28 November 2020

News Flash

अधिकारांसाठी दुसरा मार्ग..

हर्नाडो डी सोटो हे मूळ पेरूचेच असले, तरी त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले

हर्नाडो डी सोटो

गौरव सोमवंशी

ऐंशीच्या दशकात दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात वाढत्या आर्थिक विषमतेमुळे जनमानसात असंतोष वाढला होता. ‘सेण्देरो लुमिनॉसो’ या संघटनेने त्यास उग्र स्वरूप दिले. या यादवीने जवळपास कोसळण्याच्या अवस्थेत पोहोचलेल्या या देशाला एका अर्थशास्त्रज्ञाने सावरले. या अर्थशास्त्रज्ञाने नेमके काय केले आणि त्याचा ‘ब्लॉकचेन’शी काय संबंध?

दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशासाठी ऐंशी-नव्वदची दशके प्रचंड घुसळणीची ठरली. पेरूत यादवी निर्माण करणाऱ्या ‘सेण्देरो लुमिनॉसो’ (म्हणजे ‘प्रकाशमय मार्ग’) नावाच्या एका अतिरेकी संघटनेने देशातील जवळपास ६० टक्के जमिनीवर ताबा मिळवला होता. या संघटनेने पेरूमधील गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या दरीला अधोरेखित करत जनसामान्यांतील असंतोषाला उग्र स्वरूप दिले होते. त्यातून हा देश आता कोसळणार असे भाकीत तेव्हा वर्तवले जात होते. मात्र एका अर्थशास्त्रज्ञाने या बिकट परिस्थितीतून पेरूची सुटका केली होती. यात त्या अर्थशास्त्रज्ञावर अनेकदा प्राणघातक हल्लेही झाले, पण तो डगमगला नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्याच्याबद्दल ‘वर्तमान जगातील सर्वात महान अर्थशास्त्रज्ञ’ असे कौतुकोद्गार काढले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीसुद्धा त्याची प्रशंसा केली आणि अनेकांच्या मते या अर्थशास्त्रज्ञास नोबेल मिळायला हवे.

हर्नाडो डी सोटो हे ते अर्थशास्त्रज्ञ. त्यांनी पेरूला त्या संकटातून कसे बाहेर काढले आणि त्या साऱ्याचा ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’शी काय संबंध आहे, ते पाहू या.

हर्नाडो डी सोटो हे मूळ पेरूचेच असले, तरी त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले. ‘मालमत्तेचा अधिकार’ हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात, वयाच्या ३८व्या वर्षी ते मायदेशी परतले अन् त्यांना अतिरेकी विचारांनी ग्रासलेल्या पेरूचे दर्शन झाले. पेरूत आल्यावर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ लिबर्टी अ‍ॅण्ड डेमोक्रसी (आयएलडी)’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पेरूमधील गरिबीच्या समस्येचा अभ्यास केला. पेरूतील गरिबीचे भांडवल करूनच ‘सेण्देरो लुमिनॉसो’ ही अतिरेकी संघटना फोफावली होती. मात्र या संघटनेप्रमाणे समस्येच्या केवळ लक्षणांवर केंद्रित होण्याऐवजी तिच्या मुळांवरच घाव घातला तरच काही दीर्घकालीन उपाय निघू शकतो, हे डी सोटोंनी जाणले होते. ते कसे, हे त्यांनी ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘द ऑदर पाथ : द इन्व्हिजिबल रिव्हॉल्यूशन इन द थर्ड वर्ल्ड’ या पुस्तकात मांडून जणू ‘सेण्देरो लुमिनॉसो’ला आव्हान दिले होते. दुसरा मार्ग सांगणारे हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालेच, पण त्यातील विचारांची अंमलबजावणीसुद्धा पेरूच्या सरकारकडून होऊ लागली.

