09 April 2020

News Flash

महाराष्ट्रातील मध्यम-वर्गीय अस्मिता

बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ वर्तमानपत्राने लग्नातील अशा पंक्तिप्रपंचाची नोंद केली आहे.

|| उमेश बगाडे

एकोणिसाव्या शतकात जातीची आधुनिकता व जातीची पारंपरिकता या द्वंद्वात्मक वाटेने वर्गीयतेची वाटचाल भारतात होत राहिली. म्हणजे पाश्चात्त्यीकरण स्वीकारायचे, पण जातीची वैशिष्टय़ेही टिकवायची.. कुणा एखाद्या जातीचा अभ्यासपूर्ण उल्लेखसुद्धा ‘जातिवाचक’ समजण्याची चूक आजही लोक करतात, याची पाळेमुळे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाचाच धांडोळा घ्यावा लागेल..

कोणत्याही प्रकारची समुदायअस्मिता स्वसमूहाशी सारखेपणा व पर-समूहाशी भेद या रूपात उभी राहते. भारतात मध्यमवर्गाच्या अशा सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला विशिष्ट आकार देण्यामध्ये जातीच्या सामाजिकीकरणाची म्हणजे सारखेपणा व भेद घडवणाऱ्या यंत्रणेची एक भूमिका राहिली. कोणाला वगळायचे या निकषावरच वर्गाची ओळख उभी राहू शकत होती. त्यामुळे जातीच्या वगळण्याच्या प्रवृत्तीचा अवलंब मध्यमवर्गाची ओळख घडवण्याच्या प्रक्रियेत करण्यात आला. इंग्रजांच्या अव्वल अमदानीत नोकरदार मध्यमवर्गात प्रवेश केलेल्या ब्राह्मणांनी प्रशासनामधील नोकरदार, कारकुनांच्या नोकऱ्या ब्राह्मण जातीपुरत्या सीमित करण्याचा प्रयत्न केला.

पांढरपेशी नोकऱ्या ‘स्वजातीपुरत्या सीमित करण्याच्या ब्राह्मणांच्या प्रवृत्ती’वर लोकहितवादींनी त्या काळात जोरदार कोरडे ओढले. ते लिहितात, ‘‘हल्ली बहुधा सर्व रोजगार ब्राह्मणांनी बळकावले आहेत, म्हणजे एकीकडे भटांनी धर्म व दुसरीकडे गृहस्थांनी रोजगार अशा दोन्ही बाजू धरून इतर लोकांस आत येऊ देऊ नये, अशी शक्कल केली होती. आता जर कोणी शुद्र जातीचा कारकून झाला, तर सर्व ब्राह्मण लोक त्याजकडे डोळे वटारून पाहतात. त्यांस वाटते की, आमचा धर्म लिहिणे पुसणे करावयाचा असून कुणबी आमचा वृत्तीछेद करितात’’.

जातीच्या पायावरच वर्गोन्नती साधण्याची ही प्रवृत्ती महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकाळापासून रूढ झाली. जातीच्या नातेगोतेसंबंधांच्या बळावर पांढरपेशा नोकऱ्यांवर ताबा मिळवण्यासाठी ब्राह्मण व तत्सम जाती झटू लागल्या. त्यामुळे नव्या बुद्धिजीवी वर्गाच्या अस्तित्वातच जातीची अस्मिता, संघटन व यंत्रणा पायाभूतपणे कार्य करू लागल्या.

इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवी म्हणून मध्यमवर्गात प्रवेश करताना ब्राह्मण व तत्सम जातींना आपले पारंपरिक बुद्धिजीवी म्हणून असलेले स्थान सोडावेसे वाटले नाही. वर्गीय विशेषाधिकारांचा उपभोग घेताना जाती-पितृसत्ताक व्यवस्थेने दिलेल्या अधिकारांचा अवलंब त्यांनी सहजी केलाच, पण नव्या बुद्धिजीवी मध्यमवर्गात स्वजातीची मक्तेदारी प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला आणि हे करताना त्यांनी जातीश्रेष्ठत्वाचा वर्गश्रेष्ठत्वाशी मेळ घातला. वर्गउतरंडीतील श्रेष्ठत्व सांगताना जातीउतरंडीतील आपल्या प्रभुत्वस्थानाची काळजी त्यांनी सातत्याने वाहिली.

