News Flash

मेरी रिक्षा सबसे निराली

स्त्रियांना ऑटो रिक्षा परवाना वाटपात ५ टक्के आरक्षण दिल्याने त्या स्वावलंबी होऊ लागल्या आहेत.

परिवहन विभागाने स्त्रियांना ऑटो रिक्षा परवाना वाटपात ५ टक्के आरक्षण दिल्याने त्या स्वावलंबी होऊ  लागल्या आहेत. २०१४ मध्ये राज्यात रद्द किंवा नूतनीकरण न झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांची ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर महापालिका क्षेत्रांमधील ४२७९८ परवान्यांपैकी ५ टक्के परवाने म्हणजे २१३९ परवाने स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आले. या लॉटरीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात ४६५ व इतर क्षेत्रांत ८३ अशा ५४८ स्त्रियांची यशस्वी उमेदवार म्हणून निवड झाली.

रिक्षाचालक म्हणून तिचा अनुभव जाणून घेण्यासाठी मी योगिताला फोन केला होता. ती बोलत असताना एकच गलका झाला, बायकांचे जोरजोरात ओरडणे फोनवर ऐकू येऊ लागले. एका मिनिटासाठी योगिता फोनपासून दूर झाली, पण आवाज येतच होते. काही वेळातच ती फोनवर आली. विचारलं, ‘‘काय झालं योगिता, कुणी भांडत आहे का?’’

‘‘काही नाही हो, एक दारुडा इथे केव्हाचा घिरटय़ा घालत होता. मी पायातली चप्पल काढली तसा तो पळाला. इथं काही जणी सामान घेऊन बसलेल्या आहेत, त्याही त्याच्यावर ओरडत होत्या.’’

योगिता. २९ वर्षांची विवाहिता, दोन मुलांची आई. रुळलेल्या वाटांपलीकडे जाऊन स्वत:चा स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलेली. नवी मुंबईत रिक्षा चालवणारी एक धाडसी स्त्री. असे प्रसंग येतच राहातात. ‘‘आपण आपली मर्यादा सांभाळत, कधी गोड बोलून कधी त्यांना त्यांची जागा दाखवून काम केलं की नाही त्रास होत,’’ योगिता सांगत होती. फोनमुळे कानावर पडलेल्या शब्दांमधून माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं होतं. एक स्त्री म्हणून तिच्या कामाचं आणि धाडसाचं कौतुकही वाटत होतं.. ‘‘योगिता मला तुझ्याबद्दल काही सांग ना’’, मी असं विचारताच ती सांगू लागली.

‘‘मी योगिता माने, वय वर्षे २९. राहणार नवी मुंबई, वाशी. शिक्षण बी.ए. दुसरं वर्ष. नंतर डिप्लोमा इन अ‍ॅग्रीकल्चर. वडील चंद्रकांत गावडे यांच्या पाच अपत्यांपैकी मी एक (चार मुली एक मुलगा). विवाहित, दोन मुलं, एक सात वर्षांचा, एक साडेचार वर्षांचा. पती भास्कर माने खासगी कंपनीत अ‍ॅडमिन मॅनेजर. सासर गगनबावडा तर माहेर सोलापूर. खाऊन पिऊन सुखी असं आमचं कुटुंब.’’

‘‘आपण कधी ऑटो रिक्षा चालवू असं स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं,’’ असं सांगताना योगिताने तिचा स्वावलंबनाचा प्रवास अधिक बोलका केला. ती म्हणाली, ‘‘माझ्या माहेरी माझा भाऊ  रिक्षा चालवतो. मजा म्हणून मी एक दोन वेळेला रिक्षा चालवलेली. पण आपण आपली स्वत:ची रिक्षा चालवू असा कधी विचारच केला नाही. घरी रिक्षा होती त्यामुळे ड्रायव्हिंगमध्ये रस होताच. भावाने चार चाकीही शिकवलेली. असंच एकदा वर्तमानपत्रामध्ये टॅक्सी परवान्यासंदर्भात बातमी वाचली. मग अधिकृतरीत्या ड्रायव्हिंग शिकून घेतलं. ड्रायव्हिंग स्कूलमार्फतच बॅज् मिळवला. तोपर्यंत नवऱ्याला याची काहीच कल्पना दिली नाही.

