उमेश बगाडे

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?

नेह्मिया गोऱ्हे यांचे धर्ममत-खंडन वा बाबा पदमनजींचे धर्मपालन यांच्या पलीकडला- धर्मातरानंतरही सत्त्वशोध न सोडण्याचा- मार्ग पंडिता रमाबाई यांचा होता,  त्याला ख्रिस्ती अवकाशात साथ मिळण्याची शक्यता धूसरच होती..

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराचा धडाका सुरू केला. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, बहुदेवतावाद, अंधश्रद्धा, कर्मकांडांचे स्तोम, पुरोहितांचे वर्चस्व, समाजघातक रूढी-परंपरा, समाजव्यवहारातील अनीती यावर त्यांनी जोराचा हल्ला चढवला. जॉन विल्सनकृत ‘हिंदुधर्म प्रसिद्धीकरण’सारख्या पुस्तिका प्रसारित करून हिंदू धर्म-खंडनाच्या आधारे धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्मप्रसार वासाहतिक ज्ञानमीमांसेच्या चौकटीत कार्य करत होता. प्रागतिक-मागास, लोकशाही-जुलूमशाही अशा द्वंद्वात भारताचे चित्रण करत होता. ख्रिस्ती एकेश्वरवाद प्रागतिक तर भारतीय धर्म पाखंडी वा मागास ठरवणाऱ्या वर्णनपद्धतीची घडण करत होता. ख्रिस्ती धर्माला असा प्रमाणशास्त्रीय अवकाश देणाऱ्या वर्णन-रीतीने नवशिक्षित प्रभावित होत होते. त्यातील काही हिंदू धर्मसुधारणेच्या क्रमात ख्रिस्ती धर्मतत्त्वांना अंगीकृत करत होते. काही धर्मातराच्या उंबरठय़ापाशी पोहोचत होते; तर, बुद्धिजीवींपैकी अगदी अत्यल्प ख्रिस्ती धर्मातराच्या वाटेने पुढे जात होते. परमहंस मंडळींचे तत्त्वज्ञ दादोबा पांडुरंग ख्रिस्ती धर्माच्या अगदी दाराशी पोहोचले होते. मात्र, अतिविचार करण्याच्या सवयीमुळे ते माघारी परतले. तर, नेहेमिया गोऱ्हे (१८४८), बाबा पदमनजी (१८५४), पंडिता रमाबाई (१८८३), ना. वा. टिळक (१८९५) यांनी धर्मातराचा मार्ग पत्करला.

नेहेमिया नीळकंठशास्त्री गोऱ्हेंचे पाखंडखंडन

कोकणस्थ ब्राह्मण कुळात जन्मलेले व काशीला संस्कृत अध्ययन करून वेद, न्याय व व्याकरण यांत पारंगत झालेले नेहेमिया नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांनी ईश्वरी कृपेच्या आत्मिक ओढीने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. विविध प्रकारच्या परस्परविरोधी मतांचे कडबोळे असलेला हिंदू धर्म ईश्वरोक्त नसल्याचा, तसेच धर्मतत्त्वांची एकसंधता व गुणवत्ता असलेला ख्रिस्ती धर्म ईश्वरोक्त असल्याचा दावा त्यांनी केला.

हिंदूंच्या कर्मकांडी स्वरूपावर हल्ला चढवताना आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या खोलात घुसण्याच्या फंदात मिशनरी फारसे पडत नसत. मात्र, नेहेमिया गोऱ्हे यांनी ‘अ मिरर ऑफ दि हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टम’ आणि ‘अ रॅशनल रेफ्यूटेशन ऑफ दि हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टम’ असे (मूळ हिंदी भाषेतले) ग्रंथ लिहून हिंदू तत्त्वज्ञानाची मूलगामी चिकित्सा केली. ख्रिस्ती ईश्वरकल्पनेच्या तुलनेत ब्रह्म सिद्धांताला उभे करून मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न केला. तार्किक युक्तिवाद व आत्मप्रत्यय या दोन्ही आधारे अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. मानवी विवेकाच्या आधारावर धर्माची स्थापना करता येत नसल्याचे सांगून ब्राह्मो व प्रार्थना समाजाच्या एकेश्वरवादाला त्यांनी फटकारले.

