24 January 2021

News Flash

स्वतंत्रतेची पहाट ती..

स्वातंत्र्याचे तत्त्व व प्रेरणेने महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गावर मोठा प्रभाव टाकला.

 

उमेश बगाडे

एकोणिसावे शतक हे आधुनिक महाराष्ट्राचे प्रबोधन पर्व. या काळात स्वातंत्र्याची कल्पना महाराष्ट्रीय मध्यमवर्गाच्या आत्मशक्तीला वळण देणारी मध्यवर्ती प्रेरणा राहिली. मात्र, वर्ग-जातीच्या स्वजाणिवेनुसार स्वातंत्र्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले गेले.. ते कसे, हे सांगणारा या सदरातील हा समापनलेख..

युरोपीय प्रबोधनविचारातून स्वातंत्र्याचे मूल्य व प्रेरणा भारतात दाखल झाली. खरे तर, स्वातंत्र्याची प्रेरणा भारताला नवी नव्हती. आध्यात्मिक-सामाजिक परिघात ती निरंतर प्रगट होत होती. पण इहवादी धारणेतून लावलेला ‘दास्यमुक्ती’ असा स्वातंत्र्याचा अर्थ भारतासाठी नवा होता, व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना नवी होती, धर्मस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य अशा नागरी स्वातंत्र्याची ग्वाही राज्यसंस्थेने देण्याचा विचार नवा होता.

स्वातंत्र्याचे तत्त्व व प्रेरणेने महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गावर मोठा प्रभाव टाकला. एक तर, वर्गीय ओळख दाखवण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य मध्यमवर्गाला हवेहवेसे वाटत होते. दुसरे म्हणजे, विचारस्वातंत्र्याची आत्मिक ईर्षांही त्यांना आकर्षित करत होती. स्वातंत्र्याचे हे आकर्षण परंपराद्रोहाच्या वाटेने चालले असल्याच्या कल्पनेने महाराष्ट्रातील मध्यमवर्गाच्या विचारविश्वात मोठी खळबळ माजली.

जातीच्या पायबेडय़ा

बंधनातून मुक्त होणे आणि स्वत:च्या संकल्पाप्रमाणे कृती करणे असे जे दोन अर्थ स्वातंत्र्यकल्पनेतून येतात, ते दोन्ही अर्थ जातिव्यवस्थेच्या विरोधात जातात. त्यामुळे दादोबा पांडुरंगांसारख्या पहिल्या पिढीतील नवशिक्षितांनी जाती मोडण्याला अग्रक्रम दिला. ‘परमहंस मंडळी’ची स्थापना करून जात मोडण्याचा प्रतीकात्मक उपक्रम सुरू केला. मात्र हा उपक्रम फार काळ टिकला नाही. मंडळीच्या गुप्त बैठकींचे रजिस्टर बाहेर येताच हा उपक्रम विरून गेला.

परमहंस मंडळीची जाती मोडण्याची कल्पना का फसली, याचे उत्तर- जातीचा अडथळा व्यक्तिस्वातंत्र्याला पार करता आलेला नाही, हे होते. स्वातंत्र्याच्या कल्पनेत व्यक्तीच्या आत्मिक स्वायत्ततेचे तत्त्व मध्यवर्ती असते. त्यात कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वत:चे आकलन उभे करणे, स्वबुद्धीचा उपयोग करून विश्वाला जाणण्याचे धैर्य दाखवणे यास महत्त्व असते. व्यक्तीच्या सार्वभौमत्वाची ही अशी कल्पना व्यक्तिगत परिघात निर्णय घेण्याची व निवड करण्याची मुभा त्या व्यक्तीला देत असते. पण जातीच्या सामाजिकतेमध्ये रुतलेल्या ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाला व्यक्तीचे सार्वभौमत्व स्वीकारणे शक्य होत नसल्याने जाती मोडण्याच्या वाटेने जाता आले नाही.

तत्कालीन समाजात कुटुंब, जात यांच्या सत्ताचौकटीत व्यक्तीचे नियमन केले जात होते. व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व रूढी-परंपरेची मातब्बरी मानणाऱ्या जात-समुदायसत्तेसमोर अप्रस्तुत ठरत होते. व्यक्तीचे विचार व कृती जातीला मान्य नसेल, तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जात होता. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी अशा सुधारकांना त्यामुळे प्रायश्चित्त घेण्याची तोहमत पत्करावी लागत होती. या परिस्थितीत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच सुधारकांनी स्वीकारला. पण विद्रोहाच्या स्वातंत्र्याचा मार्ग मात्र अजमावला नाही. स्वजातीला मान्य असणारा वेदप्रामाण्य, शास्त्रप्रामाण्याच्या चाकोरीतला तर्क त्यांनी सुधारणेसाठी वापरला. व्यक्तीच्या सार्वभौमत्वाचा आग्रह धरण्याऐवजी जातीच्या सार्वभौमत्वासमोर नमण्याची भूमिका त्यांनी घेतली. जात-पितृसत्तेशी तडजोड करत व्यक्तिस्वातंत्र्याचा जेवढा विस्तार होईल तेवढा करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. त्यामुळे सुधारकांच्या उक्ती आणि कृतीमध्ये मोठी विसंगती निर्माण झाली.