रिक्षा चालवायला नवऱ्याची परवानगी नव्हती. लोक काय म्हणतील, रिक्षात बसणारे प्रवासी कसे असतील एक ना दोन शंका त्यांच्या मनात होत्या म्हणून ‘परमिट’ मिळेपर्यंत मी त्यांना काहीच सांगितले नाही. परंतु ‘परमिट’ मिळाल्यानंतर त्यांना सगळं सांगितलं. त्यांनाही आनंद झाला पण तू रिक्षा चालवण्यापेक्षा आपण ती रिक्षा भाडय़ाने चालवायला देऊ. त्यांचा नवा प्रस्ताव माझ्यासमोर आला. एवढं सगळं मी एकटीने केलं, पैसेही खर्च केले तर रिक्षा मीच चालवणार हा माझा हट्ट कामाला आला. तेवढय़ात आरटीओ ऑफिसकडून आताच रिक्षा खरेदी करू नका, महिलांच्या रिक्षाचा रंग निश्चित होतो आहे, तोपर्यंत थांबा, असा निरोप आला. मग अबोली रंगाची रिक्षा स्त्रियांसाठी निश्चित झाली आणि युनियन बँकेकडून १ लाख ७६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन मी रिक्षा खरेदी केली. घरातूनही तोपर्यंत रिक्षा चालवायला परवानगी मिळाली होती.  रिक्षासाठी नवऱ्याकडून एकही पैसा घेतला नाही असं सांगत योगिताने तिच्या ध्येयनिष्ठ वाटचालीची जणू साक्षच पटवून दिली. घर-संसार आणि मुलांची सकाळची शाळा सांभाळून मी रिक्षा चालवते, योगिता सांगत होती.

महिला रिक्षा चालवते यात लाज वाटण्यासारखं काय आहे, असा खडा प्रश्न उपस्थित करताना हाताची पाच बोटे सारखी नसतात. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आव्हानात्मक असतो हे सांगायला योगिता विसरली नाही. ‘‘आता मी रिक्षाचालक म्हणून रुळलेय. मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्ज फेडतेय. मी जिथे राहाते ती सोसायटी खूप चांगली आहे. आता सोसायटीतील मुलींना शाळेत घेऊन जात जा, अशी मागणी देखील झालीय. पण तशी सोय अजून रिक्षात केली नाही त्यामुळे अजून त्याचा विचार केला नाही.’’ ती सांगते. मात्र लोकांनीही आता स्त्री रिक्षाचालकांना स्वीकारलं आहे, याचा तिला आनंद आहे.

रिक्षा चालवताना सिग्नलवर मी उभी असेल आणि शेजारी मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यू उभी राहिली तर त्या गाडीत बसलेले लोक आतून हाताने – व्वा – खूप छान अशी प्रतिक्रिया देतात तेव्हा आनंद होत असल्याचं योगिता सांगतो. ती म्हणते, ‘‘मी एकदा इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्टला देखील गेले होते. तेव्हा रिक्षात बसलेल्या महिलांनी माझ्या पाठीवर शाब्बासकी दिली. पाठ थोपटत, व्वा, मुली आणि महिलांनी असंच धाडसी केलं पाहिजे, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असंदेखील त्या म्हणाल्या

तेव्हाही मला खूप आनंद झाला होता. सुरुवातीला रिक्षा चालवायची सवय नव्हती तेव्हा पाय, गुडघे आणि बोटे दुखायची, आता सवय झालीय. खरं तर आपण कधी असं काही करू असं वाटलंच नव्हतं. खरं तर लग्न होऊन मुंबईत आल्यावर मी ग्रामसेवकाची परीक्षा दिली होती. मी अ‍ॅग्रीकल्चरचा डिप्लोमाही केला आहे. काही दिवसांनंतर सासरच्या शेतीतही नवनवीन प्रयोग करायचे आहेत.’’ योगिता सांगत राहिली..

परिवहन विभागाने स्त्रियांना ऑटो रिक्षा परवाना वाटपात ५ टक्के आरक्षण दिल्याने त्या स्वावलंबी होऊ  लागल्या आहेत किंवा भविष्यातही होतील याची चुणूक योगिताच्या रूपाने अनुभवायला मिळाली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे हे समान सूत्र स्वीकारून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागाने महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेतले. त्यातला हा महत्त्वाचा निर्णय. २०१४ मध्ये राज्यात रद्द किंवा नूतनीकरण न झालेल्या झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांची ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर महापालिका क्षेत्रांमधील ४२७९८ परवान्यांपैकी ५ टक्के परवाने म्हणजे २१३९ परवाने स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आले. या लॉटरीमध्ये मुंबई महानगरक्षेत्रात ४६५ व इतर क्षेत्रात ८३ अशा ५४८ स्त्रियांची यशस्वी उमेदवार म्हणून निवड झाली.

