहे.

ही माणसांकरवी देशोदेशी, गावोगावी ज्या प्रकारे पसरली, त्यातून एवढे दिसले की एकप्रकारे ‘बाहेरून येणाऱ्या माणसांकरवी’ हा आजार येतो. आता यातील हे ‘बाहेरचे’ म्हणजे सुरुवातीला परदेशातून येणारे होते आणि आता कालांतराने देशांतर्गत शहरे, महानगरांकडून आपापल्या गावाकडे धावणारा वर्गही त्यात गणला जाऊ लागला आहे. त्यातूनच गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक गावांत, निमशहरांमध्ये सामाजिक संघर्षांचे वातावरण तयार झाल्याची लक्षणे दिसताहेत.

सुरुवातीला हा आजार पुण्या-मुंबईसारख्या महानगरांपुरताच मर्यादित होता. पण जसजसे मोठय़ा शहरांमधील करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला, तसा उर्वरित महाराष्ट्रही अस्वस्थ होऊ लागला. एकीकडे संशयित रुग्णांचे रोज वाढते आकडे आणि दुसरीकडे सुरू झालेल्या वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, यांमुळे भीती आणि संशयाचे वातावरण हळूहळू वाढत गेले. यामुळे २२ मार्चच्या ‘जनता संचारबंदी’पूर्वीच अनेकांनी शहरांची हद्द ओलांडत गावचे रस्ते पकडले. दरम्यान, प्रत्येक गावा-शहरात विदेशवारी करत दाखल होणाऱ्या आकडय़ांनी या तणावात भर घातली. यातूनच हा आतले-बाहेरच्यांचा सुप्त संघर्ष पेटत गेला. आपल्या भागात कुणी विदेशातून आला आहे का, याकडे स्थानिकांच्या सुरुवातीपासूनच नजरा वळलेल्या होत्या. यामध्ये त्यांच्यावर नकळत लक्ष ठेवणे समजू शकतो, पण त्याऐवजी काही ठिकाणी त्यांना ‘लक्ष्य’ करण्याचे काम सुरू झाले होते.

प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून विदेशातून आलेल्या प्रवाशांची केवळ आकडेवारी जाहीर केली जात असताना काहींनी त्यांच्या नावपत्त्यांचा शोध घेत पाळत प्रकरण सुरू केले. नाशिकमध्ये अशा प्रकारे उठाठेव करणाऱ्यांनी जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना नाकीनऊ आणले. या विदेशवारीहून आलेल्यांना गुन्हेगार असल्याप्रमाणे वागवले गेल्याच्या तक्रारी आहेत. गावाबाहेर ठेवण्याचा, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र बाळगण्याचा आग्रह, जीवनावश्यक सुविधा देण्यास नकार देण्याचे पायंडे पडू लागले आहेत. या साऱ्यांमुळे अशी परदेशवारी करून आलेल्या किंवा त्याच्या कुटुंबाची अवस्था मात्र हतबल होत आहे.

कोल्हापुरात विदेशातून आलेल्या, पण करोना न झालेल्या आणि तरीही खबरदारी म्हणून विलगीकरणाचे १४ दिवस काढलेल्या एका प्रवाशाला तर धावत्या एसटीतून मध्येच खाली रस्त्यावर उतरवण्यात आले. तो निरोगी असल्याचे प्रमाणपत्र दाखवत असतानाही जमावाने त्याला पुन्हा नजीकच्या रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडले. विदेशवारीबरोबरच शहरातून गावाकडे निघालेल्या लोकांनाही असे भेदभावाचे, सापत्न वर्तनाचे अनुभव पुढे येऊ लागले.

कोकणातील बहुसंख्य चाकरमानी हा पुण्या-मुंबईत कामधंदा करतो आणि तिथेच मिळेल त्या छोटय़ाशा घरात दिवस काढतो. करोनासंकट उभे राहताच या हजारो कुटुंबांनी कोकणची वाट पकडली. मात्र एरवी डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांनी यंदा गावबंदीचे ठराव करत त्यांना वेशीबाहेरच रोखले आहे. मराठवाडय़ाच्या काही गावांमध्ये वेशीवर काटे टाकण्याचे, अडथळे उभे करण्याचे प्रकार घडले. विदर्भातही गावांत येणारे रस्ते खोदणे, रस्त्यांवर मोठी झाडे आडवी टाकणे असे प्रकार सुरू आहेत. गावात शिरण्याच्या रस्त्यांवर पहारे लावून, आपल्याच गावातून रोजगारासाठी बाहेर गेलेल्या गावकऱ्यांना गावात प्रवेश करण्यापासून अडवले जात आहे. विदर्भातील गावकरी मजुरीसाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठय़ा संख्येने जातात. आज करोनाच्या भीतीने परतलेले हे सर्व मजूर आणि गावकऱ्यांमध्ये प्रवेशावरून संघर्ष सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातही हीच स्थिती आहे. दूर वसतिगृहात शिकणारी मुले, हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक, मजूर या सगळ्यांना शहर जेवू घालत नाही आणि गाव आत येऊ देत नाही, अशी स्थिती झाली आहे. पुन्हा कुठे आसऱ्यासाठी धडपड केली, तर स्थानिकांपासून पोलिसांपर्यंत सगळ्यांच्या झाडाझडतीला सामोरे जावे लागत आहे.

सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्राची स्थिती काही निराळी नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांतील हजारो कुटुंबांतील एक व्यक्ती तरी पुण्या-मुंबईत स्थिरावलेली असते. अगदी मोलमजुरीपासून ते माहिती तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत हा वर्ग काम करत आहे. तेवढय़ाच संख्येने शिक्षणासाठीही पुण्यात गेलेला मोठा तरुण आहे. या सर्व लोकसंख्येने गेल्या काही दिवसांत करोनाच्या भीतीने गावाची वाट पकडली. पण वरवर प्रगतशील वाटणाऱ्या या प्रदेशातही या बाहेरून आलेल्यांना गावबंदी, बहिष्कार, कडक नियमावलींचे पालन करणे, आदी स्वयंघोषित आचारसंहितेला तोंड द्यावे लागत आहे. काही गावे कडुनिंब घातलेल्या गरम पाण्याने आंघोळ करण्याच्या सक्तीनंतर का होईना, प्रवेश देतात. पण सोलापूरच्या ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या कुटुंबीयांना संशयापोटी घराबाहेर पडू न देणे, त्यांना सार्वजनिक नळावर पाणी न देणे, अबोला ठेवणे असे सामाजिक बहिष्काराचेच प्रकार घडत आहेत. सांगलीच्या काही गावांमध्ये तर बाहेरून आलेल्यांना गावाबाहेरच रानात, एखाद्या वस्तीवर राहण्यास भाग पाडले जात आहे. पुन्हा ही प्रवेशाची सूट(?) मिळवण्यासाठी मग सरपंचाची परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि गावाशी संबंध असल्याच्या नोंदी दाखवण्याच्या अटी घातल्या आहेत.  एक प्रकारे गावातील कुटुंब बोलावते आहे, पण गाव  दरवाजे बंद करते आहे, अशी स्थिती या बाहेरून आलेल्यांची झाली आहे.

गावचे-शहरातले हा संघर्ष आणखी तीव्र झाला, तो देशव्यापी २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा झाल्यावर. कारण यामध्ये आता करोनाच्या भीतीबरोबरच रोजगार, आसरा, भूक, महागाई अशा नव्या समस्यांची भर पडली आहे. हातावर पोट असणाऱ्या, हक्काचे घर नसणाऱ्या अशा हजारोंना करोनाएवढाच मोठा प्रश्न जगण्याच्या लढाईचा आहे.

खरे तर कुठल्याही व्यक्तीला आपल्या गावाबद्दल कायम ओढ असते. तो त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय असतो. आनंदाच्या क्षणापासून ते संकटकाळी त्याला सामावून घेणारा आधाराचा थांबा त्याला वाटतो. पण आज तिथेच त्याला मिळणारी ही वागणूक चक्रावून टाकणारी आहे. आपल्याच घराची कडी वाजवताना दार लोटून बंद केल्याचा हा अनुभव त्याला जखम देणारा ठरत आहे.  ही जखम भरून यायला खूप काळ लोटावा लागेल. करोनाची साथ कदाचित काही दिवसांनी कमी होईल. पण या साथीने आपल्याकडे ही जी सामाजिक दरी तयार केली आहे, समाजात जागोजागी बहिष्काराचा संसर्ग पसरवला आहे, तो दूर होण्यास खूप काळ लोटावा लागेल.

(या लेखासाठी सतीश कामत (रत्नागिरी), दिगंबर शिंदे (सांगली), एजाजहुसेन मुजावर (सोलापूर), राखी चव्हाण (नागपूर), अनिकेत साठे (नाशिक), सुहास सरदेशमुख (औरंगाबाद) यांनी योगदान दिले आहे.)

abhijit.belhekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 12:13 am

Web Title: article on infection of the social valley abn 97
Next Stories
1 प्रशासनाचा मानवी चेहरा..
2 खरी चिंता उद्योगवाढीची..
3 मक्तेदारी मोडण्याची हुशारी
Just Now!
X