एसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना स्वस्त, दर्जेदार आणि रुचकर आहार मिळावा तसेच स्त्रियांना रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक विकासाची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी एसटी महामंडळाने राज्यातल्या ५६ बसस्थानकांतील रिक्त उपाहारगृहे महिला बचतगटांना करार तत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘‘नाही हो, नाही जमत ते रोज हॉटेलचं खाणं.. चांगलं असतं पण नाही आवडत. एखाद्या दिवशी ठीक आहे पण रोज? नाही बाबा, घरचं जेवण ते घरचं जेवण.’’ ही भावना माझ्या एकटीची नाही. बाहेर कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही, जेवल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे खूप जण आहेत, कारण आपल्याला सवय आहे ती तव्यावरची गरमागरम भाकरी, झुणका आणि मिरच्याचा ठेचा खाण्याची. वरणभात-भाजी, भाकरी किंवा चपाती, कोशिंबीर असा साधा मेनू आपल्याला आवडून जातो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

अलीकडच्या काळात तर आपण आरोग्याच्या बाबतीत जास्तच जागरूक झालो आहोत. फार चमचमीत, मसाल्याचं, रोज खोबऱ्या-कांद्याचं वाटण करून केलेली भाजी वाटते. त्यातल्या कॅलरीज आपल्याला खुणावत राहातात. शिवाय बाहेर जेवायचं तर ही सगळी पथ्ये पाळून कोण जेवण तयार करणार? तिथे स्वच्छता कशी असणार, हा प्रश्नही मनात असतोच..  अशातच जर तुम्हाला स्त्रियांनी, स्वच्छ परिसरात केलेले आणि आपल्या दैनंदिन आहाराचं वैशिष्टय़ जपलेलं जेवणाचं ताट किंवा नाश्ता समोर आणून दिला तर? तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

आपल्या मनातील हीच भावना ओळखून बसस्थानकांमधील उपाहारगृहे महिला बचतगटांना करार तत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने ७ नोव्हेंबर २०१५च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. याचे दोन उद्देश होते. एक एसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मिळणारा आहार हा स्वस्त, दर्जेदार आणि रुचकर मिळावा, दुसरं स्त्रियांच्या हाताला काम मिळून महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला वेग यावा. यातून स्त्रियांच्या आर्थिक विकासाची चळवळ अधिक गतिमान व्हावी.

एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजलं जातं. हजारोंच्या संख्येने रोज प्रवासी येथे येत-जात असतात. या सर्व प्रवाशांची नाश्ता, जेवण आणि चहापाण्याची व्यवस्था उत्तम व्हावी, सामान्य माणसाला स्वस्त दरात, पौष्टिक आणि रुचकर खाद्यपदार्थ मिळावेत म्हणूनही या निर्णयाकडे अतिशय स्वागतार्ह दृष्टीनं पाहता येईल.

राज्यात ५९७ एसटी बसस्थानकं आहेत. यामध्ये  ५६ बसस्थानके अशी आहेत जिथे सध्या उपाहारगृह रिक्त आहे किंवा तेथील करार संपुष्टात आला आहे. या ५६ ठिकाणी फक्त महिला बचतगटांकडून ई-निविदा मागवण्याची कार्यवाही सुरू आहे. या निविदा जिल्ह्य़ाच्या विभागीय नियंत्रकांकडून काढण्यात येत असून त्या फक्त महिला बचतगटांसाठीच असणार आहेत. तसेच पुढे उर्वरित बसस्थानकांध्ये जसजसे जुने करार संपुष्टात येतील तसतसे नवीन परवाने देताना ते फक्त महिला बचतगटांनाच दिले जातील. लवकरच या संदर्भातील निविदा वर्तमानपत्रांतून जाहीर होतील.

प्राप्त निविदांमध्ये ज्या महिला बचतगटाचा दर सर्वाधिक येईल त्या महिला बचतगटांना हे उपाहारगृह व्यावसायिक तत्त्वावर चालवण्यासाठी दिले जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यासंबंधीच्या सविस्तर अटी आणि शर्तीही निश्चित केल्या आहेत. त्या सर्व अटी आणि शर्तीचे पालन या संबंधित महिला बचतगटांकडून होणे आवश्यक आहे.

