आदि शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू, सलीम चिश्ती, गुरू नानक, तुलसीदास, रामकृष्ण परमहंस, मीराबाई..

चक्रधर, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, तुकाराम, रामदास, चोखोबा, जनाबाई, गाडगेमहाराज..

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

खूप जण आहेत आणखी. आहेत म्हणजे होते. असे की, ज्यांचा या यादीत समावेश करता येईल. नावांवरून कळेलच, की ही यादी संतांची. पहिल्या ओळीतील नावे ही प्रामुख्याने महाराष्ट्राबाहेरील संतांची. आणि दुसऱ्या ओळीतील नावे महाराष्ट्रातील संतांची. एक महत्त्वाची बाब येथे आवर्जून उल्लेख करावी अशी की, ही यादी परिपूर्ण असल्याचा, सर्वप्रातिनिधिक असल्याचा मुळीच दावा नाही. हा दावा न करण्याचे कारण म्हणजे हल्ली एखाद्याचे नाव घेतले, किंवा याउलटही- एखाद्याचे नाव नाही घेतले, तरी जाज्ज्वल्य अस्मिता उफाळून येण्याचा हा काळ आहे. असल्या अस्मिता उफाळून आल्या की मूळ चर्चेचा विषय राहतो बाजूला आणि वेगळेच काहीतरी धगधगू लागते. त्यात विचार, चर्चा जळून जाते.

ही यादी विविध विचारप्रवाहांतील संतांचे प्रतिनिधित्व करणारी. म्हणजे यातील कुणी संत शून्यवादी, कुणी निवृत्तीवादी, कुणी प्रवृत्तीवादी किंवा कुणी आणखीन वेगळ्या पंथाचे. मात्र, हे जवळपास सारेच संत उत्कट भक्तीच्या मार्गावरून चालणारे. ईश्वरीतत्त्वाची भक्ती हा या मंडळींमधील एक समान दुवा निश्चित सांगता येईल असा. आपल्या महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे तर तुकोबांना आपण साधारणत: निवृत्तीपंथाचे उपासक म्हणून ओळखतो. तर रामदासांना प्रवृत्तीमार्गाची शिकवण देणारे संत म्हणून. आता या दोघांची ही अशी ओळख असली तरी ती काही १०० टक्के खरी नाही. तुकोबांनीही प्रवृत्तीमार्गास जवळचे असे अभंग रचले आहेत आणि रामदासांच्या साहित्यातही निवृत्तीमार्गाच्या खाणाखुणा दिसतातच. आणि हे होणारच. सुखदु:खाच्या पार आपण जावे असे संतांना भले कितीही वाटत असेल, वैचारिक द्वंद्वाच्या पल्याड आपण जावे अशी संतांची भले कितीही इच्छा असेल, तरी निवृत्ती व प्रवृत्ती यामधील झगडा राहणारच ना काही प्रमाणात! मानसिक आंदोलने राहणारच ना काही प्रमाणात! संत म्हणा, ज्ञानी म्हणा.. शेवटी त्यांचे मूळ माणसाचेच ना! माणसापासून ते संतपदापर्यंतचा प्रवास सोपा कसा असू शकेल? केला एखाद्या विषयाचा अभ्यास, दिली परीक्षा आणि मिळवले प्रमाणपत्र- इतके सोपे नसते ना ते. हा प्रवास कठीण आणि वळणघाटांचा. त्यात कधी सौम्य रीतीची, तर कधी जीवघेणी वाटणारी मानसिक आंदोलने सामोरी येणारच. त्याखेरीज उत्तम साहित्य कसे निपजणार?

