||  उमेश बगाडे

एकोणिसाव्या शतकात केवळ सार्वजनिक क्षेत्रातच नव्हे, तर इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवी कुटुंबाच्या चार भिंतींच्या आतही पाश्चात्त्यीकरणाने प्रवेश केला. त्यातूनच घडला देशव्यापी ‘कॉस्मोपॉलिटन’ वर्ग!

एकोणिसाव्या शतकात ‘मध्यमवर्ग’ अशी ओळख घडवताना ‘पाश्चात्त्यीकरण’ व ‘ब्राह्मणीकरण’ या दोन्हींचा आश्रय घेण्यात आला. त्याचे प्रत्यंतर पाठारे प्रभूंसारख्या वर्गोन्नत जातिगटांमध्ये पाहता येते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अमदानीत इंग्रजी शिक्षित बनून आर्थिक संपन्नता प्राप्त केलेल्या पाठारे प्रभूंनी पाश्चात्त्य वर्गाच्या चालीरीतींचे अनुकरण करून आपली वर्गीय विशिष्टता जाहीर केली. त्यांनी पाश्चात्त्य वर्गसमाजातील ‘क्लब’ला जातीय चौकटीत आणून सामूहिक सौख्यसोहळ्याचे उपक्रम सुरू केले. दिवसभर नोकरी, व्यवसाय केल्यानंतर थकलेले पाठारे जातीचे पुरुष संध्याकाळच्या वेळी क्लबमध्ये जमू लागले. तिथे सामूहिकरीत्या चहा घेणे, संगीत ऐकणे, पत्ते खेळणे, बातम्यांची चर्चा करणे असे उद्योग ते करू लागले. रविवारची पार्टी, पिकनिक, सहली यांचे आयोजन करू लागले. वर्गीय विशिष्टता दाखवण्यासाठी इंग्रजी भाषा, वस्त्रे व काही शिष्टाचार यांचा वापर त्यांनी सुरू केला.

जातिश्रेष्ठत्व आणि स्त्री-सुधारणा

मात्र, वर्गसंस्थेच्या आगमनानंतरही सामाजिक दर्जा ठरवण्याचे कार्य जातीउतरंडच करत राहिली. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झालेल्या पाठारे प्रभूंनी स्वत:च्या ब्राह्मणीकरणातून जात्योन्नती साधण्याचा मार्ग अवलंबिला. जातिव्यवस्थेची उतरंड कर्मकांडी शुद्धीच्या तत्त्वावर उभी असल्याने नित्य व प्रासंगिक कर्मकांडे करण्याचा उपक्रम त्यांनी आरंभला आणि कर्मकांडे करण्यासाठी भिक्षुक ब्राह्मणांना नोकरीवर ठेवले. ब्राह्मणांप्रमाणेच जातिश्रेष्ठत्वाचा गंड बाळगण्यास त्यांनी सुरुवात केली. मुंबई म्युनिसिपालटीच्या शाळेत प्रभू व अन्य उच्च जातींच्या मुलांसोबत कुणबी, माळी अशा शूद्र जातींतील मुलांना शिकवण्यास दादाजी धाकजी या पाठारे प्रभू जातीच्या पुढाऱ्याने कडाडून विरोध केला. निम्नजातींबाबत हीनता प्रगट करून जातिश्रेष्ठत्वाचा दावा करण्याचा रिवाज वर्गोन्नती झालेल्या जातिसमूहांनी रूढ करायला सुरुवात केली.

यात वर्गोद्भवाबरोबर वर्गउतरंडीची दर्जारचना आकार घेऊ लागली. मात्र ती स्वायत्तपणे वा स्वतंत्रपणे अस्तित्वात येऊ शकत नव्हती. जाती-लिंगभावाच्या (कास्ट-जेण्डर) संयुक्त उतरंडीत एकवटून ती साकार होऊ लागली. त्यामुळे जात-लिंगभावाच्या उतरंडीच्या तर्करचनेचा आधार वर्गीय श्रेष्ठतेची चिन्हे ठरवण्यासाठी घेण्यात येऊ लागला. पारंपरिक जातिसमाजात जातींच्या उतरंडीची विषमता स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाच्या तत्त्वावर आरूढ झालेली होती. त्यात स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेची सामाजिक श्रेष्ठता व प्रतिष्ठेशी सांगड घातली जात होती. तिचे सातत्य नव्या वर्गसमाजात अबाधित राहिलेच; पण वर्गउतरंडीत त्यात काहीसा बदल होऊन श्रेष्ठता व प्रतिष्ठा स्त्री-सुधारणेशी जोडली जाऊ लागली.