व्यक्तिस्वातंत्र्यासाठी विद्रोहाचा मार्ग अवलंबणे न्यायमूर्ती रानडे यांना अनुचित वाटले. त्यांनी परंपरेच्या चाकोरीत संयत सुधारणावादाचा पुरस्कार केला. याउलट, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी परंपराद्रोह करण्याची बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका गोपाळ गणेश आगरकरांनी स्वीकारली. विचारस्वातंत्र्याच्या इरेला पडून जातीच्या समुदायसत्तेशी झुंज घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले. अज्ञेयवादाची भूमिका स्वीकारून धर्मातीत नीतीचा पुरस्कार केला. पाश्चात्त्य उदारमतवादाच्या स्वातंत्र्य कल्पनेच्या समर्थनार्थ त्यांनी वादविवाद केला. मात्र, त्यांचा वादविवाद ब्राह्मणबहुल मध्यमवर्गीय सामाजिक अवकाशापुरता, म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुशीतल्या कुटुंब सुधारणेसाठी अधिक मुखर झाला. विषम, अन्यायकारक, देशहितविरोधी संस्था म्हणून जातिसंस्थेचा निषेध आगरकरांनी केला. पण जात मोडणाऱ्या विद्रोहाच्या दिशेने सामाजिक वा व्यक्तिगत कृतीचे पाऊल मात्र त्यांनी टाकले नाही.

स्वातंत्र्याचे अर्थ..

स्वत:चा विचार, निर्णय व कृती करण्यामागची आत्मिक स्वायत्तता स्वजाणिवेवर उभी असते. स्वजाणीव ही आत्मकल्पनांच्या मुशीत आकार घेत असते. महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाची स्वजाणीव वर्ण- जाती- वर्ग- लिंगभावयुक्त आत्मकल्पनांच्या अक्षावर उभी होती. स्वत:चा म्हणून जो विचार ते करत होते, त्यात त्यांच्या वर्ण-जाती श्रेष्ठत्वाची एक भूमिका होती. वर्ण-जातीची अशी स्वजाणीव ठेवूनच, ‘जाचक व कालबाह्य़ सामाजिक निर्बंधांपासून मुक्ती’ असा स्वातंत्र्याचा अर्थ ते लावत होते. वर्ण-जातींच्या आत्मतत्त्वांना त्यागण्याची भूमिका त्यांच्या स्वातंत्र्यकल्पनेत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणबहुल मध्यमवर्गात जातिव्यवस्था-विरोधी विद्रोहाची आत्मस्थिती आकार घेत नव्हती.

अशा परिस्थितीत ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाने पाश्चात्त्य उदारमतवादातून आलेले स्वातंत्र्याचे अर्थ स्वीकारले. प्रबोधन चळवळीने मांडलेले स्वातंत्र्य-गुलामीचे द्वंद्व त्यांनी स्वीकारले. ‘वासाहतिक राजवटीच्या दास्यातून मुक्ती’ असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी लावला. ब्रिटिशांच्या वासाहतिक सत्तेमधील गुलामी व शोषण त्यांनी अधोरेखित केले. परकीय राजवटीच्या गुलामीविरोधात चीड निर्माण केली. ‘स्वयंनिर्णय’ व ‘स्वराज्य’ असा जॉन स्टुअर्ट मिलनी लावलेला स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी स्वीकारला.

स्वातंत्र्याचा विचार राजकीय परिघापुरता ठेवण्याची भूमिका चिपळूणकर-टिळकांनी घेतली. राजकीय सुधारणांना त्यांनी अग्रक्रम दिला. उच्चवर्णीय पुरुषांना स्वातंत्र्य व स्वामित्व देणाऱ्या, तर स्त्री-शूद्रातिशूद्रांना पारतंत्र्य व अंकितत्व देणाऱ्या जातीउतरंडीची त्यांनी भलामण केली. सामाजिक सुधारणांना आत्मतेज कमी करणाऱ्या ठरवून त्यावर हत्यार उपसले. वांशिक भेदभावाला लक्ष्य करून गोऱ्या सत्ताधीशांकडून समतेची अपेक्षा केली. मात्र, शूद्रातिशूद्र जातींना स्वातंत्र्य व समता देण्याची कल्पना त्यांनी गैरलागू ठरवली.

