मला कळतंय रे बाळांनो की मी थोडा.. थोडा नाही खूपच मोठ्ठय़ा आवाजात बोलतो हल्ली, तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये, एखाद्या फोनवरच्या बोलण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो माझ्या मोठ्ठय़ांदा बोलण्याचा. तुम्ही खुणांनी, कधी शब्दांनी कधी नुसत्याच कपाळावरच्या आठय़ांनी सांगता मला की, अप्पा हळू.. कमी आवाज; म्हणजे बहुतेक वेळा प्रेमानेच सांगता तुम्ही मला, पण क्वचित एकदम ओरडता अंगावर.. आणि खरंच आहे तुमचं.. कटकट होते ना? समजतं मला ते पण.. पण मुद्दाम नाही रे मी मोठ्ठय़ा आवाजात बोलत.. इतकी र्वष तुमच्यासारखाच होतो की मी.. पण सत्तरी ओलांडली, पंचाहत्तरी गाठली आणि कसं.. कधी.. केव्हा कळलंसुद्धा नाही, पण इतकं कमी ऐकू येतंय मला की कदाचित त्यामुळेच ओरडून ओरडून बोलतो मी.. तुमची आई पण ओरडते मला की अहो फोनवर बोलताय ना? मग इतकं का ओरडायचंय? थेट अमेरिकेला ऐकू जाईल राणीला.. आणि गंमत म्हणजे तिचे कान मात्र सत्तरीतसुद्धा उत्तम!! बी.पी. नाही, डायबेटिस नाही पण.. पण.. इतक्या हुशार बाईची.. म्हणजे अरे प्रिन्सिपल ना ती कॉलेजची.. १९९९ मध्ये निवृत्त झाली तेव्हासुद्धा प्रत्येक बॅचच्या मुलांची नावं तोंडपाठ होती तिला.. आणि अशा बाईची स्मृती अशी कशी इतकी अंधूक झाली? परवा अचानक मलाच म्हणाली, ‘‘काय काम आहे तुमचं?’’ मी काही बोलतो तर म्हणाली, ‘माझा मुलगा येईल आता, मोठ्ठा शास्त्रज्ञ आहे.. त्याच्याशी बोला.. आणि चक्क हात जोडून.. ‘भेटू पुन्हा’ म्हणाली!!

मलासुद्धा विसरते ती आता अधूनमधून, पण तू आणि राणी यांचे संदर्भ सतत असतात तिच्या बोलण्यात, विचारांतही असणारच.. तू रोज ऑफिसमधून आल्यावर येतोस आमच्या खोलीत तेव्हा कशी हसते ती!! पाहतोस ना तू? खरं सांगू तुमच्या लहानपणी मी आणि तुझी आई बाहेरून संध्याकाळी घरी यायचो ना तेव्हा तू आणि राणी अगदी अस्सेच हसून धावत यायचात आणि आम्हाला बिलगायचात.. एकदा ऑफिसमधून आलास की तिला घट्ट कुशीत घेशील का रे?. आता आम्ही दोघं तुझी मुलंच आहोत असं समज.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

परवा तुझी मावशी आली तर तिलासुद्धा अजिबात ओळखलं नाही तिनं.. मला विचारलं, ‘‘या बाई कोण?’’, ‘‘चेहरा आमच्या आईसारखा आहे’’.. खूप रडली मावशी तुझी. मी मुद्दाम सगळं रोजचं रोज सांगत बसत नाही तुला. तू, सूनबाई आणि मुलं सगळं ऐकता आमचं म्हणून किती बोलायचं आम्ही? नाही का?

राणी डिसेंबरमध्ये येणार म्हणतीये ते मात्र मनात आहे तुझ्या आईच्या. तुम्ही दोघं शाळेतच आहात अशा थाटात बोलली परवा फोनवर राणीला.. म्हणाली, ‘दादाबरोबर घरी ये.. उगाच मैत्रिणींकडे जाऊ नको.’ अजूनही भाषा किती सुंदर बोलते, लिहिते तुमची आई. मधूनच बालकवी, केशवसुत, गोविंदाग्रज यांच्या कविता घडाघडा म्हणते.. कधी-कधी सगळंच्या सगळं आठवतं तिला आणि कधी लहान मुलीसारखी उशीत डोकं खुपसून रडत बसते.. म्हणते, आई नाही.. कॉलेज नाही.. कुठे येऊन पडलीये मी.. आणि एक दिवस मात्र कागद-पेन घेऊन बसली आणि तिच्या टपोऱ्या सुंदर अक्षरात कविता लिहिलीये..

ही बघ..

– सारखं सारखं नका मला विचारू की.. आठवतंय का तुला? आठवतंय का?

..मी खरंच मेंदूच्या सगळ्याच्या सगळ्या नसा ताणून प्रयत्न करतीये पण नाही मला आठवत काही..

मला सारखं समजावून नका सांगू की.. कसा आजार.. कसं शास्त्र.. कसं आयुष्य.. नको..

मला समजावून सांगण्याची नाही.. समजून घ्यायची ही वेळ आहे..

तुमच्या कल्पनेपलीकडे गोंधळ चाललाय माझ्या मनांत.. शाळेतले सर.. एसटीचा प्रवास.. बाबांचा आवाज येतो कानांत..

मधूनच लहानपणीची भोंडल्याची गाणी,

आजीच्या नऊवारी लुगडय़ाचा मऊ मऊ स्पर्श जाणवतो गालाला

..उंच डोंगर, दऱ्या, धबधबे दिसतात..

