गौरव सोमवंशी

ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
kolkata knight riders vs sunrisers hyderabad
IPL 2024 : कमिन्स विरुद्ध स्टार्क द्वंद्व; श्रेयसच्या नेतृत्वाखालील कोलकाताची आज हैदराबादशी गाठ
Mumbai Chennai Gujarat Bangalore and Delhi attention to the performance of these teams in IPL
विश्लेषण : मुंबई, चेन्नई सहाव्यांदा, की बंगळूरु पहिल्यांदा… आयपीएलमध्ये यंदा कोणाची सरशी?

इंटरनेटच्या जगतात सुरुवातीला समान संधी होत्या, त्या पुढे अधिकच कमी कमी होत गेल्या; आता तर, ज्या कंपन्यांची मक्तेदारी आहे त्यांचीच वाढ होताना दिसते. यात ‘ब्लॉकचेन’ कसा बदल घडवत आहे/ घडवू शकते?

डिजिटल जगाने घडवून आणलेल्या आणि पुढील काळात घडून येऊ शकतील अशा बदलांचे भाष्यकार टॉम गुडविन यांनी २०१५ साली त्यांच्या एका लेखाची सुरुवात अशी केली होती : ‘जगातील सर्वात मोठय़ा टॅक्सी सेवापुरवठा कंपनीकडे- म्हणजेच ‘उबर’कडे- स्वत:च्या मालकीची एकही टॅक्सी नाही. जगातील सर्वात प्रसिद्ध माध्यम कंपनीकडे- म्हणजेच ‘फेसबुक’कडे- स्वत:चा कोणताच मजकूर नाही. ‘अलिबाबा’- जी जगातील सर्वात मोठी रिटेलर कंपनी आहे, तिच्याकडे स्वत:चे कोणतेच उत्पादन नाही. आणि ‘एअर-बीएनबी’ या निवासव्यवस्था पुरवणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा कंपनीकडे स्वत:च्या मालकीचे एकही निवासस्थान नाही!’ गुडविन यांची ही विधाने इतकी प्रसिद्ध झाली की, अगदी व्हॉट्सअ‍ॅप संदेशांपासून ते थेट सर्वोच्च न्यायालयाने ‘खासगीपणाचा अधिकार (राइट टु प्रायव्हसी)’ या मुद्दय़ाविषयी दिलेल्या निकालातही ती नमूद करण्यात आली होती. यालाच ‘शेअिरग इकॉनॉमी’ असेही म्हटले जाते आणि हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. हे सारे कशामुळे शक्य झाले?

तर.. याचा संबंध थेट ‘वेब २.०’च्या उगमाशी जोडता येतो. ‘वेब १.०’ आले तेव्हा इंटरनेट हे फक्त साध्या कागदावरील मजकूर जसा वाचता येतो तशा वाचता येणाऱ्या संकेतस्थळांनी बनले होते. इथे नुसते एक वाचक म्हणून आपण सहभागी होऊ शकत होतो. पुढे इंटरनेटशी निगडित तंत्रज्ञानात अधिक भर पडून जेव्हा ‘वेब २.०’ आले तेव्हा वाचक हे नुसते ‘वाचक’ न राहता, ‘सहभागी’ आणि ‘भागीदार’ म्हणून संकेतस्थळांशी संवाद साधू लागले. समाजमाध्यमे, ब्लॉग, नेटफ्लिक्स हे सगळे म्हणजे ‘वेब २.०’! याद्वारे नवीन व्यवसाय, महसूल/नफा कमविण्याच्या पद्धती समोर आल्या, त्या आधारे अनेक कंपन्यांचा उगम झाला. पण सुरुवातीला इंटरनेटच्या जगतात थोडीफार समान संधींची परिस्थिती होती, ती पुढे अधिकच कमी-कमी होत गेली; आता तर, फक्त ज्या कंपन्यांची मक्तेदारी आहे त्यांचीच वाढ होते असे दिसते. याला अर्थशास्त्रात ‘मॅथ्यू तत्त्व’ म्हणतात; अगदी ढोबळपणे सांगायचे तर- पैसा हा पैसेवाल्याकडे जातो आणि गरिबाकडून तोच दूर जातो. हे पाहता, जिथे पैसा हा माहितीपासून उत्पन्न होतो, तिथे अगोदरच डिजिटल माहितीवर मक्तेदारी असलेल्यांकडेच अधिक डिजिटल माहिती साठवली जाईल आणि तेल व्यापाराप्रमाणेच त्यांचा संघ (कार्टेल) निर्माण होईल.

