News Flash

अज्ञातवासातील राजे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले

‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी’ असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन केले जाते. रयतेचे रक्षण करण्यासाठी दुष्ट प्रवृत्तींचा महाराजांनी नि:पात केला. म्हणून शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणून संबोधले जाते. मोगलाई, आदिलशाही, निजामशाहीच्या जुलमी राजवटीपासून रयतेची सुटका करण्याकरिता शिवाजी महाराजांनी लढा दिला. सैन्यापासून रयतेस त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घ्या, असा आदेशच शिवाजी महाराजांनी दिला होता. सैन्यासाठी चारा आणि धान्य बाजारभावाने विकत घ्यावा, अन्यथा सैनिक शेतकऱ्यांचे धान्य घेतील व शेतकरी नागवला जाईल. मग जनता म्हणेल यापेक्षा मोगल काय वेगळे होते? ‘एैसे झाल्यास मराठेयांची तो इज्जत राहणार नाही,’ असे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुभेदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. कोणाला त्रास देऊ नका यावर शिवाजी महाराजांचा कटाक्ष असायचा. शिवाजी महाराजांची थोरवी गायली जात असतानाच त्यांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांची कृती मात्र नेमकी उलटी असते. साताऱ्याच्या गादीचे राजे खून, खंडणी, मारामाऱ्या यांसारख्या गुन्ह्य़ांमध्ये अडकले आहेत. सध्या पोलिसांच्या नोंदीनुसार ते ‘बेपत्ता’ आहेत.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. राजकारणात गुन्हेगारांना संधी देता कामा नये, असे राजकारणी मंडळी आवाहन करतात किंवा तशी मते मांडतात, पण त्यांच्या कृती आणि उक्तीत फरक असतो. मोहम्मद शहाबुद्दीन, राजाभैया, पप्पू यादव यांच्यासारखे अनेक गुन्हेगारीची पाश्र्वभूमी असलेली मंडळी संसद किंवा विधिमंडळांमध्ये निवडून येतात. त्यांना मानाची पदे दिली जातात. निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर गुन्हेगारांचे फावते. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. ज्या पप्पू कलानीच्या विरोधात भाजपने जंग जंग पछाडले त्याच्याच मुलाला उल्हासनगर महानगरपालिका जिंकण्यासाठी जवळ केले. नाशिकमध्ये पोलिसावर हल्ला करणारा भाजपला त्यातूनच जवळचा वाटतो. उत्तर भारतातील राजकारणात गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळत गेली. फक्त निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष त्यासाठी उपयोगी ठरला. महाराष्ट्रातही अशी काही उदाहरणे आहेत. त्यात साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव प्राधान्याने घेता येईल.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना उदयनराजे भाजपवासी झाले आणि त्यांची महसूल खात्याचे राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. पुढे राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद लेवे यांच्या खूनप्रकरणी उदयनराजे यांना तुरुंगात जावे लागले. अर्थात, तुरुंगापेक्षा रुग्णालयातच त्यांचा मुक्काम जास्त काळ होता. तेथे त्यांची बडदास्त ठेवली गेल्याचा आरोप झाला. लेवे खून खटल्यात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पुढे सरकारने या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि अजूनही ते प्रलंबित आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्याकरिता त्याही वेळी भाजपच्या नेतृत्वाने उदयनराजे यांना जवळ केले होते; पण त्यांचा फायदा होण्याऐवजी उपद्रव वाढल्याने भाजपने त्यांना दूर केले. २००९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांना खासदारकीचे वेध लागले. काँग्रेसने त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले. शिवसेनेनेही खडा टाकून बघितला. शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादीला राज्यातून जास्तीत जास्त खासदार तेव्हा निवडून आणायचे होते. मग राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर मग उदयनराजेंनी राष्ट्रवादीची वाट पत्करली. राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश करण्याच्या समारंभात कोणत्या खुर्चीवर बसायचे यावरून गडबड झाली आणि राजेंचे पित्त खवळले. खुर्ची देता की जाऊ, असे दरडावताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजेंची मनधरणी करावी लागली होती. राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांचे सारेच वागणे स्वयंभू. त्यामुळे मी म्हणजेच पक्ष अशी त्यांची भूमिका कायम राहिली. अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापासून कोणालाच त्यांनी जुमानले नाही. राजेंची दादागिरी राष्ट्रवादीचे नेते निमूटपणे सहन करीत आले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उदयनराजेंना आशीर्वाद असल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा नाइलाज झाला. राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या कार्यकर्त्यांला राजे यांनी कसे बदडून काढले होते याचे किस्से विधान भवनात ऐकायला मिळतात.

