04 December 2020

News Flash

काम्यू आणि मुराकामी

आता जरा अल्बेर काम्यू यांच्याकडे वळू या. काम्यू यांना सन १९५७ मध्ये नोबेल सन्मान मिळाला.

लेखक हारुकी मुराकामी व अल्बेर काम्यू

दोन गोष्टी.

त्यातील एक गोष्ट जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी जे आत्ता आत्ता.. म्हणजे सन २०१७ मध्ये सांगितलं त्याची. दुसरी गोष्ट अल्बेर काम्यू यांनी सन १९५७ मध्ये जे सांगितलं त्याची.

मुराकामी यांना अद्यापि तरी नोबेल सन्मान मिळालेला नाही. काहीजण म्हणतात त्यांना तो मिळणं अंमळ कठीणच वाटतंय म्हणून. काम्यू यांना तो सन १९५७ मध्ये मिळाला.

मुराकामी जे म्हणाले ते आहे चीनमधील नानजिंग नरसंहारासंदर्भात. ही घटना सन १९३७ मधली. शक्तिशाली जपाननं चीनवर स्वारी केली होती. १३ डिसेंबर १९३७ या दिवसापासून ते पुढील जवळपास सहा आठवडे जपानी सैनिकांनी नानजिंगमध्ये नृशंस धुमाकूळ घातला. अतीव रक्तपात झाला. बलात्कार झाले. या सहा आठवडय़ांच्या काळात जवळपास तीन लाख चिनी मारले गेले- असा एक अंदाज. त्याचे पुरावे अर्थातच कुणाच्या हाती लागणार नाहीत याची तजवीज केलीच तेव्हा जपान्यांनी. पण हे एवढे रक्त कुणाला दिसणार नाही असे कसे होणार? तर त्याचा बभ्रा झालाच. आणि होतही राहिला. जपानवर त्यासाठी टीकाही होत राहिली.. आजही होते.

आता वळू या तोशियो मोटोया या गृहस्थांकडे. जपानमधील हे भलंथोरलं, बडं प्रस्थ. देशभरात जवळपास ७० ठिकाणी त्यांची आलिशान हॉटेलं आहेत. ते लेखकही आहेत. प्रकाशकही आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रांत त्यांची वट चालते ते लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे आणि अर्थातच पंतप्रधान शिंझो एब यांचे ते कट्टर समर्थक. ही सगळी पाश्र्वभूमी लक्षात घेतली म्हणजे तोशियो मोटोया हे गृहस्थ राष्ट्रवादी.. नव्हे, कट्टर राष्ट्रवादी असणार, हे ओघानं आलंच.

आता मुराकामी, काम्यू यांच्यात हे मोटोया कुठून आले? तर मध्यंतरी त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं एक. नानजिंगमध्ये जपानी सैनिकांनी अत्याचार केले, बलात्कार केले, तीन लाख जीव घेतले, वगैरे म्हणणे म्हणजे निव्वळ खोटारडेपणा आहे.. असं काही झालेलंच नाही, असं त्यांचं म्हणणं. आणि एवढय़ावरच ते थांबलेले नाहीत. देशभरातील आपल्या हॉटेलांत त्यांनी हे म्हणणं मांडणारं पुस्तक मोठय़ा रुबाबात प्रदर्शनीय जागेत मांडलं आहे.

मुराकामी जे म्हणाले ते याचबद्दल. आपली भूमिका त्यांनी मांडली एका मुलाखतीत. (ते तसे भारंभार मुलाखती देत सुटणारे लेखक नाहीत. फार कमी वेळा ते यात पडतात.)