यात ‘ब्लॉकचेन’ने प्रवेश केला तर संभाव्य चित्र कसे असू शकेल? त्यातही ‘वेब ३.०’, ‘ब्लॉकचेन’चे ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’, ‘ईथिरियम’सदृश अनेक तंत्रव्यासपीठांचे आगमन, ‘विकेंद्रित ओळख’ वा त्याचा पुढचा भाग म्हणजे ‘सेल्फ-सॉव्हरिन आयडेन्टिटी’ (स्वत:ची सार्वभौम ओळख) अशा अनेक नव्या शक्यतांचा विचार केल्यास, या क्षेत्रात काय बदल होऊ शकेल?

‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ हे शब्द सर्वात प्रथम सातोशी नाकामोटोच्या लेखामधून ३१ ऑक्टोबर २००८ साली जगासमोर आले. त्या लेखाच्या शीर्षकातच ‘पीअर टु पीअर’ असेही नमूद केले होते. यात सातोशी नाकामोटोने सुचवले होते की, आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चलन पाठवताना कोणत्याच ‘मध्यस्था’ची गरज पडणार नाही. तसेच केंद्रीय/ राष्ट्रीय बँक वा न्यायालय किंवा कोणत्याही देशाचे सरकार/ प्रशासन किंवा कोणत्याही मोठय़ा कंपनीचा हस्तक्षेप होणार नाही, पण तितकीच सुरक्षा आणि शाश्वती मिळेल. ‘बिटकॉइन’ने आर्थिक व वित्तीय व्यवस्था किती बदलू शकते, हे आपण अ‍ॅण्ड्रीज अ‍ॅण्टोनोपोलस यांच्या विचारांवरून समजून घेतले (पाहा : ‘निरपेक्ष बँकिंग..’, १५ ऑक्टो.).

२०१५ साली प्रा. भगवान चौधरी यांना नोबेल समितीकडून अर्थशास्त्राच्या नोबेल नामांकनासाठी नाव सुचवण्यासाठी विचारणा झाली. त्यांनी ‘सातोशी नाकामोटो’ हे नाव सुचवले (प्रस्तुत लेखकाने एका शोधप्रकल्पाच्या निमित्ताने प्रा. चौधरी यांच्याबरोबर काम केले असून; त्यांच्यासमवेत चर्चा करताना हेच लक्षात आले की, नोबेल पारितोषिकासाठी सातोशी नाकामोटोचे नाव सुचवताना त्यांच्यापुढे ‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’च्या संभाव्य शक्यतांचे चित्र स्पष्ट होते.). ज्या व्यक्तीची (वा समूहाची) ओळख माहीत नाही तिच्यापर्यंत पारितोषिक पोहोचवायचे कसे, असे विचारल्यावर प्रा. चौधरी यांच्या उत्तर तयार होते : ‘आपल्याला सातोशी नाकामोटोची ओळख माहीत नाही, पण त्याचे खाते हे कोणत्याही बिटकॉइन खात्याप्रमाणे पारदर्शकच आहे. नोबेल पारितोषिकेची रक्कम ही बिटकॉइनमध्ये रूपांतरित करून त्या खात्यावर पाठवा.’ पण नोबेल समितीने तेव्हा हा प्रस्ताव नामंजूर केला. असो.

मुद्दा हा की, हेच तंत्रज्ञान सुरुवातीला उल्लेख केलेल्या कंपन्यांमध्ये राबविले तर? आता, ‘ईथिरियम’ या तंत्रव्यासपीठाचे संस्थापक व्हिटालिक ब्युटेरिन यांचे विधान पाहा : ‘आजपर्यंतचे बहुतांश तंत्रज्ञान अमलात आल्याने वेळोवेळी सामान्य काम करणाऱ्या वा खालील स्तरावरील कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा आली. पण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे थेट केंद्रस्थानी किंवा उच्चपदावरील कामांनाच स्वयंचलित करून बंद करू शकते.’ याचा अर्थ, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे टॅक्सीचालकाला नोकरीवरून न काढता, संपूर्ण ‘उबर’सारखी कंपनीच नष्ट करू शकते; जेणेकरून टॅक्सीचालक थेट ग्राहकाशी व्यवहार करू शकेल (आठवा : ‘‘ईथर’चे टोकन!’, ३ सप्टें.).

