News Flash

कटुता तरीही राजकीय अपरिहार्यता

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा समोर आला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाजप आणि शिवसेनेचे आता तुटेपर्यंत ताणले गेले आहे. कमालीची कटुता आलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये संबंध सुधारण्याची शक्यता कमीच आहे. आज दिसत असलेला एकोपा दोन्ही पक्षांच्या राजकीय अपरिहार्यतेतून दिसत आहे..

‘मोठा अ‍ॅटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना कळले पाहिजे. साम, दाम, दंड, भेद.. ही निवडणूक जिंकायची असेल तर जशास तसे उत्तर दिले पाहिजे. – (शिवसेनेने सादर केलेल्या ध्वनिफितीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान असल्याचा शिवसेनेचा दावा. मुख्यमंत्र्यांकडून मात्र इन्कार.)

‘बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आता शिवविरोधी सेनेपर्यंत प्रवास झाला आहे. साम-दाम-दंड-भेद या निवडणुकीतील कूटनीतीचा अर्थ हवा असल्यास आम्ही शिवसेनेला शिकवू. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

‘पराभवानंतर श्रीनिवास वनगाला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील, असे मुख्यमंत्री सांगतात. किडे पडो तुमच्या तोंडात. मोदींची कृती बघितल्यास उचलबांगडी करून ते जेव्हा दरवाजा बंद करतील तेव्हा कुठे जाल. -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल.

‘कामेच होत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा लागलाय की काय, कळत नाही.  -आघाडीचे सरकार असताना शरद पवार यांचे विधान.

‘मी कोणाचीही वैयक्तिक वा कोणाच्या हिताची कामे करणार नाही. – तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा समोर आला. भाजप आणि शिवसेना केंद्र व राज्यात सत्तेत भागीदार असले तरी राजकीय विरोधकांप्रमाणे दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे. आधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळातही असेच वाद होत असत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांची सत्ता असली की भांडय़ाला भांडे लागतेच. भाजपच्या विरोधात शेजारील कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल(से) एकत्र येऊन गेल्या आठवडय़ात सरकार स्थापन केले, पण खातेवाटपाच्या वादातून अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत असताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून शरद पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले होते. सत्तेत एकत्र असताना किती ताणायचे याच्या काही मर्यादा असतात. दोन्ही बाजूने थोडे जुळवून घ्यावे लागते. सत्तेत एकत्र असताना शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते काँग्रेसची चांगलीच कळ काढत असत, पण काँग्रेसचे नेते सत्तेसाठी सहन करीत. भाजप व शिवसेनेत मात्र तसा समन्वय आढळत नाही. गेल्याच आठवडय़ात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली. भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी तीन मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. तरीही आमची युती नाही, असे शिवसेनेने जाहीर केले होते. फक्त तीन मतदारसंघांमघ्ये आम्ही उमेदवार उभे केले नाहीत, असे शिवसेनेचे म्हणणे होते. विधान परिषदेच्या निवडणुकीवर पालघरच्या पोटनिवडणुकीचे पडसाद उमटलेच. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने मित्रपक्ष शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केला. नाशिक भाजपमध्ये दोन गट पडले. एका गटाने राष्ट्रवादीला मदत केल्याची चर्चा आहे. विदर्भात शिवसेनेने काँग्रेसला मदत केल्याचा आरोप झाला.

महाराष्ट्राचा राजकीय बाज लक्षात घेता एका पक्षाची सत्ता मिळणे सध्या तरी कठीण दिसते. १९८५च्या निवडणुकीनंतर राज्यात एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. १९९० मध्ये काँग्रेसला १४१ जागा मिळाल्या होत्या. १९९५ पासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांची सरकारे आली आहेत. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. शिवसेनेने युती करावी म्हणून भाजप आग्रही आहे. भाजपच्या स्थापनादिनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईतील मेळाव्यात शिवसेनेबरोबर युती करण्याची पक्षाची तयारी असल्याचे जाहीर केले होते. अगदी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर युती करण्यास भाजपची तयारी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपला पूर्ण विश्वास आहे. पण वारंवार युतीकरिता शिवसेनेपुढे हात पुढे केला जात असल्याने स्वबळावर सत्ता मिळणे सोपे नाही, याचा भाजपच्या धुरिणांना अंदाज आला असणार. शिवसेनेने युतीबाबत अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. ‘भाजपबरोबरील युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली’, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त केले होते. यापुढे युती नाहीच, अशी ठाकरे यांची भूमिका आहे. युती न करण्याच्या भूमिकेवर ठाकरे किती ठाम राहतात यावर सारे अवलंबून आहे. ‘भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यास त्याचा काँग्रेसला फायदा होईल आणि राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येईल’, असे मत भाजपचे क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यावरून भाजपच्या गोटातही भीती आहे हे स्पष्ट होते.

