|| उमेश बगाडे

एकोणिसाव्या शतकात महादेव शिवराम गोळे यांनी ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ या ग्रंथात सर्वजातीय विद्याव्यासंगींना ‘ब्राह्मण’ म्हटले खरे; पण त्याविरोधी ठरतील अशी मते सनातनी पक्षाचे गंगाधरशास्त्री फडके हे ‘हिंदुधर्मतत्त्व’ या ग्रंथात मांडत होते. अशा प्रकारची दुविधाच पुढे मध्यमवर्गाच्या आत्मप्रतिमेतही दिसते..

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचे भान मुख्यत: इंग्रजी शिक्षित असल्याच्या जाणिवेतून येत होते. युरोपीय प्रबोधनाचे विश्वभान अंगीकारलेले बुद्धिजीवीपण पत्करण्यामधून त्यांचे मध्यमवर्गीय भान साकारत होते. आपल्या पारंपरिक सामाजिक वारशाला ज्या प्रकारे ते वासाहतिक आधुनिकतेशी भिडवत होते त्यातून त्यांचे विश्वभान, अस्मिता व कत्रेपण यांची घडण होत गेली.

नवशिक्षित बुद्धिजीवी असल्याचे हे भान भवानी विश्वनाथ कानिवदे यांनी १८५८ मध्ये युनायटेड स्टुडंट्स असोसिएशनच्या सभेत सादर केलेल्या ‘सुशिक्षित तरुणलोक’ या निबंधात पाहावयाला मिळते. सुशिक्षित तरुणांचे समाजातील वेगळेपण अधोरेखित करणारे वैचारिक, सामाजिक व नैतिक आत्मरूप त्यातून त्यांनी समोर ठेवले आहे.

नवशिक्षित बुद्धिजीवींचे आत्मरूप

ज्ञाननिष्ठा व विवेकनिष्ठा हा नवशिक्षितांच्या आत्मतत्त्वाचा गाभा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘सुशिक्षित तरुणलोक’ पारंपरिक अज्ञानाच्या जोखडातून बाहेर पडून ज्ञानसाधना करतात, पुस्तके वाचतात, ग्रंथालयांचा विस्तार करतात, मासिके, त्रमासिके चालवतात, ज्ञाननिष्ठा अंगीकारून ते स्वतच्या व समाजाच्या पुनर्रचनेचा विचार करतात.

हे शिक्षित बुद्धिजीवी ‘बाबा वाक्यं प्रमाण’ मानत नाहीत. ते सुधारणेच्या मार्गाने चालतात, विवेकनिष्ठा बाळगतात, धर्मभोळेपणा व बुवाबाजीचा निषेध करतात, धर्मज्ञान व चालिरीती असा फरक ते करतात, सर्व धर्मग्रंथांचे चिकित्सक परिशीलन करून ते धर्मज्ञान प्राप्त करतात, ते सृष्टिरचनेवरून देवाची अगाध शक्ती व त्याचे गुणानुवाद जाणण्याचा परमहंसिक (डेईस्ट) मार्ग अनुसरतात व सन्मार्गाने चालण्यास बुद्धी व्हावी अशी ईश्वराची प्रार्थना करतात.

नवशिक्षित वर्गाच्या नैतिक आत्मरूपाचे वेगळेपण कानिवदे समोर ठेवतात. त्यानुसार सुशिक्षित तरुण लोक सत्यनिष्ठ असतात, नैतिकतेच्या मार्गाने चालणारे असतात.  ‘गुडगुडी, रांडा, अफू, द्यूत’ अशा व्यसनांच्या अधीन ते होत नाहीत, दुष्कर्मी स्वार्थ साधत नाहीत, गुलामी वृत्ती बाळगत नाहीत, गर्वष्ठिपणा करत नाहीत. भाऊबंदकी करण्याच्या फंदात पडत नाहीत. इष्टमित्रांवर व इतर मनुष्य प्राण्यांवर प्रीती करण्याचा मार्ग अनुसरतात.

स्त्रीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन नवशिक्षित वर्गामध्ये बदलला आहे याची नोंद कानिवदे करतात. ‘‘बायको म्हणजे आपल्याहून हलकी किंबहुना ती आपली बटीकच आहे, तिने फक्त शेणेपोतेरे घालून भाकरीचा तुकडा खाऊन व मिळेल ते जाडे वस्त्र नेसून राहावे व आठ-पंधरा दिवशी थापटपोळी व मुष्टीमोदक भक्षण करावे, असा जो कित्येकांच्या घरी प्रकार चालला होता तो मोडून तिची स्थिती सुधारत चालली आहे’’ असे ते लिहितात. उदार समत्वाच्या तत्त्वावर पती-पत्नी व कुटुंब संबंधांची रचना करण्याचा उपदेश ते नवशिक्षित तरुणांना करतात.