जगातील बहुतांश लोकसंख्या (सुमारे ५०० कोटी) ही असंघटित क्षेत्रात कार्यरत आहे. कोणी झोपडीतून छोटा व्यवसाय करतात, कोणी भाजीपाला वा पाणीपुरीचा गाडा चालवतात, कोणी गॅरेज थाटून आपला उदरनिर्वाह करतात; हे सारे करताना बहुतांश जणांकडे स्वत:ची मालमत्ता किंवा व्यवसाय सिद्ध करण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा नोंदणीपत्रे नसतात. असे का होते, हे डी सोटो यांनी पेरूतील झोपडपट्टय़ांत फिरून तिथल्या लोकांकडून जाणून घेतले. याआधी खुद्द डी सोटो यांचे स्वत:च्या संस्थेची नोंदणी करण्यात जवळपास ३० दिवस खर्ची झाले होते. याच कामासाठी झोपडपट्टीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस सरासरी २८९ दिवस लागत. परंतु डी सोटो यांना या प्रक्रियेत फारशी दगदग झाली नाही. कारण संस्था स्थापन करताना डी सोटो यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसे होते, सरकारी विभागांत ओळखी होत्या आणि लागणारी सर्वच कागदपत्रे सहजरीत्या उपलब्ध होती. नेमके हेच असंघटित क्षेत्रात उपलब्ध नसते.

याचे परिणाम काय होतात? तर.. असंघटित क्षेत्रातील एखाद्यास आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर अधिकृत नोंदणी नसल्याने ते शक्य नसते. झोपडपट्टीत स्वत:ची जागा असली, तरी त्या जागेची नोंदणी अथवा कागदपत्रे नसतात. मग अशा असंघटित क्षेत्रातील लहान व्यावसायिकांना सावकारांवर विसंबून राहावे लागते. म्हणजे स्वत:चा व्यवसाय असताना आणि स्वत:ची मालमत्ता असतानाही ही परिस्थिती उद्भवते. त्यास डी सोटो ‘डेड कॅपिटल’ (मृत भांडवल) असे म्हणतात. कारण या भांडवलाचा वापर त्याचा मालक करू शकत नाही, त्याच्याआधारे कोणती गुंतवणूक उभारू शकत नाही आणि त्याच मालमत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी कोणतेही आर्थिक प्रोत्साहन मिळत नाही. ‘मृत भांडवल’ ही संकल्पना डी सोटो यांनी २००० साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘द मिस्टरी ऑफ कॅपिटल’ या पुस्तकात विस्ताराने मांडली आहे.

मालमत्तेच्या अधिकाराचे महत्त्व इथेच संपत नाही. समजा, स्वत:च्याच अस्तित्वाची किंवा स्वत:च्या व्यवसायाच्या अस्तित्वाची कोणतीच अधिकृत नोंदणी नसेल तर ते केव्हाही कोणीही हिसकावून घेऊ शकते (उदाहरणार्थ, टय़ुनिशियात २०१० साली मोहम्मद बौझिझी या भाजी विक्रेत्याने त्याच्या गाडय़ाची पोलिसांनी नासधूस केल्याने हतबल होऊन स्वत:स जाळून घेतले. ही घटना टय़ुनिशियातील क्रांतीसाठी ठिणगी ठरली आणि नंतर त्याचे रूपांतर ‘अरब स्प्रिंग’मध्ये झाले.). डी सोटो यांच्या मते, मालमत्तेच्या अधिकाराअभावी अनेक व्यवसाय वाढूच शकत नाहीत.

मग यावर उपाय काय?

