29 January 2020

News Flash

समतेची चळवळ : जातीच्या पल्याड किती?

चळवळीला विचारधारेचा आधार असतो. चळवळीला पुढे नेण्यासाठी काही संकल्पना मांडल्या जातात.

संग्रहित छायाचित्र

मधु कांबळे madhukar.kamble@expressindia.com

जन्माच्या आधारे पुरोगामित्व वा प्रतिगामित्व ठरवण्याचा उद्योग समतेच्या चळवळीने नाकारावाच, तो का?

सामाजिक विषमता नष्ट करून समतेच्या पायावर नवसमाजाची निर्मिती करणारी चळवळ म्हणजे समतेची चळवळ. चळवळ कोणतीही असो, तिचे एक अंतिम उद्दिष्ट असते. चळवळीला विचारधारेचा आधार असतो. चळवळीला पुढे नेण्यासाठी काही संकल्पना मांडल्या जातात. अशी उद्दिष्टे, विचारधारा किंवा संकल्पना यात स्पष्टता नसेल किंवा त्यांचा अर्थ चुकीचा लावला गेला, तर चळवळ पराभूत होते.

उदाहरणार्थ, भारतीय समाजव्यवस्थेभोवती तीन वर्ग आहेत आणि त्यांचा सतत वर्गसंघर्ष सुरू आहे. पहिला वर्ग व्यवस्थारक्षकांचा; तो सर्वोच्च लाभधारक असल्यामुळे व्यवस्था टिकवण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. तो साम, दाम, दंड, भेद, बुद्धिभेद आणि प्रसंगी हिंसेचाही अवलंब करतो. दुसरा जो वर्ग आहे, त्याचा व्यवस्थेचे फायदे मिळण्यासाठी व्यवस्थारक्षक वर्गाशी झगडा सुरू असतो. परंतु तो भासवतो की तो व्यवस्था बदलासाठी संघर्ष करतो आहे. तिसरा वर्ग आहे, तो या व्यवस्थेने नागवलेले आहे म्हणून ही व्यवस्था संपूर्णपणे बदलली पाहिजे, यासाठी त्याचा लढा सुरू असतो. मात्र व्यवस्थारक्षक म्हणजे वर्ग एक अशा संपूर्ण व्यवस्था बदलाची भूमिका घेऊन रणमदानात उतरलेल्या वर्ग तीनला व्यवस्थेतील काही लाभाचा क्षुल्लक वाटा देऊन, त्याचा विद्रोह थंड करून टाकतो. विशेष म्हणजे व्यवस्थेचा लाभ मिळू लागल्यानंतर व्यवस्था बदलली, असे वर्ग तीनलाही वाटू लागते, आणि तिथे संपूर्ण व्यवस्था बदलाचा संघर्ष थांबतो. चळवळीच्या पराभवाची ती सुरुवात असते.

दुसरे असे की, इतिहासात किंवा भूतकाळात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी घडलेल्या असतात. त्या सगळ्याच वर्तमानकाळात घेऊन चालता येत नाहीत. त्यातील चांगल्या गोष्टी बरोबर घ्याव्या लागतात, वर्तमानात समतेच्या चळवळीला हानिकारक असतील, त्या भूतकाळातच गाढून टाकाव्या लागतात. तसे केले नाही तर समतेची चळवळ पराजित होण्याचा धोका असतो. समतेच्या चळवळीचे म्हणून एक तत्त्वज्ञान असते किंबहुना ते आहेच. बुद्ध- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचे एकत्रित सार म्हणजे समतेचे तत्त्वज्ञान. समतेच्या चळवळीने जर समतेच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत वर्तन केले नाही किंवा समतेच्या तत्त्वज्ञानावार आघात करणाऱ्या संकल्पना मांडल्या किंवा स्वीकारल्या तर समतेच्या चळवळीची हार होते. या पाश्र्वभूमीवर, समतेच्या चळवळीचे उद्दिष्ट, संकल्पना स्पष्ट आहेत का, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत आहेत की विसंगत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जातिअंताचे अंतिम उद्दिष्ट असलेली ही समतेची चळवळ जातमुक्त आहे का, यावर नव्याने विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे.