जातिविद्रोहाची आत्मस्थिती

स्त्रियांच्या व जातीच्या अंकितीकरणाला गुलामी संबोधून ‘स्त्रीदास्यमुक्ती’ व ‘जातीदास्यमुक्ती’ असा स्वातंत्र्याचा अर्थ जोतीराव फुले यांनी लावला. विशेषत: स्त्री-शूद्रातिशूद्रांचे शोषण-दमन करणाऱ्या धार्मिक गुलामगिरीवर त्यांनी हल्ला चढवला. वर्ण-जातींच्या उदयाची ऐतिहासिक संगती सादर करून जातीच्या गुलामीचे सामाजिक-आर्थिक, वैचारिक-सांस्कृतिक व मानसिक पदर उकलून दाखवले. त्याविरोधात मानवी अधिकाराचे बंड त्यांनी उभारले.

स्वातंत्र्यासाठी हवी असणारी आत्मिक स्वायत्तता स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या ठायी नसल्याचे जोतीरावांनी जाणले. व्यक्तीच्या आत्मिक स्वायत्ततेची स्थिती घडण्यासाठी त्याचे स्वत:वर नियंत्रण असणे, स्वत:च्या विचाराने वा निर्णयाने चालण्याची क्षमता असणे, त्यासाठीची भौतिक स्थिती व संधी असणे, मानसिक स्वातंत्र्य असणे आवश्यक असते, हे त्यांनी लक्षात घेतले.

जोतीरावांनी स्त्री-शूद्रातिशूद्रांची गुलाम आत्मस्थिती स्पष्ट करण्यासाठी ‘अविद्या’ हे सूत्र वापरले. स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या सर्वंकष पतनाचे कारण अविद्या असल्याचे सांगून त्याचे दोन प्रमुख अर्थ त्यांनी दिले. ‘साक्षरता व शिक्षणाचा अभाव’ हा अविद्येचा पहिला अर्थ त्यांनी सांगितला. शिक्षणाच्या अभावामुळे स्त्री-शूद्रातिशूद्र विचार करण्याची, स्वत:च्या कौशल्यात वृद्धी करून परिस्थितीत बदल करण्याची क्षमता गमावतात; स्वत:चा हितसंबंध न कळण्याइतपत भोळे व अंधश्रद्ध बनतात; स्वत:च्या अपमानित स्थितीविषयी निलाजरे बनतात, असे अविद्येचे दुष्परिणाम त्यांनी सांगितले. ‘वास्तवाचा भ्रम निर्माण करणारे ब्राह्मणी ज्ञान’ असा अविद्येचा दुसरा अर्थ जोतीरावांनी सांगितला. अविद्येचे हे दोन अर्थ सांगून स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या आत्मिक स्वायत्ततेसाठी अविद्येचा नाश करण्याची भूमिका जोतीरावांनी घेतली. गुलामीच्या आत्मस्थितीला पालटण्यासाठी आत्मस्थितीविषयक इतिहासज्ञान, भौतिक परिस्थितीत बदल करणारे अनुभविक ज्ञान व समाजसंबंधांचे नीतिज्ञान दिले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

जोतीरावांनी शूद्रातिशूद्रांच्या शासन-शोषणाचा बहुपेडी विग्रह मांडला. वर्णजातिव्यवस्थेचा विग्रह त्यांनी मांडलाच, पण वासाहतिक व्यवस्थेविरुद्धचा विग्रहही मांडला. धर्माची वैचारिक-सांस्कृतिक यंत्रणा जातीच्या भौतिक शासन-शोषणात कळीची भूमिका बजावत असते; जातीउतरंडीमधील विषम सत्तासंबंध जातीच्या विनिमय व शोषणसंबंधाचा आधार बनत असतात, याचे दिग्दर्शन त्यांनी केले. जोतीरावांच्या विचारांमधून स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या आत्मिक व भौतिक मुक्तीच्या वाटा खुल्या झाल्या.

स्वातंत्र्याची कल्पना महाराष्ट्रातील मध्यमवर्गाच्या आत्मशक्तीला वळण देणारी मध्यवर्ती प्रेरणा राहिली. जातीच्या सामाजिकतेमध्ये वर्गजाणीव आकार घेत असल्याने स्वातंत्र्याची एकच एक प्रतिमा पुढे आली नाही. गुलामीच्या व्याख्येनुसार व आकलनानुसार स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या कल्पना पुढे आल्या. आत्मिक स्वायत्ततेत ज्या प्रकारची वर्गजातीची स्वजाणीव राहिली, त्यानुसार स्वातंत्र्याचे वेगवेगळे अर्थ व परिमाणे प्रगट झाली. स्वातंत्र्याचे हे अनेकविध अर्थ एकोणिसाव्या व विसाव्या शतकाला जोडणारे सेतू बनले.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2020 12:03 am

Web Title: article on dawn of freedom abn 97
Next Stories
1 महाराष्ट्रधर्माची चर्चा
2 प्रेमकल्पनेची कोंडी
3 सार्वजनिकतेचा चव्हाटा
Just Now!
X