आपल्या भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या प्रचंड आहे. देशच इतका अवाढव्य, खंडप्राय.. आणि संस्कृतीही इतक्या भिन्न भिन्न, की भाषांची संख्या प्रचंड असणे ओघाने आलेच. संख्येच्या हिशेबात बोलायचे झाले तर आजमितीस देशभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या साडेसातशेपेक्षाही अधिक. देश कशाला, आपल्या महाराष्ट्रातही कितीतरी बोलीभाषा आहेत. त्यांची लिखित प्रमाणभाषा समान असली तरी बोलीभाषांमध्ये वैविध्य आहेच. या अशा मराठी भाषेचे भवितव्य काय, असा प्रश्न कितीतरी वर्षांपासून विचारला जात आहे. सन १९२६ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनीही तो विचारला होता. ‘मराठी भाषा मुमुर्षू आहे काय?’ या शीर्षकाचा त्यांचा लेख मराठीविषयी, मराठीच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारा होता. सुशिक्षित मराठी माणसे इंग्रजीत शिकतात, पत्रव्यवहार इंग्रजीतून करतात, पुस्तके लिहायची झाली तर इंग्रजीचा आधार घेतात. अशा वेळी मराठी भाषा केवळ घरामध्ये- चार भिंतींआड संभाषणापुरतीच मर्यादित राहील की काय, अशी चिंता त्यांना वाटली होती.

अशी चिंता राजवाडे यांना वाटून जवळपास ९० वर्षे झाली आणि मराठी अजून जिवंत आहे. पण त्याचवेळी ‘मराठी मरते आहे’ अशी चिंता आजही काहीजण व्यक्त करतातच. म्हणजे ९० वर्षांपूर्वी जो प्रश्न होता, तो आजही कायम आहे. याबद्दल खेद व्यक्त करायचा, की राजवाडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर ९० वर्षांनंतरही मराठी मेलेली नाही याचा आनंद व्यक्त करायचा, हा ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग!

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

मराठी भाषेच्या.. खरे तर एकूणातच भाषांच्या अस्तित्वाच्या अनुषंगाने नुकतेच प्रसिद्ध झालेले एक सर्वेक्षण यादृष्टीने विचारात घेण्याजोगे आहे. ज्येष्ठ भाषा-अभ्यासक डॉ. गणेश देवी यांचा सक्रिय सहभाग असलेल्या ‘पीपल्स लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ने भाषाविषयक अभ्यास करून हे नवे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. भारतात आजमितीस बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपकी ४०० भाषा येत्या ५० वर्षांमध्ये लोप पावण्याची भीती आहे, असे हे सर्वेक्षण सांगते. हा मुद्दा खचितच चिंतेचा. त्याच- वेळी मराठीसह हिंदी, बंगाली, तामीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, गुजराती आदी भाषांना मात्र तसा अस्तित्वाचा मोठा धोका नाही, हा सर्वेक्षणातील निष्कर्ष दिलासादायी. या भाषांसमोर इंग्रजीचे आव्हान मोठे आहे हे खरे; मात्र त्यामुळे थेट त्यांच्या अस्तित्वालाच नख लागण्याचा धोका नाही, असे हे सर्वेक्षण सांगते. या भाषांतील चित्रपटसृष्टी, संगीत, शिक्षण, प्रसारमाध्यमे यांचे प्रमाण मोठे आहे, हे या भाषा टिकून राहण्याचे एक प्रमुख कारण. त्याचवेळी गोंडी, भेली, गारो, खासी या बोलीभाषा असलेल्या सुशिक्षितांमध्ये त्यांचा लिखित वापर वाढतो आहे. त्या भाषांतून साहित्य प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या बोलीभाषांचे भवितव्य चांगले दिसत आहे, हा सर्वेक्षणातील निष्कर्ष महत्त्वाचा. त्याचबरोबर ज्या भाषांचे अस्तित्वच लोप पावण्याचा धोका आहे त्यांच्याबाबतची सर्वेक्षणातील माहितीही उद्बोधक आहे.

ज्या भाषांपुढे.. बोलीभाषांपुढे स्वत:चे अस्तित्वच टिकवण्याचे आव्हान आहे त्यातील सर्वाधिक भाषा या किनारपट्टी भागांतील आहेत. या भाषांपुढे असे आव्हान उभे ठाकण्यामागील कारण अत्यंत व्यावहारिक आहे. किनारपट्टीवरील मुख्य वस्ती ही पारंपरिक रीतीने मासेमारी व तत्सम व्यवसाय करणाऱ्यांची. मात्र, अत्याधुनिक तंत्राने मासेमारी करणाऱ्यांच्या रेटय़ाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पोटावर पाय येत असल्याने ही मंडळी व्यवसाय/ नोकरीच्या शोधात किनारपट्टीपासून दूर जात आहेत. परिणामी त्यांच्या भाषेच्या चलनवलनावर विपरीत परिणाम होत आहे, असे निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे.

यातून एक अर्थ आडवळणाने काढता येतो. केवळ साहित्यव्यवहार, केवळ बोलणे यांच्याच आधारावर आपले अस्तित्व टिकवून धरणे, हे कुठल्याही भाषेसाठी कठीण आहे. भाषेच्या व्यवहाराला खऱ्या व्यवहारांचीही जोड आवश्यक. थोडी शब्दांची गंमत करायची तर कुठलीही भाषा टिकून ठेवायची तर ती ‘पशाची’ भाषा व्हायला हवी. पशाची म्हणजे ती पुरातन प्राकृत भाषा नव्हे, तर पशाची म्हणजे खऱ्याखुऱ्या पशांची!