कानिवदे यांनी मांडलेले नवशिक्षित बुद्धिजीवींचे हे आत्मरूप मध्यमवर्गीय समाजघडणीचे एक अंग निर्देशित करते. त्यात मध्यमवर्गीय जडण-घडणीचे समग्र भौतिक वास्तव सांगितले जात नाही. ते मध्यमवर्गाच्या वैचारिक व नैतिक आत्मकल्पनेचा एक भाग चितारते. ते उगवत्या मध्यमवर्गाचे आत्मरूप म्हणून विवेकनिष्ठ सुधारणावादाचे तत्त्व पुढे मांडते आणि समाजाला वळण देणारे त्यांचे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक धुरीणत्व अधोरेखित करते.

पारंपरिक बुद्धिजीवित्व

विवेकनिष्ठ सुधारणावादाच्या दिशेने प्रवाहित झालेले नवशिक्षितांचे बुद्धिजीवित्व व्यक्तिवादाच्या स्फुट अभिव्यक्तीमधून प्रगट होत होते. त्याला स्वतंत्र असा सामाजिक पाया नव्हता. नवशिक्षित हे पारंपरिक बुद्धिजीवी जातींमधून मध्यमवर्गात प्रविष्ट होत होते. त्यामुळे त्यांचे बुद्धिजीवित्व एका बाजूला वर्गप्रेरणेने भारलेले होते तर दुसऱ्या बाजूला जातीवारशानेही बांधलेले होते. ते शिक्षणामुळे सुधारणावादाकडे तर जातीच्या आंतरिक प्रेरणेने धर्म व परंपरा रक्षणाच्या भूमिकेकडे जात होते. इटालियन विचारवंत ग्रामशी ज्याला पारंपरिक बुद्धिजीवी म्हणतो त्या भूमिकेत स्वत:ला ते उभे करत होते.

ग्रामशीच्या मते, ‘‘इतिहासाच्या कालक्रमामध्ये सातत्य टिकवून धरणारा धर्मोपदेशकांचा वर्ग हा पारंपरिक बुद्धिजीवी वर्ग असतो. तो धार्मिक विचार, शाळा, शिक्षण नैतिकता, न्याय परोपकार आणि विधायक कार्य इत्यादी कार्याची जबाबदारी स्वतकडे राखून सरंजामी-उमरावशाहीचे हितसंबंध दृढ करण्याची जबाबदारी पार पाडत असतो.’’ ग्रामशीच्या पारंपरिक बुद्धिजीवीच्या कल्पनेप्रमाणे तत्कालीन ब्राह्मण जातीने इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत बुद्धिजीवी असण्याची मक्तेदारी टिकवली होती आणि जात-पितृसत्ताक व्यवस्थेचे पोषण केले होते. सामाजिक-धार्मिक संघर्षांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर धर्म तत्त्वज्ञानाची फेरमांडणी करून कर्मकांडाचे पौरोहित्य करून समन्वयकारी श्रद्धा, कर्मकांड व नीती सांगणारी पुराणे रचून व जातिव्यवस्थेचा कायदा सांगणारी धर्मशास्त्रे उभारून पितृसत्ताक वर्ण-जातिव्यवस्थेची उतरंड टिकवून धरण्याचा खटाटोप केला होता.

वासाहतिक काळातही पारंपरिक बुद्धिजीवी म्हणून धर्म व परंपरा रक्षणाची जबाबदारी ब्राह्मण जातींवर आली. त्यांनी इंग्रजी शिक्षित होऊन मध्यमवर्गात प्रवेश केल्यावर सुधारणेचा जसा ध्यास घेतला तसा परंपरारक्षणाचा पवित्राही घेतला. त्यामुळे नवा ब्राह्मणबहुल मध्यमवर्ग दुभंगलेला राहिला. सनातनी व सुधारक या आंतरिक द्वंद्वात तो प्रगट होत राहिला.

आत्मप्रतिमेची दुविधा

ब्राह्मण जातीच्या पारंपरिक बुद्धिजीवी वारशाच्या जडत्वाने मध्यमवर्गीय जाणिवेला घेरले. त्यामुळे वर्गाची आत्मप्रतिमा ही ब्राह्मण जातीच्या आत्मप्रतिमेच्या आधारावर उभी करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. महादेव शिवराम गोळे यांनी ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ या ग्रंथात ब्राह्मण शब्द नवशिक्षितांसाठी योजला आणि देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सारस्वत ब्राह्मण, कायस्थ आणि पाठारे प्रभू व दुसऱ्या सर्व शुद्ध विद्याव्यासंगी जातींचा समावेश ब्राह्मण शब्दात केला. गोळे यांची ही व्याख्या आज कितीही गोंधळबाज व गरलागू ठरली तरी, मध्यमवर्गाच्या आत्मउभारणीच्या प्रक्रियेत ब्राह्मण जातीची प्रतिमा काम करीत होती हे ती स्पष्ट करते.

