गौरव सोमवंशी

तेराव्या शतकातील इटलीच्या मार्को पोलोने तब्बल २५ वर्षे परदेश प्रवास केला. त्यापैकी जवळपास १७ वर्षे तो चीनमध्ये होता. पुढे कोलंबस आदींची प्रेरणा ठरलेल्या मार्को पोलोला या प्रवासात चिनी पैशाची नवलाई समजली..

‘‘पैसे काय झाडावर लागतात का?’’ हे वेळोवेळी ऐकू येणारे प्रश्नार्थक वाक्य. अर्थात याचा सरळ अर्थ असा की, पैसे कमवावे लागतात, ते काही फुकटात झाडावर उगवत नाहीत. पण मजेदार गोष्ट म्हणजे, पशाबद्दल सर्वात आधी पाश्चात्त्य देशात लिहिले गेले तेव्हा त्याचे वर्णन ‘झाडावर उगवणारी गोष्ट’ असेच काहीसे केले होते. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी १३ व्या शतकात काय झाले, ते पाहू या. मागील लेखात आपण वस्तू-विनिमय पद्धतीपासून यॅप बेटांवरील दगडी पशापर्यंत आलो, आता त्याच पशाच्या कहाणीला आपण थोडे पुढे नेऊ या..

तर.. या गोष्टीची सुरुवात होते १३ व्या शतकात- एका अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वापासून. ती व्यक्ती म्हणजे इटलीचा मार्को पोलो! पूर्व दिशेला काय काय आहे, याचा शोध घ्यायला निघालेल्या मार्को पोलोच्या परदेश प्रवासाची वर्णने ऐकून ख्रिस्तोफर कोलंबससारखी मंडळीसुद्धा प्रेरित झाली होती. जवळपास २५ वर्षांचा प्रवास मार्को पोलोने मुख्यत: आशिया खंडात केला. त्यापैकी १७ वर्षे तरी तो चीनमध्ये होता. इतके फिरून तो इटलीला परतला, तर तिथे युद्ध सुरू होते. युद्धात शत्रू सन्याने त्याला कैदी बनवून ठेवले. जवळपास पाच वर्षे तो कैदेत होता. तुरुंगात त्याची मत्री रस्तीचेलो दा पिसा नामक कैद्यासोबत झाली. मार्को पोलो या पिसाला आपली २५ वर्षांची भटकंती वर्णन करून सांगायचा आणि पिसा ते त्याच्या पद्धतीने लिहून काढायचा. मार्को पोलोचे हे प्रवासवर्णन पुढे पुस्तकरूपात अजरामर ठरले. अनेक इतिहासकारांच्या मते या पुस्तकानेच प्रेरित होऊन पूर्व-पाश्चात्त्य देशांत त्या काळी प्रचंड प्रमाणावर व्यापार सुरू झाला. त्या पुस्तकाचे नाव- ‘द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो!’

आपण ‘‘पैसे काय झाडावर लागतात का?’’ या वाक्यापासून या चच्रेची सुरुवात केली आहे. पोलोच्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात एक धडा आहे, ज्याची सुरुवातच अशी होते- ‘चीनचा सम्राट कुब्लाई खान याने झाडाच्या सालीपासून कागदी पसा बनवला आणि तो देशभर चालवला..’ झाडाच्या सालीपासून कागद बनवणे हा प्रकार मार्को पोलोसाठी नवीन नव्हता; पण या कागदाचा वापर सोने किंवा चांदीसारखा होतोय हे त्याने पहिल्यांदाच पाहिले आणि अनुभवले होते. त्याबद्दल त्याने पुस्तकात सांगितले. परंतु तत्कालीन युरोपीय वाचकांना ही गोष्ट इतकी आश्चर्यकारक वाटायची, की त्यांना वाटे मार्को पोलो हा अतिशयोक्ती करत आहे.

परंतु इतरांसाठी नवलाईचा असला, तरी हा कागदी पसा चीनसाठी काही नवीन नव्हता. कुब्लाई खान हा तर १३ व्या शतकातील सम्राट होता; पण कागदी पशाची पहिली ऐतिहासिक नोंद चीनमध्ये सातव्या शतकातली आहे. अर्थात, कुब्लाई खानने त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. याची सुरुवात कशी झाली?

आधी सोने, चांदी किंवा अन्य काही धातू वापरून नाणे बनवले जायचे आणि मोठमोठय़ा व्यापारी व्यवहारांपासून दैनंदिन व्यवहारांसाठीही या नाण्यांचा वापर होत असे. ही नाणी सोबत घेऊन फिरता यावे म्हणून त्यांच्या मधोमध एक छिद्र पाडलेले असायचे, जेणेकरून एका दोऱ्यात त्यांची माळ ओवता यायची. पण व्यवहार जर शंभरएक नाण्यांचा असेल तर? आणि प्रत्येक वेळी ही नाणी सोबत ठेवणे तसे सोयीचेही नव्हते. त्याबाबत चीनमधील सम्राटांना एक युक्ती सुचली. त्यांनी व्यापाऱ्यांकडून त्यांचे सोने किंवा चांदीचे नाणे घेतले व आपल्या किल्ल्यात सुरक्षित ठेवले आणि त्याच वेळी राजाने अधिकृत केलेल्या आणि विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या कागदावर असे जाहीर केले की, या कागदाच्या मोबदल्यात आपण राजकीय तिजोरीतून सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घेऊन जाऊ शकता. कुब्लाई खानने या कागदी चलनाला ‘जिओचाओ’ असे अधिकृत नावही दिले.