तिरस्काराधारित व्यवस्था नको

भारतातील जातिव्यवस्था केवळ समाजाची विभागणी करून थांबत नाही, तर ती एकमेकाचा द्वेष, तिरस्कार करायला भाग पाडते. एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते, वरची जात खालच्या जातीवर अन्याय-अत्याचार करते, त्यातून या देशात कायम जातिसंघर्षांचे वातावरण राहिले व आजही ते संपलेले नाही. अशा परिस्थितीत जातिनिर्मूलनाचे मोठे आव्हान समतेच्या चळवळीपुढे आहे. एका जातीने दुसऱ्या जातीच्या विरोधात किंवा काही जातींनी काही जातींच्या विरोधात युद्ध पुकारून समता प्रस्थापित करता येईल का, तर खचितच नाही; परंतु आज नेमके तेच किंवा तसेच घडते आहे. हे कटू वास्तव बदलायचे असेल तर समतेच्या चळवळीने स्वीकारलेली विचारधारा आणि योजलेल्या संकल्पना यांची फेरतपासणी करण्याची आवश्यकता आहे.

भारतीय समाजव्यवस्थेत जन्माने जात व जातीने माणसाचा उच्च-नीच असा दर्जा ठरविला जातो. अशा प्रकारची जन्मावर आधारित माणसाचे श्रेष्ठत्व वा कनिष्ठत्व ठरविणारी विचारसरणी प्रथम समतेच्या चळवळीने नाकारली पाहिजे. परंतु आजची समतेची चळवळ ती स्वीकारत नसली तरी ठामपणे नाकारतही नाही. किंबहुना समतासंगराचा आधारही जन्माधारित जातच ठरते की काय, अशी आजची परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, बहुजन-अभिजन, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मूळनिवासी-विदेशी या जातीला घट्ट पकडून ठेवणाऱ्या संकल्पना जातमुक्त आहेत का किंवा त्या जातीच्या किती पल्याड आहेत, या प्रश्नांचे उत्तर शोधावे लागेल.

जन्माधिष्ठित जात-वर्ण व्यवस्था नाकारणारे बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर हे कृतिशील विचारवंत समतेच्या चळवळीचे आदर्श असतील, तर मग बहुजन-अभिजन, ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा मूळनिवासी व उपरे अशी समाजाची पुन्हा जाती-जातीत द्वेष आणि तिरस्काराच्या पायावर विभागणी कशी काय केली जाऊ शकते, मग अशा चळवळीला समतेची चळवळ म्हणावे का? काल त्याने माझ्यावर अन्याय केला, म्हणून मी आज त्याचा सूड घेणार किंवा बदला घेणार हा समतेचा विचार होऊ शकत नाही. द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. समतेच्या चळवळीने बुद्धाचा हा विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

जो बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराचे समर्थन करतो किंवा त्या विचाराच्या बाजूने उभा राहतो, तो माणूस जातिव्यवस्थेच्या विरोधात असतो, तो बहुजन-अभिजन, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मूळनिवासी-विदेशी असला भेद करत नाही आणि मानतही नाही. शूद्र-अतिशूद्रांना व स्त्रियांना गुलाम करणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात जोतिबा फुल्यांनी वैचारिक बंड पुकारले. त्यांनी शूद्रांना व स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली करण्यासाठी शाळा सुरू केल्या, त्या वेळी जगन्नाथ सदाशिव, अण्णा सहस्रबुद्धे, केशव शिवराम जोशी, विष्णू मोरेश्वर भिडे, बापू रावजी मांडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, सदाशिवराव गोवंडे, मोरोपंत वाळवेकर, सखाराम यशवंत, बाबा मनाजी डेंगळे, विष्णुपंत थत्ते, केशवराव भवाळकर-जोशी अशा सुजाण मंडळींनी त्यांना साथ दिली. ते फुल्यांच्या बाजूने उभे होते, म्हणून ते ब्राह्मणी व्यवस्थेचे विरोधक होते, म्हणजेच ते समतावादी होते, असे म्हणता येणार नाही का?

छत्रपती शाहू महाराजांना क्षत्रिय न मानता शूद्र मानून त्यांच्या स्नानाच्या वेळी पुराणोक्त मंत्र म्हणून त्यांच्याच पदरी नोकर असलेले नारायण भटजी त्यांना अवमानित करीत होते; हे महाराजांना कळले ते त्यांचे एक स्नेही राजारामशास्त्री भागवत यांच्यामुळे. भटजी वेदोक्ताऐवज पुराणोक्त मंत्र म्हणत आहेत, हे भागवत यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. नारायण भटजी व राजारामशास्त्री भागवत हे जन्माने कोण होते हे महत्त्वाचे नाही, तर ते कोणत्या व्यवस्थेच्या किंवा विचारांच्या बाजूने उभे होते हे महत्त्वाचे आहे. सामाजिक न्यायाची कृतिशील भूमिका घेणाऱ्या शाहू महाराजांच्या बाजूने उभे राहणारे भागवत चातुर्वण्र्य व्यवस्थेचे विरोधक ठरत नाहीत का? म्हणजे ते समतावादीच ठरत नाहीत का?

