|| उमेश बगाडे

वासाहतिक स्थित्यंतरानंतर जाती नष्ट न होता, बुद्धिजीवित्वाचे सातत्य विशिष्ट वर्णाकडे/ जातीकडे कसे टिकले हा आपल्या सामाजिक इतिहासाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ‘आद्य आधुनिकता’ यासारख्या संकल्पना मांडून शोधण्याऐवजी, ‘पौर्वात्यवाद’ समजून घेऊन वसाहतपूर्व आणि वसाहतोत्तर काळात फरक नसण्याच्या कारणांचा शोध घेतल्यास अधिक स्पष्टपणे मिळेल.. 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात पारंपरिक व नवशिक्षित बुद्धिजीवींच्या भूमिकेतल्या ब्राह्मणबहुल* मध्यमवर्गाने समाजाच्या धुरीणत्वाची जबाबदारी अंगावर घेतली. परंपरा व आधुनिकता यांच्या तणावात समाजातील बदलांचे नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी सर्वागीण चिकित्सा केली. स्वत:च्या आत्मस्थितीचा शोध घेतला. इतिहास व संस्कृतीचा धांडोळा घेतला. जात, वर्ग, प्रदेश, पंथ, धर्म, राष्ट्र या विविध आत्मकल्पनांची नव्याने संगती मांडली.

मध्यमवर्गाने सुरू केलेली ही ज्ञानमीमांसा स्वतंत्र नव्हती. वासाहतिक ज्ञानमीमांसेच्या आश्रयाने ती आकाराला आली होती. वसाहतोत्तरवादी (पोस्ट-कलोनियल) अभ्यासकांनी वासाहतिक ज्ञानव्यवहाराच्या अशा गुंतागुंतीची उकल केली. ज्ञान व सत्तेचा संबंध सांगणाऱ्या मिशेल फुकोच्या सिद्धांताला त्यांनी अनुसरले. एडवर्ड सईद या पॅलेस्टिनियन अभ्यासकाने त्याच्या ‘ओरिएन्टॅलिझम’ या बहुचíचत ग्रंथामधून वासाहतिक सत्तासंबंधात उभ्या राहणाऱ्या पौर्वात्यवादी ज्ञानमीमांसेचे संभाषित उलगडून दाखविले. वासाहतिक देशांची अंकितता पौर्वात्यवादी ज्ञानव्यवहारामुळे कशी घडली याचा खुलासा सईद यांनी केला आहे.

पौर्वात्यवादी ज्ञानव्यवहाराचे संभाषित

पौर्वात्यवादाने पश्चिम विरुद्ध पूर्व या सत्ताशास्त्रीय (ऑन्टॉलॉजिकल) चौकटीत पूर्वेचे विवरण करण्याचा पायंडा पाडला. पश्चिमेला भौतिक, प्रगत, सभ्य, प्रबुद्ध ठरवून त्याविरोधात पूर्वेला आध्यात्मिक, अप्रगत, रानटी, अप्रबुद्ध ठरवू पाहणाऱ्या द्वंद्वात्मक वर्णनबंधाचा उपयोग केला. युरोपियन सभ्यतेच्या प्रभुत्वाची योजना अंतर्भूत करून युरोपीय भूमीतील संकल्पनांच्या आधारे पूर्वेच्या समाज व संस्कृतीचे आकलन सादर करण्याचा रिवाज रूढ केला.

पौर्वात्यवादाचे हे संभाषित (डिस्कोर्स) भारताच्या ज्ञान-उभारणीतही कार्यरत राहिले. भारतीय इतिहास, धर्म, संस्कृती, भाषा, समाज यांचा अभ्यास पौर्वात्यवादी सूत्रांना अनुसरून करण्यात आला. वसाहतवादी प्रभुत्वासाठी पूरक असलेली प्रबोधनकालीन युरोपीय ज्ञानाची प्रमाणशास्त्रीय दृष्टी त्यातून प्रस्थापित करण्यात आली. पण पौर्वात्यवादाच्या चौकटीत चाललेली ही ज्ञानउभारणी केवळ पाश्चात्त्य हेतू व हितसंबंधांची उपज नव्हती. त्यांचे साथीदार असलेल्या एतद्देशीय ब्राह्मण बुद्धिजीवींचे हेतू व हितसंबंधही त्यात सामील झाले होते.

वासाहतिक हितसंबंध व प्रमाणशास्त्रीय अधिष्ठान राखण्याच्या पौर्वात्यवादी योजनेत भागीदार ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाच्या हितसंबंधांचा व प्रमाणशास्त्राचा समावेश केला जात होता. भारतीय कायदा, इतिहास, धर्म, संस्कृतीच्या संगतीसाठी केलेला शास्त्राभ्यास असो की जमीन मालकीची निश्चिती, महसुलाचा आकार, जाती-जमातींची नोंद यासाठी केलेले सर्वेक्षण असो; वासाहतिक हिताबरोबर प्रशासनात त्यांना साह्य़भूत होणाऱ्या ब्राह्मणवर्गाच्या हिताची काळजी घेण्यात येत होती.