युरोपीय ‘मडम’सारखे कोट, हॅट..

ब्रिटिश सत्ता आणि आधुनिकतेद्वारे वर्गीय उन्नती साधलेल्या प्रभू जातीने प्रसंगविशेषी स्व-स्त्रियांना युरोपीय ‘मडम’सारखे कोट, हॅट चढवली आणि त्यांच्या हातामध्ये पर्स दिली. स्त्रियांच्या राहणीमानातील आधुनिक दृश्यात्मकतेला त्यांनी वर्गोन्नतीचे चिन्ह बनवले. प्रभू स्त्रियांनी आपल्या जात-वर्गीय विशिष्टतेची ओळख म्हणून नीटनेटकी व उंची वस्त्रे परिधान करावयास प्रारंभ केला. सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून, टापटीप सांभाळून, केसांची सल वेणी बांधून (वृद्ध वा जुन्या मताच्या स्त्रिया घट्ट वेणी घालत असत) केसांमध्ये फुले माळून त्यांनी नटायला पसंती दिली. त्यातून त्यांच्या सौंदर्याचा असा मानदंड तयार झाला, की अन्य जातींतील कोणत्याही सुंदर दिसणाऱ्या स्त्रीसाठी ‘छान परभीन दिसतेस!’ असा अभिप्राय देऊन तिला गौरवले जाऊ लागले.

आधुनिकतेचा तर्क आणि प्रेरणा मध्यमवर्गाच्या अधिवासामध्ये मध्यवर्ती झाल्यामुळे जातिसुधारणेच्या मार्गाने स्त्रीसुधारणा करण्याचा मार्ग इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींनी अवलंबला होता. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न जातिसुधारणेच्या वाटेने पुढे नेला; पोटजाती दूर करून वर्गीय अभिसरणाचा अवकाश वाढवणारी जातिसुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला. मध्यमवर्गीयत्वाच्या आशा-आकांक्षांशी अनुकूल अशा विभक्त कुटुंबाचा पुरस्कार केला. शिक्षित स्त्री हे वर्गोन्नतीचे प्रतीक बनवले. आपापल्या जातिसंघटना उभ्या करून जातिसुधारणांचा उपक्रम राबवला.

स्त्रियांनी शिकणे, सायकल चालवणे ही वर्गोन्नतीची चिन्हे प्राय: ब्राह्मण, प्रभू व तत्सम जातींतच दिसत असल्यामुळे ती जातिश्रेष्ठत्वाची चिन्हे म्हणूनही पाहिली जाऊ लागली. पुढे याच वर्गोन्नतीच्या प्रेरणेला व प्रतीकात्मकतेला स्वीकारून किसन फागुजी बनसोडे यांनी दलित मुलींसाठी शाळा व सायकल चालवणे शिकवणारे वर्ग नागपूरला सुरू केले. जात-लिंगभावाच्या उतरंडीचे वर्गाच्या उतरंडीशी होणारे हे एकत्व वर्गाच्या सामाजिकीकरणाचे, व्यक्तित्वाचे ताणेबाणे विणत होते हे यातून स्पष्ट होते.

मध्यमवर्गाची ओळख सांगण्यासाठी विवेकनिष्ठतेच्या मूल्याला आत्मगत करण्याचा प्रयत्न मध्यमवर्गाच्या एका घटकाकडून झाला. कुटुंब व जात यांच्या विरोधी न जाता सोयीस्कररीत्या विवेकनिष्ठेला अंगीकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खर्चीक कर्मकांड, उपचार यांना फाटा देऊन साधेपणाने मुंज, लग्न यांसारखे विधी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला.

समाजहिताचा विवेकनिष्ठ विचार ही मध्यमवर्गाची बांधिलकी असल्याचे त्यांनी मानले. मध्यमवर्गीय सांस्कृतिक धुरीणत्वाचे दायित्व म्हणून परोपकार करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला होता. आपल्या जातीतील होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, आर्थिक संकटात असलेल्या जातबंधूंना साहाय्य करणे, दुष्काळ, प्लेगची साथ अशा संकटकाळी जनतेला साहाय्य करणे असे प्रयत्न मध्यम जात-वर्गाकडून झाले.