व्यापारांना पुढे असे ध्यानात येऊ लागले की, राजाच्या तिजोरीकडेही जायची गरज नाही, कारण याच कागदी चलनाद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. ‘जिओचाओ’ या शब्दाचा आधुनिक अर्थ हा ‘बँकांची नोट’ असाच होतो. हाच पहिल्या कागदी चलनाचा उगम असे आपण म्हणू शकतो. पण आपण आज ज्या नोटा वापरतो, त्या अशा नाहीत. अनेक वर्षांसाठी प्रत्येक ‘जिओचाओ’च्या बदल्यात तिजोरीमध्ये तितकेच सोने किंवा नाणे असायचेच. परंतु काही वर्षांनी चीनच्या सम्राटांना वाटले की, यात एकाच वेळी सगळे लोक तिजोरीतून सोने किंवा चांदी तर काढणार नाहीत ना? मग थोडे आणखी कागदी चलन छापले तर त्याचा उपयोग करून बरेच व्यवहार करता येतील, असा विचार त्यांनी केला. परंतु या नव्या छापल्या जाणाऱ्या नोटांना कोणताच आधार नव्हता; म्हणजे असे की, त्यांच्या बदल्यात तिजोरीमध्ये कोणते सोने किंवा नाणे नव्हते. त्यामुळे जर एकाच वेळी सगळ्या नोटधारकांनी नोटा परत करत आपापले सोने किंवा चांदीचे नाणे मागितले तर? या उदाहरणात शेवटी येणाऱ्यांना काहीच मिळणार नाही, कारण तिजोरीमधील सोन्या-चांदीहून अधिक नोटा छापल्या गेल्या आहेत.

ही सगळी नवलाईची प्रक्रिया मार्को पोलोने खूपच जवळून पाहिली. त्याच्या पुस्तकानुसार, त्याने कुब्लाई खानच्या दरबारातसुद्धा बराच वेळ घालवला. या सगळ्यात एक गंमत झाली. तेराव्या शतकातील इराणच्या ‘ईखनात’ साम्राज्यात गेयखातू नावाचा राजा होता. चीनच्या कुब्लाई खानच्या घराण्याशी संबंध निर्माण व्हावेत म्हणून त्याने आपल्या एका नातेवाईकाचे लग्न कुब्लाई खानच्या घराण्यातील एका राजकन्येसोबत ठरवले. तर ती मुलगी जेव्हा चीनवरून इराणला आली, तेव्हा तिच्यासोबत मार्को पोलोसुद्धा आलेला. गेयखातूला त्याने कुब्लाई खानच्या कागदी चलनाबद्दल सांगितले आणि गेयखातू प्रचंड खूश झाला. इराणला त्या काळी अनेक गाई-बल हे एका विशिष्ट आजाराने मरत होते, त्यामुळे प्रचंड दुष्काळ पसरला होता. गेयखातूला कुब्लाई खानची युक्ती पूर्णपणे समजली नव्हती, पण त्याने ती युक्ती जमेल त्या अर्थाने वापरून पाहू असे ठरवले. तर सोने किंवा चांदी असे काहीच नसताना, त्याने फक्त कागदी चलनावर भर दिला. चीनचे ‘जिओचाओ’ हे चलन त्याला इतके आवडले की, त्याने जसेच्या तसे चिनी लिपी आणि भाषा वापरून ते छापले. त्यावर नक्की काय लिहिले होते, हे इराणच्या जनतेसहित गेयखातूलासुद्धा वाचता येत नव्हते; पण नक्कल करायची तर पूर्णच करू असे त्याने ठरवलेले. थोडा धार्मिक रंग यावा म्हणून काही शब्द अरबीमध्येही छापण्यात आले. गेयखातूने यास अधिकृत चलन घोषित केले. त्यामुळे काय झाले? तर, आधीच दुष्काळ होता, तो दुप्पट-तिप्पट वाढला. कारण चलनवाढ प्रचंड प्रमाणात झाली. लोकांना गेयखातूचा इतका राग आला की, त्याच्याच दरबारातील एका व्यक्तीने गेयखातूची दोऱ्याने गळा आवळून हत्या केली.

मागील लेखात आपण यॅप बेटांवरील दगडी पशाबद्दल पाहिले. आधुनिक प्रणालीमुळे दगडी पशांचे उत्पादन सोपे झाले, तेव्हा त्या दगडांचीसुद्धा चलनवाढ झालीच. त्यामुळे १९३० नंतर नवीन दगडी चलन बनवले गेलेले नाही. जुनेच दगडी पैसे वापरले जात आहेत. कारण नुसते पैसे छापत गेलो की आर्थिक भरभराट वगैरे येते, असे नाही.

या गोष्टी ऐकायला इतिहासातील गमती वाटत असतील, तर नुकतीच झिम्बाब्वेमध्ये चलनवाढ कुठपर्यंत गेली हे पाहू शकता. पशावर कोणाचे नियंत्रण असावे, कोणी सगळ्या गोष्टी ठरवाव्या, हे प्रश्न आहेत. ‘बिटकॉइन’ आणि त्यामागील ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान याच त्रुटींना सोडवण्यासाठी समोर आणले होते. इतकेच नाही, तर २००८ मध्ये जी जागतिक आर्थिक मंदी आली, त्याचा आणि बिटकॉइनचा थेट संबंध आहे. कारण त्याकडे आपण क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणूनही पाहू शकतो.

पुढील लेखात बँकिंग आणि फायनान्स (वित्त व्यवस्था) यांनी ‘सायफरपंक’ नावाच्या चळवळीला कसा जन्म दिला, ते पाहू या.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io