वर्गीयतेला चिकटलेली जात-पितृसत्ता

वर्गव्यवस्थेच्या पोटात जातीची पितृसत्ता कार्यरत राहिल्यामुळे जातीउतरंड वर्गाला प्रभावित करू लागली. त्याचे सुरुवातीचे प्रत्यंतर मुंबईत बघायला मिळते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत ब्रिटिशांना व्यापारामध्ये सहायक बनलेल्या सोनारांचा एक गट आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाला होता. या नव-श्रीमंत सोनारांमध्ये जी वर्गभेदाची जाण निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या जातीच्या भोजनामध्ये पंक्तिभेद करण्यात येऊ लागला. सोन्याचे, चांदीचे व तांब्याचे गडवे घेऊन भोजनाला येणाऱ्या सोनारांसाठी वेगवेगळ्या पंगती मांडल्या गेल्याच, पण सोन्याचे गडवे आणलेल्या श्रीमंतांसाठी विशेष प्रकारचे जेवण देण्यात आले. बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ वर्तमानपत्राने लग्नातील अशा पंक्तिप्रपंचाची नोंद केली आहे.

आर्थिक उन्नती केल्यावर आपली वर्गीय विशिष्टता कशी व्यक्त करायची याचे उत्तर सोनारांनी जातिभेदाच्या अंगानेच वर्गभेद प्रगट करून दिले. त्यांनी जात म्हणून एक पंगत सांभाळण्याचा नियम मोडून जातिभेदाचे चिन्ह वर्गभेद प्रगट करण्यासाठी वापरले. सोनारांच्या लग्नातील पंक्तिभेदाचे उदाहरण जरी सार्वत्रिक मानता येत नसले तरी जातिभेदाच्या अंगाने वर्गभेद प्रगट करण्याची प्रवृत्ती रूढ झालीच. एका विशिष्ट जातीतील श्रीमंत व्यक्ती स्वजातीय श्रीमंताशी विवाहसंबंध जोडण्यास पसंती देऊ लागली. परिणामस्वरूप जातिव्यवस्थेच्या सांस्कृतिक अवकाशातच म्हणजे ब्राह्मणवादाच्या मुशीत नवे वर्गभान आकार घेऊ लागले.

आपली वर्गीय ओळख प्रगट करण्यासाठी वर्ग विशिष्टता दाखवणारी चिन्हे धारण करण्यास सुरुवात झाली. जातीसमाजाच्या प्रभावाखाली आकार घेणारी वर्ग-चिन्हे व्यामिश्र पद्धतीने अभिव्यक्त होत राहिली. ब्राह्मण व तत्सम जातीची जीवनशैली वर्गीयतेची खूण बनलीच, पण व्यापारी जातीची श्रीमंती दर्शवणारी वस्त्रप्रावरणे व जीवनशैलीसुद्धा वर्गीयतेची चिन्हावली म्हणून प्रगट होऊ लागली. सामान्य लोकही आपली जाती दर्शवणारी वस्त्रे त्यागून श्रीमंत समजल्या जाणाऱ्या व्यापारी जातीच्या वस्त्रांचे अनुकरण करू लागले. ‘मुंबईचे वर्णन’मध्ये गोविंद नारायण माडगावकर लिहितात, ‘‘मुंबईतील सर्वसाधारण लोकांस वस्त्रप्रावरणाची जितकी छानछौकी असते तेवढी कलकत्यातील मोठमोठय़ा बाबुलोकातही नसते. कायहो सांगावे! सहज एखादा ताकवाला दुकानातून बाहेर पडला, तर वीत-दीड वीत काठाचे अष्टी धोतर नेसतो; लफ्फेदार दशांचे चक्रीदार पागोटे डोकीस घालतो; बुट्टीदार काश्मिरी शाल पांघरतो; हिंगळासारखा लाल नरम आपशाई जोडा पायात चढवितो; आणि कानात सुंदर भिकबाळी लटकावून रस्त्यातून इतक्या मिजाशीने चालत जातो की पाहणारास हा कोणी जगतशेटीचा नातूच असावा असा भास होतो.’’ ब्राह्मण, व्यापारी अशा जाती उतरंडीतल्या उच्च जातींचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वर्गोन्नतीप्रदर्शक चिन्ह म्हणून मुंबईत रूढ होऊ लागली.