मोल्सवर्थचा शब्दकोश हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मोल्सवर्थने इंग्रजी भाषा व संकल्पनांच्या चौकटीत मराठी शब्दांचे अर्थ सांगताना पाश्चात्त्य प्रभुत्वाचा प्रमाणशास्त्रीय अवकाश प्राप्त केला. तर मोल्सवर्थला साह्य़ करणाऱ्या ब्राह्मणांनी कथित ‘निम्न जाती-जमातीं’च्या अनेक शब्दांना वगळून स्वजातीच्या सांस्कृतिक भांडवलाच्या बळकटीकरणाला पोषक असा अवकाश प्राप्त केला.

आद्य आधुनिकतेचे प्रमेय

भांडवली स्थित्यंतराचा व युरोपीय प्रबोधनाच्या मूल्यांना आत्मगत करणारा काळ म्हणून वसाहतकाळाला आधुनिकतेचा कालखंड मानले जाते. ‘वसाहतपूर्व काळापासून फारकत घेणारे युग’ म्हणून त्याची ओळख उभी केली जाते. वसाहतोत्तरवादी अभ्यासक त्याला गतकाळापासून घेतलेला खंड (रप्चर) मानतात. ज्ञानव्यवहाराचे नवे युग म्हणून त्याला अधोरेखित करतात.

वसाहतकाळाला गतकाळापासून घेतलेला खंड मानणे अनेक इतिहासकारांना मान्य नाही. ते वसाहतकाळाला आधुनिक मानत असले तरी वसाहतपूर्व काळ व वसाहतकाळ यात सातत्यक्रम पाहतात. काही इतिहासकार भांडवलशाही उद्गमाची प्रक्रिया वसाहतपूर्व काळात शोधतात तर काही त्या काळात आद्य आधुनिकता पाहतात. काही ज्ञानव्यवहारातील सातत्य अधोरेखित करून वसाहतपूर्व व वसाहतकाळात सेतू बांधतात.

काही दशकांपूर्वी प्रा. अरिवद देशपांडे यांनी अठराव्या शतकात आद्य आधुनिकता अस्तित्वात असल्याचा युक्तिवाद सादर केला होता. राष्ट्रवादाची प्रेरणा, विस्तारवादी धोरण, जातिनिष्ठ व्यवसायांची पारंपरिक सीमारेषा पार करणारे उत्पादक घटक, सामाजिक गतिशीलता, लोकाभिमुख ऐहिकता या निकषांवर अठराव्या शतकातील आद्य आधुनिकतेचे प्रमेय त्यांनी प्रस्तावित केले आहे. रोझँलिंड ओ’हॅनलन, संजय सुब्रमण्यम अशा काही लोकांनी आद्य आधुनिकतेचे प्रमेय उचलून धरलेले आहे.

आद्य आधुनिकतेचे हे प्रमेय मूळ कालपटापासून तोडून निवडलेल्या तथ्यांवर उभे केले असल्यामुळे मान्य करणे अवघड आहे. ‘वसाहतपूर्व व वसाहतकाळ यांच्यात खंड नसून सातत्यक्रम असल्या’ची या सर्वाची भूमिका मात्र बरोबर आहे. मराठेशाही आणि वासाहतिक सत्ता यामधील सातत्यक्रम आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचा जसा आहे तसा विचार व्यवहाराचाही आहे. वसाहतपूर्व काळात पारंपरिक बुद्धिजीवी असलेल्या ब्राह्मण जातींमधूनच वसाहतकाळातील नवशिक्षित बुद्धिजीवी घडलेला असल्यामुळे या दोन काळांतील हे सातत्य ज्ञान वारसा आणि विचार करण्याच्या पद्धतीचेही राहिले होते.

विचारपद्धतीचे सातत्य

पारंपरिक बुद्धिजीवी म्हणून अठराव्या शतकात ब्राह्मण वेगवेगळ्या भूमिका पार पाडत होते. ते पौरोहित्याचे पिढीजात काम करत होते. धार्मिक चळवळी, संस्था, मठ यात धुरीणत्वाची भूमिका पार पाडत होते. प्रशासनात मंत्री, अधिकारी अथवा लेखनिक बनून कारकुनी सेवा करत होते. लेखनकलेच्या आधारावर व्यापार व सावकारीही करत होते. आयुर्वेदाच्या ज्ञानाआधारे वैद्यकी करत होते. वेद व शास्त्रांचे शिक्षण घेत-देत होते. शास्त्रप्रामाण्याच्या आधारावर धर्मदंड सांभाळत होते. संस्कृत अध्ययनाची परंपरा चालवत होते. त्यांच्या संस्कृत अध्ययनाच्या परंपरेचे सातत्य जसे वसाहतकाळात चालू राहिले तसे विचार करण्याच्या पद्धतीचे सातत्यही चालू राहिले.

