चेतन भगत हे आजचे लोकप्रिय लेखक. लोकप्रिय म्हणजे ज्यांच्या पुस्तकांचा खप प्रचंड प्रमाणात आहे असे.. इतकी साधी-सोपी व्याख्या करून हा शब्द वापरलेला. भगत यांच्या पुस्तकांच्या खपाचे आकडे निदान मराठी वाचकांना अचंब्यात टाकणारे ठरतात. जेथे हजारभर पुस्तकांची आवृत्ती खपायला वष्रे जावी लागतात, अशी आकडेमोड ज्यांच्या मनात असते तेथे एका वर्षांत ५० लाख पुस्तके खपली, ७० लाख पुस्तके खपली, असले आकडे अचंबित करणारच.

भगत यांचे लिखाण कसे? तर काळाला धरून जाणारे. काळाची सोपी भाषा बोलणारे. ज्यावर चित्रपट निघावेत; आणि तेही चांगल्या प्रकारे चालावेत- असे त्यांचे लिखाण. लोकांना आवडेल अशा रीतीने लिहिणारे ते लेखक. मात्र, लोकप्रिय असलेले चेतन भगत हे काही त्या अर्थाने तत्त्वज्ञ, सखोल चिंतनात्मक, मूलगामी लिखाण करणारे लेखक नव्हेत. त्यांच्या लिखाणाला काही अंगभूत मर्यादा आहेत.

अशा या चेतन भगत यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. हे वक्तव्य एकंदर वाचकांबद्दलचे. चेतन भगत यांचे लिखाण मूलगामी पद्धतीचे नसले तरी त्यांनी केलेले विधान हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोण बोलले, यापेक्षा काय बोलले, या न्यायाने त्यावर विचार करायला हरकत नाही.

काय म्हणाले चेतन भगत? तर त्यांनी आक्षेप घेतला तो भारतीय मानसिकतेत खोल रुजलेल्या जातप्रथेबद्दल. प्रत्येक गोष्टीभोवती जातीय परीघ आखणे, प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देणे भारतीयांना आवडते, हे त्यांचे म्हणणे. आता भगत हे एकदम जातव्यवस्थेवर का घसरले? तर- ते ज्या जातव्यवस्थेवर घसरले ती जातव्यवस्था म्हणजे रूढार्थाने चातुर्वण्र्याची नव्हे, तर वाचकांमधील जातव्यवस्था! जातव्यवस्था म्हणण्यापेक्षा त्यास ‘वर्गीकरण व्यवस्था’ म्हणणे अधिक योग्य ठरू शकेल. साहित्याकडे पाहण्याच्या वाचकांच्या दृष्टिकोनावर हे वर्गीकरण ठरणारे. उदाहरणार्थ, एखादा लेखक खूप लोकप्रिय आहे तर त्याचे लिखाण तितकेसे चांगले नसणार, कमअस्सल असणार, असे वाचकांतील एक वर्ग गृहीतच धरून चालणार आणि त्यावर तसा शिक्का मारणार. हा वर्ग वाचकांच्या वर्गव्यवस्थेत, उतरंडीत वरच्या फळीवरचा. आम्हाला सगळे काही कळते, आमची अभिरूची अत्यंत वरच्या दर्जाची आहे, अशा तोऱ्यात नाक वर करून चालणारा आणि खालच्या फळीतील लिखाण व त्या खालच्या फळीतील वाचकांकडेही तुच्छतापूर्ण दृष्टीने पाहणारा..

हे निरीक्षण व मत चेतन भगत यांचे. भगत हे लोकप्रिय लेखक असल्याने ते असा पवित्रा घेणारच, इतकेच म्हणून त्यांच्या म्हणण्याची वासलात नाही लावता येणार. त्यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहेच. वाचक आणि समीक्षक या दोन्ही घटकांचे निरीक्षण केले तर वरील बाब ध्यानात येतेच. ‘लोकप्रिय ते खालच्या दर्जाचे’ अशी खूणगाठच अनेकांनी मनाशी बांधून ठेवलेली. त्यामुळे लोकप्रिय पुस्तक हाती घेण्याचीही तसदी अनेक वाचक घेत नाहीत. आणि समीक्षकांचेही वर्तन साधारणत: तसेच. मनात पूर्वग्रह असले, दृष्टीत खुलेपणा नसला की हे असेच होणार. वाचून, पारखून मत तयार करणे वेगळे, आणि आधीच मत तयार करून वाचणे, पारखणे वेगळे.

