News Flash

निदानाच्या पुढे काय?

महात्मा जोतिबा फुले यांनी त्यावर ‘उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचे संमेलन’ अशी टीका केली होती.

निदानाच्या पुढे काय?
अभिव्यक्तीच्या अन्य माध्यमांशी लिखित साहित्याला जोडण्याची जबाबदारीही ‘विद्रोही’ संमेलनांनी निभावली, त्याचे हे छायाचित्र ‘यूटय़ूब’वरून

गर्दी, खप, प्रसिद्धी अशा निकषांवर यशस्वीठरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणखी  १० दिवसांत सुरू होणार असताना, या संमेलनाला सार्थ विरोध करणारे विद्रोहीआता काय करताहेत?

. भा.संमेलनाशी त्यांचा संवाद नाही, पण तो सुरू होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नांचा हा वेध..

सन १८७८ मध्ये महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जे मराठी साहित्य संमेलन भरले होते त्याची नोंद ‘पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अशी केली जाते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यावर ‘उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचे संमेलन’ अशी टीका केली होती. समाजातील नाही रे वर्गाची दखल न घेणाऱ्या ‘घालमोडय़ा दादां’च्या संमेलनाविरोधातील महात्मा फुले यांचा हा आवाज विद्रोहाचा होता, हेही सगळ्यांना ठाऊक आहे. या ठाऊक असलेल्या गोष्टींची उजळणी आज येथे करण्याचे निमित्त म्हणजे डोंबिवलीत येत्या ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी होत असलेले ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. कुणी कितीही टीका करो, कुणी काहीही आक्षेप घेवो, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ असे बिरुद लावलेली संमेलने यशस्वी होतातच, हे नाकारून चालणार नाही.. अर्थात हे यश कस, गुणवत्ता, समृद्धी, आशयगर्भता या मोजमापांवरचे नव्हे, तर, गर्दी, बडय़ा मंडळींची उपस्थिती, पुस्तकांचा खप, प्रसिद्धी या निकषांवर ते मोजलेले असते. या धर्तीवर, अशा संमेलनास विरोध असणारा विद्रोहाचा आवाज आज कुठे आहे, याचा धांडोळा घेणे आवश्यक वाटते.

अगदी आत्ताआत्ताचा इतिहास पाहायचा तर प्रस्थापित साहित्य संमेलनाविरोधात पहिला मोठा निषेधध्वनी घुमला होता तो मुंबईच्या धारावीत सन १९९९ मध्ये विद्रोही साहित्य संमेलनात. सामाजिक परिवर्तनाची आस असलेले, आणि त्याच रीतीने साहित्याची मांडणी करणारे बाबूराव बागूल हे त्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन आयोजित करण्यामागील मुख्य संस्था होती ती ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ’. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास विरोध’ ही विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील मुख्य प्रेरणा होती. ‘प्रस्थापितांच्या संमेलनात जो साहित्यिक, सांस्कृतिक व्यवहार होतो तो आपला नाही.. आपण तेथे उपरे आहोत, तेथे आपल्या मूल्यांना, तत्त्वांना नकार मिळतो आहे’, अशी तीव्र भावना असलेल्या मंडळींनी या संमेलनाची उभारणी केली. त्यातील विद्रोहाची ठळक दखलही घेतली गेली.

