24 January 2021

News Flash

माहितीचा मोबदला..

एस्टोनिया या देशात राष्ट्राध्यक्षांच्या भाषणापासून ते सरकारसंबंधी कोणतीही माहिती ब्लॉकचेन व्यासपीठावर साठवली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

गौरव सोमवंशी

प्रचलित समाजमाध्यमांच्या कार्यप्रणालीतील केंद्रीकरण टाळणारी, वापरकर्त्यांनाही आर्थिक मोबदला देणारी समाजमाध्यमे ‘ब्लॉकचेन’द्वारे आकारास आली आहेतच; शिवाय या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कलाक्षेत्र, वृत्तमाध्यमे, निधी संकलन यांतही पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने जगभर प्रयोग होताहेत..

आपल्यापैकी अनेक जण ‘फेसबुक’ हे समाजमाध्यम वापरत असाल. त्यावरील खात्यावर आपण वाचनीय मजकूर लिहितो वा उत्तम छायाचित्र डकवतो, तेव्हा त्यास मित्रयादीतील मंडळींचा प्रतिसाद मिळतो. या प्रक्रियेमुळे जाहिरातदारांना त्यांची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होते, कारण फेसबुक या माध्यमाचा वापर या प्रक्रियेत वाढलेला आहे. पण या साऱ्यामुळे निर्माण झालेला सर्व महसूल/नफा मात्र फेसबुक या कंपनीकडेच जातो. मजकूर, छायाचित्र वापरकर्त्यांचे, माहिती वापरकर्त्यांची, हे सगळे उपभोगणारेही वापरकर्तेच; पण मग महसूल/नफ्यामध्ये वापरकर्त्यांचा हिस्सा का नसावा? इतकेच नव्हे, तर वापरकर्त्यांच्या माहितीवर, अगदी खासगी संभाषणांवरदेखील फेसबुकचे हक्क आहेत. हे सगळे शक्य होते कारण फेसबुक एक केंद्रीय संस्था म्हणून काम करते, जिचा उद्देश कोणत्याही कंपनीप्रमाणे फक्त स्वत:साठी नफा कमावणे हा आहे. नव्वदच्या दशकात इंटरनेटचा नुकताच उगम झाला तेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वगैरे असे काही येऊ शकते याची कल्पना करणेदेखील शक्य नव्हते, कारण त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान प्रचलित वा प्रगल्भ नव्हते. पण म्हणून ‘ब्लॉकचेन’सारख्या आजच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या भविष्यात पडू शकणाऱ्या पडसादांची कल्पनाच करू नये असेही नाही. मग वितरितता आणि विकेंद्रीकरण या संकल्पनांना अनन्यसाधारण महत्त्व देणारे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समाजमाध्यमांमध्ये कोणते बदल घडवू शकते?

समजा, ‘ब्लॉकचेन’ तंत्रव्यासपीठावर आधारित एक समाजमाध्यम आहे, ज्यात मार्क झुकरबर्ग किंवा फेसबुक असे कोणतेही ‘मालक’ नाहीत. त्यावर वापरकर्ते स्वत:ची डिजिटल ओळख स्वत:हून बनवतील, त्या डिजिटल ओळखीवरून निर्माण झालेली सगळी माहितीदेखील वापरकर्त्यांच्याच मालकीची असेल आणि हे तंत्रव्यासपीठ कोणत्या कार्यप्रणालींवर चालते हेदेखील उघड असेल. तसेच त्यावर वापरकर्त्यांने काही चांगला मजकूर लिहिला आणि त्यास इतरांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर जाहिरातदार थेट त्या वापरकर्त्यांलाच पैसे देतील.

हे सारे वाचायला नवलाईचे वाटत असेल; पण या प्रकारची अनेक ब्लॉकचेनआधारित समाजमाध्यमे आजघडीला कार्यरत आहेत. त्यांविषयी आज जाणून घेऊ या..