प्रत्येत स्त्रीमध्ये एक यशस्वी व्यवस्थापक दडलेला असतो असे म्हटले जाते. घर-संसार सांभाळून व्यवसायाची बाजू उत्तमरीत्या सांभाळणारे आणि विविध क्षेत्रांत काम करून नाव कमावणारे अनेक महिला बचतगट आपल्याकडे आहेत. या स्त्रियांच्या कर्तृत्वाला अधिक चालना देण्यासाठी तसेच तिच्या पंखात बळ देताना तिच्यासाठी स्वयंरोजगाराचं एक मोकळं आकाश उपलब्ध करून देण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून झाले आहे. एका बचतगटात दहा महिला आहेत, असं गृहीत धरलं तर आजमितीस ५६ ठिकाणी ५६० स्त्रियांच्या हाताला रोजगार मिळेल. उपाहारगृहात काम करणारे कर्मचारी स्त्रियाच असणे बंधनकारक केल्याने इतर कामांसाठीही स्त्रियांना मोठी संधी मिळेल, तर एसटी बसस्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला स्वस्त किमतीत घरच्या जेवणाचा स्वाद!

तुमचा महिला बचतगट आहे तर मग हे वाचा-

* ज्या एसटी स्थानकात सध्या उपाहारगृह रिक्त आहे किंवा तेथील उपाहारगृहाचा परवाना कालावधी संपला आहे अशा बसस्थानकांचा ई-निविदेसाठी विचार होईल. तिथे नवीन उपाहारगृह परवाना देताना फक्त महिला बचतगटांसाठी निविदा मागवल्या जातील.

महिला बचतगटांकडून सहा महिन्यांच्या मासिक परवाना शुल्काएवढे सुरक्षा अनामत (सिक्युरिटी डिपॉझिट) घेण्यात येईल. ते सध्याच्या १५ महिन्यांच्या मासिक परवाना शुल्क रकमेच्या तुलनेत सहा महिने इतके कमी करण्यात आले आहे.

*ज्या दिवशी निविदा प्रसिद्ध होईल (वर्तमानपत्रांतूनही) त्या दिवशी महिला बचतगटाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे, तसेच एक वर्षांपूर्वी या गटाने मान्यताप्राप्त बँकेत आपले खाते उघडलेले असणे आवश्यक आहे.

बचतगटाच्या पासबुकमधील प्रत्येक पानाची वर्षभराची नोंद असलेली साक्षांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

बचतगटाला कोणत्याही बँकेचा फिरता निधी मिळालेला असणे आवश्यक. तसेच संस्थेचे वर्गीकरण किमान दुसऱ्या श्रेणीत असणे (Second Gradation) आवश्यक.

*दोन सक्षम जामीनदारांचे स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र (मूळप्रत).

बयाणा रकमेची मूळ पावती.

निविदेत कुठलीही खाडाखोड नसावी.

बचतगटाने यापूर्वी असे काम इतर कुठल्याही व्यावसायिक महामंडळात केले असल्यास त्याची माहिती.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज’ डिपार्टमेंटचा परवाना प्राप्त करून घेण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक.

महिला बचतगट आणि बचतगटातील सदस्यांवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा संबंधित पोलीस ठाण्याचा दाखला आवश्यक (निवड झाल्यास).

महिला बचतगटातील सदस्यांची नावं आणि पद याची माहिती.

गट हा व्यवहाराच्या पंचसूत्रीचे पालन (नियमित उपस्थिती, नियमित बैठका, नियमित बचत, नियमित कर्जव्यवहार, नियमित परतफेड) करणारा आहे याचे शिफारसपत्र संबंधित एजन्सी, संस्था यांच्याकडून प्राप्त  असावे. गटाचा निधी किमान ५० हजार रुपये इतका असावा.

जामीनदाराचे स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र आवश्यक (मूळप्रत).

विभागीय छाननी समितीच्या शिफारसीनुसार विभागनियंत्रक हे शिफारसींची तपासणी करून परवानाधारकांच्या निवडीसंदर्भात योग्य तो निर्णय सात  दिवसांत घेतील. विभाग नियंत्रक हे जर विभागीय निवड समितीच्या शिफारशीस सहमत नसतील तर सहमत नसल्याबद्दलच्या कारणांसह सविस्तर नोंदी करतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील.