डी सोटो यांनी आपल्या संस्थेमार्फत पेरूच्या सरकार-प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आणि त्याची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही हेसुद्धा पाहिले. १९८४ ते १९९५ या काळात पेरूमध्ये आलेल्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने डी सोटो यांच्या सूचनांचे पालन केले आणि त्यांच्या संस्थेची मदत घेतली. डी सोटो यांच्या संस्थेची मदत घेऊन दहा वर्षांत जवळपास ४०० नवीन कायदे वा नियम तिथे आणले गेले. जमीन वा मालमत्तेच्या नोंदणी प्रक्रियेच्या खर्चात ९९ टक्के कपात करण्यात आली, जेणेकरून प्रत्येकास ती परवडू शकेल. त्यामुळे २००० सालापर्यंत १९ लाख नवीन मालमत्ता वा जमीन मालकांची नोंदणी पेरूत झाली. केवळ अधिकृत नोंदणी झाल्यामुळे जवळपास तीन लाख लोकांच्या मालमत्तेच्या एकूण मूल्यात दुपटीने वाढ झाली. तसेच व्यवसाय नोंदणी करण्यासाठी आधी जवळपास वर्षभराचा कालावधी लागत असे, तो कालावधी एका महिन्यावर आणला गेला. त्यामुळे १९९४ सालापर्यंत जवळपास तीन लाख नवीन व्यावसायिकांची नोंदणी झाली होती. हे केल्याने सरकारलासुद्धा करांद्वारे अधिक भांडवल मिळाले, जे विकासकामांसाठी वापरण्यात आले. आधी पेरूमध्ये अनेक शेतकरी कोकेन उत्पादनात गुंतलेले होते; पण आता कायदेशीर व्यवसायाचे मार्ग सुलभ झाल्याने त्यांनी कोकेनचे उत्पादन घेणे बऱ्याच प्रमाणात सोडून दिले.

हे झाल्याने अतिरेक्यांना आपोआप आळा बसला. दहशतवादी ‘सेण्देरो लुमिनॉसो’ ही संघटना जवळपास संपुष्टात आली. तिचा संस्थापक अबिमाएल गुझमन याने मान्य केले की, ‘‘हर्नाडो डी सोटो यांनी मालमत्तेच्या अधिकारावर केलेल्या कामांमुळेच आमचा पराभव झाला.’’

तर.. स्वत:च्या अस्तित्वाची, स्वत:च्या व्यवसायाची, जमिनीची किंवा मालमत्तेची अधिकृत नोंदणी होणे आर्थिक वा सामाजिक समृद्धीसाठी गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धत रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क मिळवून दिला, तेव्हा त्यामागेही हाच विचार होता. जे पेरूमध्ये खरे ठरले, ते जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर त्यासाठी एक जागतिक तंत्रव्यासपीठ लागेल, हे डी सोटो यांनी जाणले. २०१५ साली ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान यासाठी कसे वापरता येईल, या दृष्टीने काही प्रयोग सुरू झाले. याचे कारण- (१) ‘ब्लॉकचेन’वर कोणतीही माहिती सुरक्षितरीत्या साठवली जाऊ शकते. (२) ‘ब्लॉकचेन’ तंत्रव्यासपीठ कोणामध्येही भेदभाव करत नाही. (३) ‘ब्लॉकचेन’मध्ये संपूर्ण पारदर्शकता असून कोणतीही माहिती कोणीही तपासून पाहू शकते; उदा. एस्टोनियासारख्या देशांनी त्यांची सगळी सरकारी माहिती ‘ब्लॉकचेन’वर आणली आहे.

याच धर्तीवर डी सोटो यांनी एका नव्या संस्थेची (डी सोटो इंक) स्थापना केली आहे, जिच्याद्वारे केवळ जमीन आणि मालमत्ता अधिकाराची पूर्तता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाद्वारे कशी करता येईल, याविषयी प्रयोग आणि उपक्रम सुरू आहेत. याच अनुषंगाने इतर देशांनी आणि अनेक नवउद्यमींनीसुद्धा पुढाकार घेतला आहे, ज्याचा सविस्तर आढावा पुढील लेखात घेऊ या.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 12:09 am

Web Title: article on economist hernando de soto abn 97
Next Stories
1 ‘ब्लॉकचेन धोरणा’ची गरज..
2 डिजिटल सरकार!
3 निरपेक्ष बँकिंग..
Just Now!
X