महाराष्ट्रातील संतांनी समाजाचे भले केले की नाही, हा विचारला जाणारा प्रश्न जुना आहे. त्यावर खूप वादविवाद झडलेले आहेत, लिखाण झाले आहे. त्या प्रश्नाकडे जाणे, हा आजच्या येथील लिखाणाचा हेतू नाही. आणि काहीही असले, संत ढोबळ अर्थाने कुठल्याही पंथाचे, कुठल्याही विचारसरणीचे असले, ते कुठल्याही धर्माचे-पंथाचे असले, वेगवेगळे ईश्वरी तत्त्व मानणारे असले तरी त्यांच्यात एक गोष्ट मात्र समान होतीच होती. ती म्हणजे समाजाच्या भल्याची, व्यक्ती व समष्टीच्या कल्याणाची खरीखुरी कळकळ. ‘बुडतां हे जन न देखवे डोळा’ ही तुकोबारायांची ओळ प्रसिद्धच आहे. तुकोबांनी आपल्या अभंगांतून समाजाला जाचक ठरणाऱ्या गोष्टींवर तीक्ष्ण शब्दांत प्रहार केले आहेत, हे तर सर्वज्ञातच आहे. रामदासांनी ‘आधी प्रपंच करावा नेटका’ असे बजावले. बलोपासनेला महत्त्व दिले. आणि गाडगे महाराजांसाठी तर अध्यात्म म्हणजे समाजकल्याणाची आस असाच अर्थ होता. शिवाय ते हाती झाडू घेऊन रस्ते झाडणारे कृतिशील संत होते. अर्थात सगळ्याच संतांकडे तुकोबारायांच्या वा गाडगे महाराजांच्या धाटणीची दृष्टी नव्हती, हे तितकेच खरे. भोवतालापेक्षा अंतरात जास्त रंगून गेलेले, बुडून गेलेले असे ते लोक होते. बा जगाचे त्यांना भानच नव्हते असे नाही; मात्र त्यांची दृष्टी आत जास्त वळलेली असल्याने ते अधिकत: बघत होते ते आतले जग. त्याशिवाय जातीपातीची व इतरही बंधने असल्याने बोलण्यावर, काही मांडण्यावर, व्यक्त होण्यावर येणारी कमालीची जाचक बंधने होती, ती वेगळीच. या सगळ्या गोष्टी असल्या तरीही या तमाम संतमंडळींच्या शुद्ध हेतूंबाबत शंका घेण्यास तीळमात्रही वाव नाही. या संतमंडळींच्या नावे असलेल्या चमत्काराच्या कथा राहू देत बाजूला, किंवा त्याकडे वेगळ्या, आजच्या नजरेने किंवा मग प्रतीकात्मक रूपाने पाहता येईल. (ज्ञानेश्वरांनी रेडय़ाच्या तोंडून वेद वदवले, किंवा भिंत चालवली- या चमत्कारांपेक्षा त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हा मोठा चमत्कार आहे, असे प्रतिपादन अनेक संत-अभ्यासकांनी केलेले आहे. किंवा तुकोबारायांचे अभंग खऱ्याखुऱ्या नदीच्या प्रवाहाने नव्हे, तर जनांच्या प्रवाहाच्या ताकदीने तारले, असेही प्रतिपादन ठोसपणे केलेले विपुल प्रमाणात आढळते.) आणि ही तमाम संतमंडळी म्हणजे साहित्यिकच ना! त्यांनी धर्मावर, अध्यात्मावरच का लिहिले? तर- आपल्याकडे विज्ञानाचा, उद्योगपर्वाचा उदय होण्याआधीच्या काळात धर्म, देव, आध्यात्मिकता हेच जगण्यातील मुख्य बिंदू होते. तेव्हा त्यांचे लिहिणे हे त्याच बिंदूंभोवती फिरले, यात नवल ते काय? आणि त्यात आक्षेप घेण्यासारखे काय? त्यांच्या लिखाणाकडे बघताना त्यांच्या काळाच्या धर्तीवरच बघायला हवे. आजच्या काळाच्या नव्हे!

