मराठी साहित्यविश्वातील वर्तमान स्थिती-गतीची, घटना-घडामोडींची आस्थेने अन् आस्वादक चिकित्सा करणारे सदर..

आपण काय वाचतो? काही सांगतील- रुचेल ते. काही सांगतील- पटेल ते. काही सांगतील- उमजेल ते. काही सांगतील- कुणी सुचवतात ते. कुणी सांगतील- दिसेल ते. यातील ‘दिसेल ते’ वाचणाऱ्यांची संख्या कमीच असणार. अल्पसंख्यच की! खरं तर दिसलं अक्षर की टाक वाचून, असं कुणाचं काही असणं म्हणजे अजबच गोष्ट. म्हणजे वाचणाऱ्याचा स्वत:चा असा काही आवड-निवडधर्म असतो. प्रचीतीधर्म असतो. त्याची स्वत:ची अशी अनुभवसंलग्नता असते. त्यामुळेच समोर आलेल्या अक्षरांचे नमन काय सांगते याचा अदमास घेऊनच वाचक पुढे जायचं की नाही हे ठरवतो. हे तर अगदी स्वाभाविकच झालं. पण मुळात आपल्यासमोर कुठली अक्षरं येतील, हे ठरवतो कोण? तर बहुतांश वेळा वाचणाराच. म्हणजे व. पु. काळे वाचणारा कुणी जी. ए. कुलकर्णी आपल्यासमोर आणणं थोडं अवघड. पु. ल. देशपांडे वाचणारा कुणी विलास सारंग आपल्यासमोर आणणं थोडंसं अवघड. प्रकाश नारायण संत वाचणारा कुणी प्रणव सखदेव यांचे पुस्तक वाचनाला घेईलच याची खात्री नाही. शांता शेळके ज्याला आवडतात त्यानं प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरीला हात घालणंही अवघडच. रुचणं- न रुचणं ही गोष्ट पुढची झाली. मुळात महत्त्वाची गोष्ट- आपल्या आवडीनिवडीच्या पलीकडे असलेल्या प्रवाहांमध्ये बुडी नाही मारली, तरी निदान त्यांचा अदमास घेणं, ही. इथे मुद्दा मुळात- अदमास न घेण्याच्या प्रवृत्तीचा आहे. काय होतं असा अदमास घेऊन?

आपल्या मराठी साहित्यात काय नवं चाललंय याची कल्पना येतेच; आणि सोबत आपल्या वाचनाची उंची, खोली आणि पैस किती आहे, याचीही कल्पना येते स्वत:ची स्वत:ला. पुस्तकं हा त्यासाठीचा एकदम थेट उपाय. आणि त्या पुस्तकांपर्यंत जाण्याचा एक हमखास मार्ग म्हणजे आपल्या मराठीत निघणारी नियतकालिकं वा अनियतकालिकं. काही नियतकालिकं ही नियमितपणे अनियमित असतात, असा विनोद केला जातो. या विनोदावर मनमोकळं हसून झाल्यावर वरच्या मार्गाचा धांडोळा घेण्यात काही हरकत नसावी..

आपल्या मराठीतील नियत/अनियतकालिकांची परंपरा तशी फार जुनी. मासिकांबाबत बोलायचं तर ती पार अगदी १८४० पर्यंत जाऊन भिडते. त्या वर्षी प्रसिद्ध झालेले ‘दिग्दर्शन’ हे मासिक मराठीतील पहिलं मासिक बहुमतानं मानलं जातं. ती झाली खूपच जुनी गोष्ट.. तरीही आजही सुरू असणारी. ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’ असो, ‘कोनटिकी’, ‘येरू’, ‘विद्रोह’, ‘छंद’.. अशा अनेकांचा काळ हा साधारण १९५०-६० चा. हा काळ यात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याची- भली वा बुरी- मोठी दखल घेण्याचा. ती दखल इतकी मोठी होती, की त्याच्या रेंगाळलेल्या सावल्या आजही अनेकदा दृष्टीस पडतात. त्या सावल्या बाजूला ठेवल्या तर आजच्या मराठी साहित्यविश्वात नियत/अनियतकालिकांच्या आघाडीवर काय चित्र दिसतं? यादीच करायला घेतली तर ती चांगलीच मोठी. सतीश काळसेकरांचं ‘आपले वाङ्मय वृत्त’, मंगेश काळे यांचं ‘खेळ’, नितीन रिंढे यांचं ‘नव-अनुष्टुभ’, यशोधन पाटील यांचं ‘मुक्त शब्द’, प्रवीण बांदेकर यांचं ‘नवाक्षर दर्शन’, विष्णू जोशी यांचं ‘काव्याग्रह’, सुखदेव ढाकणे यांचं ‘सर्वधारा’, दा. गो. काळे यांचं ‘अतिरिक्त’, आसाराम लोमटे यांचं ‘प्रतिष्ठान’, रमेश इंगळे उत्रादकर यांचं ‘ऐवजी’, माधुरी राऊत यांचं ‘साक्षात’, कोठावळे यांचं ‘ललित’.. शिवाय आणखीही अनेक.

काय करतात ही नियत/अनियतकालिकं? काय असतात त्यांचे हेतू? कोण वाचतं ती?

