18 January 2018

News Flash

हेही क्षेत्र गेले, तर.. ?

आधुनिक भारताच्या यशगाथेत माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या भरभराटीचा मोलाचा वाटा आहे.

सचिन रोहेकर | Updated: May 30, 2017 2:19 AM

आयटीक्षेत्रातील नोकऱ्यांना लागलेली उतरंड सुरूच राहण्याची भाकिते आणि महाराष्ट्राचा आयटीवरच राहिलेला भर यांचा ताळमेळ लावणार कसा?

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अवघा तीन टक्का तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर जेमतेम टक्काभर असतानाची, सन १९६८ ची ही गोष्ट. कानपूरच्या आयआयटीतून इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगच्या अख्ख्या तुकडीला एका कंपनीने घाऊक भरती करून घेतले. आधुनिक भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी ‘टीसीएसी’ची निर्मिती त्याच साली झाली होती. तिचे सुकाणू हाती असलेल्या फकीरचंद कोहली यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील नवप्रवाहातील आपले प्रारंभिक सोबती कानपूर आयआयटीतून निवडले होते. त्या काळी भारतातील कोणतेही विद्यापीठच काय अगदी आयआयटीमध्येही कॉम्प्युटरसाठी स्वतंत्र विभाग नव्हता. पण नेमक्या त्याच वर्षी, आयआयटी कानपूरमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरची द्विपदवी घेऊन मास्टर्स पूर्ण केले होते.

आधुनिक भारताच्या यशगाथेत माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या भरभराटीचा मोलाचा वाटा आहे. या इमारतीचा मजबूत पाया टीसीएससारख्या कंपन्यांनी रचला. आज पावणेचार लाख लोकांना रोजगार देणाऱ्या टीसीएसमध्ये १९७० पर्यंत २५० कर्मचारी व केवळ २५ अभियंते सेवेत होते. संगणकीय साक्षरताच यथातथा त्यामुळे त्या काळी सॉफ्टवेअर क्षेत्राला उद्योग म्हणून दर्जा नव्हता. मग सॉफ्टवेअर सेवा निर्यातीस बँकांकडून कुठल्याही प्रकारचा पतपुरवठा, मदत मिळणे दुरापास्तच. हार्डवेअरसाठी १३५ टक्के तर सॉफ्टवेअरवर १०० टक्के असे जुलमी आयात शुल्क होते. टीसीएसला सध्याच्या उंचीवर नेणारे नेतृत्व एस. रामदोराई यांनी त्यांच्या ‘द टीसीएस स्टोरी अ‍ॅण्ड बियॉण्ड’मध्ये कंपनीच्या प्रारंभिक घडणी व अडथळ्यांचे असे किस्से सांगितले आहेत.

निम्मे शतक जवळपास सरले. मूळ परिस्थितीत आमूलाग्र व नाटय़मय बदल घडत गेले. आज तिने एक विचित्रच वळण घेतल्याचे दिसत आहे. चार-साडेचार दशकांत आयटी क्षेत्र कमालीचे भरभराटीला आले. झुळझुळीत, लठ्ठ  पगाराची सुखवस्तू नोकरी म्हणून मध्यमवर्गीयांचा या क्षेत्राकडे ओढा वाढला. जवळपास ४० लाख तरुणांसाठी ते रोजगाराचे क्षेत्र बनले. म्हणजे सरकार व रेल्वेनंतरचे सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणारे संघटित क्षेत्र! शालेय स्तरापासून इंग्रजीचे शिक्षण असल्याने, त्या बळावर भारतीय तंत्रज्ञांनी जगावर बौद्धिक साम्राज्य गाजवावे असा भारताच्या आयटी क्षेत्राचा गवगवा झाला. अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या क्षेत्रात अलीकडे होत असलेला रोजगाराचा संकोच त्यामुळेच अस्वस्थ करणारा आहे.