तर.. ‘शेअिरग इकॉनॉमी’ची व्यावसायिक पद्धतीने भरभराट शक्य झाली ती विशिष्ट डिजिटल माहितीची साठवण केल्यामुळे व त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे. कारण सुविधा पुरवणाऱ्यांना ग्राहकांशी जोडणे सोपे होऊ लागले. अगोदर दुर्लक्षित केले गेलेले मूल्यनिर्मितीचे साधन- उदा. घरातील न वापरली जाणारी खोली किंवा पडून असलेले वाहन, यांचा व्यावसायिक हेतूंसाठी वापर या कंपन्यांद्वारे शक्य होऊ शकला. पण ‘मॅथ्यू तत्त्वा’नुसार, ज्यांनी या कामात सर्वात आधी सुरुवात केली, त्यांची डिजिटल माहितीच्या साठवणीमुळे निर्माण होणारी मक्तेदारी अधिकच बळकट होऊ लागली. अशांचा कल पूर्णपणे नफा कमवण्याकडे वळून ग्राहक आणि सुविधा पुरवणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ लागली. या मध्यस्थ कंपन्यांनी महसुलातील स्वत:चा हिस्सा मोठा करत नेल्याने इतरांचा घटता राहिला. त्यामुळेच मग इतर पर्यायी मार्गाचा शोध सुरू झाला. उदाहरणार्थ, ‘उबर’मध्येच वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या क्रिस्तोफर डेव्हिडने ती कंपनी सोडून स्वत:चे तंत्रव्यासपीठ तयार केले, ज्यामध्ये कोणीही मध्यस्थ नाही; ग्राहकांना थेट वाहनचालकांशी जोडले जाऊ लागले. असाच प्रयोग भारतात ‘ड्राइफ’ या कंपनीने सुरू केले आहेत, ज्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रव्यासपीठाद्वारे ग्राहक आणि वाहनचालकांना अनेक पर्याय आणि सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. यात कोणत्याही ‘मध्यस्था’ला पैसे देण्याची गरज नसल्याने हा पर्याय ग्राहकांना स्वस्त पडतोच आणि वाहनचालकांनाही आधीपेक्षा जास्त मोबदला मिळतो. पण ‘उबर’, ‘ओला’ यांसारख्या कंपन्या फक्त ‘मध्यस्था’ची भूमिका पार पाडतात असे नाही. या कंपन्या अनेक कामेदेखील करतात- उदा. वाहनचालकाची तपासणी करणे, तक्रारी आल्यास त्यांचे निवारण करणे, पैसे बरोबर दिले गेले आहेत की नाही याची शहानिशा करणे, इत्यादी. मग असा ‘मध्यस्थ’च दूर सारला तर हे सारे कोण करणार?

याचे उत्तर ‘ब्लॉकचेन’च्या एका गुणधर्मात दडले आहे. तो गुणधर्म असा की, ‘ब्लॉकचेन’मध्ये नोंदवलेल्या माहितीत कोणतीही खाडाखोड, बदल करता येत आणि ती पारदर्शक असते. यामुळे आपण काही बाबी कालांतराने सोडवू शकतो. समजा, एक वाहनचालक आणि एक ग्राहक यांच्यामध्ये काही वाद झाला आणि त्याचे परिणाम ‘ब्लॉकचेन’वर नमूद करण्यात आले. म्हणजे दोघांनी एकमेकांना नकारात्मक ‘रेटिंग’ दिली. मग यामध्ये कोण खरे हे जाणून घेण्याच्या अनेक पर्यायांपैकी दोन पाहूयात :

(१) असे काही झाल्यास त्या संपूर्ण समूहातून कोणत्याही पाच व्यक्तींची निवड केली जाईल- मग ते ग्राहक असो वा वाहनचालक. त्यांच्याद्वारे या समस्येचे निराकरण केले जाईल. या पाच व्यक्तींनी आपला वेळ आणि परिश्रम दिले म्हणून त्यांना त्या तंत्रव्यासपीठाच्या ब्लॉकचेनवर आधारित ‘टोकन’द्वारे मोबदला दिला जाईल. ही प्रणाली ‘बी-टोकन’ ही कंपनी अमलात आणत आहे.

(२) इंडोनेशियातील शेतकऱ्यांसाठी बँकांद्वारे कर्ज मिळण्याचे मार्ग मोकळे व्हावे म्हणून ‘हरा’ ही कंपनी माहितीची वैधता पडताळताना त्या माहितीला अन्य किती लोकांनी दुजोरा दिला आहे हे पाहते. अगदी तसेच, कालांतराने अनेक लोकांचा सहभाग आणि अभिप्राय साचून प्रत्येक वाहनचालक व ग्राहकांची खरी प्रतिमा उभी राहील आणि दोघांना एकमेकांची माहिती उपलब्ध असल्याने, ती खरी आहे याची शाश्वती असल्याने या माहितीच्या आधारे योग्य निवड करता येईल.

या क्षेत्रात ‘राइडकॉइन’, ‘पी-चेन’, ‘ड्राइफ’ अशा अनेक कंपन्यांची उदाहरणे देता येतील. पण हे फक्त टॅक्सीसेवा पुरवठय़ाविषयी झाले; इतर क्षेत्रांत काय घडते आहे, हे पुढील लेखात पाहूया..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io