याव्यतिरिक्त महिला बचतगटांकडून परवाना कालावधीमध्ये शुल्काचा भरणा नियमित न झाल्यास त्यांच्याकडून वसुलीची कार्यवाही करताना महामंडळ न्यायालयीन प्रक्रिया हाती घेईल. अशातच संबंधित बचतगट विघटित वा बरखास्त झाला तर महिला बचतगटास नोटीस देऊन त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल. संबंधित महिला बचतगटातर्फे महामंडळाकडील थकीत रकमेच्या वसुलीबाबत संबंधित जामीनदारांना नोटीस देऊन वसुलीबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली जाईल.
संबंधित बचतगटाची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यास किंवा प्राधिकरणास त्या महिला बचतगटाबाबत शासकीय तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत कळवले जाईल. शक्य झाल्यास त्या महिला बचतगटातील पदाधिकाऱ्यांना भविष्यातील शासकीय योजनेतील तरतुदीकरिता कायमस्वरूपी बाद करण्याचा विचार केला जाईल. या अटी आणि शर्ती फक्त उपाहारगृहे या व्यावसायिक आस्थापनाकरिता लागू राहतील.
स्त्रियांसाठी हा एक रोजगाराचा आणि म्हणूनच स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा भक्कम मार्ग आहे.

सध्या रिक्त ५६ उपाहारगृहे

विभाग        आगार                  बसस्थानक

पालघर        वसई                    गणेशपुरी

रत्नागिरी       देवरूख              माखजन

रत्नागिरी       चिपळूण            शिवाजीनगर

रत्नागिरी       रत्नागिरी           रत्नागिरी

सिंधुदुर्ग       कुडाळ                   कसाल

सिंधुदुर्ग       वेंगुर्ला                   वेंगुर्ला

सिंधुदुर्ग       कणकवली            तरळा

सिंधुदुर्ग       कणकवली            दोडामार्ग

ठाणे          मुरबाड                    मुरबाड

नाशिक        नाशिक-१              निमाणी

नाशिक        पिंपळगाव            पिंपळगाव

नाशिक        मनमाड                चांदवड

नाशिक        लासलगाव           लासलगाव

नाशिक        पेठ                       दिंडोरी

जळगाव       मुक्ताईनगर       मुक्ताईनगर

जळगाव       पाचोरा                भडगाव

जळगाव       चोपडा                 चोपडा

जळगाव       चाळीसगाव       चाळीसगाव

अहमदनगर     पाथर्डी             पाथर्डी

अहमदनगर     नेवासा            सोनई

अहमदनगर     नेवासा            नेवासा

अहमदनगर     अकोले            अकोले

अहमदनगर     पारनेर              सुपा

कोल्हापूर        राधानगरी       राधानगरी

पुणे                तळेगाव           तळेगाव

सांगली        सांगली                सांगली

सांगली        मिरज                 मिरज

सांगली        तासगाव           तासगाव

सांगली        आटपाडी           खरसुंडी

सातारा        फलटण            फलटण

सातारा        कोरेगाव           कोरेगाव

सातारा        वडूज                मायनी

सातारा        पाटण               तारळे

सातारा        पाटण                ढेबेवाडी

सातारा        दहीवडी            शिंगणापूर

सातारा        महाबळेश्वर     महाबळेश्वर

सातारा        पा. खंडाळा       लोणंद

सोलापूर       माढा                मोहोळ

सोलापूर       अकलूज            नातेपुते

सोलापूर       बार्शी                  वैराग

औरंगाबाद      औरंगाबाद       फुलंब्री

औरंगाबाद      वैजापूर           शिऊर

बीड          अंबाजोगाई           घाटनांदूर

नांदेड         कंधार                  कंधार

नांदेड         भोकर                  भोकर

उस्मानाबाद     उमरगा          उमरगा

परभणी        पाथरी                पाथरी

परभणी        वसमत              वसमत

गडचिरोली      गडचिरोली      आरनेरी

गडचिरोली      ब्रह्मपुरी          ब्रह्मपुरी

गडचिरोली      अहेरी              अहेरी

गडचिरोली      अहेरी              कुरखेडा

नागपूर        रामटेक               रामटेक

अकोला        मंगळूरपीर         मंगळूरपीर

अमरावती       दर्यापूर            दर्यापूर

अमरावती       दर्यापूर            चांदूररेल्वे