(१) स्टीमीट : याचे फेसबुकशी बरेच साम्य आहे. पण यात वापरकर्त्यांकडून जितका जास्त वापर वा सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, त्यानुसार त्यास ‘स्मार्ट मीडिया टोकन’द्वारे मोबदला मिळत जाईल. आजपर्यंत १६२ कोटी रुपयांचा असा मोबदला वापरकर्त्यांना मिळाला आहे. समाजमाध्यमांची व्यापकता पाहता, ही रक्कम आज तुटपुंजी वाटेल, पण सुरुवात म्हणून नक्कीच आशादायी आहे.

(२) सेपियन : वापरकर्ते समाजमाध्यमावर जितका जास्त काळ वावरतील तितका या क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढतो. कारण जाहिरातदार या कंपन्यांना त्याचेच तर पैसे देतात. परंतु वापरकर्त्यांच्या वेळेवर आणि त्यावरून निर्मित होणाऱ्या उत्पन्नावर वापरकर्त्यांचाही हक्क असावा यासाठी ‘सेपियन’ हे ब्लॉकचेनवर आधारित समाजमाध्यम आकारास आले आहे. यात स्वत:ची माहिती जाहिरातदारांना विकावी की नाही हा पूर्णपणे वापरकर्त्यांचा निर्णय असतो.

(३) डीटय़ूब : यूटय़ूबची कार्यप्रणाली ही फेसबुकपेक्षा काही प्रमाणात बरी आहे; कारण यामध्ये विशिष्ट निकष पूर्ण केल्यावर वापरकर्त्यांना त्यांच्या दृक्मुद्रणावर उत्पन्न मिळणे सुरू होते. पण हेसुद्धा पूर्णपणे विकेंद्रित व्हावे यासाठी डीटय़ूब हा पर्याय उपलब्ध झाला आहे.

(४) याशिवाय ‘ऑल.मी’, ‘डायस्पोरा’, ‘माइण्ड्स’, ‘सोशल-एक्स’ आदी समाजमाध्यमे ब्लॉकचेन तंत्रव्यासपीठावर आहेत. त्यांस अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कलाक्षेत्र : कलाकारांचा स्वत:च्या कलाकृतीवर पूर्णपणे हक्क असावा, ही शक्यता ब्लॉकचेनमुळे मूर्तरूपात येऊ शकते. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका इमोजेन हीप यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘कोणत्याही कलाकृतीसाठी सर्वात आधी परिश्रम करणारे कलाकार असतात आणि मोबदला मिळताना सर्वात शेवटचे व दुर्लक्षित केले गेलेलेदेखील कलाकारच.’’ याच हीप यांनी कलाक्षेत्रात बदल घडवून आणू शकेल असा ब्लॉकचेन प्रयोग सुरू केला आहे. हीप लिहितात : ‘२३ वर्षे संगीत क्षेत्रात काम करून मी अनेक निराशांना सामोरे गेले. मात्र, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा परिचय झाला तेव्हा माझ्या लक्षात आले की, कलावंतांसाठी या क्षेत्रात पारदर्शकता हवी, योग्य मोबदला आणि स्वकलाकृतीवर स्वनियंत्रण मिळायलाच हवे.’ हीप या आता ‘मायसीलिया’ या संस्थेच्या आणि त्याअंतर्गत चालणाऱ्या ‘क्रिएटिव्ह पासपोर्ट’ प्रकल्पाच्या संस्थापिका आहेत. डिजिटल पेण्टिंग, व्हिडीओ गेम, तसेच अन्य कोणत्याही कलाकृतींमध्ये ब्लॉकचेन वापराच्या शक्यता अभ्यासण्यासाठी ‘स्विस आर्ट्स कौन्सिल’तर्फे स्वित्झर्लंडमध्ये सुरू असणाऱ्या प्रकल्पांना भेट देण्याची संधी प्रस्तुत लेखकाला मिळाली होती. यामध्ये ‘नाओ’, ‘एव्हरड्रीमसॉफ्ट’ अशा काही प्रकल्पांच्या संस्थापकांना भेटल्यानंतर, डिजिटल कलाकृतींच्या विश्वात ब्लॉकचेनमार्फत काय काय घडू शकते हे जाणून घेता आले.