बाबा पदमनजींचे धर्मातर

बाबा पदमनजी यांनी ‘अरुणोदय’ या आत्मकथनातून धर्मातराचा मानसिक प्रवास सांगितला. हिंदू धर्मापासून दुरावण्याची व ख्रिस्ती धर्म आत्मीय वाटण्याची विविध कारणे त्यांनी त्यात नमूद केली. एका बाजूला मूर्तिपूजा, शाक्तांचा अनाचार, पुरोहितशाहीचे शोषण, जातीविषमतेचा अन्याय, मुहूर्त/ शकुन-अपशकुनासाख्या अंधश्रद्धा यांना ते नकार देत गेले. तर दुसऱ्या बाजूला, बायबल व संत साहित्याचा संस्कार, धर्मोपदेशकांचा भूमिका-आदर्श, ख्रिश्चन धर्मतत्त्वे व नीतिविचाराचा प्रभाव, मृत्यूच्या गूढतेची भावना आणि ख्रिस्ती मित्रमंडळीची साथ यांमुळे ते ख्रिस्ती धर्माकडे ओढले गेले.

बाबा पदमनजींचे व्यक्तित्व आंतर्बाह्य ईश्वरनिष्ठ व धर्मश्रद्ध होते. हिंदू धर्मात असताना व पुढे ख्रिस्ती झाल्यावरही ईश्वर-भयापासून ते कधी मुक्त झाले नाहीत. त्यांचे व्यक्तित्व आणि स्वभाव जीवनाच्या इहवादी इर्षेमध्ये गुंतणारा नव्हता. ख्रिस्ती ईश्वराची कृपा प्राप्त करण्याचा ध्यास त्यांना लागला होता. मनुष्याच्या पापग्रस्ततेच्या ख्रिस्ती धर्मभावनेने त्यांच्या मनात घर केले होते. त्यातूनच त्यांनी धर्मातराचे पाऊल टाकले.

हिंदू धर्मात असताना ज्या अचिकित्सक भोळ्या भावाने हिंदू धर्मश्रद्धेचे पालन बाबा पदमनजी करत होते त्याच अचिकित्सक भोळ्या भावनेने ख्रिस्ती धर्माचे पालनही ते धर्मातरानंतर करत राहिले. एखाद्या सश्रद्ध ख्रिश्चनासारखे भूत व सैतान यांचे अस्तित्व त्यांना मान्य होते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवर ईश्वराला शरण जाणे हा एकमेव उपाय असल्याचे त्यांचे मत होते.

कासार या शूद्र जातीत जन्मलेले बाबा जातिविषमतेचा निषेध करत असले तरी त्यांच्या धर्मातराच्या कृतीमागे जातिविद्रोहाची भावना नव्हती. किंबहुना, व्यक्तिगत वा सामाजिक विद्रोहाची कोणतीही भावना नव्हती. ना त्यामागे व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्राप्तीची आस होती; ना भौतिक लाभाची कोणती अपेक्षा; ना आधुनिकतानिष्ठ समाज-उभारणीची अभिलाषा त्यामागे होती. निखळ पारमार्थिक श्रेयाच्या ओढीने म्हणजे आत्म्याची व भावनेची भूक भागवण्यासाठी त्यांनी धर्मातर केले होते.

बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये कोरला गेलेला धर्मोपदेशकाच्या भूमिकेचा आदर्श बाबांच्या जीवनाची मुख्य प्रेरक शक्ती राहिला. सत्याचा प्रकाश केवळ ख्रिस्ती धर्मातूनच प्राप्त होऊ शकतो या निष्ठेने आयुष्यभर त्यांनी काम केले. ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या आंतरिक ऊर्मीतून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. विधवांच्या दु:खाला वाचा फोडणारी ‘यमुनापर्यटन’ ही मराठी कादंबरी त्यांनी लिहिली. जातिविषमतेच्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला. ख्रिस्ती धर्मावरच्या अपार श्रद्धेतून सामाजिक सुधारणेची अव्याहतपणे खटपट केली. जातिअंताचे तत्त्वज्ञ असलेल्या महात्मा फुल्यांशी व त्यांच्या चळवळीशी निकटचा संबंध राखला. तरीही त्यांची स्त्री प्रश्न व जाती प्रश्नाबाबतची जाण व कृतिशीलता ख्रिस्ती धर्मश्रद्धेने अवगुंठित राहिली.

पंडिता रमाबाईंचा धर्मविचार

पंडिता रमाबाईंचे पूर्वायुष्य विलक्षण कष्ट व संघर्षांचे. पण त्याचमुळे त्यांच्यामध्ये स्त्रीसत्त्वाचे लढाऊ भान जागृत झाले. कलकत्त्याच्या वास्तव्यात त्यांच्या स्त्रीसत्त्वाच्या जाणिवेला आधुनिक विचारांची धार व कर्तेपण प्राप्त झाले. स्त्री-अनुभवाच्या आधारे जगाकडे बघण्याच्या भूमिकेमुळे, स्त्रियांना अधिकारविहीन करणाऱ्या धर्मशास्त्रांच्या चिकित्सेची- पर्यायाने ब्राह्मणी पितृसत्तेच्या निषेधाची- त्यांची दृष्टी आणि स्त्रीसुधारणेची कळकळ विकसित झाली.

