गौरव सोमवंशी

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

‘बिटकॉइन’मध्ये वापरण्यात आलेली ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाची यंत्रणा इतरही क्षेत्रांत तिच्यात काहीसे बदल करून वापरता येते हे जसजसे ध्यानात येऊ लागले, तसतसे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय झाला. मग गरजेनुसार केलेल्या प्रयोगांतून ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे काही प्रकारही आकारास आले, ते कोणते?

नव्वदच्या दशकात इंटरनेट नेमके काय आहे हे समजून सांगण्यासाठी ईमेल हे सटीक उदाहरण ठरले असते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, इंटरनेट हे फक्त ईमेलपुरतेच मर्यादित आहे. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि ‘बिटकॉइन’ यांचे नातेही तसेच काहीसे आहे. गेल्या काही लेखांमध्ये आपण बिटकॉइनविषयी सविस्तर जाणून घेतले. त्यातून आपल्या हे ध्यानात आले असेलच की, बिटकॉइन हे पुढील चार गोष्टींचे मिश्रण आहे : (१) ‘ब्लॉकचेन’वर आधारित नोंदवही- म्हणजेच माहिती साठवून ठेवण्याची पद्धत, (२) बहुमत जुळवून आणण्यासाठी वापरली जाणारी ‘प्रूफ ऑफ वर्क’ कार्यप्रणाली, (३) फक्त इंटरनेटद्वारे एकमेकांशी संवाद साधून काम करू शकणारी ‘पीअर टु पीअर’ नेटवर्क प्रणाली आणि (४) कूटशास्त्र (क्रिप्टोग्राफी).. या चार पायांवर ही प्रणाली ११ वर्षांपासून उभी आहे.

परंतु यामध्ये ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा फक्त एक प्रकार वापरला गेला आहे. बिटकॉइनला ‘वितरित-विकेंद्रित (डिस्ट्रिब्युटेड-डिसेंट्रलाइज्ड) नोंदवही’ असे म्हटले जाते. मात्र, त्यात ‘वितरित’ हा गुणधर्म किती प्रमाणात आहे, ‘विकेंद्रित’ हा गुणधर्म अल्प प्रमाणात आहे की संपूर्ण आहे, यावरून ‘ब्लॉकचेन’मध्ये काही मुख्य प्रकार पडतात. आजच्या लेखात त्याविषयी जाणून घेऊ या..

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली तेव्हापासूनच ते वितरित आणि संपूर्ण विकेंद्रित असावे हा त्यामागील उद्देश होता. कारण या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी, उपयोजनासाठी- उदा. बिटकॉइनसारख्या प्रणालीत- त्याचीच आवश्यकता होती. यात थोडे जरी नियंत्रण केंद्रित केले असते, तर कदाचित बिटकॉइनचे मूळ मूल्य हरपले असते. पण बिटकॉइनमध्ये वापरण्यात आलेली ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची यंत्रणा इतरही क्षेत्रांत त्यात काहीसे बदल करून वापरता येते हे जसजसे ध्यानात येऊ लागले, तसतसे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे एक स्वतंत्र अभ्यासाचे क्षेत्र बनले. मग गरजेनुसार प्रयोग करीत गेल्याने या तंत्रज्ञानाचे काही प्रकारही आकारास येत गेले. तसे चार प्रकार आता प्रामुख्याने वापरात आहेत, ते पुढीलप्रमाणे : (१) सार्वजनिक (पब्लिक) ब्लॉकचेन, (२) खासगी (प्रायव्हेट) ब्लॉकचेन, (३) गटाधारित (फेडरेटेड) ब्लॉकचेन आणि (४) संकरित (हायब्रिड) ब्लॉकचेन.

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या या प्रकारांविषयी आता थोडक्यात माहिती घेऊ..

(१) सार्वजनिक (पब्लिक) ब्लॉकचेन : बिटकॉइन हे याचे उत्तम उदाहरण. नावानुसार सार्वजनिक ब्लॉकचेनमध्ये कोणीही कधीही सहभागी होऊ शकतो आणि कोणालाही यामध्ये विशेषाधिकार नसतो, सारे समान असतात. सर्व काही सार्वजनिक ठेवून प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये हे साध्य करणे काही सोपे नाही आणि याचविषयी आपण मागील काही लेखांत जाणून घेतले. यास परवानगीविरहित (पर्मिशनलेस) ब्लॉकचेनदेखील म्हणतात. कारण यामध्ये कोणासही काही विशेष परवानगी किंवा अधिकार देण्यात आलेले नाहीत. जर बिटकॉइनसारखेच एक कुटचलन (क्रिप्टोकरन्सी) बनविणे हे आपले ध्येय असेल, तर सार्वजनिक ब्लॉकचेन हाच उत्तम पर्याय ठरतो. कारण पैसा कोणी, कधी, कसा वापरावा यावर ज्याचे-त्याचे नियंत्रण हवे. सार्वजनिक ब्लॉकचेनमध्ये सहभागी एकमेकांना ओळखण्याने वा न ओळखण्याने काहीही फरक पडत नाही. कारण यात प्रत्येकाने खरे वागण्याचे बंधन आणि त्यासाठी प्रेरक कारणही आहे. प्रत्येकाकडे असलेल्या बिटकॉइनचे मूल्य तेव्हाच कायम राहील, जेव्हा ते खऱ्या व्यवहारांवर अवलंबून असेल. प्रत्येकाची खरे वागण्याची बांधिलकी ही बिटकॉइनद्वारे जोडली गेली आहे. इथे आपण बिटकॉइनला ‘मूळ टोकन’सुद्धा म्हणू शकतो. सार्वजनिक ब्लॉकचेनमध्ये अशा मूळ टोकनची गरज असतेच; कारण इथे अनोळखी लोकांमधील व्यवहारात आपल्याला प्रत्येकाचे हितसंबंध एकमेकांशी जोडायचे आहेत. अमेरिकी गणितज्ञ नसिम निकोलस तालेब यांचे ‘स्किन इन द गेम’ हे पुस्तक यासंदर्भात आठवते. या पुस्तकाचे शीर्षकच सुचवते की, कोणत्याही संस्थेच्या किंवा प्रणालीच्या यश-अपयशाबरोबर त्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींचे हितसंबंध जोडले गेले नसतील, तर ते नीट काम करणारच नाहीत. त्यासाठीच सार्वजनिक ब्लॉकचेनमध्ये बिटकॉइनसारखे काही मूळ टोकन असतेच. याच कारणामुळे सार्वजनिक ब्लॉकचेनची कार्यप्रणाली थोडीशी संथ असते (आठवा : प्रत्येक मिनिटाला किती व्यवहार ब्लॉकबद्ध होतील, या वादावर पर्याय काढण्यासाठी केलेली धडपड आणि त्यावरून झालेले ‘हार्ड फोर्क’ याबाबत आपण मागील काही लेखांत पाहिले आहेच!).