महाराष्ट्रात मध्यमवर्गाच्या आत्मरूपाची घडण होत असताना ब्राह्मण जातींच्या आत्मतत्त्वांचे रंगही त्यात भरले जाऊ लागले. सुधारणेसाठी असो की धर्म व परंपरेच्या रक्षणासाठी ब्राह्मण जातीच्या ज्या प्रतिमा उपयोगाच्या वाटल्या त्याचा सुधारकांनी व सनातन्यांनी आपल्या आपल्या परीने उपयोग केला.

विवेकनिष्ठ सुधारणांचा आक्रमकपणे पुरस्कार करताना लोकहितवादी यांनी वर्णाश्रमधर्माच्या मुशीतला ब्राह्मणत्वाचा एक कल्पित आदर्श उभा केला. त्यांनी लोककल्याणकारी ज्ञानव्यवहार व समाजाच्या प्रगतीचे धुरीणत्व हे ब्राह्मणाचे वर्णोचित कर्म ठरवले आणि त्या आधारावर गतानुगतिक, यथास्थितवादी भूमिकेत अडकलेल्या ब्राह्मणांच्या अवगुणांचे वाभाडे काढले.

‘पूर्वी ब्राह्मण अर्थज्ञ होते. धर्माचा विचार करत होते. ग्रंथ लिहीत होते. पढवीत होते व धर्मात वाईट असेल ते सुधारीत होते’ असे प्रतिपादन करून लोकहितवादींनी ब्राह्मणांची इतिहास-कल्पित प्रतिमा उभी केली. इहपर ज्ञाननिष्ठा आणि सुधारणावादी कृतिशीलता या ब्राह्मणत्वदर्शक गुणांचा गौरव करताना त्यांनी मध्यमवर्गीय आत्मतत्त्वाचे संगोपन केले.

लोकहितवादींसारखे सुधारक जेव्हा कर्मकांडी ब्राह्मणत्वावर प्रहार करत होते तेव्हा सनातनी मात्र कर्मकांडी ब्राह्मणत्वाची भलावण करत होते. सनातनी पक्षाचे गंगाधरशास्त्री फडके यांनी ‘हिंदुधर्मतत्त्व’ या ग्रंथात कर्मकांडी शुद्धी-अशुद्धीच्या उतरंडीतील ब्राह्मण सत्त्वाची श्रेष्ठता स्वाभाविक व समर्थनीय ठरवली आहे. शूद्रांच्या दास श्रमाच्या विरोधात ब्राह्मणांचे स्वामित्वभावी आत्मतत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. ब्राह्मण जातीच्या उच्चपणाच्या रक्षणासाठी विटाळाचे तत्त्व अनिवार्य मानले आहे. पितृसत्ताक जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा कर्मकांडी ब्राह्मणत्वाचा हा आदर्श त्यांनी अतीव निष्ठेने पुरस्कारलेला आहे.

सुधारकांनी उभारलेल्या ज्ञाननिष्ठ-ब्राह्मण या प्रतिमेच्या तुलनेत सनातन्यांनी पुरस्कारलेली ही कर्मकांडी ब्राह्मणत्वाची प्रतिमा कितीही तर्कदुष्ट वाटत असली तरी व्यवहारात तिचाच अंमल चालत होता. रोजच्या व्यवहारात कर्मकांडाच्या चाकोरीतच ब्राह्मण ही ओळख घडवली जात होती. मुंज, श्रावणी, स्नान-संध्या अशी नित्य नमित्तिक कम्रे करण्यातूनच जातिसत्त्वाचा निर्वाह केला जात होता. नवशिक्षित कुटुंबांमध्येही कर्मकांडाचा निर्वाह करून ब्राह्मण जातिसत्त्वाची निरंतरता कायम राखली जात होती. कर्मकांडाच्या विशेषाधिकारातून मिळणारे ब्राह्मण सत्त्वाचे नैतिक श्रेष्ठत्व व धुरीणत्व नवशिक्षितांच्या आत्मकल्पनेतही कोरले जात होते.

पारंपरिक बुद्धिजीवित्वाचा वारसा सांभाळणाऱ्या ब्राह्मण जातींच्या भौतिक व सांस्कृतिक अधिवासामध्ये (हॅबिट्स) मध्यमवर्ग रुतलेला होता. तो वासाहतिक आधुनिकतेने संचारित बुद्धिजीवित्व आणि ब्राह्मण जातीचे पारंपरिक बुद्धिजीवित्व या भूमिकांमधील विरोध आपल्या परीने सोडवत होता आणि त्यासाठी ज्ञाननिष्ठ व कर्मकांडी या दोन ब्राह्मण प्रतिमांच्या प्रभावाखाली स्वत:च्या वर्गीय आत्मप्रतिमेची दुविधा सोडवण्याचा प्रयत्न करत होता.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. ईमेल : ubagade@gmail.com