पुढच्या काळात या ‘केवळ विरोध’ भूमिकेत काही बदल होत गेले. मात्र ते घडत असताना वैचारिक, तात्त्विक मतभिन्नतेमुळे या विद्रोहाच्या प्रवाहातही फूट पडत गेली. ही फूट फाळणी म्हणावी इतकी तीव्र नव्हती व नाही. अशा प्रकारच्या फुटीचा फायदा-तोटा दोन्ही असतो. फायदा असा की मुख्यत्वे वैचारिक, तात्त्विक व कृतीचा अवकाश अधिक उपलब्ध होतो. तोटा असा की एकसंध आवाज उरत नसल्याने तो क्षीण होण्याचा धोका असतो. आजमितीस महाराष्ट्रात साहित्याशी संबंधित छोटी-मोठी मिळून जवळपास २७० संमेलने होतात. त्यातील प्रस्थापितविरोधाचा आवाज असलेली संमेलनांची संख्या बऱ्यापैकी आहे. नुकतेच पुण्यात झालेले विचारवेध संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन आदी संमेलनांना प्रदीर्घ व समृद्ध अशी वैचारिक परंपराही आहे. इतक्या संख्येने संमेलने घेण्यापेक्षा एकच एक मोठे संमेलन घेणे शक्य नाही का? विद्रोही साहित्य संमेलनाचे एक प्रमुख प्रवक्ते अविनाश कदम यांच्या मते, ‘असे एकच एक संमेलन झाले तर उत्तमच, मात्र ते होत नसेल तरी वेगवेगळी संमेलने होण्यात काहीच हरकत नाही.’ ‘संमेलने वेगवेगळी झाली तरी त्यांतील सहभागी लोकांमध्ये संवाद असावा, तो वाढावा. साहित्य व्यवहारातील, आणि एकूणच प्रतिगामी शक्तींविरोधात एकत्रित लढा मात्र आवश्यक आहे,’ हे त्यांचे सांगणे. याच विद्रोही धारेचे आणखी एक महत्त्वाचे प्रवक्ते किशोर ढमाले यांच्याही मते प्रतिगामी प्रवृत्तींबद्दल प्रश्न विचारत राहणे नितांत आवश्यक आहे. ‘विद्रोही साहित्य चळवळीस फार मोठे यश अद्याप मिळालेले नसले, तरी या चळवळीची दिशा योग्य आहे,’ असे या दोघांचेही म्हणणे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हे मुळात, अ. भा. मराठी साहित्य संमेलन हा एकमेव मुख्य प्रवाह आहे, हे मानत नाहीत. ‘महामंडळाचे संमेलन हा मुख्य प्रवाह आणि इतर प्रवाह गौण ही धारणा चुकीची आहे. आम्ही राजे आणि इतर प्रजा अशी मांडणी होऊ  शकत नाही. त्याच वेळी, विविध प्रकारची साहित्य संमेलने होण्यात काहीच वावगे नाही. कारण त्यातून साहित्य व्यवहारवाढीस लागून साहित्य अधिक समृद्ध होते,’ असे त्यांचे म्हणणे. ‘विद्रोही असोत वा अन्य प्रवाह, महामंडळाने साऱ्यांशीच सुसंवादी असायला हवे; मात्र संवाद ही दुतर्फी प्रक्रिया आहे, एकतर्फी नव्हे. विद्रोही व इतर प्रवाहांतील मंडळींशी आम्ही संवादप्रक्रिया सुरू केली आहे,’ अशी माहिती ते देतात.

