पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारणही प्रादेशिकतेच्या पायावरच उभे राहिले, समाजकेंद्रित राजकारणाच्या बळावर फोफावले आणि जातीच्या आधारावर जगले. ही बाब लक्षात घेतली, तर विशिष्ट नेत्यांना वादाला सामोरे जावे लागल्यानंतर या तीन घटकांच्या प्रभावाची दखल घेणे गरजेचे ठरते. किंबहुना, असे वाद निर्माण झाले, की हे तीन घटक उघडपणे उफाळून येतात आणि त्यांच्या प्रभावाच्या प्रमाणानुसार वादाचा प्रभावही कमीजास्त होतो..

राजकारणात एखादा नवा वाद जेव्हा जन्म घेतो, तेव्हा जुना वाद कितीही वादळी असला, तरी तो आपोआप शमलेला असतो. हा इतिहास आहे, वर्तमानकाळ आहे आणि भविष्यकाळातील चित्रही तसेच असणार आहे. त्यामुळे असे वादळ सुरू झाले, की नव्या वादाला तोंड फुटेल असे कोणतेही वक्तव्य करायचे नाही, एवढा शहाणपणा, मुरलेला आणि नवशिका राजकारणीदेखील कटाक्षाने पाळतो. मग एकाच वादाचे वादळ संपूर्ण राजकारणावर घोंघावत राहते.. बाकीच्या लहानमोठय़ा वादळांमध्ये सापडलेल्यांची अलगद सुटका होते!

असे काहीसे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसू लागल्यावर, विनोद तावडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, अजितदादा पवारांपासून अगदी तटकरे, पाचपुते आणि ढोबळे असे नामोल्लेख करण्याची गरजच राहात नाही. अशा अनेक नेत्यांच्या उमेदीच्या आणि पडत्या काळाच्या इतिहासाची पाने भराभर समोर उघडी होऊ  लागतात. जेव्हा जेव्हा असे नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले, त्यांचे राजकीय अस्तित्वच पणाला लागले, तेव्हा तेव्हा नेमका एखादा नवा वाद जन्माला आला. सध्या याच इतिहासाची पुनरावृत्ती सुरू आहे. राज्याचे महसूल, कृषिमंत्री एकनाथ खडसे हे सध्या वादळात सापडल्याने कालपर्यंत महाराष्ट्रात घोंघावणारी राजकीय वादळे आपोआपच शमली आहेत. अशा वादळांच्या जन्माची कथा बहुधा सारखीच असते, असे इतिहास सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणाने याआधी अशी अनेक वादळे पाहिलेली आहेत. ‘श्रेष्ठी संस्कृती’ला आव्हान देत राज्याच्या सत्तास्पर्धेत उतरण्याची किंवा सत्तापदावर दावा सांगण्याची हिंमत करणाऱ्या जवळपास प्रत्येकासच अशा वादळाचा सामना करावा लागला आहे. त्याचे परिणाम भोगून झाल्याखेरीज, म्हणजे तो स्पर्धेतून पुरता बाहेर पडल्याखेरीज ही वादळे शमलेली नाहीत. एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादळाचा शेवट तसाच होणार, असे राजकीय पंडित छातीठोकपणे सांगू लागले आहेत, त्यामागे याच अनुभवाचा आधार आहे.

