News Flash

अनुवादाचे नवे पान..

सोलापूरचे नीतिन वैद्य मोठय़ा नेटाने आणि आस्थेने ‘आशय’चा अंक काढत असतात

सोलापूरचे नीतिन वैद्य मोठय़ा नेटाने आणि आस्थेने ‘आशय’चा अंक काढत असतात. आज, २३ एप्रिल रोजीच्या ‘जागतिक ग्रंथ व स्वामित्व हक्क दिना’निमित्त (अंकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी ‘लेखन हक्क दिन’ असा शब्द योजिला आहे, तो अनेक बाजूंनी अर्थवाही आणि महत्त्वाचा.) त्यांनी काढलेला अंक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीवर आधारलेला आहे. अंकाच्या प्रारंभी वैद्य यांच्या प्रस्तावनेत श्याम मनोहर यांचे एक उद्धृत आहे. ते असे..

‘धार्मिक ग्रंथांचे वाचन काही ना काही निमित्ताने नेहमी केले जाते, त्यातून त्याची परंपरा निर्माण झाली. मराठी साहित्याला मात्र इतिहास आहे, पण अशी परंपरा नाही. ती निर्माण व्हावी म्हणून केव्हाही वाचणे हेच निमित्त केले पाहिजे..’

खरे तर वाचनच काय, कुठलीही गोष्ट करण्यासाठी निमित्त आवश्यक असते असे नव्हे. श्याम मनोहर यांची एकंदरीत जगण्यातील हालचालींकडे पाहण्याची अत्यंत वेगळी दृष्टी आहे. त्यातून हे असे उद्धृत येणे साहजिकच.

तर मुद्दा आहे निमित्ताचा. आजच्या ‘जागतिक ग्रंथदिना’च्या निमित्ताचा. आपल्याच धुंदीत आणि मस्तीत, आपल्या वास्तवातील प्रतिकुलाशी लढणाऱ्या डॉन क्यिओट नामक लढवय्या लेखणीतून उतरवणारा म्युग्युअल सव्‍‌र्हातिसचा मृत्युदिन.. विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिनही आणि मृत्युदिनही.. असे संदर्भ आजच्या जागतिक ग्रंथदिनास आहेत. आणि याच निमित्ताने आज येथे विषय मांडायचा आहे तो आपल्या मराठीतील पुस्तकांचा. ही पुस्तके जागतिक कधी होतील, त्या पातळीवर कधी पोहोचतील याचा.

या मुद्दय़ाकडे जाण्यापूर्वी जरा वाट बदलू या आणि ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश देवी हे मराठी भाषेच्या भवितव्याबाबत मध्यंतरी काय म्हणाले होते ते बघू या-

मराठीचे सूत्र हे बहुभाषिकतेमधून गुंफले गेलेले आहे. त्यासाठी उदाहरण संत ज्ञानेश्वरांचे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या रचनांत संस्कृतही वापरली आणि मराठीही. जी भाषा या रीतीची असते ती नष्ट होत नाही. काळासोबत ती भाषाही चालत राहते आणि संस्कृतीही. याउलट एकारलेल्या भाषाधोरणाने साम्राज्येही लयास गेल्याची उदाहरणे आहेत. लॅटिन व इतर भाषांना नकार देणारे रोमन साम्राज्य असेच एकारलेल्या भाषाधोरणामुळे लयास गेले. ब्रिटिश मंडळीही बहुभाषिक नव्हती. त्यांनी राज्य केले ते स्थानिकांमधील दुभाषे, भाषांतरकार हाताशी धरून.. असे गणेश देवी यांचे निरीक्षण. या निरीक्षणाचा पाया अर्थातच त्यांचा या विषयातील सखोल अभ्यास.

देवी यांच्या या मांडणीतील एक महत्त्वाचा मुद्दा बहुभाषिकतेचा. आता आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठीतील बहुभाषिक लेखकांचा विचार करता येईल. तर तसे लेखक मराठीत खूपच कमी. अरुण कोलटकर, किरण नगरकर, विलास सारंग अशी मोजकी प्रमुख नावे चटकन आठवणारी. म्हणजे मराठी लेखकांना (येथे प्रामुख्याने ललित, कविता, कथा, कादंबरी आदी साहित्य प्रकारांचा विचार केलेला आहे) इंग्रजी वा अन्य कुठली भाषा येत नाही, असे नव्हे. भारतातील अन्य कुठलीही भाषा त्यांना उमजत नाही, असेही नव्हे. मात्र लिहिण्याची त्यांची भाषा मराठीच. त्यात त्यांना दोष देण्याची काही आवश्यकता नाही. पण मनात विचार येतो तो असा, की मग मराठी लेखक-कवी मराठीपुरताच राहणार का? विदेशातील परभाषिक दूरच राहू देत, आपल्या देशातील इतर भाषकांना मराठी लेखकांची ओळख होणार की नाही?

