07 April 2020

News Flash

रिकाम्या खुर्चीचे वजन

मानवीहक्क कार्यकर्ते लिऊ क्षियाओबो यांना यकृताचा कर्करोग झाल्याने उपचारांसाठी पॅरोल मान्य.

ओस्लो येथे नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यात (सन २०१०) पुरस्काराचे मानकरी चिनी लेखक-कार्यकर्ते लिऊ क्षियाओबो  यांच्यासाठी रिकामी ठेवण्यात आलेली खुर्ची.

प्रतितास ४०० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीचा प्रवास चीनमध्ये सुरू..

चीनची सिक्कीममध्ये घुसखोरी. भारतीय जवानांना धक्काबुक्की..

आणि

शांततेचे नोबेल मिळवणारे आणि दीर्घ काळ तुरुंगात असलेले चिनी लेखक, समीक्षक, मानवीहक्क कार्यकर्ते लिऊ  क्षियाओबो यांना यकृताचा कर्करोग झाल्याने उपचारांसाठी पॅरोल मान्य.

चीनसंदर्भातील या तीन बातम्या सरत्या आठवडय़ात एकाच दिवशी याव्यात हा योगायोग. कम्युनिस्टांना योगायोग शब्द मान्य नसला तरी हा योगायोगच. या बातम्यांतील पहिली बातमी बेधडक विकासमार्गाची. दुसरी विस्तारवादी महत्त्वाकांक्षेची. तिसरी बातमी चिरडल्या गेलेल्या, चिरडल्या जात असलेल्या अक्षरांची, हक्कांची!

आपला शेजारी असलेल्या चीनमध्ये अक्षरे, हक्क आणि माणसेही चिरडले जाणे नवीन नाही. त्यात विकासाच्या नावाखाली आणि राष्ट्रहिताच्या बोंग्याआड अशी चिरडाचिरडी होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणेही मुश्कील. चीनसारख्या देशात, जेथे अक्राळविक्राळ स्वरूपाची एकपक्षीय राजवट आहे तेथे तर हा असा आवाज उठवणे म्हणजे महामुश्कील. राज्यकर्त्यांच्या लेखी देशद्रोहच की तो. मग देशद्रोहीमुक्त देश घडवायला हवाच. चीनने तेच केले.. तेच करीत आहे. मग त्याचा फटका लिऊ  क्षियाओबो यांच्यासारख्यांना बसणे ओघाने आलेच.