मुघल राजवटीच्या आश्रयाखाली बनारसमध्ये संस्कृत अध्ययनाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी सुरू केला होता. त्यात त्यांनी वैदिक परंपरेला हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहाचे स्थान दिले. अद्वैत सिद्धांताला भारतीय तत्त्वज्ञानाचे मध्यवर्तित्व बहाल केले आणि वैदिक परंपरेच्या चौकटीत प्रचलित श्रद्धा व परंपरांचे समन्वयन करण्यास सुरुवात केली. अठराव्या शतकातील ब्राह्मणांची ही विचारपद्धती पुढे पौर्वात्यवादी चर्चाविश्वाचा भाग बनून सुधारणा चळवळीचे मुख्य सूत्र बनल्याचे पाहावयास मिळते.

जाती समाजात जात पंचायतींना निवाडय़ाचे अधिकार असल्यामुळे रूढीगत कायद्याचा अंमल स्वीकृत केलेला होता. रूढीगत कायदा व धर्मशास्त्रांचा कायदा या दोहोंच्या आधारे समाजाचे नियमन केले जात होते. संस्कृत अध्ययनाच्या परंपरेने रूढी व धर्मशास्त्रांच्या तणावात शास्त्रार्थाला वरचढ ठरवण्याची भूमिका घेतली. रूढीगत कायद्याचा अंमल कायम राहिला असला तरी शास्त्रार्थाला महत्त्व मिळू लागले. जात्युन्नतीच्या कामनेतून केलेल्या क्षत्रियत्वाचा वा ब्राह्मणत्वाचा दावा शास्त्रप्रामाण्याच्या आधारावर सोडवला जाऊ लागला. ब्राह्मण पोटजातींमध्ये अधिकारभेदाचे व उच्चनीचतेचे वाद शास्त्रांची साक्ष काढण्यासाठी काशीला मराठी ब्राह्मणांकडे येऊ लागले. शास्त्रात ब्राह्मणांचा वर्ण म्हणून एकवट उल्लेख असल्यामुळे काशीचे हे ब्राह्मणही निम्न मानल्या गेलेल्या ब्राह्मण पोटजातींच्या अधिकाराबाबतीत उदार निर्णय देऊ लागलेले दिसतात. या काळातील शास्त्रार्थ धूसर स्वरूपात का होईना सुधारणेच्या दिशेनेही वळण घेऊ लागला होता हे यातून स्पष्ट होते. बालपणीच वैधव्य कोसळलेल्या मुलीच्या पुनर्वविाहासाठी शास्त्रांची साक्ष काढण्याचा प्रयत्न सरदार पटवर्धनांनी केला होता, हा पेशवाईतील प्रवाद त्याची प्रचीती देतो.

तरीही अठराव्या शतकातील जाती-तंटय़ाचा व स्त्रीविषयक निकालांचा विचार करता ब्राह्मणांच्या जाती-तळावर प्रबळ होत चाललेले शास्त्रप्रामाण्य कर्मठ सनातनी रूपातच बहुंशी व्यक्त झालेले दिसते. या पार्श्वभूमीवर संस्कृत अध्ययनाच्या परंपरेला आद्य आधुनिकतेशी जोडू पाहण्याचा रोझँलिंड ओ’हॅनलन यांनी केलेला प्रयत्न स्वीकारता येत नाही.

संस्कृत अध्ययनातून अठराव्या शतकात गतिमान झालेली शास्त्रप्रामाण्याची भूमिका वसाहतकाळात पौर्वात्यवादी ज्ञानपद्धतीचा भाग बनून सुधारणा चळवळीचे सूत्र बनली. सुधारक व सनातनी या दोन्ही पक्षांनी शास्त्रार्थ आपापल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न केले. तथापि, पौर्वात्यवादी संभाषितामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रबोधनकालीन तत्त्वव्यूहामुळे व वसाहतवादी राज्यसंस्थेच्या पाठिंब्यामुळे शास्त्रप्रामाण्यवादी सुधारणावाद या काळात गतिमान होत राहिला.

अठराव्या शतकातील ब्राह्मणांची विचार करण्याची पद्धती जातीच्या पायानेच मध्यमवर्गाच्या जाणीव-नेणिवेत दाखल होत होती. त्यामुळे जातिसुधारणेच्या मर्यादेतच नवशिक्षितांनी आधुनिकतेचा विचार केला. त्याची अनेक उदाहरणे मिळतात. विवेकनिष्ठेचा आग्रह धरत शास्त्रांमधील अग्राह्य़ आणि वेदप्रामाण्य नाकारणारे लोकहितवादी जातिसुधारणेच्या दबावातून आयुष्याच्या      उत्तरार्धात शास्त्रप्रामाण्य शिरोधार्य मानतात आणि वेदाला अपौरुषेय मानणाऱ्या आर्य समाजाचे अनुयायित्व पत्करतात. पारंपरिक बुद्धिजीवी जातीच्या जडत्वाने नवशिक्षितांना घेरल्याचीच ही अंतिम परिणती होती.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com