पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला फारशी किंमत न देता अनुल्लेखाने मारणे, ही आगामी निवडणुकीत स्वबळावर लढून शिवसेनेला धडा शिकविणार, याचे संकेत देण्याची राजकीय नीती होती. मुंबई महापालिका स्वत टिकवायची, तर शिवसेनेला हे आव्हान स्वीकारावेच लागेल..

‘देशाच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ टिकलेली युती,’ अशी नोंद होऊनही आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना यांच्यात मानापमान व भांडणाचेच प्रसंग वारंवार घडत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी माणूस हे मुद्दे आक्रमकपणे उचलून धरल्यावर त्यांना उदंड प्रतिसाद लाभला व शिवसेनेची ताकद राज्यात दिसू लागली. तेव्हा भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी शिवसेनेला राज्यात मोठा भाऊ म्हणत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी राज्यात शिवसेनेशी युती केली. एका झाडालगत दुसरे मोठे झाड लावले की त्याची वाढ जशी खुंटते, तसे भाजपचे झाले. त्यामुळे युतीची २५ वर्षांची वाटचाल झाली. त्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली १९९५ मध्ये युतीचे सरकार स्थापन झाल्यावर राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द भाजपने नेहमीच प्रमाण मानला व सन्मानही राखला. मात्र शिवसेनाप्रमुखांचे निधन आणि देशात नरेंद्र मोदी यांचे सत्ताग्रहण या घटनांनंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांना ‘स्वबळ’ दिसू लागले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे १५१ जागांचे ‘लक्ष्य’ भाजपला न विचारताच जाहीर केल्यामुळे शिवसेनेनेच आधी युती तोडली होती, अशी धुसफुस भाजपने करूनही युतीची चर्चा अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन-तीन दिवस उरले असेपर्यंत सुरू राहिली; पण जागावाटपात आमची मागणी पूर्ण न झाल्याने युती तोडल्याचे भाजपने जाहीर केले. ‘पुरेशा तयारीअभावी’ भाजपला राज्यात पूर्ण बहुमत नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर पहिला विश्वासदर्शक ठराव गोंधळ-गडबडीत मंजूर करवून घेण्याची ‘कामगिरी’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार पाडली. पुढे शिवसेनेला सत्तेत येण्याचे आमिष दाखवून दुय्यम मंत्रिपदे गळ्यात मारून भाजपने पक्की मांड रोवली.

‘ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत’ सत्ता काबीज करण्याचे ध्येय पंतप्रधान मोदी व अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुकाही गांभीर्याने घेऊन भाजपने सर्वाधिक नगराध्यक्षपदे काबीज केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी लगट करण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधी पक्ष म्हणूनही चांगली कामगिरी करून दाखवू शकत नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी क्रमांक एकचा शत्रूही तोच, याबद्दल भाजपमध्ये स्पष्टता आहे. विधानसभा निवडणुकीआधी युती तुटल्यापासून ते अगदी आतापर्यंत ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आणि अमित शहा यांच्यावरही तोफ डागली, त्यामुळे तर शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचेच त्यांचे मनसुबे आहेत. शिवसेना हा प्रादेशिकच आहे आणि आमच्या ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या ताकदीपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही, हे दाखवून देण्यासाठी भाजप आसुसली आहे. विधानसभेच्या वेळी युती तुटणार नाही, म्हणून गाफील असलेली शिवसेना महापालिकेसाठी मात्र पुरेशा तयारीत आहे. भाजपने आतापर्यंत दोन मोठी सर्वेक्षणे त्रयस्थ संस्थेमार्फत केली, आता आणखी एक केले जाणार आहे. मासिक सर्वेक्षणेही पक्षाकडून सुरू आहेत. भाजप स्वबळावर लढल्यास अधिक फायदा होईल आणि बहुमत मिळाले नाही, तर कल्याण-डोंबिवलीप्रमाणे गरज भासल्यास शिवसेनेची मदत घेता येईल, असे भाजपचे गणित आहे. शिवसेनेच्या अटींमध्ये अडकण्यापेक्षा व त्यांच्या कटकटींना तोंड देण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात त्यांना धूळ चारण्याची भाजप नेतृत्वाची भूमिका आहे.

विदर्भातील भाजप नेत्यांना शिवसेनेची ताकद फारशी जाणवतही नाही व फडणवीस हेच प्रदेशाध्यक्ष असताना युती तोडण्याचा निर्णय घेतला गेला, हे विसरता येणार नाही. पण भाजप पक्षश्रेष्ठी व फडणवीस हे मुरब्बी राजकारणी असल्याने शिवसेनेचा पाठिंबा घेऊन वापर तर करून घ्यायचा, मात्र एकामागोमाग एक विजय संपादन करून व भाजपची ताकद वाढवून शिवसेनेला खच्ची करायचे, या राजकीय रणनीतीनुसार भाजपची वाटचाल सुरू आहे.