उत्तम शिक्षण, चांगली प्राध्यापकाची नोकरी, अंगभूत वक्तृत्वकला, लिखाणाची हातोटी अशा सगळ्या गोष्टी हातात. तर मग विद्यार्थ्यांना जमेल तसे शिकवत राहायचे, गावोगावी व्याख्याने देत फिरत राहायचे, प्रसारमाध्यमांत चमकायचे, लेखक-समीक्षक म्हणून मिरवत राहायचे, पुरस्कार पदरात पाडून घ्यायचे, पुरस्कार समित्यांवर वर्णी लागण्यासाठी खटपट करायची, साहित्य संमेलनांचे अध्यक्षबिध्यक्ष व्हायचे.. हा असा जगण्याचा मार्ग किती छान. पण चीनमधल्या लिऊ  क्षियाओबो यांना काय अवदसा सुचावी? तर स्वत:च्या देशातील मानवी हक्कांच्या पायमल्लीविरोधात लढायचे त्यांनी ठरवले. या युद्धातील पहिली मोठी लढाई ते लढले सन २००८ मध्ये. चीनमधील मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे आणि देशातील एकपक्षीय राजकीय प्रणालीत सुधारणा व्हावी, अशा दोन महत्त्वाच्या मागण्या करीत त्यांनी ऑनलाइन याचिका केली. ‘चार्टर ०८’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होता तो एका अर्थाने. पण चीनच तो. असल्या याचिकांना भीक घालणार? पण त्यांनी अनुल्लेखाने नाही मारले क्षियाओबो यांना. तर त्यांना अटकच केली. या असल्या काही भलत्या मागण्या करता म्हणजे काय. पुढे सुटका झाली त्यांची. त्याआधीची मोठी अटक होती ती सन १९८९ मधील तियानमेन आंदोलनानंतरची. चीनमधील लोकशाहीचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तियानमेन चौक आंदोलनात लिऊ  क्षियाओबो यांचा सक्रिय सहभाग होताच. त्याचबरोबरीने त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ती हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना तियानमेन चौकातून सुखरूप बाहेर काढण्यासाठीच्या शिष्टाईमध्ये. एरवीही ते आंदोलन चिरडताना चीनच्या पाशवी दमनयंत्रणेने किती जणांचे बळी घेतले याचे वेगवेगळे आकडे आजही सांगितले जातात. क्षियाओबो यांनी केलेल्या शिष्टाईमुळे तो आकडा काही शेकडय़ांनी वाढण्याचे टळले एवढे नक्की. आंदोलनानंतर क्षियाओबो यांना अटक झाली. पुढेही त्यांचा एक पाय घरात आणि एक पाय तुरुंगात अशी स्थिती होतीच. मात्र त्यांच्या हातांतील बेडय़ा कमालीच्या घट्ट झाल्या त्या सन २००९ मध्ये. त्या वर्षी २३ जून रोजी क्षियाओबो यांना अटक झाली ती ११ वर्षांच्या काळासाठी. त्यांचा गुन्हाच तेवढा गंभीर होता चिनी सरकारच्या दृष्टीने. राष्ट्राच्या अधिकारांना आव्हान देण्याचा प्रयत्न. एक क्षुल्लक लेखक-समीक्षक राष्ट्राच्या अधिकारांना आव्हान देतो म्हणजे काय? एक क्षुल्लक लेखक-समीक्षक मानवी हक्कांचा बागुलबोवा उभा करून राष्ट्राची कडक परीटघडी विस्कटण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय? घ्या रे त्याला आत..

लिऊ  क्षियाओबो आत गेले आणि सन २०१० मध्ये त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले. मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने लढा दिल्याबद्दलचा तो जागतिक सन्मान होता. त्याने चीनचे पित्त खवळले. क्षियाओबो यांच्या नोबेलची बातमी चीनवासीयांना कळू नये म्हणून प्रसारमाध्यमांना चाप लावण्यात आला, ज्यांना ही बातमी कळली होती त्यांच्या आनंदसोहळ्यांवर बंदी आणण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नॉर्वेशी असलेले राजनैतिक संबंध नोबेल दिल्याबद्दल गोठवून टाकले. ओस्लो येथे झालेल्या नोबेल वितरणास जाणे क्षियाओबो यांना अशक्यच होते. कारण ते होते तुरुंगात. मग त्या नोबेल वितरण सोहळ्यात एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली आणि तो सोहळा पार पडला.

या रिकाम्या खुर्चीचा अर्थ ज्याने त्याने आपल्या मनाप्रमाणे लावला असणार. क्षियाओबो आपल्यातच आहेत, असे म्हणत समाधान मानून घेतले असेल काहींनी, तर क्षियाओबोंचे नसणे त्या रिकाम्या खुर्चीने अधिक तीव्रपणे अधोरेखित झाले असेल काहीजणांसाठी.

या सगळ्या गोष्टींची उजळणी आज करण्याचे कारण म्हणजे क्षियाओबो यांची कर्करोगाने ढासळलेली प्रकृती आणि मोठय़ा उदार मनाने चीन सरकारने उपचारांसाठी त्यांना दिलेला पॅरोल. क्षियाओबो यांच्या प्रकृतीबाबत निरनिराळ्या बातम्या येत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार, त्यांची तब्येत खूपच नाजूक आहे; तर काहींच्या मते, ते बरे होऊ  शकतात अशी आशा आहे.