त्यांनी विरोध केला आहे तो मोटोया यांच्या प्रतिपादनाला. चीनवरील स्वारीसाठी जपानने माफी मागायला हवी, ही त्यांची सर्वज्ञात भूमिका आहे. ती स्वारी हा इतिहास झाला. त्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा आटापिटा मोटोया व त्यांच्यासारख्या असंख्यांचा सातत्याने सुरू असतो. मुराकामी यांनी या मुलाखतीत आक्षेप नोंदवला आहे तो या वृत्तीवर. इतिहास म्हणजे राष्ट्राचा सामूहिक स्मरणसंचय असतो. त्याचं सोयीस्कररीत्या विस्मरण होऊ  देणं, किंवा सोयीस्कररीत्या त्याचं फेरलेखन करणं- या दोन्ही गोष्टी चुकीच्याच, असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

आता जरा अल्बेर काम्यू यांच्याकडे वळू या. काम्यू यांना सन १९५७ मध्ये नोबेल सन्मान मिळाला. तो स्वीकारताना त्यांनी जे भाषण केलं त्याचा अरुण नेरुरकर यांनी केलेला अनुवाद ‘ललित’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालाय. त्यातील हा एक उतारा..

‘याच अर्थाने लेखकाची भूमिका दुष्कर नियतकार्यापासून अलिप्त असू शकत नाही. व्याख्येनुसार जे इतिहास घडवतात, त्यांच्या सेवेत लेखक राहू शकत नाही. त्याने ज्यांना हालअपेष्टा भोगाव्या लागतात, त्यांच्या सेवेत राहायला हवं. अन्यथा तो एकटा पडेल आणि त्याची कला त्याच्यापासून हिरावेल. आणि त्याने एखाद्या जुलूमशहाशी हातमिळवणी केली तरी त्याचं हजारो-लाखोंचं सैन्यबळ त्याची या एकटेपणातून सुटका करू शकणार नाही..’

सन १९५७ मधील काम्यू यांचं भाषण आणि आत्ताची मुराकामी यांची मुलाखत यांत साम्य काय? तर एक सूत्र दिसतंच त्यातून- लेखकानं भूमिका घेण्याची आवश्यकता किंवा अनिवार्यता. आणि लेखकाची बांधीलकी- किंवा नैतिकता म्हणू या त्याला- कशाशी निगडित आहे, हा मुद्दा.

या मुद्दय़ाला जोडूनच एक गोष्ट.. ती अशी की, काम्यू किंवा मुराकामी यांचे प्रतिपादन काय किंवा मग मोटोयो यांच्यासारख्या बलाढय़ उद्योगपतीचे लेखन काय, हे तर निव्वळ आरसेच. किंवा प्रतिबिंबही म्हणू या त्याला. ही प्रतिबिंबं सहज निरखली तरी त्यात आपल्याकडचेही रंग, आकृती यांचे भास आपल्याला होतील, याची खात्रीच.

आणि सगळेच भास खोटे नसतात..

तर मुद्दा भूमिका घेण्याचा.. निदान आपल्यापुरती नैतिकता जपण्याचा. यावर आत्यंतिक टोकाची मतं मांडली जातात आपल्याकडे. एक असं की, लेखक-कवीनं.. एकुणातच कलावंतानं भूमिका घ्यायलाच पाहिजे. किंवा मग- कलावंत मंडळी ही स्वत:च्या विश्वात.. कलानिर्मितीत बुडालेली असतात. त्यांना भवतीच्या जगाचं भान नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून भूमिकेची वगैरे अपेक्षा ठेवता येणार नाही, असंही एक प्रतिपादन. या अशा दोन्ही टोकाच्या बाजू त्याज्यच.

