05 August 2020

News Flash

पैशाची भाषा.. पुढे चालू

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही प्रकाशन व्यवसायातील एक मातब्बर प्रकाशन संस्था.

कुठलीही भाषा अस्तित्वात राहण्याची कारणे कुठली, याबाबत गेल्या रविवारी बोललो होतोच आपण. कुठलीही भाषा निव्वळ भावनांवर, प्रेमावर, आस्थेवर जगू शकत नाही. जोवर ती भाषा व्यावहारिक उपयुक्तता अंगी बाणवत नाही, पोट भरण्याचे साधन उपलब्ध करून देत नाही, तोवर तिच्या टिकण्याच्या शक्यता आक्रसत जातात, याचा ऊहापोह केला होताच गेल्या रविवारी. त्या पाश्र्वभूमीवर आलेल्या दोन बातम्या लक्ष देण्याजोग्या. वरवर पाहता कदाचित त्यात विरोधाभास दिसू शकतो; पण नीट पाहिल्यास त्यात आंतरिक सुसंगती आहे, हे कळेलच.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही प्रकाशन व्यवसायातील एक मातब्बर प्रकाशन संस्था. ऑक्सफर्ड विद्यापीठाची ती प्रकाशन शाखा. आपल्या भारतातही ती कार्यरत आहे. या संस्थेचे मुख्य काम म्हणजे बिगर-ललित पुस्तकांचे प्रकाशन. ही पुस्तके प्रामुख्याने शैक्षणिक व संशोधनात्मक. विद्यार्थ्यांना, अभ्यासू मंडळींना, संशोधन-अभ्यास करणाऱ्यांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना या प्रकाशन संस्थेची पुस्तके खूपच उपयुक्त. ही प्रकाशन संस्था आपल्या देशातील प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांचा जोर वाढवणार आहे. या संस्थेचे म्हणणे असे की, उपरोल्लेखित विषयांवर उत्तमोत्तम पुस्तके इंग्रजीत खंडीभर आहेत. मात्र, प्रादेशिक भाषांमध्ये तुलनेने ती कमी आहेत. त्यामुळे इंग्रजीतील पुस्तके भाषांतरित करून ती प्रादेशिक भाषांमध्ये आणली जातील. महत्त्वाचे म्हणजे पाश्चात्त्य देशांतील पुस्तके  आपल्याकडील प्रादेशिक भाषांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आणण्याचा संस्थेचा मानस आहे. अशा पुस्तकांचा ग्राहकही मोठा आहे, हे संस्थेचे म्हणणे. ते खरेच आहे. परीक्षांसाठी उपयुक्त असलेली ही पुस्तके उपयुक्ततावादी तर आहेतच; पण गंभीर संशोधनात्मक पुस्तकांची संख्याही इंग्रजीत खूप मोठी आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये त्याला मागणीही असते चांगली. आपल्याकडे अशा संशोधमात्मक, गंभीर पुस्तकांचा वाचक खूपच मर्यादित. यात दोष केवळ वाचकांचा आहे असे नाही. आपल्याकडील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आणि अगदी कौटुंबिक भवताल त्यास कारणीभूत आहे. ११ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात हजार पुस्तकांची आवृत्ती तीन-चार वर्षांत संपली तरी पेढे वाटावेत अशी अवस्था असते. ते असो. तर वर उल्लेख केलेल्या दोन बातम्यांमधील ही पहिली बातमी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची.

दुसरी बातमी- साहित्य अकादमी पुरस्कार- विजेत्यांच्या मनोगताची!

चंदन कुमार झा हा सन २०१७ मधील साहित्य अकादमी युवा पुरस्काराचा मानकरी. त्याची भाषा मैथिली. ज्यांच्याकडून पुढील काळात उत्तमोत्तम कवितांची अपेक्षा करता येईल असा हा एक कवी. ‘धरतीस आकाश धैर’ या त्याच्या काव्यसंग्रहाला सन २०१७ मधील साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला. अशा या साहित्यिकाचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? तर तो कोलकात्यातील एका खासगी विमा कंपनीत नोकरी करतो. ‘‘कविता म्हणजे माझ्या अगदी हृदयाच्या निकटचा प्रकार आहे हे खरे; मात्र केवळ कवितांवर, लिखाणावर जगता येत नाही आपल्याकडे. विशेषत: प्रादेशिक भाषांमधील लेखक-कवींना तर तसा विचारही करता येत नाही..’’ – इति चंदन कुमार झा.

ओडियाभाषक कवी सूर्यस्नत त्रिपथी हादेखील साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराचा विजेता. त्याच्या ‘ई संपर्क ईमिती’ या पुस्तकावर साहित्य अकादमीची गौरवाची मोहोर उमटलेली. हैदराबाद आयआयटीमध्ये तो मायक्रो इलेक्ट्रॉनिक विषयात पीएच. डी. करतो आहे. त्याचेही म्हणणे झा याच्यासारखेच. ‘‘प्रादेशिक भाषांमध्ये लिखाण करून पैसा नाही मिळत. त्यातही कवितांच्या आधारे पोट भरणे वगैरे तर सोडूनच द्या. प्रादेशिक भाषांतील बिननाववाल्या कवींची पुस्तके काढण्यात प्रकाशकांना काडीचाही रस नसतो. त्यामुळे मुळात त्यासाठी प्रकाशक मिळणे अवघड. आणि त्यापुढे ती पुस्तके खपणे आणखीन अवघड- अशी स्थिती आहे..’’ – इति सूर्यस्नत त्रिपथी.