अनुदान आढावा : आपण कोणत्याही संस्थेला दिलेल्या अनुदानाचे/देणगीचे पुढे काय झाले, त्या पैशांचा योग्य वापर झाला की नाही, ते खरेच गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचले की नाही, हे सारे पाहता येणे ब्लॉकचेनद्वारे शक्य आहे. यासाठी भारतातच ‘ट्रॅक माय चॅरिटी’ नावाचा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे. नोबेल पारितोषिक जाहीर झालेला ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’, ‘एलिस’, ‘व्हर्ल’, ‘एड-चेन’ असे जगभरातील अनेक उपक्रम ब्लॉकचेनद्वारे कार्यरत आहेत. तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या मध्यस्थ कंपन्यांना बाजूला सारून विक्रेत्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे काम ‘ओपन-बाजार’तर्फे केले जात आहे. यामध्ये कोणीही मध्यस्थ नसून आर्थिक व्यवहारांची पूर्ण पारदर्शकता प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.

वृत्तमाध्यम : एस्टोनिया या देशात राष्ट्राध्यक्षांच्या भाषणापासून ते सरकारसंबंधी कोणतीही माहिती ब्लॉकचेन व्यासपीठावर साठवली जाते. यात दिलेला माहितीचा मजकूर हा बनावट किंवा बदललेला नाही, याची खात्री देता येते. वृत्तमाध्यमांच्या बाबतीतही हे अवलंबता येईल. ज्यात खोटी माहिती (फेक न्यूज) पसरविणारे किंवा जल्पक (ट्रोल्स) यांच्या डिजिटल ओळखीस कमी गुणांक (रेटिंग) देऊन त्या खात्यास बातमी देण्यापासून रोखता येऊ शकेल. तसेच वारंवार खरी माहिती देणाऱ्या व्यक्तींना मोबदलादेखील देता येईल.

मतदान : आपण सातोशी नाकामोटोच्या खात्यात किती बिटकॉइन आहेत आणि त्या खात्याद्वारे कोणकोणते व्यवहार झाले हे पाहू शकतो, पण नाकामोटो कोण आहे, हे आपणास अद्याप समजलेले नाही. समजा, हीच पारदर्शकता आणि गोपनीयता मतदान प्रक्रियेतही आणता येईल का, या दृष्टीने प्रयोग सुरू आहेत. अमेरिका, ब्राझील, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि एस्टोनिया या देशांमध्ये हे प्रयोग केले जात आहेत, पण अद्याप ते प्राथमिक स्थितीतच आहेत.

निधी संकलन : इटालियन दिग्दर्शिका मिट्झी पैरोन यांच्या पहिल्या सिनेमासाठी सर्व निधी ‘ईथिरियम’ या तंत्रव्यासपीठाद्वारे उभारला गेला होता. त्यांचा ‘ब्रेड’ हा सिनेमा ब्लॉकचेन टोकनधारक निर्माता असलेला जगातील पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाद्वारे मिळालेल्या नफ्यातील ३० टक्के वाटा हा याच टोकनद्वारे गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना दिला गेला. हे जसे सिनेमासाठी शक्य झाले, तसेच इतर कोणत्याही प्रकल्पासाठी शक्य होऊ शकते. ज्यात गुंतवणूकदारांनी गडगंज श्रीमंत असण्याची गरज नाही आणि जनसामान्यांनादेखील यथाशक्य गुंतवणूक करून निधी उभारता येईल.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2020 12:04 am

Web Title: bitcoin article on information exchange abn 97
Next Stories
1 ‘मध्यस्था’ची मक्तेदारी मोडताना..
2 स्वत:च्या घरी दूरचा..
3 विश्वासाचा सेतू
Just Now!
X