03 April 2020

News Flash

चिनी माती.. मराठी माती

आपल्या मराठीत झाले नसेल असे काही; पण चीनमध्ये झाले आहे असे.

कल्पना करा. समजा, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये वा दुकानात गेला आहात. खरेदी करता करता खाद्यपदार्थाच्या विभागात जाता. तेथील रॅकवर कसली कसली पाकिटे ठेवलेली असतात. लोणची, सॉस, मुरांबे, चटण्या, सरबते वगैरे वगैरे. तुमची नजर त्यातील वेफर्सच्या पाकिटांकडे जाते आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. त्या पाकिटांवर नेहमीसारखे वेफर्सचे कुरकुरीत चित्र नसते, तर झाडाला टेकून उभे असलेले चिं. त्र्यं. खानोलकर- म्हणजेच आरती प्रभू त्या पाकिटावरील चित्रातून तुमच्याकडे बघत असतात, किंवा दाढीधारी ग्रेस पाकिटावरील चित्रातून तुमच्या नजरेत खोल बघत असतात. आरती प्रभू वा ग्रेस यांना जे ओळखत असतील ते हमखास ते पाकीट हाती घेणारच. आणि समजा, त्यांना न ओळखणारे असतील तर- हे काय नवे आले आहे, असे म्हणून ते पाकीट हाताळणारच.

वेफर्सच्या पाकिटांवर कवी.. हा काय प्रकार आहे? हे असे कुठे कधी होते काय? आपल्या मराठीत कधी असे झाले आहे काय? कधी होईल काय?

आपल्या मराठीत झाले नसेल असे काही; पण चीनमध्ये झाले आहे असे. आणि चीनमधील बटाटा चिप्सच्या पाकिटांवर एखादा चिनी कवी, लेखक नाही, तर साहित्यामधील नोबेल पुरस्कार मिळवणारा गीतकार, संगीतकार, गायक बॉब डिलन त्यावर अवतरला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डिलनचे चित्र वेष्टनावर असलेल्या बटाटा चिप्सच्या पाकिटात चिप्स नाहीत.. डिलनच्या गाण्यांचे चिनी अनुवादातील पुस्तक आहे. अशी आठ-दहा पुस्तके डिलनच्या वेगवेगळ्या छायाचित्रांची वेष्टने असलेल्या पाकिटांतून सध्या चीनमध्ये विकली जात आहेत.

खरे तर डिलनची गाणी, त्यांचा बाज आणि चीनमधील एकूण परिस्थिती, चिनी माणसाची- विशेषत: सत्ताधाऱ्यांची मानसिकता या दोन अगदीच भिन्न प्रकृतीच्या गोष्टी. तरीही चीनमध्ये डिलनची गाणी ऐकणारा, ती भावणारा एक मोठा वर्ग आहे. विषयाला एक संदर्भ खाण्याचा असल्याने जरा भाषेतून गंमत करीत म्हणायचे झाले तर- डिलनची गाणी चवीने वाचणारा, ऐकणारा मोठा वर्ग साम्यवादी चीनमध्ये आहे. त्याच्या गाण्यांचे चिनी भाषेत अनुवाद होतात व त्या पुस्तकांना चांगली मागणीही असते.

डिलनची चिनी अनुवादित पुस्तके, बटाटा चिप्सच्या पाकिटाचे त्यांना असलेले वेष्टन- हा झाला या माहितीच्या तपशिलातील चुरचुरीत भाग. या तपशिलाची एक बाजू आहे ती पुस्तकांच्या मार्केटिंग तंत्राची.. विक्रीकौशल्याची. आणि या मुद्दय़ावर हमखास मतभेद होऊ  शकतात. हे मतभेद व्यक्त करण्याच्या आड कल्पकतेची वानवाही दडवली जाणार अनेकदा.