नवविकसित तंत्रज्ञानाचा मार्गच आता तंत्रज्ञानाधारित उद्योग क्षेत्राच्या रोजगारावर घाव घालत आहे. इंग्रजीवरील प्रभुत्व हे आपले आयटीतील वैशिष्टय़ चिनी मुसंडीने लुप्त झाले. बौद्धिक भांडवलाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या उद्योगाच्या व्यावसायिक यशाची परिमाणे, मोजपट्टय़ाच बदलल्या. प्रति ग्राहक महसुलाचा ओघ आटला, म्हणून व्यवसायाचे अर्थशास्त्रही प्रत्येक कर्मचाऱ्यामागे महसूल प्राप्ती किती याचे गणित मांडणारे बनले आहे.. यापकी नेमके काय घडत आहे, की या साऱ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे? की काळाने घेतलेले अपरिहार्य प्रक्षोभक वळण आहे? येथे पडझड होणार, जुने रसातळाला जाणार, हे संक्रमण अटळ म्हणायचे काय?

जगातील अव्वल आयटी कंपन्या भारतात कार्यरत आहेत. कॉग्निझंट, इन्फोसिस, विप्रोमधील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली किंवा त्यांच्या नोकऱ्यांवर आज टांगती तलवार आहे. आकडय़ांची मांडणी करता कैक लाख कर्मचाऱ्यांमधील काही हजारांना (सुमारे ५६,०००) घरचा रस्ता दाखविला जाणे तितकेसे भीतीदायक वाटत नाही. परंतु हे येथेच थांबणार नाही, तर पुढील तीन वर्षांत दरसाल काही लाख असे मिळून सहा लाखांच्या नोकऱ्या जाणार, असे मॅकिन्से इंडियाच्या संशोधन अहवालाचे भाकीत आहे. मुळात इतरत्र नोकऱ्यांचे स्रोत आटले असताना आहे तो रोजगारही गमावला जात असल्याचे चित्र त्रासदायक निश्चितच आहे. २०१६ साल सरत असताना अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय ‘लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो’ समूहाने १४,००० कर्मचाऱ्यांना कमी केले. एकूण कर्मचारी संख्येच्या ११.२ टक्के मनुष्यबळ घटविणारी ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कर्मचारी कपात होती. मंदावलेला व्यवसाय, वाढते डिजिटायझेशन व स्वयंचलितीकरण, पर्यायाने अनावश्यक ठरलेले मनुष्यबळ ‘ताळ्यावर’ आणणारा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय, असे त्याचे समर्थन लार्सन अ‍ॅण्ड टूब्रोचे मुख्य वित्तीय अधिकारी आर. शंकर रमण यांनी केले. यापेक्षा अधिक लक्षणीय गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे ही कर्मचारी कपात नाही, तर काळानुरूप अपरिहार्य ठरलेली ‘दुरुस्ती’ आहे. मिहद्र, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रोकडून या ‘दुरुस्ती’ची सुरुवात झाली. टाटा मोटर्सने १,५०० जण कमी केले. एचडीएफसी बँकेचे १०,००० नोकऱ्यांना कात्रीचे नियोजन आहे. म्हणजे आज आयटी क्षेत्रातील रोजगार जात्यात आहे म्हटले, तर सुपात असणाऱ्या संकटग्रस्त नोकऱ्यांचे प्रमाण अधिक भयावह आहे.

