19 October 2019

News Flash

आभाळाकडे डोळे!

‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’

‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ ही प्राथमिक शाळेतली एकेकाळची कविता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे यंदाही, अद्याप तरी नाहीत. रोहिणी नक्षत्रात दमदार हजेरी लावत यंदा पावसाने राज्यभर जोरदार सुरुवात केली होती. मराठवाडय़ाच्या काही भागांत तर या काळात अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा नोंदवलेला अंदाज आणि त्यातच पूर्वमोसमी पावसाने अनेक ठिकाणी लावलेली जोरदार हजेरी यामुळे यंदाचा खरीप चांगला जाणार असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. मात्र हा आशावाद कुठेसा रुजत असतानाच पावसाळी हंगामातील भरवशाचे मृग नक्षत्र यंदा कोरडे जाऊ लागल्याने शेतक ऱ्यांच्या काळजात धस्स झाले आहे. राज्याच्या बहुतांश भागात मशागती तयार करून खरिपासाठी तयार शेती चांगल्या आणि सलग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. चालू आठवडय़ात त्याने हजेरी न लावल्यास हा हंगाम विस्कळीत होण्याचा धोका उभा ठाकला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या

पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यच्या पश्चिम भागातच झालेल्या अल्पशा पावसावर भात, सोयाबीनची थोडीफार पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्हा तर पूर्ण कोरडा असल्याने तिथे खरिपाची कुठलीच हालचाल अद्याप दिसत नाही. सातारा जिल्ह्यतील वाई, महाबळेश्वर, मेढा तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप असते. पण यंदा कमी पावसाने भाताची रोपेदेखील धोक्यात आली आहेत. अन्यत्र तर सगळा खरीप कोरडा आहे. सांगली जिल्ह्यच्या पूर्व भागात कृष्णा-वारणा खोऱ्याच्या परिसरात ७ टक्के पेरण्या झाल्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यत १ लाख हेक्टर तर सांगली, सातारा जिल्ह्यत २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मात्र चालू आठवडय़ात पाऊस न पडल्यास ही पेरणीदेखील धोक्यात येईल. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यत अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्याच झालेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यतही पावसाअभावी खरीप पेरण्या रखडलेल्या आहेत. पश्चिम भागात झालेल्या थोडय़ाफार पावसावर ११८० हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीची, तर पंधरा हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीची कामे सुरू असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यत खरिपाचे ६ लाख ५० हजार हेक्टरचे क्षेत्र असून पावसाअभावी  पेरण्या खोळंबल्या आहेत. कपाशी, सोयाबीन, मका, लाल कांदा, बाजरी या पिकांची लागवड केली जाते.

उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा

दमदार पावसाअभावी उत्तर महाराष्ट्रात जेमतेम एक टक्का पेरण्या झाल्या आहेत. त्यातही ज्यांनी पेरण्यांची घाई केली, त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. उत्तर महाराष्ट्रात खरिपाचे एकूण २२ लाख ४३ हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. आतापर्यंत केवळ २१ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होऊ शकली. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यंत कापूस वगळता अन्य कोणतीही पेरणी करता आलेली नाही. कापूस, भात, मका, बाजरी, नागली, ज्वारी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही या भागातील मुख्य पिके. पण पावसाचे आगमन लांबल्यास जादा कालावधी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी कालावधीच्या पिकांची पेरणी करावी लागते की काय, अशी स्थिती आहे. त्यातही भात पिकाला पर्यायी पीक फारसे नाही. अन्य पिकांची पेरणी लांबल्यास सूर्यफूल, बाजरी, ज्वारी, सोयाबीन या कमी कालावधीच्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळावे लागू शकते. पेरणी लांबल्याने उत्पादनात घट होईल. जळगावसह खान्देशातही पाऊस अंतर्धान पावला आहे. जळगाव जिल्ह्यत आतापर्यंत ४० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक ३६ हजार हेक्टर क्षेत्रफळावर कापूस तर उर्वरित चार हजार हेक्टरवर मक्याचा पेरा झाला आहे. यात बागायतीचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे ३० हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