आघाडीला पूरक स्थिती

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे सूतोवाच केले आहे. नवी दिल्लीत विरोधी नेत्यांच्या बैठकांमध्ये शरद पवार यांचा पुढाकार असतो. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनाला पवार उपस्थित होते. कर्नाटकच्या निकालानंतर राहुल गांधी यांच्या मित्रपक्षांबाबतच्या भूमिकेत बदल बघायला मिळाला. राष्ट्रवादीसाठी हे सारे अनुकूल आहे. २००४ आणि २००९ प्रमाणे काँग्रेसने राष्ट्रवादीला झुकते माप दिल्यास आघाडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आघाडी झाल्यास भाजप आणि शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतात की, नियोजित वेळेत होतात यावरही बरेच काही अवलंबून असेल.

विधानसभेच्या निवडणुकी नियोजित वेळी म्हणजे ऑक्टोबर २०१९ मध्येच होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुका आधी झाल्या आणि विधानसभा निवडणुका नियोजित वेळेत झाल्यास राजकीय चित्र बदलू शकते. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता आल्यास राज्यातील राजकीय वातावरण भाजपला अनुकूल होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यास राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवेलच हे निश्चितपणे सांगता येत नाही. अशा वेळी राष्ट्रवादी वेगळ्या पर्यायांचा विचार करू शकते. आघाडी तुटल्यास ते भाजपच्या पथ्यावरच पडेल. लोकसभा निवडणुकीत यश मिळणाऱ्या राजकीय पक्षाला पुढील सहा महिने ते वर्षभराच्या काळात होणाऱ्या राज्यातील निवडणुकांमध्ये यश मिळते, असे आपल्याकडील राजकीय चित्र आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकांमध्ये भाजपचा यशाचा आलेख चढता राहिला होता.

स्वबळावर लढण्याचा निर्धार केलेल्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान असेल. मुंबई-ठाणे, कोकण आणि मराठवाडय़ात शिवसेनेची चांगली ताकद आहे. या पट्टय़ातील १२५ जागांपैकी किती जागा शिवसेना स्वबळावर जिंकू शकते? ६२ जागा असलेल्या विदर्भात दुहेरी आकडा गाठणे शिवसेनेला कठीण जाते, असा आजवरचा अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि पुण्यातील काही भाग वगळता शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगावमध्ये भाजपला कडवी लढत द्यावी लागेल. त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपला समजा चांगले यश मिळाल्यास त्याचे राजकीय परिणाम राज्यात विधानसभा निवडणुकीत होऊ शकतात. अशा वेळी उजव्या विचारसरणीची मते भाजपकडे वळू शकतात. भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या राजकीय लढाईत शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न असेल.

भाजप आणि शिवसेनेचे आता तुटेपर्यंत ताणले गेले आहे. कमालीची कटुता आलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये संबंध सुधारण्याची शक्यता कमीच आहे. विरोधकांची पोकळी भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. म्हणूनच भाजप सरकारने कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर केल्यास त्याला शिवसेनेकडून विरोध केला जातो. कोकणातील नाणार हे ताजे उदाहरण. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करणारी शिवसेना केंद्र व राज्यातील सत्तेला अद्याप चिकटून आहे. एकाच वेळी भांडायचे आणि सत्तेतही चिकटून राहायचे ही शिवसेनेची भूमिका पक्षाला त्रासदायक ठरते. कारण शिवसेनेला सत्ता सोडवत नाही हा त्यातून संदेश जातो. पालघरमध्ये कोण कोणावर बाजी मारतो हे गुरुवारी समजेलच, पण एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांनी परस्परांना वैयक्तिक लक्ष्य केल्याने त्याचा भविष्यातील राजकारणावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

santosh.paradhan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2018 2:07 am

Web Title: shiv sena bjp relation uddhav thackeray devendra fadnavis
Next Stories
1 आरोग्याची ऐशीतैशी!
2 नेते व मंत्र्यांच्या अपयशाची प्रतीके
3 देवभूमींचा बाजार
Just Now!
X