एक तर मोर्चे काढणं, मोर्चामध्ये सहभागी होणं, घोषणा देणं, आपला लेखनबाज सोडून दुसऱ्या प्रकारांत आक्रमक अशा रीतीनं आपलं सांगणं मांडणं, भाषणं देत सुटणं, मुलाखती देत सुटणं, व्यवस्थेविरोधात आपल्या लिहिण्या-बोलण्यातून आग ओकणं अशा कृत्यांभोवतीच आपली भूमिका घेण्याबाबतची संकल्पना गरगरा फिरत असते. म्हणजे लेखक-कवी-कलावंत यांपैकी कुठल्या मार्गानी गेला नाही तर त्याला समाजाशी काहीच देणंघेणं नाही, असा सोपा समज करून घेण्यासाठी इतर सारे मोकळे असतात. आपल्याला ठाऊक असलेल्या गोष्टींबाबत खोटं बोलण्यास नकार देणं व दडपशाहीचा प्रतिकार करणं, या गोष्टी काम्यूनं लेखकाच्या बांधिलकीशी जोडल्या आहेत. पण ही बांधिलकीही त्याला ढोबळ अशी अपेक्षित नसणार. म्हणजेच लेखक-कवी मोर्चात सहभागी झाला नाही तरी चालेल, त्यानं भाषणं दिली नाहीत तरी चालेल, त्यानं व्यवस्थेविरोधात आग ओकली नाही तरी चालेल, पण त्याचा जो मार्ग आहे त्यावर त्यानं सच्चाईनं, निष्ठेनं चालायला हवं. म्हणजे आपल्या अक्षरांवर नको त्या शक्तींची हुकमत चालणार नाही याची खबरदारी त्यानं घ्यायला हवी. आपलाच लेखनबाज कायम ठेवून त्यानं त्यातून दडपशाही म्हणा किंवा अन्य काही- याविरोधात व्यक्त व्हायला हवं. शिवाय बोलणं, लिहिणं व कृती करणं यांत सुसंगती हवीच. व्यवस्थेला सुरुंग लावण्याच्या तोंडी गोष्टी करायच्या आणि त्याच व्यवस्थेच्या वळचणीला राहून तिचे फायदे ओरपायचे, हा दुटप्पीपणा- व त्याहीपेक्षा ढोंगीपणा झाला. तसेच स्वत:च्या बुडाशी जाळ पेटल्यानंतर मग खडबडून जागं होऊन दमनशाही, दडपशाही, सामंतशाही याविरोधात बोलायला लागणं आणि त्या भाषेला उगाचच व्यापक सामाजिक परिप्रेक्ष्य देणं, हाही एका रीतीने स्वार्थीपणाच झाला.

त्याचसोबत- ‘आम्ही कलावंत.. आम्ही आमच्याच मस्तीत राहणार. समाजाशी आम्हाला काही देणंघेणं नाही..’ असं कुणाचं म्हणणं असेल तर त्यानं ते म्हणण्यात काही गैर नाही; पण ही मस्ती, कलंदरपणा त्यानं कायम ठेवायला हवा. व्यवस्थेतील एखाद्या वाईट गोष्टीविरुद्ध बोलायची वेळ आली की कलावंतपणाचा बुरखा ओढून घेत स्वत:ला सुरक्षित करून घ्यायचं आणि त्याच व्यवस्थेतून काही साधायचं झालं की मात्र कलावंतपणाचा बुरखा हळूच दूर सारून जे हवं ते मिळवण्यासाठी हात हळूच पुढे करायचे, हेही वर्तन अस्वीकारार्ह. कलावंतपण राखण्यात, त्यात राहण्यात काही गैर नाही. फक्त मग प्रसंगपरत्वे त्याच्याशी प्रतारणा होता कामा नये.

भूमिका घेणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ती निभावणं ही तर त्याहीपेक्षा कठीण गोष्ट. आणि त्यासाठी जपाननं मारली तशी तीन लाख माणसं मारण्याची वाट बघावी लागते असं नाही. आपल्याही आजूबाजूला असं काही घडत असतंच. ते आपल्याला दिसतंय का.. जाणवतंय का, ते महत्त्वाचं. ते दिसतच नसेल, जाणवतच नसेल, तर प्रश्नच मिटला. द्या सोडून.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:35 am

Web Title: rajiv kale article on albert camus and haruki murakami
Next Stories
1 मराठी ढोलताशे आणि अभिजातता
2 (पैशा)अडक्यावाचून अडते सारे..
3 ब्रिटनचे काय? आपले काय?
Just Now!
X