आपापल्या किंवा कुठल्याही भाषेवर प्रेम असणे मान्यच. त्याच भाषेत बोलण्याचा आग्रह धरणेही मान्य. त्याच भाषेत साहित्य लिहिण्याचा आग्रह धरणेही मान्यच. पण भाषा केवळ तेवढय़ाच प्रेमाने जगत नाही, वाढत नाही. जगाच्या पसाऱ्यात, जगण्याच्या पसाऱ्यात त्या प्रेमाला व्यवहाराचेही अधिष्ठान हवे. म्हणजे काय? तर ती भाषा येत असल्याचा फायदा नोकरी-व्यवसायात, पोट भरण्यासाठी व्हायला हवा. भाषेवर निरपेक्ष प्रेम हवे, ही बाब खरीच. पण या भावनेस स्पर्श झाला आहे भाबडेपणाचा. हा भाबडेपणा पूर्वीही उपयोगी नव्हता, आणि आता तर मुळीच नाही. जगाचे अनेक अर्थानी सपाटीकरण होत असताना.. झाले असताना स्वत:ची भाषा टिकवून ठेवण्याची लढाई लढणे खूप कठीण आहे. एखाद्या भाषेचा अभ्यास करून, त्यात पांडित्य मिळवून बौद्धिक व मानसिक आनंद मिळतोच यात शंका नाही. हा आनंद अगदी अस्सल व उच्च प्रतीचा असतो यातही शंका नाही. पण केवळ आनंदाने पोट भरत नाही. शिकणाऱ्यांचे पोट भरण्याची तजवीज करण्याची ताकद भाषेत असेल तर ती भाषा नक्कीच टिकेल आणि वाढेल.

त्याचसोबत भाषेने काळाच्या सोबतीने जायलाच हवे. काळाच्या सोबत जाणे म्हणजे फरफटतच जायला लागते असे नव्हे. आपले स्वत्व राखूनही काळासोबत जाता येऊ शकतेच की! काळासोबत जाताना माणसांसोबतही राहायला हवे. भाषेने माणसांशी फटकून वागून चालत नाही. माणसाचा हात धरूनच, प्रसंगी त्याच्याशी गोड बोलत, प्रसंगी फटकारत चालायला हवे.

या धबडग्यात भाषेला व्यावहारिक अधिष्ठान देण्याचे काम करायचे कुणी? भाषा तर बिचारी निर्गुण-निराकार. ती स्वत: काही करू शकत नाही. मग ती भाषा बोलणाऱ्या, तिच्यावर प्रेम करणाऱ्या, ती वाढावी अशी प्रामाणिक इच्छा असलेल्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती भाषा बोलणाऱ्या मंडळींच्या हाती सत्तेची सूत्रे असतील तर ती सूत्रे वापरून भाषेचे, भाषा बोलणाऱ्यांचे भले होईल अशी पावले त्यांनी टाकायला हवीत. भाषेच्या नावावर मते मागण्यापेक्षा, भाषेच्या नावावर सत्ता चालवण्यापेक्षा हे काम कठीण. कारण त्यात भावनेपेक्षा बुद्धीचा, कल्पकतेचा वापर अधिक गरजेचा. तो करण्यात एकूणातच आळशीपणा काठोकाठ भरलेला. ही वृत्ती सोडली तरच खऱ्या अर्थाने भाषेचे भले होणार, ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधलेली बरी.

ज्या भाषांमधील मंडळींनी हे केले नाही त्यांच्या भाषेचे काय झाले? त्यांची भाषा विस्तारणे सोडाच, उलट ती आक्रसत गेली. त्यात आपल्याकडे जाती-उपजातींचा, धर्माचा, पंथांचा बडिवार मोठा. अमकी भाषा अमक्याच धर्मासाठी. तमकी भाषा तमक्याच जातींसाठी. ही भाषा अमक्यांनी बोलणे निषिद्ध.. वगरे बंधने चिक्कार. भाषिक लोकशाहीला त्यात किंचितही स्थान नाही. त्याने काय झाले? भाषांनी पूर्णपणे मान नसेल टाकली कदाचित; पण त्या उरल्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्याजोग्या. काही नमित्तिके त्या भाषांच्या आधारे उरकली की पितर स्वर्गाला पोहोचले, अशी आपली भावना. मग त्या भाषांचे झटपट कोर्स घेणे, डोळ्यांमध्ये करुण भाव आणून त्यांची महती सांगणे किंवा मग छाती फुगवून तिचा पोकळ अभिमान बाळगणे, अर्थ कळत नसतानाही त्यांतील सुवचने पाठ करून समोरच्याच्या तोंडावर फेकणे, त्यातील साहित्याचा तोंडपाठ दाखला देणे- असले चिरकुट उद्योग आपण करीत बसलो आणि आजही करतो. त्यातच आपली सांस्कृतिक मिरासदारी मिरवतो. उद्याच्या पिढीलाही याचे बाळकडू देतच आहोत आपण आंधळेपणाने.

या असल्या निव्वळ पोपटपंचीने ना त्या भाषांचे काही भले होईल, ना आपले. मिळेल ते निव्वळ कृतक मानसिक समाधान. असल्या समाधानावर आयुष्य काढता येत नाही. ना आपल्याला, ना भाषेला..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com