भारतातील जातिव्यवस्थेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक युद्ध पुकारले. त्या युद्धात उच्च वर्गात जन्मलेले किती तरी सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. त्याची यादी फार मोठी आहे. त्यातील एक उदाहरण म्हणून सांगता येईल. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि अस्पृश्यांनी पाणी बाटवले असा कांगावा करून काही सनातनी विचारांच्या मंडळींनी गोमूत्राने तलावातील पाणी शुद्ध करण्याचा घाट घातला. त्या वेळी पाणी बाटले, तर बघू मला काय होते, असे म्हणून बापू जोशी नावाच्या एका तरुणाने पाण्यात उडी मारली. खरे म्हणजे ते सनातनी विचारांच्या निषेधाचे प्रतीकात्मक आंदोलनच होते. त्याची शिक्षाही त्याला भोगावी लागली. बापूला त्यांच्या जातीने वाळीत टाकले. मात्र जातीच्या बहिष्काराची पर्वा न करता, बाबासाहेबांनी पुकारलेल्या समतेच्या लढय़ात उडी घेणारा बापू जोशी जातिव्यवस्थेचा विरोधक ठरत नाही का, म्हणजे तो समतावादी ठरत नाही का?

हे कप्पे गैरलागूच 

जन्माच्या किंवा वंशाच्या आधारावर मूळनिवासी कोण व विदेशी कोण हा एक मूलतत्त्ववादी विचार मांडला जातो. बाबासाहेबांच्या मूलभूत तत्त्वज्ञानालाच छेद देणारा हा विचार आहे. बाबासाहेबांनी स्वत: याविषयी असे म्हटले आहे की, वंशशास्त्रज्ञांच्या मते शुद्ध वंशांची माणसे कुठेच अस्तित्वात नाहीत आणि जगात सर्वत्र सगळ्या वंशांची सरमिसळ झालेली आहे. वास्तविक पाहता भारतात रक्त आणि संस्कृती या दोन्ही दृष्टीने विविध वंशांची सरमिसळ झाल्याच्या बऱ्याच काळानंतर जातिसंस्था अस्तित्वात आली. जाती-जातीमधला फरक हा वंशावंशांमधला फरक आहे, असे मानणे आणि भिन्न जातींना ते भिन्न वंशांचे असल्याप्रमाणे वागविणे हा सत्याचा अपलाप आहे.. .. .. जातिव्यवस्था वांशिक भेदाची सीमारेषा निश्चित करीत नाही, जातिव्यवस्था एकाच वंशाच्या लोकांचे सामाजिक विभाजन आहे (जातिव्यवस्थेचे निर्मूलन- लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र शासनाचे प्रकाशन, पान क्र.- २७).

इतिहासात बऱ्याच बऱ्या-वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. आज समतेच्या चळवळीला पूरक असतील त्याच गोष्टी घ्याव्या लागतील आणि मारक असतील त्या टाकून द्याव्या लागतील. बाबासाहेबांनी एक उदाहरण दिले आहे. इंग्रजांचे पूर्वज वॉर ऑफ रोजेस, तसेच क्रॉमवेलियन युद्धामध्ये या किंवा त्या बाजूने लढले. परंतु एका पक्षाकडून लढलेल्यांच्या मनात दुसऱ्या बाजूने लढलेल्या वंशजांच्याविषयी वैरभाव किंवा आकस शिल्लक राहिला नाही. समतेच्या चळवळीची व्यापकता व सर्वसमावेशकता वाढविणारा हा विचार आहे. इतिहासाची साक्ष पुन:पुन्हा काढून जातिनिर्मूलनाची लढाई लढता येणार नाही. जन्माने पुरोगामित्व वा प्रतिगामित्व ठरवले जात असेल, तर मग जन्मावर आधारित माणसाची उच्च-नीचता ठरविणाऱ्या जात-वर्ण व्यवस्थेचे समर्थक आणि समतावादी यांच्यात फरक काय राहिला? म्हणूनच जन्माधारित समतावादी कोण व विषमतावादी कोण, या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत, तरच समतेची चळवळ योग्य दिशेने पुढे जाऊ शकेल.

First Published on October 17, 2019 1:05 am

Web Title: madhu kamble article on movement of equality and social inequality zws 70
Next Stories
1 प्रतिक्रांतीच्या फेऱ्यात धम्मक्रांती
2 शिक्षण, शासन धर्ममुक्त आहे?
3 कायद्याच्या कुंपणातील अस्मितांची बेटे
Just Now!
X