स्त्रीसत्त्वाच्या संघर्षांची भूमिका रमाबाईंना धर्मातराकडे घेऊन गेली. इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी केलेल्या वास्तव्यात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पोकळी निर्माण झाली हे खरे असले तरी केवळ त्यामुळेच त्यांनी धर्मातराचा निर्णय घेतला हे खरे नाही. हिंदू धर्म स्त्रियांना व अन्य पददलितांना न्याय देण्याच्या भूमिकेत नाही, असे त्यांना मनापासून वाटत होते. हिंदू शास्त्रग्रंथ, पुराणग्रंथ, आधुनिक कवी साहित्यिक, उच्च व निम्नजातीय पुरुष यांच्या स्त्रीद्वेष्टय़ा विचारव्यूहाचा त्यांना तिटकारा आला होता. ‘अ टेस्टेमनी’ या ग्रंथात धर्मपरिवर्तनामागची मानसिक व वैचारिक भूमिका त्यांनी विशद केली आहे. ती अशी की, हिंदू धर्म स्त्री-शूद्रांना लौकिक जगात समता नाकारतोच पण पारमार्थिक मोक्षाचा अधिकारसुद्धा नाकारतो. विधवांना तर पराकोटीच्या वंचनेच्या स्थितीत ढकलतो. कर्मसिद्धांत व पुनर्जन्माच्या वैचारिक व्यूहात अडकवून त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल करण्याची शक्यता नाकारतो. याउलट ख्रिस्ती धर्म कोणताही भेदाभेद न करता स्त्रिया, पददलित अशा सर्वाना मोक्षाचा अधिकार देतो. हिंदू धर्मात व्यक्तीला मोक्षासाठी प्रयत्न करावे लागतात तर ख्रिस्ती धर्मात ईश्वर सर्वाचे तारण करत असतो.

ख्रिस्ती धर्माच्या माफी देणाऱ्या, प्रेममय ईश्वराची कल्पना रमाबाईंना आत्मीय वाटली. हिंदूंची ईश्वरकल्पना देवाला मनुष्यप्राण्याच्या पातळीवर खाली आणते तर ख्रिस्ती ईश्वरकल्पना मनुष्याला ईश्वराच्या पातळीपर्यंत उंचावते असा दावा त्यांनी केला. हिंदू धर्मात असताना वाटत नसलेली पापाची टोचणी निर्माण केल्याबद्दल कनवाळू ईश्वराचे त्यांनी आभार मानले.

विवेकाधिष्ठित चिकित्सेची रमाबाईंची भूमिका धर्मातरानंतरही कायम राहिली. ख्रिश्चन धर्मातील असंगत श्रद्धांवर बायबलमधील विसंगतीवर त्यांनी टीका केली. ख्रिस्ती धर्माच्या सत्तेच्या उतरंडीबरोबर झगडत पितृसत्तेच्या विरोधातला स्त्रीसत्त्वाचा संघर्ष त्यांनी आयुष्यभर सुरू राखला. विरोधकांना व संकटांना न जुमानता परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या उद्धारासाठी अथकपणे काम केले.

धर्मातरितांचे तणाव

ख्रिस्ती ईश्वरविचार ही धर्मातराची मुख्य प्रेरणा होती; पण त्याशिवाय जातिव्यवस्थेच्या व पितृसत्तेच्या घुसमटीतून वाट काढण्याची प्रेरणाही त्यामागे होती. ख्रिस्ती धर्मातील मानवी समतेच्या ग्वाहीमुळे अस्पृश्य जातीतील व्यक्ती धर्मातर करत होत्या. पण ‘जातिभेद मानू नये’ या चौकटीपुरताच हा प्रश्न सीमित ठेवल्यामुळे जाती प्रश्नाचे निराकरण त्यांना करता आले नाही. चर्चमधील उच्चपदी अस्पृश्यजातीय का नेमले जात नाहीत हा फुल्यांनी उपस्थित केलेला प्रश्न त्याची प्रचीती देतो.

ख्रिस्ती धर्मातरामुळे ओळख बदलत होती, धर्मश्रद्धेचे केंद्र व विश्वदृष्टिकोन बदलत होता. मात्र, त्यामुळे एतद्देशीयांशी असलेली जैविक नाळ व राष्ट्राविषयीच्या प्रतिबद्धता यात अंतर पडत नव्हते. युरोपीय वंशश्रेष्ठत्व आणि वासाहतिक शोषण-दमन यांच्या प्रतिकाराचीच भूमिका रमाबाई व नारायण वामन टिळकांसारख्या धर्मातरितांनी घेतली. तरीही ब्राह्मणबहुल मध्यमवर्गीय सामाजिक अवकाशात या धर्मातरितांच्या वाटय़ाला वंचनाच आली.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

ईमेल : ubagade@gmail.com