05 August 2020

News Flash

लेखकाचे दीर्घायुष्य

लेखक-कवींची ही सनावळ आणखी वाट्टेल तेवढी वाढवता येईल. पण आपला हेतू तो नाही.

विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे, बा. सी. मर्ढेकर ,चिं. त्र्यं. खानोलकर

विंदा करंदीकर आज हयात असते तर गेल्या बुधवारी, २३ ऑगस्टला त्यांनी वयाच्या शंभरीत प्रवेश केला असता. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजीचा. मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचा जन्म सन १९१३ मधला. ज्येष्ठ लेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म पेंडसे यांच्यानंतर दहा वर्षांनी झालेला. साल १९२३. विलक्षण प्रतिभेचे कवी पु. शि. रेगे यांचा जन्म तर पेंडसेंच्याही आधीचा. साल १९१०. त्या तुलनेत चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांचे जन्मसाल थोडे अलीकडचे.. १९३०. उर्दू-हिंदीतील ज्येष्ठ लेखक सआदत हसन मंटो यांचा जन्म १९१२ मधला. तर इस्मत चुगताई यांचा १९१५ मधला. आपल्या बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म या सगळ्यांच्या आधीचा.. सन १९०९ मधला. आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मसाल खूपच मागचे.. १८८०. ज्येष्ठ कादंबरीकार प्रेमचंद यांचाही जन्म याच वर्षांतला.

लेखक-कवींची ही सनावळ आणखी वाट्टेल तेवढी वाढवता येईल. पण आपला हेतू तो नाही. वर उल्लेख केलेल्या लेखक-कवींच्या यादीत अमक्याचे नाव नाही, तमक्याचा उल्लेख गाळला आहे, असा आक्षेपही घेऊ  शकतील कुणी. पण वरील यादी ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. त्यात मुद्दामहून कुणाचे नाव समाविष्ट करण्याचा वा कुणाचे नाव गाळण्याचा असा काहीही हेतू नाही.

विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त वृत्तपत्रांच्या पुरवण्यांतून त्यांच्या साहित्यावर लिहून आले, काही पुस्तके नव्याने प्रसिद्ध झाली, जाहीर कार्यक्रम झाले. विंदांची जन्मशताब्दी आहे म्हणून अचानक जाग आल्यासारखे हे झाले असे नव्हे. विंदा हयात असतानाही त्यांच्या साहित्याची चर्चा होतीच; आणि आता ते हयात नसतानाही ती कौतुक, टीका, समीक्षा आदी स्वरूपात होतच आहे. शारीर अस्तित्व न उरलेले विंदा करंदीकर एक लेखक-कवी म्हणून आजही जिवंत आहेत, त्याचे हे लक्षण. आणि केवळ विंदाच काय, वर उल्लेख केलेले सारेच लेखक-कवी आजही त्या अर्थाने जिवंत असलेले. त्यांचे हे असे लेखक-कवी म्हणून असलेले आयुष्य किती असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आज देणे तसे अवघडच. अभिजात, कालजयी, कालातीत वगैरे शब्द जरा धाक दाखवणारे वाटतात. त्यामुळे ते शब्द बाजूला ठेवू या आणि निदान भरपूर आयुष्य असलेले लेखक-कवी अशा दृष्टीने त्यांच्याकडे बघू या. हे आयुष्य अर्थातच त्यांच्या साहित्याचे.

कुठलाही लेखक किंवा कवी जेव्हा काही लिहायला बसतो तेव्हा, चला.. काळाच्या खडकावर खूप काळ टिकून राहील असे काही लिहू या, असे म्हणून लेखनाची सुरुवात करत नसतो. ती त्याची मूळ प्रेरणा नसते. म्हणजे निदान नसावी. व्यक्त होण्याची ऊर्मी, आपल्याला जे वाटते आहे ते सांगण्याची असोशी, प्रश्न उपस्थित करण्याची इच्छा, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर ती मांडण्याची आस, किंवा अगदी प्रसिद्धीची हौसही.. या किंवा अशा असंख्य प्रेरणा त्यामागे असतात. प्रेरणांचे मिश्रणही त्यात असते. लेखनाचा हा व्यवहार, त्यामागील मनोव्यापार तसा खूपच गुंतागुंतीचा. या गुंतागुंतीच्या व्यवहारांतून जे साहित्य उपजते ते किती काळ टिकेल, हे ठरवण्याचे सर्वाधिकार वाचकांकडे. तेच लेखन वाचणार, वाचवणार, टिकवणार. आता टिकाऊ  लेखनाचे म्हणून स्वत:चे असे साचे नाहीत. की बुवा, अमका साहित्यरस इतक्या प्रमाणात घेतला, त्यात अमका रस इतक्या प्रमाणात मिसळला, त्याला ढमक्या साहित्यरसाची जोड दिली की मग ते साहित्य टिकणार असे काही सूत्र नाही. असे हिशेबी लिहिणारेही आहेतच अनेक हुशार लेखक; पण तसे साहित्य टिकाव धरत नाही, हे लक्षात घेण्याजोगे.

