News Flash

सामाजिक सुरक्षिततेसाठी विमा

कौशल्यात वाढ करणारी काही महत्त्वाकांक्षी पावलं अलीकडे वेगाने पडताना दिसत आहेत.

एका बाजूला भरभराट आणि दुसऱ्या बाजूला जीवन जगण्यासाठीचा संघर्ष, उत्पन्न आणि रोजगाराच्या बाबतीत असलेली अस्थिरता असा विरोधाभास असलेल्या समाजामध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरक्षित करून त्यांचा विकास साधणे ही एक आव्हानात्मक बाब असली तरी शासन हे आव्हान स्वीकारताना दिसत आहे.  विकासापासून वंचित राहिलेल्या माणसाचा विचार करून त्याला आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देणारी आणि त्यांच्या कौशल्यात वाढ करणारी काही महत्त्वाकांक्षी पावलं अलीकडे वेगाने पडताना दिसत आहेत.

‘फंडिंग टू अनफंडेड’, ‘पेन्शन टू अन्पेशन्ड’ ही संकल्पना हाती घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक विकास पोहोचवणारी अर्थनीती आखली जात आहे. असंघटित आणि असुरक्षित रोजगार क्षेत्रात वावरणारे मग पुरुष असोत किंवा स्त्रिया त्यांच्यापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्याचा, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या प्रयत्नातूनच पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांचा जन्म झाला. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्त्रिया आणि पुरुष दोघेही पात्र आहेत.

या योजनांसाठीचा वार्षिक हप्ता पाहिला तर समाजातील गरिबातील गरीब व्यक्ती त्यात सहभागी होऊन विम्याचे छत्र प्राप्त करून घेऊ  शकतात, इतका तो कमी आहे. शिवाय समाजातील अशा गरीब वर्गासाठी काही करू इच्छिणाऱ्या व्यक्ती ही या लोकांची विम्याची वार्षिक रक्कम भरून त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करू शकतात. गरज आहे आपण पुढे येण्याची. पुढे येऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याची..

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

योजनेचा वार्षिक हप्ता प्रति व्यक्ती प्रति वर्ष १२ रुपयांचा आहे. एक वर्षांचे विमा संरक्षण देणारी ही एक अपघात विमा योजना आहे. या अंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना २ लाख रुपयांची विमा भरपाई मिळते, तर दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि न बरी होणारी हानी/ दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास/ एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते.

 • एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपयांची विमा भरपाई मिळते.
 • १८ ते ७० वयोगटातील बँक बचत खातेदारांना योजनेचा लाभ घेता येतो.
 • बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या सहकार्याने योजनेची अंमलबजावणी.
 • योजनेचा कालावधी १ जून ते ३१ मे असा आहे.
 • योजना पुढच्या वर्षी सुरू ठेवावयाची असल्यास नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक.
 • संयुक्त नावे बचत खाते असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेत सहभागी होता येईल.
 • विमाधारकाने वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यास बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता जमा करण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास किंवा बँक खाते बंद झाल्यास विमा संरक्षण संपुष्टात येते. तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता करून पुन्हा सुरू करता येते.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

 • दोन लाखांचा विमा आणि एक वर्षांचे विमा संरक्षण असलेली ही एक जीवन विमा योजना आहे.
 • दरवर्षी योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक.
 • बँका आणि भारतीय जीवन विमा महामंडळ यांच्या सहकार्याने योजनेची अंमलबजावणी.
 • १८ ते ५० वयोगटातील सर्व बँक बचत खातेधारक योजनेत सहभागी होऊ शकतात
 • योजनेचा वार्षिक हप्ता प्रति व्यक्ती प्रति वर्ष ३३० रुपयांचा आहे.
 • योजनेत सहभागी झाल्यांनतर आणि वयाच्या पन्नाशी नंतर इच्छा असल्यास ही योजना पुढे पाच वर्षे सुरू ठेवता येईल, त्यासाठी प्रत्येक वर्षी विमाधारकाला ३३० रुपयांचा हप्ता भरणे आवश्यक राहील.
 • एका व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर कोणत्याही एका बचत खात्याद्वारे योजनेत विमा उतरवता येईल.
 • संयुक्त नावे बचत खाते असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेत सहभागी होता येईल.
 • योजनेचा कालावधी १ जून ते ३१ मे असा राहील.
 • विमा हप्ता खातेदाराच्या नावे परस्पर बँकेत टाकला जाईल.
 • योजना पुढच्या वर्षी सुरू ठेवावयाची असेल तर तसा अर्ज ३१ मेपूर्वी देणे आवश्यक.
 • विमाधारकाचा ५५ वर्षांच्या आत कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसास २ लाख रुपयांची भरपाई मिळेल.
 • विमाधारकाने वयाची ५५ वर्षे पूर्ण केल्यास बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता जमा करण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास किंवा बँक खाते बंद झाल्यास विमा संरक्षण संपुष्टात येणार.
 • तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी अटींची पूर्तता करून पुन्हा सुरू करता येईल.

अटल पेन्शन योजना

 • ही निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक परतावा देणारी सरकारी पेन्शन योजना आहे.
 • योजना मुख्यत: असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी. ज्यांना कोणतीही पेन्शन योजना उपलब्ध नाही अशांसाठी लाभदायक आहे.
 • बँका आणि पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहकार्याने योजनेची अंमलबजावणी केली जाते.
 • १८ ते ४० वयोगटातील व्यक्ती त्यांच्या बँकेतील बचत खात्याद्वारे योजनेत सहभागी होऊ शकतात.
 • केलेल्या गुंतवणुकीनुसार वयाच्या ६० व्या वर्षांपासून १ हजार रुपये ते ५००० रुपयांपर्यंतची पेन्शन योजनेतून मिळते.
 • समजा १८ वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा ४२ रुपये भरले तर त्या व्यक्तीला त्याने ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा एक हजार रुपयांची पेन्शन मिळेल. आणि त्याने दरमहा २१० रुपये भरले तर ५ हजार रुपयांची मासिक पेन्शन मिळेल. यात ग्राहकाच्या योगदानाबरोबर पहिली पाच वर्षे (२०१५-१६ ते २०१९-२०) सरकारचेसुद्धा योगदान असणार आहे हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या ५० टक्के किंवा एक हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे असेल. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षितता नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान उपलब्ध आहे. ग्राहकाचा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या किंवा तिच्या पतीस किंवा पत्नीस पेन्शन चालू राहील. दोघांचा मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एकरकमी परत करण्याची तरतूद यात आहे.

अटल पेन्शन योजनेत वयानुसार सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या लाभाची व या तीनही योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी www.jansuraksha.gov.in/www.financialservices.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. दूरध्वनीवरून माहिती घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक आहे १८००११०००१/ १८००१८०११११.

योजनेची प्रीमियमची रक्कम खातेधारकाच्या बचत खात्यातून बँकेद्वारे ऑटो डेबिट सुविधेच्या माध्यमातून भरली जाते. कोणतीही व्यक्ती केवळ एका बचत खात्याद्वारा या योजनांसाठी पात्र आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेची शाखा, बँक मित्र/ सूक्ष्म विमा अभिकर्त्यांशी (एजंट) संपर्क साधावा लागतो किंवा याचे कॅम्प आयोजित होतात.

डॉ. सुरेखा मुळे

drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:04 am

Web Title: insurance for social security
Next Stories
1 पर्यटनातून रोजगार
2 आरोग्यविषयक योजना
3 स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना
Just Now!
X