प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी प्रेरणा अमित शहा यांनी कोल्हापूरला झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात गेल्या वर्षीच दिली होती. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढायची, हे भाजपने पक्के ठरविले आहे. शिवसेनेला युतीच्या चर्चेत अडकवून वेळ काढायचा व गाफील ठेवायचे, ही भाजपची रणनीती आहे. शिवसेनेला भाजपच्या राजकीय डावपेचांची कल्पना असली तरीही वारे भाजपच्या बाजूने वाहत असल्याची जाणीव असल्याने शिवसेनेला भाजपसह युती हवी आहे. शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ भाजपपेक्षा दुपटीहून अधिक असले तरी विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक संपादन केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महापालिकेतील शिवसेनेची सत्ता गेली, तर चिडून जाऊन शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढेल, ही भीती भाजपमधील एका गटाला वाटत आहे. त्या वेळी अन्य पक्ष फोडणे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्यापेक्षा शिवसेना कितीही भांडली तरी बरी, असे त्यांना वाटत आहे. मात्र शिवसेनेच्या कुबडय़ा घेऊन चालणे आता भाजप नेतृत्वाला फारसे पसंत नाही. त्या फेकून देऊन आणि शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची तयारी भाजप नेतृत्वाने केलेली आहे. केंद्रातील सरकार, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष हे अनुकूल असताना अल्पमतातील सरकार चालविणे फडणवीस यांना फारसे अवघड वाटत नाही. उलट हिंमत असेल तर पािठबा काढावाच, मग शिवसेनेतून बरेच नेते बाहेर पडतील, तुकडे होतील, असे इशारे भाजपकडून दिले जाऊ लागले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनीच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जाणीवपूर्वक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांचा उल्लेख टाळला. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी ठाकरे यांना मोदींसमवेत व्यासपीठावर निमंत्रित न केल्याने शिवसेनेने बहिष्कार घातला होता; पण तशी चूक न करण्याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी घेऊन ठाकरे यांना ‘सन्मान’ देत व्यासपीठावर आमंत्रित केले. मात्र शिवस्मारक व मुंबईत एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन साकारताना भाजपचे शक्तिप्रदर्शन घडावे, अशी भाजपची रणनीती होती. त्यातच मोदी यांनी नोटाबंदीच्या देशहिताच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा असल्याचे सांगून ‘काळा पैसा बाळगणाऱ्यांचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या मूठभरांचा विरोध’ असल्याची टिप्पणी करीत खिल्ली उडविली. नोटाबंदीमुळे होत असलेल्या जनतेच्या हालामुळे नोटाबंदीस शिवसेनेचा विरोध आहे; पण कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळणाऱ्या ठाकरे यांना मोदी यांचे हे मुद्दे निमूटपणे ऐकणे भाग पडले. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नौदलातर्फे मुंबईत भोजन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर मोजकेच उच्चपदस्थ होते. तेथे ठाकरे यांना निमंत्रणच नसल्याने अनौपचारिक चर्चेची संधीही फडणवीस यांनी दिली नाही. गिरगाव चौपाटी येथेही मोदी यांनी ठाकरे यांच्याशी केवळ औपचारिकतेपुरतेच हस्तांदोलन केले व नजरानजर झाली. मात्र शिवसेनेला फारशी किंमत देत नाही, हे मोदी व फडणवीस यांनी आपल्या देहबोलीतून व भाषणातील उल्लेखांमधून दाखवून दिले. ठाकरे हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, नेहमी सहकार्य करतात, अशी वक्तव्ये मुख्यमंत्री फडणवीस हे ठाकरेंबरोबर एका व्यासपीठावर असताना करतात. मात्र या वेळी त्यांनी शिवस्मारक व विकास प्रकल्पांचे श्रेय शिवसेनेला देण्याचे किंवा युती सरकार असा उल्लेखही करण्याचे टाळले. शिवसेनाप्रमुखांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे आणि तत्कालीन भाजप नेत्यांचे असलेले नाते व उभय पक्षांची असलेली ताकद, हे सारे काही आता बदलले आहे, त्याची तुलना करणे योग्य नाही, हे बहुधा ठाकरे यांना उमगलेलेच नाही.

umakant.deshpande@expressindia.com