राज्याची मदार आयटीवरच

महाराष्ट्रासारख्या औद्योगिक विकासात अग्रेसर राहिलेल्या राज्यासाठी हे रोजगारहीन वाढीचे भविष्यचित्र अधिक क्लेशकारक आहे. मुंबई-ठाण्याबाहेर उद्योगांचे विकेंद्रीकरण होऊन पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही नवी केंद्रे प्रथम उदयाला आली, ती निर्मिती क्षेत्र, जसे वाहन, वाहनपूरक सामग्री, रंग-रसायने, औषधी व वस्त्रोद्योग निर्मितीतून. शिवाय ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळा’च्या छोटय़ा-मोठय़ा वसाहती या अनेक ठिकाणी वसल्या आणि कालांतराने गाशा गुंडाळून लुप्तही झाल्या. तथापि नाशिक, औरंगाबाद, पुण्यात बडय़ा उद्योगांना साजेसे पूरक घटक तयार करणारे तसेच बडय़ा उद्योगांच्या आश्रयाने लघुउद्योगांचे जाळे वाढून रोजगारनिर्मिती होत राहिली. तरी गेल्या दोन-अडीच दशकांत प्रामुख्याने नवीन रोजगार हा सेवा क्षेत्रात आणि तोही मुख्यत: आयटी आणि आयटीपूरक उद्योगातून निर्माण झाला असे राज्याचे चित्र आहे.

राज्याच्या २०१६-१७ सालच्या आíथक सर्वेक्षण अहवालानुसार, राज्यात ४८७ आयटी पार्कना परवानगी दिली गेली आहे. पुण्यात सर्वाधिक १७२, नवी मुंबईसह बृहन्मुंबई १६२, ठाणे १४०, नागपूर ५, नाशिक ५, औरंगाबाद ३ आणि वर्धा १ अशा या आयटी उद्योग केंद्रांतून १३.६६ लाख नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित आहे. सध्या याच केंद्रांत देशी-बहुराष्ट्रीय अशा सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर कंपन्यांमधून साडेसहा-सात लाख जणांना थेट रोजगार उपलब्ध होत आहे. गेली काही वष्रे दरसाल लाख – पाऊण लाख रोजगारनिर्मिती एकटय़ा आयटी व आयटीपूरक सेवा क्षेत्रातून झाली असल्याचे आकडेवारी तपासली असता ध्यानात येते.

पुणे परिसराचा आजचा बदललेला चेहरामोहरा हा आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या तेजीमुळेच आहे. ‘वायटूकेनंतरच्या संकटा’चे एक संक्रमण या क्षेत्राने लीलया पार केले. त्याच दरम्यान अनेक भारतीय तंत्रज्ञ सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या नोकऱ्या सोडून परतल्याचे दिसले. पुणे व परिसराच्या लोकसंख्येच्या वाढीने चक्रावून टाकणारा वेग पकडला. नव्या कर्मचाऱ्यांतील बहुतांश हे परराज्यांतून आलेले असल्याने त्यांच्यासाठी नवी गृहसंकुले बनली. जागांच्या किमती अवाचा सवा वाढल्या, शहराचा परीघ फुगत गेला. शहरालगतच्या शेतजमिनीवर बिगरशेतीचा वरंवटा फिरला. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तेजीने सधनांचा एक नवा मातब्बर वर्ग तयार केला. रस्ते ते पाण्यापर्यंत नागरी सुविधांवर कमालीचा ताण वाढला. पब्ज, मॉल्स, मल्टिप्लेक्स, पंचतारांकित रुग्णालये व तत्सम ऐषारामी ऐवज शहरी पर्यावरणाशी जोडलाच गेला.