आजच्या समासात ही सगळी मांडणी कशासाठी? तर- कालच्या संतांनी जे काही केले ते आजच्या स्वकथित संतांच्या कृतींशी ताडून बघण्यासाठी! कारण संत म्हणजे केवळ साहित्य नाही; तर त्यांच्या कृतीही, त्याचे ऐहिक आयुष्यही. आणि संतच काय, कुठलाही साहित्यिक हा केवळ शब्दांपुरता राहू शकतो का? की त्याचा विचार करताना त्याच्या ऐहिक कृतीही लक्षात घ्यायच्या असतात? तर- काही धाटणीच्या साहित्यामध्ये या कृती, त्याचे जगणे लक्षात घ्यायला लागतेच. ते लक्षात घ्यायलाच हवे. म्हणजे लेखकाने त्याच्या शब्दांशी इमान राखले आहे की नाही, हे पाहणारच ना लोक.. वाचक. आणि ते पाहायलाच हवे. ढोबळ अर्थाने उदाहरण द्यायचे तर ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण..’ असे नाही ना चालत. आजच्या स्वकथित संतांचे आयुष्य, त्यांच्या जगण्याची रीत हे सगळे समोर येते अशा वेळी. सामान्यत: प्रसारमाध्यमांतून या स्वकथित संतांचे जे उद्योग समोर येत आहेत ते काय आहेत? ते उद्योग असे की ते पाहून आपलीच मान शरमेने खाली जावी. किंवा मग त्यांचे ते उद्योग नखशिखांत निखंदून काढण्याची तीव्र इच्छा मनी बळावावी. आदल्या संतांनी ऐसे काही केले नव्हते. त्यांच्या काळात प्रसारमाध्यमे नव्हती. वाऱ्याहाती दिले माप.. हीच केवळ जनांप्रति पोहोचण्याची रीत. तरीही ते जनांपर्यंत पोहोचले. केवळ पोहोचले नाहीत, तर त्या काळातील त्यांचे साहित्य आजही टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे शब्द आणि त्यांची कृती यांत सुसंगती होती. त्यांचे शब्द आणि त्यांचे हात परस्परपूरक होते.

आजचे नेमके उलटे आहे. तुलसीदासांच्या रामायणावर लक्षावधी लोकांसमोर प्रवचने झोडायची, राम हा आदर्शवत कसा होता, तो त्यागमूर्ती कसा होता, हे लोकांना सांगायचे; आणि आपण अलोट संपत्ती भोगत गाद्यागिरद्यांवर लोळायचे. प्रवचनांतून नि:संगाची महती गायची आणि स्वत:ची बँक खाती फुगवत न्यायची. प्रवचनांतून शुद्ध आचारांचे गोडवे गायचे आणि आपण काळा पैसा वाढवत न्यायचा. आचारविचारांची शुद्धता सांगणारी पुस्तके छापायची आणि स्वत: अनैतिकतेच्या चिखलात बरबटून निघायचे. ‘स्त्री ही पवित्र आहे.. मातेसमान आहे’ अशी विधाने करायची आणि आपल्याच आश्रमांतील तरुणींवर बलात्कार करायचे.. असले हे संत. ज्यांच्यामागे ‘संत’ ही उपाधी लावणे, आदल्या संतांशी तुलना करणे हेदेखील महापाप ठरावे अशी यांची कृत्ये. अशा अनेकांतील मोजक्यांना षठीषण्मासी शिक्षा होते, यातच आपण समाधान मानायचे. सर्वशक्तिशाली अशी सरकार नामक यंत्रणा, त्यातील धुरीणच जर या स्वकथित संतांपुढे लीन होणार असतील तर संपलेच सगळे. आणि आपण तरी काय? असल्या भंपक, भडभुंज्या आणि पायताणाने फोडून काढावे अशा लायकीच्या लोकांमागे आपण धावणार, त्यांच्या आरत्या ओवाळणार, त्यांची स्तोत्रे गाणार, त्यांची पुस्तके उराशी कवटाळणार. त्यातील एखाद्या कुणाला शासन झाले की खडबडून जागे होणार आणि काही काळात पुन्हा डोळे मिटून ग्लानीत जाणार.. नवा संत शोधणार.

शब्द आणि हात यांची फारकत घेतलेल्या लोकांना जो समाज डोक्यावर घेतो त्याचे भवितव्य देवाहातीच..!

राजीव काळे  rajiv.kale@expressindia.com