‘‘मी माझ्या कवितासंग्रहासाठी नामवंत प्रकाशकाकडे गेलो होतो, पण त्याने नकार दिला पुस्तक काढायला. मग काय करणार? मित्राची मदत घेतली आणि मीच माझा काव्यसंग्रह काढला. दुकानदारांकडे जाऊन तो विक्रीसाठी ठेवण्याची विनंती केली..’’ हा अनुभ पंजाबी कवी हरमनजीतचा. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या या काव्यसंग्रहालाही साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. ‘‘मला आधी वाटले होते की कवितांवर, लिखाणावर जगता येईल म्हणून. पण नाही होत तसे. पोटापाण्यासाठी काहीतरी दुसरा उद्योग करावाच लागतो..’’ – इति हरमनजीत.

या दोन बातम्यांचा- म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची पहिली बातमी आणि दुसरी बातमी या साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेत्यांच्या मनोगताची- मेळ कसा घालायचा? ऑक्सफर्डने एकीकडे प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके आणण्याचा आराखडा तयार केला आहे, आणि दुसरीकडे आपले प्रादेशिक भाषांतील कवी म्हणत आहेत की, ‘‘छे.. प्रादेशिक भाषांमध्ये लिहून हाती पैसा लागणे ही दुष्प्राप्य गोष्ट आहे. लेखनात पैसा नाही असे नाही, पण तो आहे इंग्रजी वा हिंदी लिखाणात.’’

तर या दोन गोष्टींमधील भेद अगदी स्पष्टच आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जी पुस्तके काढत आहे, काढणार आहे, ती ललित स्वरूपाची नाहीत. ती आहेत मुख्यत्वे उपयुक्ततेची. आणि ती तशी असणारच. आणि केवळ उपयुक्ततेचीच असे नव्हे, तर वैचारिक लिखाणाचीही. त्यास वाचकांचा प्रतिसाद मिळणे ही चांगलीच आणि स्वागतार्ह गोष्ट.

पण प्रादेशिक भाषांमध्ये ललित साहित्याची मागणी घटते आहे, हे त्यासमोर उभे असलेले वास्तव. ते नाकारून कसे चालेल?

ललित साहित्याची- त्यात अर्थातच कविता आल्या- पुस्तके तर वारेमाप निघत असतात. वर्तमानपत्रांमध्ये पुस्तकांच्या प्रकाशनाच्या बातम्याही प्रसिद्ध होत असतात सातत्याने. मग तरीही ललित साहित्याची मागणी घटते आहे, हे कसे? की हे म्हणणे खोटे आहे? तर हे म्हणणे खोटे अजिबातच नाही. प्रादेशिक भाषांमध्ये.. आपल्या मराठीतही पुस्तके प्रकाशित होण्याचा वेग बुचकळ्यात टाकणारा आहे, हे खरे. मात्र, वेग आणि दर्जा यांचा निकटचा संबंध असतोच असे नव्हे. आणि तो संबंध फारसा नाहीच, असे मराठीबाबत निदान आत्ता तरी दिसते. पुस्तकांची अचाट संख्या हे प्रकाशन व्यवसायाला आलेले बाळसे नाही; ती सूज आहे. दर्जाचा फारसा विचार न करता निव्वळ हौस, पैसा, इतर काही हेतू यामुळे ती आलेली आहे. पण याचा अर्थ दर्जा आहे म्हणून पुस्तके खपतील, असाही करता येत नाही. तिथेही पंचाईत आहेच.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यास अनेक गोष्टींचा भवताल कारणीभूत आहे. तो बदलेल का? खरे सांगायचे तर आत्ताच्या स्थितीत तरी वाटत नाही तसे. म्हणजेच ललित साहित्याची, काव्यसंग्रहांची मागणी कमीच राहणार का? तर हो.. कमीच राहणार. आणि कदाचित आणखी कमी होत जाणार. त्यास काही अपवाद असणार. पण ते अपवादच. एरवी मराठी काय, किंवा इतर कुठलीही प्रादेशिक भाषा काय, ललित साहित्याच्या अंगाने ती पैशाची भाषा होणे महाकठीण.

परदेशातील इंग्रजी भाषेतील लेखक लेखनावरच कसा रग्गड पैसा कमावतात.. बंगले बांधतात.. जगभर फिरतात.. अशा बातम्या आपण फक्त ऐकायच्या, वाचायच्या आणि सोडून द्यायच्या.

आपले लेखक बिनपैशाचेच..!!!

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 3:54 am

Web Title: rajiv kale article on oxford university press in india
Next Stories
1 मराठी पैशाची भाषा..
2 हे राम..!
3 .. शब्दांआडचे काही..
Just Now!
X