व्यापक पायावरची सार्वजनिकता

ब्रिटिशांची सत्ता व व्यापाराच्या साहचर्यामुळे पारशी, प्रभू, सारस्वत, ब्राह्मण अशा जातींमधून इंग्रजी शिक्षित उच्च मध्यमवर्ग उदयाला आला होता. आधुनिकतेची मूल्यदृष्टी, अभिरुची, जीवनशैली त्यांना समानतेच्या पातळीवर उभी करत होती. त्यामुळे त्यांच्या सामाजिक अभिसरणात जातीची सीमा त्यांना गरलागू वाटू लागली. जात, धर्म, पंथ अशा संकीर्णतेला ओलांडणाऱ्या व्यापक पायावरची सार्वजनिकता घडवण्याचा प्रयत्न या उच्चभ्रू मध्यमवर्गाने सुरू केला. ‘स्टुडन्ट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’ (१८४५), ‘परमहंस मंडळी’ (१८४९), ‘दी बॉम्बे असोसिएशन’ (१८५२) अशा संस्थांच्या माध्यमातून वर्गीयतेचा अवकाश विस्तारण्याचा प्रयत्न झाला.

‘परमहंस मंडळी’ या महाराष्ट्रातील पहिल्या धार्मिक संघटनेमागील हेतू जातिभेदाला मूठमाती देऊन वर्गीयता साध्य करण्याचा होता. म्हणूनच जातीला पायाभूत असलेल्या शुद्धीला नकार देणारे एकमेकांच्या उष्टय़ा प्याल्याने सेवन करण्याचे कर्मकांड सभासदत्वाची पूर्वअट म्हणून त्यांनी निश्चित केले. जातिखंडन करताना प्राचीन वर्णव्यवस्थेवर वर्गीयत्वाचा आरोप करून, वर्गीयत्वाकडे घेऊन जाणाऱ्या आधुनिकतेला त्यांनी परंपरेशी जोडले. पण गुप्त पद्धतीने जाती मोडून वर्गीयत्वाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न लवकरच फसला. जाती-पितृसत्तेचे जडत्व परमहंस मंडळीच्या ध्येयवादाआड आले आणि गुप्त सभासदांची यादी जाहीर होताच जातिउच्छेदाचा कार्यक्रम विरून गेला.

बंगालात ब्राह्मो समाज (१८३०) आणि महाराष्ट्रात प्रार्थना समाज (१८६७) यांनी इंग्रजी शिक्षितांच्या कृतिशीलतेला प्रवाहित करून उच्चभ्रू अशा ‘कॉस्मोपॉलिटन’ मध्यमवर्गाच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व धर्माबाबत चिकित्सक भूमिका घेऊन विश्वधर्माच्या समन्वयशीलतेला गवसणी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यांनी जाती-जातींत वा धर्मात विभागलेल्या उच्च मध्यमवर्गाच्या समूहभानाला व कत्रेपणाला आधुनिकतेचे वळण देणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक मुशीत कार्यरत करण्याचा प्रयत्न केला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई, मद्रास, कोलकाता विद्यापीठांचा जसा उदय झाला, तसा इंग्रजी शिक्षित मध्यमवर्ग विस्तारू लागला. त्याने ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्व-वर्गजाणिवेचे प्रगटीकरण सुरू केले. आपली वर्गीय ओळख दाखवण्यासाठी इंग्रजी भाषा, पाश्चात्त्य जीवनशैली यांचा अवलंब त्यांनी केला. उच्चवर्गीय ओळख घडवण्याच्या या प्रक्रियेत त्या काळातील बहुतेक ब्राह्मो समाजी कुटुंबीयांचे अंतर्बाह्य़ पाश्चात्त्यीकरण झाले. त्यांना बंगालीचा गंधसुद्धा नसे. ते घरातसुद्धा इंग्रजीतून बोलत असत. प्रार्थना समाजाचा अंगीकार करणाऱ्या कुटुंबांतही इंग्रजी भाषेत व्यवहार केला जात असे. तात्पर्य, केवळ सार्वजनिक क्षेत्रातच नव्हे तर ब्राह्मो व प्रार्थना समाजाच्या कुटुंबाच्या चार भिंतींच्या आतही पाश्चात्त्यीकरणाने प्रवेश केला. त्यातून देशव्यापी कॉस्मोपॉलिटन वर्गाच्या रूपात इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींनी स्वत:ला पुढे आणले.

तरीही, इंग्रजी भाषा व पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारणाऱ्या कॉस्मोपॉलिटन वर्गात जातीचे जडत्व कायम राहिले. कारण पाश्चात्त्य-पौर्वात्य, परंपरा-आधुनिकता या द्वंद्वातच त्यांचा आत्मशोध चालू होता. परिणामी कॉस्मोपॉलिटन मध्यमवर्गीय सामाजिकताही प्राय: ब्राह्मण जातीय संस्कृतीचा अधिवास (हॅबिटस) पत्करणारी राहिली.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. ईमेल : ubagade@gmail.com