महिला उमेदवार जसजशा बॅज् प्राप्त करून अर्ज करतील त्यांना प्रथम प्राधान्य देऊन आरक्षित परवान्यांचे फर्स्ट कम फर्स्ट सव्‍‌र्ह या तत्त्वावर वितरण केले जाईल. हे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना असतील. मुंबई महानगर क्षेत्रात ५ टक्के याप्रमाणे आणखी १३१६ तर इतर क्षेत्रांत २७५ परवाने महिलांसाठी राखीव रिक्त आहेत. यासाठी कोणत्याही कार्यालयात स्त्रिया अर्ज करू शकतील. त्यांच्यासाठी उपलब्ध आरक्षित परवान्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

लॉटरीद्वारे परवान्यांचे वाटप करतानाच्या अटी

 • ऑटो रिक्षा परवाना मिळण्यासाठी ज्या परिवहन विभागाच्या कार्यालयीन क्षेत्रात वास्तव्याचा पुरावा आहे त्या कार्यालयात अर्ज करणे गरजेचे आहे.
 • हे परवाने देताना शासन निश्चित करेल त्या नियमाप्रमाणे सुधारित शुल्क भरणे आवश्यक राहील.
 • अर्जदाराकडे संबंधित वाहन चालवण्याची वैध मान्यता आणि सार्वजनिक सेवा वाहन बिल्ला असणे आवश्यक
 • अर्जदारास स्थानिक भाषेचे ज्ञान आणि परवाना क्षेत्रातील स्थळांची माहिती असावी
 • अर्जदाराविरुद्ध मागील एका वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या दखलपात्र गुन्हयांची नोंद झाली नसल्याचा पोलीस विभागाचा दाखला असावा
 • अर्जदाराने शासनाच्या, निमशासकीय किंवा खासगी कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे
 • मुंबई महानगर क्षेत्रात परवान्यावर दाखल करावयाची ऑटोरिक्षा ही सीएनजी/ एलपीजी इंधनावर चालणारी असावी
 • परवान्यावर दाखल करावयाची ऑटो रिक्षा पुण्यात, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरात सीएनजी/ एलपीजी या इंधनावर चालणारी असावी व अन्य क्षेत्रात पेट्रोलवर चालणारी असावी.
 • सर्व वाहनांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे आवश्यक राहील.
 • स्थानिक गरजेनुसार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने लागू केलेले अतिरिक्त नियम लागू राहतील.
 • सर्व महापालिका क्षेत्रामध्ये परवान्यांवर नोंद करण्यासाठी नवीन वाहन असावे. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी परवान्यावर दाखल करण्यात येणारे वाहन हे ५ वर्षांच्या आतील असावे.
 • भविष्यात शासनाने निश्चित केल्यास परवानाधारक ऑटो रिक्षामध्ये जीपीएस/ जीपीआरएस तसेच आरएफआयडी टॅग बसवणे बंधनकारक राहील.
 • अर्जदाराचे राज्यातील वास्तव्य किमान सलग १५ वर्षे असावे
 • शैक्षणिक अर्हतेची कोणतीही अट महिलांना लागू नाही
 • स्त्रियांच्या रिक्षाचा रंग अबोली राहील तसेच ही रिक्षा फक्त स्त्रियाच चालवू शकतील.
 • तेव्हा स्त्रियांनो, वाट कशाची पाहाताय, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाही अटी आणि शर्तीची पूर्तता करत असाल तर योगितासारखा वेगळ्या वाटेवरून चालण्याचा विचार का नाही करत?

 

डॉ. सुरेखा मुळे

drsurekha.mule@gmail.com

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:25 am

Web Title: department of transportation auto rickshaw license
Next Stories
1 नियमित उत्पन्नाचं मीटर डाऊन
2 नोकरदार नव्हे व्यावसायिक
3 उपाहारगृहे
Just Now!
X