लहानपणच्या राजू आणि राणीचा आवाज येतो कानांत

‘‘आई.. आई..’’

खूप चेहरे, खूप प्रसंग, खूप आवाज नुसते भराभरा सरकतात डोळ्यांवरून, मेंदूमधून

यांचा चेहरा मात्र ओळखते मी. म्हणजे असं वाटतं मला.. कारण कधी कधी एक अनोळखी माणूस मला औषधाच्या गोळ्या देतो आणि तो ओळखीचा वाटतो, पण आठवत नाही नक्की..

– मला कळतंय की थोडं जास्तच अवघड आहे माझ्याबरोबर जगणं पण फक्त शांतपणे थांबा तुम्ही माझा हात धरून माझ्याशेजारी..

माझे भरभरून देण्याचे दिवस सरले असावेत. ..पण मी काय करू? मी प्रयत्न करते प्रत्येक संदर्भ

पुन्हा पुन्हा आठवण्याचा.. कधीकधी तर खोटंसुद्धा बोलते.. नाटक करते मी.. ओळखल्याचं.. आठवल्याचं.. तुम्हाला बरं वाटावं म्हणून.. पण..

मला खरंच नाही आठवत काहीच.. पण थांबाल ना माझ्यासोबत? माझा हात धरून? त्या शेवटच्या प्रवासापर्यंत? – सौ. इरावती. कविता वाचून खूप रडलो मी.. आम्ही खरंच थकलो आता! चाळिशीत.. अगदी पन्नाशीतसुद्धा वाटत असतं की आपण राहू व्यवस्थित. लहानपणापासून जसे व्याधींनी ग्रासलेले आजी-आजोबा पाहिले तसं आपलं नाही होणार. पण नेमक्या कोणत्या रात्री त्वचेवर पहिली सुरकुती पडते कळतसुद्धा नाही. नकळत जाणवायला लागतं, की आता नाही जिना चढवत.. नाही राहात हात स्थिर अगदी पाण्याचं भांडं उचलतानासुद्धा. बेल वाजल्यावर खूपदा वाटतं पट्कन जाऊन दार उघडावं, स्वागत करावं.. मन पटकन् धावतही, पण पाय उचलवत नाही.

मुद्दाम नाही करत कोणी हे. कोणाला आवडेल असं खुर्चीवरून उठताना कोणाचा तरी हात धरून उठायला? आम्हीही वीस-तीस वर्षांपूर्वी वादळाला अंगावर घ्यायचो, पण रंग लावून पांढऱ्याचं काळे होऊ शकतात ते केस.. वय कसं बदलणार?

आजही तुम्ही आम्हाला सल्ला विचारता तेव्हा बरं वाटतं.. हेसुद्धा समजत असतं की, आपण मुलांना- नातवंडांना दहा-दहा वेळा एकच गोष्ट सांगतोय, पण पुढची पिढी घडताना पाहणं हा जसा सर्वोच्च आनंद आहे, तशी काळजीची वस्ती मनात कायमची व्हायला तुम्हाला आजी-आजोबा व्हावं लागेल.

आम्हाला तुमचे मॉल नको, पैसा नको, मोठे-मोठे टी.व्ही. नको. फक्त तुमच्या आवाजात रोज एकदा ‘‘कसे आहात तुम्ही?’’ एवढं वाक्यसुद्धा ऑक्सिजन देतं आम्हाला..

गेल्या आठवडय़ात तुमची आई अगदीच अनोळखी माणसासारखं वागत होती माझ्याशी.. एकदा तर मला म्हणाली, ‘‘बरं झालं तुम्ही आलात.. नवीन ओळख झाली..’’ मग मीही विचारलं, ‘‘काय करता तुम्ही?’’ तर म्हणाली, ‘‘मराठी वाङ्मय आणि कवितेचं समाजातील महत्त्व या विषयावर डॉक्टरेट आहे माझी. मिस्टर बँकेत आहेत आणि राजू आणि राणी शाळेत गेले आहेत’’ आणि मग म्हणाली, ‘‘माझ्या काही आवडत्या कविता वाचते..’’ आणि असं म्हणून तिने शंकर वैद्यांची एक कविता वाचली.. जशीजशी कविता ऐकू लागलो तसं कळेनासं झालं मला की स्मृती इतकी अंधूक होऊनसुद्धा तिने बरोब्बर याच ओळी कशा वाचून दाखवल्या मला :-

आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी

माझा निरोप घेऊन निघतांना!

पदोपदी गहिवरून येण्याचं वय

आता सुरू झालंय.

..

..

..

खरं म्हणजे तुम्ही मला आता

फसवायला हवं!

असं दाखवायला हवं की,

सहजच निघालो आहोत बाहेर, याऽऽ इथे कोपऱ्यावर

साबण आणण्यासाठी वा काडय़ाची पेटी

आणि हे असे लागलीच येणार आहोत परत

बस्स दोन मिनिटांत!

पण तरीही फसवतांना तुम्ही,

काहीतरी दुसऱ्या वस्तूचा उल्लेख करा

म्हणा लिमलेट, चॉकलेट, चहासाखर.. किंवा असंच काहीतरी

‘काडय़ाची पेटी’ मात्र नको!

आता ‘काडय़ाची पेटी’ म्हटले तरीसुद्धा

काही अशुभ वाटू लागते बघा!

आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी!!

निरोप घेऊन निघतांना..

 

तुला कळतंय ना? प्लीज.. घ्याल ना समजून?

-saleel_kulkarni@yahoo.co.in