(२) खासगी (प्रायव्हेट) ब्लॉकचेन : जेव्हा ब्लॉकचेन डाटाबेसमध्ये ‘ब्लॉक’ कोणी बनवावे, कोणती माहिती टाकावी, कशा प्रकारे संपूर्ण प्रणालीची रचना करावी, हे सारे एका संस्थेच्या नियंत्रणात असेल, तेव्हा त्यास खासगी ब्लॉकचेन म्हटले जाते. जेव्हा संस्थेला आपल्या माहितीला अधिक दुजोरा द्यायचा असेल आणि ती माहिती नंतर केवळ माहितीकरिता सार्वजनिक करायची असेल, तर खासगी ब्लॉकचेनचा उपयोग केला जातो. या ब्लॉकचेनमध्ये मूळ टोकन असावे किंवा नसावे हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे यात बिटकॉइनसारखे एखादे मूळ टोकन नसेलही. पुरवठा-साखळी (सप्लाय चेन) व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारच्या ब्लॉकचेनची गरज भासते. यामध्ये विजेचा वापर करून पर्यावरणपूरक नसलेल्या ‘प्रूफ ऑफ वर्क’चीसुद्धा गरज नाही. कारण यामध्ये माहिती ‘कोणी’ टाकली हे जाहीर असतेच; फक्त ती टाकल्यानंतर त्यात काही फेरबदल तर केले गेले नाहीत ना, याची खात्री इतरांना दिली जाऊ शकते. सरकारी दस्तावेज साठवून ठेवणे हेसुद्धा याचे उदाहरण. मूळ टोकन नसल्यामुळे आणि तुलनात्मकदृष्टय़ा सार्वजनिक पद्धतीपेक्षा सोपी पद्धत असल्यामुळे यात ‘ब्लॉक’मध्ये माहिती साठवून ठेवण्याचा वेग बराच वाढवता येऊ शकतो.

(३) गटाधारित (फेडरेटेड) ब्लॉकचेन : जर अनेक संस्थांनी एकत्र येत एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण विश्वासार्ह पद्धतीने आणि तत्परतेने व्हावी असे ठरवून एक ब्लॉकचेन सुरू केल्यास, त्याला आपण गटाधारित ब्लॉकचेन म्हणू शकतो. २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘बँकचेन’ नावाचा असाच एक प्रकल्प जाहीर केला होता, ज्यामध्ये भारताच्या प्रमुख बँकांनी मिळून एक ब्लॉकचेन सुरू करण्याचे ठरवले होते. एका बँकेकडे असलेली तुमची माहिती दुसऱ्या बँकेबरोबर पारदर्शक, विश्वासार्ह आणि तत्पर मार्गाने पाठवता यावी असा उद्देश त्यामागे होता. भविष्यातील याच्या उपयोगाचे एक उदाहरण म्हणजे, एकदा बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली किंवा नोंदणीप्रक्रिया पार पाडली, की नवीन बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही. या प्रकारात कोणाला काय अधिकार असतील हे अगोदरच ठरवलेले असते आणि या प्रक्रियेत कोणालाही परवानगीशिवाय सहभागी होता येत नाही. समुद्रमार्गे होणाऱ्या आयात-निर्यातीमधील कागदी व्यवहार बंद करून ते पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘ट्रेडलेन्स’ ही प्रणालीसुद्धा याचेच उदाहरण आहे.

(४) संकरित (हायब्रिड) ब्लॉकचेन : सार्वजनिक आणि खासगी- दोन्ही ब्लॉकचेनचे गुणधर्म मिळून बनवलेले ब्लॉकचेन म्हणजे संकरित ब्लॉकचेन. ‘रिप्पल’ ही बहुचर्चित ब्लॉकचेन प्रणाली याचे उदाहरण आहे. या प्रणालीत काही भाग हा खासगी पद्धतीने नियंत्रित केला जातो, पण माहितीची शहानिशा काही प्रमाणात सार्वजनिक पद्धतीने केली जाते. संकरित ब्लॉकचेनमध्ये सहसा कोणी सहभागी व्हावे याचे पूर्ण निर्णय हे केंद्रित पद्धतीने घेतले जातात. एकदा का तुम्ही यात सहभागी झालात, की माहितीची शहानिशा करण्यासाठी किंवा ती सार्वजनिक करण्यासाठी तुम्ही मोकळे! संकरित आणि गटाधारित ब्लॉकचेनमध्ये अनेक साम्ये आहेत. परंतु मूळ फरक हा सहजरीत्या सहभाग आणि सार्वजनिक प्रणालीच्या वापराच्या प्रमाणाचा आहे.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io