हे सारे योगायोगानेच घडत जाते, की यामागे काही सूत्रबद्ध कारणसंगती आहे, हे पाहणे मोठे रंजक असते. महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्या विशिष्ट बाबींचा भक्कम पाया आहे. त्यामध्ये समाज, जात आणि प्रदेश यांचे स्थान मोठे आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारणही प्रादेशिकतेच्या पायावरच उभे राहिले, समाजकेंद्रित राजकारणाच्या बळावर फोफावले आणि जातीच्या आधारावर जगले. ही बाब लक्षात घेतली, तर विशिष्ट काळात विशिष्ट नेत्यांना वादाला सामोरे जावे लागल्यानंतर या तीन घटकांच्या प्रभावाची दखल घेणे गरजेचे ठरते. किंबहुना, असे वाद निर्माण झाले, की हे तीन घटक उघडपणे उफाळून येतात आणि त्यांच्या प्रभावाच्या प्रमाणानुसार वादाचा प्रभावही कमी-जास्त होत जातो. एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या वादळातही हे घटक पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. मुळात महाराष्ट्रातील या तीन प्रभावशाली घटकांना छेद देणारे राजकारण अचानक उफाळते, तेव्हा असे काही वाद मुळे धरू लागतात, असे काही परिस्थितिजन्य सूक्ष्म पुरावे सापडतात. त्याचा इतिहास फार जुना नसल्याने राजकारणात त्याला ठोस पुरावा म्हणून स्थान मिळालेले नसले, तरी कालांतराने त्याची नोंद पुराव्यांच्या यादीत अपरिहार्यपणे होणार आहे. या प्रस्थापित आणि प्रभावशाली घटकांना धक्का लागला तरच वादाची मुळे वेगाने रुजतात, असेही स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होणार हे ऑक्टोबर २०१४ मध्ये स्पष्ट झाले, तेव्हा मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत खानदेशातील एकनाथ खडसे हे ओबीसी नेतृत्व पहिल्या क्रमांकावर होते. स्वत: खडसे यांनी या पदासाठी भक्कम दावा उभा केला होता. याच पदाच्या स्पर्धेत मुंबई-कोकणातील विनोद तावडे नावाच्या मराठा नेतृत्वाचीही चर्चा होत होती. पण दिल्लीत भाजपश्रेष्ठींनी विदर्भातील फडणवीस नावाच्या तुलनेने नवख्या नेत्याची निवड केली, आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन प्रभावशाली व प्रस्थापित घटकांनाच जोरदार धक्का दिला. त्याचे पडसाद उमटणे अपेक्षितच होते, आणि त्यानुसार ते उमटलेदेखील होते. महाराष्ट्राचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे असले पाहिजे, असा उघड दावा करून एकनाथ खडसे यांनी सर्वात अगोदर फडणवीस यांच्या निवडीवर नापसंती नोंदविली होती. महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकारणाला, म्हणजे, समाज, जात आणि प्रदेश या निकषांना काहीसा धक्का देणाऱ्या फडणवीस यांच्या नियुक्तीमुळे बसलेल्या धक्क्याचे पडसाद तेवढय़ावरच थांबले नव्हते. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे भक्कम आधारस्तंभ असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, पण केवळ मंत्रिपदावर त्या समाधानी नव्हत्या. पदावर नसले, तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असे थेट सांगून पंकजा मुंडे यांनी आव्हान कायम ठेवण्याचे संकेत दिले होते; तर मुख्यमंत्रिपदावर फडणवीस असले, तरी आपणच सर्वात ज्येष्ठ व योग्य नेते आहोत, असा खडसे यांचा दावा होता. तावडे यांनी थेट वक्तव्य केले नसले, तरी निवडणुकीआधीची त्यांची दावेदारी कायम असणार, याचे संकेत सरकार स्थापनेनंतरही मिळतच होते.

या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती अपरिहार्यच होती. सत्तास्पर्धेत असलेल्या नेत्यांभोवती वादाची वादळे राहिली, की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सारी शक्ती पणाला लावावी लागते, आणि स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या पुण्याईलाही धक्का लागला की आपोआपच स्पर्धेतून बाहेर पडावे लागते. त्याआधी स्वत:ला सावरण्याचे प्रयत्न करणे आणि आपापल्या बचावासाठी शक्य त्या सर्व ढाली पुढे करणे हे वादात सापडलेल्यासाठी आवश्यकच असते. पण समाज, प्रदेश आणि जातीच्या या ढाली सर्वात शेवटी पुढे केल्या जातात, असे दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा पगडा आजही आहे. पश्चिम महाराष्ट्राला डावलून महाराष्ट्राचे राजकारण होऊ  शकत नाही. प्रश्न सिंचनाचा असो वा शेतीमालाच्या उत्पादनाचा; पश्चिम महाराष्ट्राचा कल जाणून घेऊनच राजकीय निर्णय घेण्याची प्रथा आजदेखील मोडून काढली जाऊ  शकत नाही. साहजिकच, प्रदेश आणि समाज यांचा प्रभाव अशा निर्णयांवर अपरिहार्य ठरतो. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासारखे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावीपणे वावरू लागल्यानंतर ही प्रस्थापित राजकारणाची चौकट बदलण्याची भीती जन्म घेऊ  लागली, आणि मुंडे यांची राष्ट्रीय राजकारणाला गरज असल्याचे सांगितले जाऊ  लागले. पुढे मुंडे यांना दिल्लीत बसविण्याआधी राज्याच्या राजकारणात त्यांना अशाच काही वादळांना तोंड द्यावे लागले होते. त्यातून त्यांच्या नाराजीलाही तोंड फुटले होते. छगन भुजबळ या चौकटीबाहेरच्या नेत्याकडे जेव्हा मुंडे यांच्याप्रमाणेच, राज्याच्या नेतृत्वावर दावा सांगण्याची क्षमता होती, तेव्हा तेदेखील असंख्य वादळांमध्ये अडकले आणि त्याला सामोरे जाण्याची शक्ती संपुष्टात येईपर्यंत ही वादळे घोंघावतच राहिली. आता राजकारणात किंवा सत्तास्पर्धेत पुनरागमन करण्याची उमेद भुजबळ यांच्याकडे उरली असेल का, याविषयी राजकीय वर्तुळांत साशंकता आहे.