क्षियाओबोंचा इतिहास आणि वर्तमान हे असे आहे. भोवतालच्या विपरीताविरुद्ध लेखकाने लिहायला हवे, बोलायला हवे असे सांगणारे. भोवतालच्या दमनशाहीविरोधात आवाज उठवायला हवा, असा आग्रह धरणारे. पांढऱ्या कागदांवरील काळ्या अक्षरांच्या पल्याडही आयुष्य आहे आणि त्या आयुष्याशीही आपण बांधील असतो, बांधील असायला हवे, हे बजावणारे. चीनची एवढी मोठी अक्राळविक्राळ दमनवादी यंत्रणा. मानवी हक्कवादी, उदारमतवादी, लोकशाहीवादी या कशाचीही पत्रास न बाळगणारी अशी ती यंत्रणा. मात्र तरीही त्या यंत्रणेस एका लिहित्या माणसाच्या विरोधी आवाजाची धास्ती वाटू शकते, हे सिद्ध होतेच यातून. खरे तर कुठलेही हुकूमशहा, कुठलीही हुकूमशाही यंत्रणा ही आतून एका अर्थाने कायम धास्तावलेली असते. सर्वत्र आपलेच आवाज हवे असतात त्यांना. सर्वत्र आपल्याच छब्यांभोवती आरत्या ओवाळून घेणे आवडते त्यांना. विरोधातील एक क्षीणसा आवाजही त्यांना हादरविण्यास पुरेसा असतो. मग सुरू होते ती लढाई.. आणि शहाण्या, जागत्या माणसांसाठी ही लढाई कुठेही उद्भवू शकते. उदाहरण आहे केवळ चीनचे.. पण असे तर कुठेही होऊ  शकते.

शहाण्या, जाणत्या माणसांसाठी ही लढाई यंत्रणेविरुद्धची. ही लढाई दमनशाहीविरुद्धची. ही लढाई झुंडशाहीविरुद्धची. कस लागतो या लढाईत. तिकडे चीनमध्ये लिऊ  क्षियाओबो यांच्या प्राणांचाच कस लागला आहे. इतरत्र तसा तो नेहमी प्राणांचाच लागेल, असे नाही. आतल्या आवाजाचा, पाठीच्या ताठ कण्याचा, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कस लागू शकतो.

अशा वेळी स्मरण होते ते ओस्लो येथील नोबेल सोहळ्यात क्षियाओबो सहभागी होऊ  न शकल्याने रिकाम्याच ठेवण्यात आलेल्या खुर्चीचे. आपल्याला अशी रिकामी खुर्ची बघण्याची सवय नाही. खुर्ची भरण्याचीच आपल्याला घाई. रिकाम्या खुर्चीचे वजन भरलेल्या खुर्चीपेक्षा अधिक असू शकते, हे क्षियाओबोंनी दाखवून दिले. ते तरी आपण मनातल्या मनात तोलून बघू या.

उजेड हवा  आहे मला..

लिऊ शिआ ही क्षियाओबो यांची पत्नी. तीही लिहिती, कवयित्री. क्षियाओबो यांना ११ वर्षांसाठी अटक झाल्यानंतर लिऊ शिआ यांना घरात स्थानबद्ध करण्यात आले. ती नजरकैद आजतागायत कायम आहे. या दरम्यान आत्यंतिक नैराश्यातून त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. त्यांच्या कवितेतील या चार ओळी खूप काही सांगणाऱ्या..

‘माझ्यासाठी भविष्यकाळ म्हणजे

एक कडेकोट बंद खिडकी,

जेथे रात्र अंतहीन

आणि दु:स्वप्न

खुडता न येण्याजोगे..

उजेड हवा आहे मला.. उजेड.’

राजीव काळे – rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2017 1:39 am

Web Title: chinese nobel rights activist liu xiaobo released on medical parole
Next Stories
1 वारी बांधू या..
2 चिनी माती.. मराठी माती
3 इतिहासाचे वर्तमान
Just Now!
X