अचानक संपुष्टाचे घाव

कंपनी एखाद्या गावांत वसवली जाते, गावाच्या माथ्याला प्रकल्पाचा टिळा लागतो आणि एके दिवशी कंपनी अचानक गाशा गुंडाळून ती गुडूप होते. यातून कोणकोणते बदल घडतात याचे एन्रॉनचे दु:स्वप्न अनुभवणाऱ्या गुहागर, दाभोळ परिसरातील गावांतील स्थितीवरून अंदाज लावता येईल. एन्रॉन उभे राहत असताना, या परिसरात छान काळेभोर रस्ते, अत्याधुनिक रुग्णालय, इंजिनीअिरग कॉलेज, गावांना पिण्याचे पाणी आदी सोयीसुविधा आल्या. कंपनीसाठी स्थानिकांना दलालांमार्फत रोजगार, बाहेरच्या कामगारांसाठी भाडय़ाने घरे म्हणून स्थानिक घरांच्या ओसऱ्या-मोऱ्यांनाही भाव आले. मुंबईतील जुन्या गिरणगावांतील प्रथेप्रमाणे डबेवाल्या व खानावळी स्त्रियांचा एक वर्ग तयार झाला. पसा खुळखुळणे काय असते याच्या पहिल्या प्रत्ययाने लोक आनंदून गेले. पुढे एन्रॉन दिवाळखोरीत जाऊन प्रकल्प गुंडाळला गेला. घेतलेले कर्ज, गाठीचे काहीबाही विकून सुरू केलेला छोटामोठा व्यवसाय लोकांच्या उरावर येऊन बसला.

तंत्रज्ञान बदल आणि मनुष्यबळ यांचा मेळ घालताना जे संक्रमण आयटी क्षेत्रापुढे आव्हान बनून उभे राहिलेले दिसते. तसे ते अन्य क्षेत्रांत ओघाने घडणे स्वाभाविकच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मग प्रश्न उपस्थित राहतो यापुढे काय? सततच्या दुष्काळ, नापिकी व धोरण दिवाळखोरीने आधीच शेती अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे. शेतीबाबतचा हिरमोड आणि सुस्तावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था रोजगारसंधी निर्माण करेनाशी झाली आहे. निश्चलनीकरणासारख्या सरकारनिर्मित आपत्तीने त्यात भर टाकली. रोजगाराचा मुख्य स्रोत असलेल्या लघुउद्योगाचे जमेल तितके कंबरडे या वांझोटय़ा निर्णयाने मोडून काढले. त्यातून ते पुरते सावरले आहेत, असे अद्याप तरी दिसून येत नाही. काम मागणारे हात ज्या गतीने वाढत आहेत, त्या गतीने रोजगाराची व्याप्ती वाढत नाही आणि ही तफावत अवांच्छनीय सामाजिक समस्येच्या स्फोटासाठी दारूगोळा भरण्याचे काम करीत आहे. आरक्षणासाठी झालेली ताजी लाख-लाखाची आंदोलने शांततापूर्ण राहिली असली, तरी सामाजिक सलोख्याला ग्रहण लागल्याची द्योतक आहेत. श्रम -मानववंशशास्त्रज्ञ यान ब्रेनमन यांनी वर्णन केल्याप्रमाणे – ‘कामाच्या शोधात भटंकती करणारे तांडे’ गावागावांतून शहरांना धडका देऊ लागतील. यातील एखाद्या तांडय़ाला जरी त्याच्या संघटित संहारक शक्तीचा प्रयोग करून पाहावा वाटणे आणि त्यातून स्फोटक परिस्थिती निर्माण करणे केव्हाही शक्य आहे. संभाव्य धोके ओळखले नाहीत, तर अराजकाला आमंत्रण निश्चितच!

sachin.rohekar@expressindia.com

First Published on May 30, 2017 2:19 am

Web Title: it sector job issue indian economy
 1. S
  Shetkati
  May 31, 2017 at 6:31 pm
  खूप छान झाले असेच व्हावे , IT वाल्यानीच मोदी सरकार आणले आता, त्याचा परीणाम दिसायला लागला. भिकेला लागले पाहिजेत साले.
  Reply
  1. aditya hivalkar
   May 31, 2017 at 12:19 am
   आपल्याकडे बोलले जाते कि कालानुरूप बदलावे, आजची परिस्थिती मध्ये टिकायचे असेल तर आपल्याला काळाच्या अगोदर बदलले पाहिजे जेणेकरून आपण त्या बदलत्या काळाच्या survati पासून लढायला तयार असू.
   Reply
   1. Ganesh Ghadge
    May 30, 2017 at 5:11 pm
    agree . खूपच अभ्यासपूर्ण लेख.
    Reply