कोकणात धोका टळला

कोकणात उशिरा का होईना, गेल्या शनिवारपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने भात पिकाला लावणीच्या टप्प्यावरच पहिले जीवदान मिळाले आहे. आता सुरू झालेला हा पाऊस पुढे काही दिवस सातत्य राखणे आवश्यक आहे. कोकणात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्यांना सुरुवात होते आणि त्यानंतर सुमारे चार-पाच दिवसांत पेरण्या पूर्ण होऊन शेतकरी पावसाची वाट पाहू लागतो. यंदा या पावसाचे नियोजित कालावधीपेक्षा थोडे आधीच आगमन होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज चुकला. पण  ९-१० जूनला कोकणात सर्वदूर पाऊस पडला. त्यानंतर ११ जूनपासून मात्र तो पूर्णपणे गायब झाला. काही वेळा तर चक्क ऊन पडू लागले. या बदललेल्या परिस्थितीमुळे वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली. पण गेल्या शनिवारपासून सर्वत्र चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली असून सोमवारी त्याने खास शेतीसाठी आवश्यक मध्यम लय पकडली आहे. त्यामुळे तूर्त तरी कोकणातील भातपिकावरचा धोका टळला आहे.

विदर्भात चारच टक्के पेरण्या

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर बरसलेल्या पावसाने नंतर तब्बल आठ दिवस उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्यांना सुरुवात केली नाही. नवीन पीक कर्जासाठी येणाऱ्या अडचणी आणि विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना न मिळणे या आर्थिक बाबीही पेरणीच्या विलंबाला कारणीभूत ठरल्या आहेत. नागपूर विभागात ३.३६ टक्के तर अमरावती विभागात केवळ चार टक्के पेरण्या झाल्या आहेत. विदर्भात एकूण ५१ लाख हेक्टर क्षेत्र आहे. पश्चिम विदर्भात कापूस हे प्रमुख तर पूर्व विदर्भात कापसासह धान आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. ७ जूनरोजी विदर्भात सर्वदूर पाऊस झाला. परंतु ११ जूननंतर पावसाने उसंत घेतली. या काळात ऊनही चांगले तापले. कृषी खात्याने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्या सुरू करू नका, असे आवाहन केले होते. या सर्वाचा परिणाम पेरण्या खोळंबण्यावर झाला. कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली  जिल्ह्यंत सरासरीच्या ५० ते ७५ टक्के तर वाशीम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यंत सरासरी इतका आणि यवतमाळ जिल्ह्यत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने पेरण्यांनी वेग घेतला नाही.

मराठवाडय़ात आशा-निराशेचा खेळ

तूर-हरभरा विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्रावर वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिले दोन पाऊस झाल्यांनतर पेरणी केली. मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर आस वाढली होती. मृग नक्षत्रही कोरडे गेले आणि निराशेचा हिंदोळा वाढला. हिंगोली जिल्ह्यत ४० टक्के पेरण्या झाल्या. पण आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यंत वळवाचा, मृगाचा  पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांनी पेरण्याही उरकल्या. पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवली व  मराठवाडय़ातील शेतकरी अडचणीत सापडला. औरंगाबाद जिल्ह्यत पेरणीयोग्य पाऊस अजूनही झालेला नाही. जालन्यातही परिस्थिती काहीशी अशीच. हवामान विभागाने वेळेवर पाऊस होईल, असा व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला. कृषी विभागाने १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले होते. मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. लातूर-बीड व उस्मानाबादेत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आशा-निराशेचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे.

(या वृत्तलेखासाठी दिगंबर शिंदे, अनिकेत साठे, सतीश कामत, चंद्रशेखर बोबडे, सुहास सरदेशमुख यांनी लेखन केले आहे.)

First Published on June 19, 2018 3:13 am

Web Title: monsoon in maharashtra 11