आज, भोवताली सगळीकडेच, सगळ्यांच पातळ्यांवर बदल घडत असताना विद्रोही साहित्य चळवळीतील बऱ्याच मंडळींचे एका गोष्टीवर एकमत आहे, ते म्हणजे ‘काळ बिकट आला आहे. आपल्या समोरची आव्हाने मोठी आहेत. त्या तुलनेत आपल्याकडील मनुष्यबळ, आर्थिक बळ, सत्ताबळ अत्यंत तुटपुंजे आहे. तरीही आपल्याला लढाई लढायची आहे.’ ही लढाई लढायची कशी? तर, केवळ भाबडा आशावाद, समतेच्या मूल्यांवरील निष्ठा, प्रज्ञा या जोरावर ही लढाई जिंकणे खूपच कठीण आहे. (अर्थात या वास्तवाचे पक्के भान त्यांना आहेच.) विद्रोही चळवळीची छोटय़ा प्रमाणावरील संमेलने ठिकठिकाणी सातत्याने होत असतात. मात्र त्यास अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळत नाही, हे या चळवळीतील लोकही मान्य करतात. मोठय़ा स्वरूपातील संमेलनास मात्र चांगला प्रतिसाद मिळतो, असा त्यांचा अनुभव. पण, मुळात एखाद्या संमेलनाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या प्रवाहाला विरोध करायचा म्हणून आम्ही उभे आहोत, हा पवित्रा किती काळ घ्यायचा, हे ठरवणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्याचसोबत, मुख्य प्रवाहातील सारेच त्याज्य, ही भावना जर ते बाळगून असतील, किंवा दर्शवीत असतील तर त्यावर त्यांना फेरविचार करावा लागेल. अ. भा. मराठी साहित्य संमेलन ही विविध अंगांनी प्रस्थापित असलेल्या वर्गाची मक्तेदारी असल्याचा आरोप खोडून काढणे कठीण आहे. मात्र त्याच वेळी या संमेलनांतही होत असलेल्या काही बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नारायण सुर्वे, केशव मेश्राम, नागनाथ कोत्तापल्ले आदी मंडळींनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. या मंडळींची वाटचाल प्रस्थापित विचारसरणीच्या सोबतीने झालेली नव्हती. संमेलनांचा एकूण विचार करता अशा अध्यक्षांची संख्या खूपच कमी आहे, हे मान्य. पण ती मंडळी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली, ही बाब एकंदर प्रस्थापितानुकूल व्यवस्था लक्षात घेता महत्त्वाची आहे. त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेचा प्रश्न नव्हताच, प्रश्न होता तो व्यवस्थेचा. शिवाय प्रस्थापित व्यवस्थेने आयोजित संमेलनाचे आपण अध्यक्ष आहोत, म्हणून त्याविरोधात बोलायचे नाही, असे वर्तनही त्यांच्याकडून झाल्याचे दिसत नाही. (चिपळूण संमेलनात परशुरामाचे समर्थन केल्याचा प्रयत्न झाल्यानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष कोत्तापल्ले यांनी समारोपाच्या व्यासपीठावरून त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती, हे अलीकडचे उदाहरण.) प्रस्थापितविरोधी विचारसरणीची मंडळी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गेली म्हणजे त्यांनी काही तरी वैचारिक पाप केले, आणि तीच मंडळी पुन्हा आपल्या व्यासपीठावर आली म्हणजे ती विचारांना जागली, अशी धारणा उराशी बाळगून बसणे योग्य की अयोग्य याचा विचार व्हायला हवा. व्यासपीठे भले वेगळी असतील, विचारांत भले भिन्नता असेल, लेखक-कवी-साहित्यिक अशा लोकांनी एकमेकांच्या व्यासपीठांवर जायलाच हवे. संवादी राहायलाच हवे. त्यात स्वत:चा कस, सत्त्व हरवणार नाही, हे पाहणे त्यांची जबाबदारी.

‘काळ बिकट आला आहे’ हे म्हणणे म्हणजे या विद्रोही मंडळींनी केलेले निदान. पण बिकट काळाचा सामना करायचा तर केवळ निदान करून थांबून चालणार नाही. ‘आमची लढय़ाची दिशा योग्य आहे, पण म्हणावे तितके यश मिळत नाहीये,’ हे झाले त्यांचे आत्मपरीक्षण. पण तेवढय़ावरच समाधान मानून भागणारे नाही. त्यासाठी खंडित लढाई एकसंध करावी लागेल. विशेषत: संपूर्ण जगच खंडित, दुभंग अवस्थेत असताना त्याची आवश्यकता अधिकच. मतभेद असणारच, पण त्यातूनही हिताच्या समान मुद्दय़ांवर लढाई लढता येईल. तसे झाले नाही तर आणखी दहा वर्षांनीही अशीच संमेलने होत राहतील, असेच निदान काढले जाईल, असेच आत्मपरीक्षण केले जाईल. त्यातून साध्य काहीच होणार नाही. ‘आपण विचार करीत आहोत,’ एवढेच काय ते समाधान हाती लागेल, बाकी काही नाही.

rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:16 am

Web Title: vidrohi sahitya sammelan sahitya sammelan
Next Stories
1 मोडकी बाके, डिजिटल शाळा!
2 प्रशासनाचा सूर जुळेल?
3 ‘युती’तली भाजपनीती  
Just Now!
X