मग साहित्य टिकते तरी कुठले? लेखक-कवी अगदी अमर नव्हे, पण दीर्घायुषी होतो तरी कसा?

असे दीर्घायुषी होण्यामागील कारणे अनेक. वाचकप्रियता हे त्यातील ढोबळ असले तरी मुख्य कारण. ही वाचकप्रियता लेखकाला कधी मिळू शकते? त्याचीही उत्तरे अनेक. आणि गंमत म्हणजे लेखक त्याच्या हयातीमध्येच वाचकप्रिय होईल, असे सरसकट छातीठोकपणे मुळीच सांगता येत नाही. हयात सरल्यानंतर एखाद्याला वाचकप्रियता मिळू शकते, किंवा असलेली तुटपुंजी वाचकप्रियता वाढू शकते. पण तत्कालीन आयुष्याची स्पंदने योग्यरीतीने टिपणारे, माणसाच्या जगण्याविषयी बोलणारे, त्यास भिडू पाहणारे, भवतालाबाबत जागे असणारे, व्यापक अर्थाने राजकारणावर नजर ठेवणारे साहित्य टिकून राहते, असा एक सर्वसाधारण निष्कर्ष काढल्यास तो वावगा ठरणार नाही. आपण जे वाचत आहोत त्यात आपले काहीतरी आहे, आपल्याला जे म्हणायचे आहे तेच हे लेखन मांडते आहे, किंवा आपण हे जे वाचतो आहोत ते अचंबित करणारे आहे, आयुष्य.. जगणे असेही असू शकते याची जाणीव या लेखनाने आपल्याला होत आहे असे वाचकाला अगदी मनापासून वाटणे महत्त्वाचे. लेखनाबाबत काही मतभेद असूनही ते वाचावेसे वाटणेही महत्त्वाचे. हे मतभेद विषय, मांडणी, आशय, शब्दरूप, शैली, तात्त्विक मुद्दे अशा अनेक बाबतींत असू शकतात. तरीही वाचकाला ते वाचावेसे वाटत असेल तर ती त्या लेखनाची ताकद. लेखकाची भाषाही महत्त्वाची. भाषा म्हणजे केवळ छापील भाषा असे नव्हे. तो कुठल्या काळाची भाषा वापरतो आहे ती. या सगळ्या गुणांसोबतच लेखनात असे काही हवे, की जे शंभर वर्षांचे राहू देत, पण निदान ४०-५०-६० वर्षांत तरी शिळे होणार नाही. याचाच अर्थ एक तर काळाच्या पलीकडे पाहण्याची नजर हवी, किंवा मग काळाचा परिणामच होणार नाही असे काही लेखनात हवे. या गोष्टी तशा सोप्या नाहीत. म्हणूनच त्या साध्य झाल्या की लेखक-कवी दीर्घायुषी होण्याची शक्यता वाढीस लागते. आताचे आपले भोवताल फार झपाटय़ाने बदलत असते. कालचे आज नाही, आजचे उद्या नाही. पण तरीही माणसाच्या संवेदनांमध्ये एक सातत्य असतेच काही ना काही. जे काल होते, आज आहे व उद्याही असेल. त्याचा वेध घेणे हे लेखकाचे काम.

यातील एक मुद्दा लोकप्रियतेचा. लोकप्रियता आणि दर्जा यांचा परस्परसंबंध लावणे तसे अवघडच. किंबहुना, असा संबंध नसल्याचीच उदाहरणे अनेक. पण म्हणून लोकप्रिय आहे म्हणजे ते दर्जाहीनच असणार, असा समीक्षकी शिक्का मारणेही योग्य नव्हे. लोकप्रियतेविषयी भलतीच अढी असलेले समीक्षक असले शिक्के मारतात अनेकदा. ही अढी अनेक कारणांतून आलेली असू शकते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक आदी विषयांबाबतची मतभिन्नता त्यास कारणीभूत असू शकते. त्यातून साहित्याचे योग्य मूल्यमापन होणे अवघड होऊन बसते. आणि मग असे लेखन टिकून राहिले की उसासे टाकत राहतात समीक्षक. वाचक व समीक्षक यांच्यात अंतराय असण्यामागील एक प्रमुख कारण हे आहे.

आणि समीक्षकांचा मुद्दा बाजूला राहू दे; वाचन टिकून राहते ते वाचकांच्या आवडीमुळे.. त्याहीपेक्षा त्यांच्या शहाणीवेमुळे. त्या शहाणीवेला जवळ जाणारे असे काही लेखनात असेल तर अधिकाधिक पिढय़ा वाचणारच लेखन. आणि कळत-नकळत लेखक-कवीला आशीर्वाद देणार.. दीर्घायुषी भव!

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 3:06 am

Web Title: rajiv kale article on author long life
Next Stories
1 पैशाची भाषा.. पुढे चालू
2 मराठी पैशाची भाषा..
3 हे राम..!
Just Now!
X