आपल्याला ज्युझे सारामागु मराठीतून वाचता येतो, काफ्का मराठीतून वाचता येतो, शेक्सपिअर तर सहजच मराठीतून मिळतो.. मग आपले श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, प्रकाश नारायण संत, श्याम मनोहर, वसंत आबाजी डहाके आणि असे कितीतरी चांगले लेखक इतर भाषिकांपर्यंत कसे पोहोचणार? मराठीतील काही चांगल्या साहित्यिकांचे साहित्य अन्य भारतीय भाषांत, इंग्रजीत, क्वचितप्रसंगी इंग्रजीव्यतिरिक्त अन्य परकीय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अजिबातच नाही, असे नाही. मात्र त्याचे प्रमाण तुलनेने फारच कमी असल्याचे दिसते. साहित्य अकादमीसारख्या काही संस्थांच्या माध्यमातून असे प्रयत्न होताना दिसतात. मात्र एकंदर साहित्य व्यवहाराचा विचार करता त्याची व्याप्ती बरीच कमी. अशा वेळी भिस्त अर्थातच खासगी प्रकाशकांवर. आणि प्रादेशिक भाषांतील अनुवादाचा अपवाद वगळता प्रादेशिक साहित्याचा अनुवाद इंग्रजीत करण्यासाठी खासगी प्रकाशक पुढे आल्याची उदाहरणे तशी कमीच आहेत. (मुख्यत्वे करून इंग्रजी पुस्तकांसाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या काही बलाढय़ प्रकाशन संस्थांनी भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके प्रसिद्ध करण्याचा प्रयोग मध्यंतरी केला. मात्र तो फारसा यशस्वी झाल्याचे दिसले नाही. आणि येथे खेदाने नमूद करावीशी वाटणारी बाब म्हणजे, इंग्रजी पुस्तके बिनचूक काढणाऱ्या या प्रकाशन संस्थांच्या प्रादेशिक भाषेतील पुस्तकांत मात्र खटकण्यासारख्या त्रुटी, गफलती होत्या. त्यांचा विस्तार न होण्यामागे हे एक कारण असावे?) अशा परिस्थितीत अगदी नुकतीच झालेली एक घोषणा मराठीसह आपल्या देशातील सर्वच भाषांमधील लिहित्या मंडळींसाठी आणि वाचकांसाठीही सुखावणारी आहे.

‘लोटस फीट बुक पब्लिकेशन्स’ या नव्या प्रकाशन संस्थेची घोषणा नुकतीच झाली. ही मूळ कंपनी इंग्लंड व वेल्समधली. भारतीय भाषांमधील साहित्य इंग्रजीत अनुवादित करण्यासाठी त्यांनी भारतात पाऊल टाकले आहे. त्यांची प्रारंभीची प्रकाशने असतील ती हिंदी व बंगाली भाषेतील पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाची. आणि पुढील काळात ते मराठी पुस्तकांकडेही वळणार आहेत..

ही बातमी आपल्यासाठी आनंदाची. आजच्या ग्रंथदिनाच्या दिवशी तर तिचे औचित्य अधिकच.

लिहित्या लेखकाला नेमके काय हवे असते? लेखनातील आनंद हा तर आहेच मोठा. लेखनामागील ती एक प्रेरणा असतेच असते. पण त्याचसोबत अत्यावश्यक गोष्ट म्हणजे आपण लिहिलेले इतरापर्यंत पोहोचणे. आणि जाणत्या वाचकाला काय हवे असते? तर स्वत:ला अधिकाधिक समृद्ध करणारे साहित्य वाचावयास मिळणे. भारतासारख्या अवाढव्य आणि बहुभाषिक देशात जन्मणारे साहित्य त्या त्या भूमीतील प्रदेशाचे रंग, संस्कृती सोबत घेऊनच येते. त्यामुळे महाराष्ट्रातील चांगल्या वाचकाला शेजारच्या कर्नाटकमधील वा दूरच्या आसाममधील साहित्याविषयी ओढ वाटणे हे चांगले लक्षण. तसेच महाराष्ट्रातील लेखक काय लिहितायत याविषयी तामिळनाडूतील वाचकाला उत्सुकता वाटणे, हेही चांगले लक्षण.

हे आदानप्रदान होण्यासाठी अनुवादित पुस्तकांची आवश्यकता मोठी. मात्र आपल्याकडे त्यासाठीची आवश्यक यंत्रणा (अनुवादक-प्रकाशक-वितरक-प्रसिद्धीसाधने-दुकानदार) योग्य त्या प्रमाणात नाही. तसेच, आपला देश बहुभाषिक असला तरी मातृभाषेसोबत इतर राज्यांतील भाषेचीही जाणकारी असणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच. म्हणजे महाराष्ट्रातील माणसाला हिंदी, इंग्रजीसोबत कदाचित फ्रेंच वा जर्मन वा चिनी येत असेल (अर्थात त्याची कारणे व्यावसायिक व आर्थिक प्राप्तीशी निगडित असलेली), पण दक्षिणेकडील सगळ्याच भाषा त्याच्या दृष्टीने मद्रासी! अशा अवस्थेत हिंदी वा इंग्रजीतील अनुवादाचा प्रयोग नक्कीच उपयुक्त. देशातील वाचकांना अधिक संधी, पर्याय उपलब्ध करणाऱ्या या संधीचा लाभ वाचकांनी घ्यायला हवा.

म्हणजे मग उद्या ओडिशातील एखादा वाचक आपल्याशी श्याम मनोहरांच्या कादंबरीवर बोलू शकेल, सिक्कीमधील एखादा वाचक आपल्याला प्रकाश नारायण संतांच्या लंपनविषयी आनंदाने काही सांगेल.. किंवा तामिळनाडूच्या अशोकमित्रन यांच्या लेखनशैलीविषयी तेथील एखाद्या वाचकाशी आपण बोलू शकू.

अनुवादाच्या या नव्या पानाविषयी हे जरा फारच मोठे स्वप्नरंजन झाले असे वाटेलही कदाचित कुणाला. पण निदान तेवढे करण्यास हरकत काय? आजच्या जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने!

राजीव  काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:21 am

Web Title: author rajiv kale marathi article on book translation
Next Stories
1 काम्यू आणि मुराकामी
2 मराठी ढोलताशे आणि अभिजातता
3 (पैशा)अडक्यावाचून अडते सारे..
Just Now!
X