ही नियत/अनियतकालिकं म्हणजे काही किरकोळ अपवाद वगळल्यास पृष्ठसंख्येच्या दृष्टीनं तसा बेताबेताचाच मामला. ३००-४०० पानी दिवाळी अंकांच्या दृष्टीने तर त्यांचं वजन खूपच कमी. त्यांच्यात साधारणत: प्रतिबिंबित होतात ते साहित्यातील नवे प्रवाह. केवळ आपल्या मराठीतलेच नव्हे, तर अनुवादित स्वरूपात आपल्या देशातील भाषांतले, तसेच इंग्रजी वा इतर परदेशी भाषांतलेदेखील. हे प्रवाह नवे काही सांगू पाहणारे, वर्तमानाच्या डोळ्यांना ताजी नजर भिडवणारे, नवे काही ऐकून, पाहून त्याची माहिती देण्याची असोशी बाळगणारे.

हे प्रवाह प्रामुख्याने पोहोचतात ते अर्थातच त्यांची आधीच ओळख असलेल्या, त्यांची माहिती असलेल्या मंडळींपर्यंत. मग ती मंडळी आपापल्या स्वभावानुसार इतरांना त्याबाबत सांगणार. त्यातून या प्रवाहांचा वाव मिळेल तेवढा प्रसार होणार. त्यासोबत नव्या लेखकांना, कवींना व्यासपीठ देणार ही नियत/अनियतकालिकं. आता- वर विचारलेल्या प्रश्नांना जोडून एक खूपच महत्त्वाचा प्रश्न : ही नियत/अनियतकालिकं चालतात कशी? त्याचे सर्वसाधारण मार्ग तीन. सरकारी अनुदान, जाहिराती आणि वर्गणी. यातील सरकारी अनुदान हे तसे खूपच मर्यादित. जाहिरातींचे वजनही मर्यादित. आणि वर्गणी.. तर तीही मिळाली- नाही मिळाली अशीच. म्हणजे एकूण मामला (इथे खरोखरीच्या गांभीर्याने नियत/अनियतकालिकं काढण्याचा प्रयत्न करणारे लोकच गृहीत धरले आहेत.) तसा आतबट्टय़ाचाच.

बुद्धी-मन-सृजनशीलता यांच्या व्यक्त होण्यासाठी चाललेल्या चळवळ्या धडपडीला वाव देणारा हा एक मार्ग. अशक्त आर्थिक बळामुळे तो मार्ग फारसा प्रशस्त, रुंद नाही. तरीही अनेक मंडळी कसरती करीत तो चालत आली.. आजही चालत आहेत. आता समजा, मराठीतील तमाम नियत/अनियतकालिकांतील एकही पुढल्या महिन्यात प्रसिद्ध नाही झालं तर काही बिघडणार आहे का मराठी साहित्यविश्वाचं? पुस्तकं निघायची तशी निघतीलच, ती खपायची तशी खपतीलच.. तरीही काहीतरी बिघडेलच.

साहित्यात काय चाललंय, हे समाजमाध्यमं, वाहिन्या, वृत्तपत्रांतील लिखाण, जाहिराती यांतून कळतंच लोकांना. पण तरीही ते कळणं अधिक खोल, समंजस, अधिक व्याप्तीचं होण्यासाठी नियत/अनियतकालिकांना पर्याय नाहीच. संख्येच्या दृष्टीनं वाचक वाढावा, तसेच तो आंतरिकदृष्टय़ाही वाढावा, त्याची मर्मदृष्टी वाढावी, या प्रयत्नांत नियत/अनियतकालिकांनी बजावलेला वाटा मोठा. त्यामुळेच त्यांची आर्थिक अंगानं तोळामासा प्रकृती असणं व एके दिवशी त्यांनी त्यातच मान टाकणं हितावह नाही. त्यांची तोळामासा प्रकृती सुधारण्याची भरभक्कम शक्यता खुली करून देण्याची ताकद कुणाचीय? आपली. आपली म्हणजे तमाम वाचकांची. ती कशी?

या नियत/अनियतकालिकांतील अनेकांची वार्षिक वर्गणीही किरकोळ म्हणावी अशी. वर्षांला ३००-४०० रुपये ही वर्गणी किरकोळ नाही तर अन्य कुठल्या रकान्यात बसवणार? महिन्याला किमान चार-पाचशे रुपयांची पुस्तकं खरेदी करणारे कितीतरी मराठी वाचक आज मिळतील. त्यांच्या खिशाच्या दृष्टीने वर्षांला ३००-४०० रुपये रक्कम खर्ची घालणे अगदी सहजच परवडणारं. याला उगाच कर्तव्याचं भाबडं लेबल नको डकवू या. म्हणजे मराठीचे पांग फेडतो, वगैरे भाबडी, उदात्त भावना नको उगाच.

आपण समृद्ध होणं, आपण आपला विकास घडवणं, आपल्या बुद्धीचा, संवेदनशीलतेचा परीघ विस्तारणं ही आपली गरज आहे ना (खरोखर वाटतेय ना तशी गरज?), तर त्यासाठीची किंमत आपण मोजायला हवी- असं थेट गणित आहे ते. जबाबदारी म्हणू या आपण त्याला. तर ती पार पाडायला हवी आपण. तितकीशी कठीण नाहीये ती.

ती पार पाडली तर फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. वर्तमानात आणि भविष्यातही.

हे झालं आपल्या.. वाचकांच्या जबाबदारीबद्दल.

अशीच जबाबदारी त्यांच्यावरही आहेच.

ते कोण? त्यांच्यावर जबाबदारी कुठली?

तर त्याबद्दल पुढे..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com