अशी वादळे निर्माण झाली, तरी त्यामुळे राजकारणाची फार मोठी पडझड होणार नाही याची काळजी अनेकांना घ्यावीच लागते. समाज, प्रदेश आणि जात या बाबींचा प्रभाव हेच त्यामागचेही कारण असते. या बाबी नजरेसमोर ठेवूनच एखाद्या नेत्याचे खच्चीकरण किंवा त्याची प्रतिमानिर्मिती करण्याची गणिते बांधली जात असतात. त्यामुळे वादळाच्या विध्वंसक टप्प्यावरदेखील, त्यामध्ये सापडलेला कोणताच नेता पुरता उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आढळत नाहीत. तसे झाले, तर राजकारणाचा पाया असलेल्या कोणत्याही एका बाबीला धक्का लागून त्याची जबर राजकीय किंमत मोजावी लागेल याचे भान ठेवावेच लागते. कदाचित त्यामुळेच चिक्की प्रकरणाच्या वादळात प्रतिमेला पुरेसा धक्का बसून मुख्यमंत्रिपदावरील दाव्याची ताकद क्षीण होताच पंकजा मुंडे यांच्याभोवतीचे वादळ शमले, तर शैक्षणिक पात्रतेसारख्या वादळास तोंड देताना विनोद तावडे यांची दावेदारी आपोआपच संपुष्टात येत गेली. दुसऱ्या क्रमांकावर राहू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्यास पहिल्या क्रमांकावर बसण्याच्या स्वप्नाची वाच्यता करणेही सोपे नसते, हा संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात पिढय़ान्पिढय़ा दिला जात असताना आणि त्याचे परिणामही स्पष्ट असताना, इतिहासाची आणि त्याच्या पहिल्या पानावरील परिणामांचीच पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे ही वादळे होतच राहणार. कारण राजकारणाची ती अपरिहार्यता असते. कोणत्याच नेत्याला आपला राजकीय आलेख सरळ रेषेत पुढे जावा अशी इच्छा नसते. आपली रेघ मोठी असावी, अशीच प्रत्येकाची आकांक्षा असते. त्यासाठी दुसऱ्याची रेघ कापण्याचे तंत्र राजकारणात वापरले जाते. या स्पर्धेत कायमचा टिकाव धरण्यासाठी, कोणतेही वादळ आपल्या आसपास फिरकणारदेखील नाही, याची दक्षता घेण्याची जी खरी गरज असते, त्याकडे मात्र कोणीच गांभीर्याने पाहात नाही. सध्या त्या इतिहासाचीच पुनरावृत्ती सुरू आहे. अशा वेळी समाज, प्रदेश किंवा जातीच्या ढाली बचाव करू शकतीलच असे नाही. गोपीनाथ मुंडे आज असते, तर महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळेच दिसले असते, असा दावा खडसे समर्थकांकडून आज केला जात आहे. त्याचे विश्लेषण करतानाही, राजकारणातील या तीन घटकांचाच प्रभाव सूचित होतो. या प्रभावामुळेच, ही वादळे किती माजू द्यायची याचाही विचार करावाच लागतो. काही काळ वादळांना तोंड दिल्यानंतर त्यातून सुखरूप बाहेर पडलेल्यांच्या दाखल्यांवरून हाच संदेश मिळत असावा.

dinesh.gune@expressindia.com