पुढे उदयनराजेंची दडपशाही वाढत गेली. खंडणी, मारझोड, टोल नाक्यांवर दादागिरी, ठेकेदार, वाळूमाफियांना मदत, जमिनींच्या व्यवहारांमधील गैरव्यवहार यामध्ये राजेंची जवळपासची माणसे गुंतल्याचे आरोप झाले. या संदर्भात शेकडो लोकांच्या जमिनी बळजबरीने लाटल्याच्या तक्रारी करण्यात येतात. लोकांच्या जमिनी हडप केल्याबद्दल माजी आमदार विवेक पंडित यांनी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात स्वत: उदयनराजेच सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना मग धमकाविण्यात आले होते. एखाद्याच्या विरोधात मोर्चा काढायचा आणि त्यानेच मोर्चात सहभागी व्हायचे, असा प्रकार दुर्मीळ. उदयनराजे यांच्याबाबत तेही घडले. सातारा परिसरातील टोल नाक्यांवर राजेंचीच दादागिरी चालते. अवैध धंदेवाल्यांना राजांच्या निकटवर्तीयांचेच पाठबळ मिळते, असा आरोप साताऱ्यातील नागरिकांकडून केला जातो. जमिनी बळकाविण्यात राजांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचाच सहभाग असतो, असेही साताऱ्यात उघड उघडपणे बोलले जाते. महागडय़ा मोटारी बाळगण्याचा आणि अत्यंत वेगाने मोटार चालविण्याचा त्यांना शोक आहे. ३५ मिनिटांत सातारा ते पुणे अंतर पूर्ण केल्याचा आचरट दावा ते करतात. नेहमी त्यांच्या ताफ्यात दहा ते बारा आलिशान गाडय़ा आणि पलवानांची फौज असते. जिल्हय़ातील विविध कामगार संघटनांच्या पाठीशी उभे राहून औद्योगिक क्षेत्रात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

लोणंद येथील ‘सोना अ‍ॅलॉइज’च्या मालकाला खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न हे एक छोटेसे प्रकरण आहे. उदयनराजेंबाबत अशा गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. फक्त तक्रार करण्यास फारसे कोणी पुढे येत नाही. या कंपनीच्या मालकाने गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने उदयनराजे अडचणीत आले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटक अटळ आहे. अटकेच्या भीतीनेच बहुधा उदयनराजे साताऱ्यात येण्याचे टाळत होते. पण गेल्या शुक्रवारी ते अवतरले आणि जोरदार शक्तिप्रदर्शन केले. फटाके फोडण्यात आले. मिरवणूक काढण्यात आली. अगदी पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानावरून ही मिरवणूक गेली. फरार असलेल्या उदयनराजे यांना हात लावण्याची पोलिसांची हिम्मत झाली नाही. दुसऱ्या दिवशी कायदा सर्वाना समान व खासदार भोसले यांना अटक करणारच, असे कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी जाहीर केले. पण शहरात भर गोंगाटात खासदार महाशयांचे शक्तिप्रदर्शन सुरू असताना पोलीस काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित होतोच. हा सारा गोंधळ घातल्यावर उदयनराजे पुन्हा अज्ञातवासात गेले.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे नेते स्थानिक रहिवाशांच्या किंवा गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच धावून जातात. यामुळेच समाजाच्या दृष्टीने ते गुन्हेगार असले तरी स्थानिक जनता त्यांना डोक्यावर घेते. असाच काहीसा प्रकार उदयनराजेंबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज असल्याने त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे. स्थानिक जनता त्यांनाच साथ देते. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आपले चुलत बंधू राष्ट्रवादीचेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नीच्या विरोधात उदयनराजेंनी स्वतंत्र उमेदवार उभा केला. या निवडणुकीत राजा विरुद्ध प्रजा, असा रंग दिला. त्यात खासदार उदयनराजे यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार निवडून आला. याचाच अर्थ उदयनराजेंना जनतेची साथ आहे. पण ‘अति झाल्यावर माती होते,’ अशी मराठीतील म्हण प्रसिद्ध आहे. कोल्हापूरमध्ये राजघराण्याची परंपरा असलेल्या एका नेत्याच्या डोक्यात अशीच हवा गेली. विरोध करणाऱ्यांना वाडय़ावर बोलावून त्याचा भाऊ चाबकाने फटके देत असे. शेवटी कार्यकर्तेच त्या नेत्याच्या विरोधात गेले आणि निवडणुकीतील पराभवानंतर हा नेता राजकीयदृष्टय़ा विजनवासात गेला. उदयनराजेंच्या आई कल्पनाराजे यांच्या विरोधात मागे अशाच प्रकारचे आरोप यापूर्वी झाले होते. शिवाजी महाराजांचे वंशज, राजघराण्याची पुण्याई या जोरावर उदयनराजे आतापर्यंत निवडून आले आहेत. हक्काची जागा असल्याने साऱ्याच राजकीय पक्षांच्या त्यांच्याकडे नजरा असतात. भाजप तर अशा नेत्यांसाठी गळ लावूनच बसला आहे.

उदयनराजेंना वाचविण्याकरिता राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी आता पुढाकार घेतला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. रयतेचे कल्याण त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत सन्मानाने पाठविणारे शिवाजी महाराज कुठे आणि खून, खंडणी यांसारख्या आरोपांमुळे बदनाम झालेले उदयनराजे कुठे? नैतिकतेचा टेंभा मिरवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कथित ‘राजा’वर कारवाई करणार का, हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरातच महाराष्ट्राचे सत्त्व दडलेले आहे.

संतोष प्रधान

santosh.pradhan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 3:21 am

Web Title: marathi articles on udayanraje bhosale
टॅग : Marathi Articles
Next Stories
1 पुन्हा दुष्काळाचा उंबरठा
2 ‘कायदे’शीर गोंधळ
3 कर्जमाफीचा चक्रव्यूह
Just Now!
X