वर्गीय ओळख व्यक्त करण्यासाठी दुसरा संदर्भिबदू पाश्चात्त्य संस्कृती व समुदाय होता. त्यामुळे इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींनी मध्यमवर्ग म्हणून आपली ओळख व्यक्त करण्यासाठी पाश्चात्त्य आधुनिकतेचा आश्रय घेतला. त्यांनी आपली वर्गीय विशिष्टता व श्रेष्ठता प्रदíशत करण्यासाठी पाश्चात्त्य उदारमतवादी मूल्ये, इंग्रजी भाषा, वस्त्रे, शिष्टाचार, जीवनशैली यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून मध्यमवर्गीय ओळख पाश्चात्त्यीकरणाच्या वाटेने मार्गक्रमण करत राहिली. विशेषत: उच्चशिक्षित व संपन्न मध्यमवर्गामध्ये पाश्चात्त्यीकरणाची प्रवृत्ती प्रबळ राहिली. प्रार्थना व ब्राह्मो समाजातील अनेक ब्राह्मण व तत्सम जातींतून आलेल्या उच्चभ्रूंनी पाश्चात्त्य जीवनशैलीचा अंगीकार केलेला दिसतोच पण गंगाधरराव म्हस्के या मराठा जातीच्या प्रतिथयश वकिलानेही अंशिक पातळीवर पाश्चात्त्य जीवनशैली स्वीकारली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या आठवणींमध्ये त्याची नोंद केली आहे.  पाश्चात्त्यीकरण व ब्राह्मणीकरण अशा विरोधाभासी रचनेत नव्या मध्यमवर्गाची ओळख घडण्याची प्रक्रिया कार्यरत राहिली. त्यामुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख मध्यमवर्गाला वर्गउतरंडीतील श्रेष्ठतेबरोबर जातीउतरंडीतील श्रेष्ठता हवीहवीशी वाटत राहिली. त्यांनी वर्गश्रेष्ठतेच्या दाव्यासाठी जातीउतरंडीतील उच्च ठरवलेल्या ब्राह्मण व तत्सम जातीच्या सामाजिक सांस्कृतिक आत्मतत्त्वाचा निर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू केला. ब्राह्मण जातीच्या अधिवासातील भाषा, कर्मकांड, शिष्टाचार, जीवनशैली यांना वर्गीय श्रेष्ठतेशी जोडण्याची खटपट त्यातून होत राहिली.

उच्च जातीतून आलेल्या नव्या वर्गाला स्वजातीपेक्षा वेगळे वा श्रेष्ठ ठरवणारी अशी वर्गीय ओळख उभारणे आवश्यक वाटत होते. त्यांनी जातीच्या पायावर आधुनिकता साधताना वर्गीय श्रेष्ठतादर्शक चिन्हावली म्हणून पाश्चात्त्यीकरणाचा अंगीकार करण्यास सुरुवात केली. पण स्व-जातीपितृसत्तेच्या चाकोरीतच वर्गोन्नती साधण्याच्या भूमिकेमुळे स्वजातीय आत्मतत्त्वही सांभाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जातीची पारंपरिकता सांभाळण्याच्या या प्रक्रियेत स्व-जातीची ओळख सांगणाऱ्या काही वैशिष्टय़ांना त्यांनी वर्गीयतेचे प्रतीक बनवले. त्यातून उच्चभ्रू जातींच्या जीवनशैलीला वर्गश्रेष्ठत्वाची बाब म्हणून स्वीकृत केले जाऊ लागले. थोडक्यात, जातीची आधुनिकता व जातीची पारंपरिकता या द्वंद्वात्मक वाटेने वर्गीयतेची वाटचाल भारतात होत राहिली. त्यामुळे पाश्चात्त्यीकरण व ब्राह्मणीकरण यांच्या विरोधग्रस्त साच्यात मध्यमवर्गीतेला दर्शवणाऱ्या गुण-वैशिष्टय़ांना व प्रवृत्तींना आत्मगत करण्याचा प्रयत्न होत राहिला.

महाराष्ट्रात उदय पावणारे नवे वर्ग गटांतर्गत विवाह करण्याच्या र्निबधांनी बांधलेल्या जातीच्या पारंपरिकतेने बांधले होते. त्यांची स्वतची अशी कोणतीच सामाजिक-सांस्कृतिक यंत्रणा नसल्यामुळे जातीच्या पुननिर्मितीच्या रचनेतच ते स्वतचे पुनरुत्पादन करत होते. त्यामुळे प्रत्येक वर्गाच्या आणि वर्गसंबंधांच्या मुळाशी जात-पितृसत्तेची सामाजिक-सांस्कृतिक यंत्रणा काम करत राहिली.

या पार्श्वभूमीवर, जात-पितृसत्तेच्या सामाजिक सांकृतिक वैशिष्टय़ांचा निर्वाह करतच वर्गीय ओळख प्राप्त करण्याचा प्रयत्न या काळात झाला. नवा मध्यमवर्ग जाती-वर्ग अशा व्यामिश्र रूपात अभिव्यक्त होत असल्यामुळे वर्ग व जाती अशा दोन्ही उतरंडीतील दर्जावर तो एकाच वेळी दावा करत होता. एका बाजूला, जातीच्या सामाजिक सांस्कृतिक भांडवलाच्या आधारावर वर्गोन्नती साधण्याची आकांक्षा बाळगत होता, तर दुसऱ्या बाजूला वर्गोन्नतीने प्राप्त झालेल्या आर्थिक संपन्नतेच्या आधारावर जात्युन्नतीचा प्रयत्न तो करत होता.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहास विभागाचे प्रमुख आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 12:02 am

Web Title: article middle class asmita of maharashtra akp 94
Next Stories
1 आधुनिक महाराष्ट्राची समाजभूमी
Just Now!
X