पुस्तकांच्या विक्रीकौशल्याची ही आपल्या मराठी वाचकांसाठी काहीशी नवीच असलेली रीत पाहताना सध्या आपल्याकडे पुस्तकांच्या विक्रीसाठी काय केले जाते ते जरा पाहू या. तर- साधारणपणे पुस्तकविक्रीसाठीची जी पारंपरिक साधने आहेत त्यांचाच वापर यासाठी केला जातो. मासिकांमध्ये, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमध्ये जाहिराती देणे, पुस्तकाचे प्रकाशन करावयाचे असल्यास चांगला समारंभ आयोजित करणे, स्वत:च्या प्रकाशन संस्थेचे संकेतस्थळ असल्यास त्यावर पुस्तकांची माहिती देऊन ऑनलाइन खरेदीची सोय उपलब्ध करून देणे, साहित्य संमेलनादी सोहोळ्यांतील पुस्तक प्रदर्शनांत पुस्तके उपलब्ध करून देणे, वगैरे. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेतच. पण त्यातही सुधारणांना पुरेपूर वाव आहे. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर- आपल्याकडील अनेक नामवंत प्रकाशन संस्थांची संकेतस्थळे आताशा सुधारू लागली आहेत. अत्यंत रुक्ष असे त्यांचे आधीचे रूप पालटते आहे, ही स्वागतार्ह बाब. पण तरीही आपल्या प्रकाशनाच्या पुस्तकांची त्रोटक माहिती देणे एवढय़ावरच अनेक प्रकाशन संस्थांचे पाऊल थांबलेले दिसते. ते पाऊल पुढे पडायला हवे. हे पुस्तक आपण विकत घ्यायलाच हवे असे वाचकांना वाटावे अशा तऱ्हेने तपशिलातील माहिती संकेतस्थळांवर द्यायला हवी. लेखक-कवीचे स्वत:च्या पुस्तकाबद्दलचे सांगणे, ज्येष्ठ लेखक, कवींची त्या पुस्तकाबद्दलची मते, वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणारी परीक्षणे असा ऐवज या संकेतस्थळांवर दिसायला हवा. या गोष्टींसाठी वेळ, पैसा, मनुष्यबळ थोडे खर्च करावे लागेल, हे खरे. मात्र, पुस्तकांबाबतची माहिती वाचकांना व्हावी यासाठी ते आवश्यकच आहे. वृत्तपत्रांतून दिल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या जाहिरातींमध्ये तोच तोपणा आढळतो. त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वत्र अचाट विस्तार झालेल्या समाज माध्यमांचा उत्तम वापर करायला हवा. या अशा आणि आणखीही काही गोष्टी करणे हे पुस्तकविक्रीसाठी हिताचेच ठरेल.

आता मुद्दा चीनमध्ये ज्या प्रकारे बटाटा चिप्सचे पाकीट वाटावे अशा पाकिटातून डिलनची पुस्तके विक्रीस ठेवली जातात तसे आपण करावे का, हा. डिलनची पुस्तके अशा रीतीने विक्रीस ठेवताना संबंधित प्रकाशन कंपनीने काय विचार केला होता? या कंपनीचे म्हणणे असे- की मॉलमध्ये, दुकानांमध्ये आज सर्वाधिक लोकप्रिय गोष्ट कुठली आहे, तर बटाटा चिप्स- असे आम्हाला आमच्या सर्वेक्षणात आढळले. त्यामुळे ही शक्कल आम्ही लढवली. हे असे प्रकार आपल्या मराठीत करता येणार नाहीत काय? म्हणजे अगदी तंतोतंत तसेच करायला हवे असे नाही. पण पुस्तकांची उपलब्धता वाढवण्यासाठी काही गोष्टी करता येणार नाहीत का? शहरे-गावांतील काही ठरावीक दुकानांमध्येच पुस्तके मिळणार, ही परिस्थिती काही प्रमाणात तरी बदलता येणार नाही का? मुळात पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत एक स्थानमाहात्म्य आपल्या डोक्यात पक्के बसलेले आहे. त्याबाबत आपण नको इतके हळवे आणि सोवळे आहोत. त्याबाबत प्रयोग करायला आपण पटकन् धजावत नाही. अगदी चीनप्रमाणे आपल्याकडे मॉलमध्ये नाही ठेवली मराठी पुस्तके- पण समजा मुंबई-ठाण्यातील नाटय़गृहांतून, कलादालनांत, पुण्यात खाद्यपदार्थाच्या लोकप्रिय दुकानांत, नाशिक-नागपुरातील प्रसिद्ध हॉटेलांत, अगदी छोटी शहरे, गावे येथे- ज्या ठिकाणी लोकांचा बऱ्यापैकी राबता असतो अशा ठिकाणी ठेवली पुस्तके.. आणि खिशाला फार तोशीस पडणार नाही अशा बेताने करता आली काही त्यांच्या विक्रीची व्यवस्था- तर काय हरकत आहे?

अर्थात चीनमधील पुस्तक व्यवसाय, त्याची उलाढाल, त्याची रचना, त्याचा आर्थिक आवाका आणि आपल्या मराठीतील या गोष्टी यांची तुलना कदापि अशक्य आहे, हे मान्यच. प्रकाशन व्यवसायात जो देश अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तेथील प्रकाशन व पुस्तक व्यवसाय आणि आपल्या मराठीतील प्रकाशन-पुस्तक व्यवसाय यांच्यात सर्वच बाबतींत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तो फरक पुसून टाकणे निव्वळ अशक्य आहे. चिनी मातीतील प्रयोगांचे रोप थेट मराठी मातीत लावून ते रुजवणे कठीण आहे. पण निदान आपल्या मराठीचा जो काही परीघ आहे तो विस्तारण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी थोडी कल्पकता हवी आणि थोडा धोका पत्करण्याची तयारीही. तेवढे तर करायलाच हवे. मायमराठी वगैरे सोडा एक वेळ; निदान व्यवसाय वाढविण्यासाठी तरी!

rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2017 2:06 am

Web Title: american songwriter bob dylan
Next Stories
1 जगण्याबद्दलची समज वाढवणाऱ्या कथा
2 कलासक्त दाम्पत्याचा प्रेरक जीवनपट
3 पाकुळीच्या स्वप्नाची करुण कथा
Just Now!
X