याच मुद्दय़ाची दुसरी बाजू तर विलक्षणच. म्हणजे ज्या लेखक-कवीची लोकांना फारशी ओळख नाही, जे साहित्य लोकांना फारसे माहिती नाही, ते साहित्य उच्च दर्जाचे असणारच, असे जणू गृहितकच काहीजणांनी मनाशी पक्के केलेले. यात प्रामुख्याने समावेश प्राध्यापकी, विद्यापीठीय, पुस्तकी समीक्षकांचा. या अशा गृहितकामागेही वर्गीय उच्चभ्रूपणा ओतप्रोत भरलेला. आणि त्याच्या सोबतीला वाचकांच्या लेखन जोखण्याच्या क्षमतेबद्दल उसासे सोडणे, ‘बघा हो बघा, वाचकांची अभिरुची कशी हीन पातळीवर पोहोचते आहे..’ असे म्हणत अश्रू ढाळणे आले. त्यामागील हताशा नेहमीच खोटी असते असे नव्हे; मात्र या अशा उसासे सोडण्यामागून, अश्रू ढाळण्यामागून कधी हलक्या प्रतीच्या साहित्यालाही विनाकारण चढाव देण्याचा प्रयत्न होतो. कधी आपल्या गोतावळ्यातील सहभागींच्या साहित्याला नको इतके वर दाखवण्याचा प्रयत्न होतो. या बाबी नि:संशय निषेधार्ह.

या दोन्ही प्रकारांमध्ये नुकसान कुणाचे? कुठलाही चष्मा डोळ्यांवर चढवून लेखन वाचण्याआधीच नाकारणे, यात नुकसान कुणाचे? तर- नि:संशय वाचकाचे. साहित्य वाचल्यानंतर ते आवडणे, नावडणे या गोष्टी येणारच. त्या गोष्टी पूर्णत: वैयक्तिक. त्यात कुणी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नाही. पण त्यासाठी खुलेपणे वाचण्याचे स्वातंत्र्य तरी वाचकाला द्यायला हवे ना! खरे तर हे स्वातंत्र्य वाचकाला देणारे कोण? ते वाचकानेच १०० टक्के घ्यायला हवे. कुठलाही दबाव न मानता.

हे सगळे झालेच. पण त्याचवेळी या वरच्या, खालच्या फळ्यांच्या वादात वरच्या फळ्यांविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्यांनीही काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्यात. लोकप्रिय ते हिणकसच असणार, अशा गृहितकाचे झापड डोळ्यावर बांधणे जेवढे अयोग्य, तेवढेच लोकप्रिय साहित्याला वरच्या फळीने मान्यता दिलीच पाहिजे, असा आक्रमक आग्रह धरणेही तेवढेच चुकीचे. आवडनिवड, साहित्यातील घटकांविषयी असलेल्या लगावाची वेगवेगळी रीत, अनुभूती घेण्याची वेगवेगळी पद्धत या गोष्टी तर आहेतच. त्यापुढील एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती वरच्या फळीच्या मान्यतेची मनोमन असलेली, मात्र उघडपणे न दाखवता येणारी आस. तुम्ही लोकप्रिय ठरू शकणारे साहित्य लिहिताय ना? आपल्या पुस्तकाचा उत्तम खप व्हावा असे तुम्हाला वाटते आहे ना? ते बेस्टसेलर ठरावे अशी तुमची मनीषा आहे ना? त्यावर चित्रपट निघावेत असे तुम्हाला वाटतेय ना? त्यातून बक्कळ पसा आपल्याला मिळावा अशी तुमची इच्छा आहे ना? आता हे एवढे सगळे आहे, तर लिहा की खुशाल लोकप्रिय होऊ शकणारे साहित्य! कोण रोखणार तुम्हाला? आणि कशासाठी? तो तर तुमचा अधिकारच. हे लिहिताना तुमचे डोळे नेमके कुणाकडे हवेत? वरच्या फळीकडे की खालच्या फळीकडे? तर नि:संशय खालच्या फळीकडेच. लिहिताना तुम्हालाही त्याची जाणीव असतेच ना पक्की, की बुवा आपले साहित्य कोण वाचेल, कोण त्यास कसा प्रतिसाद देईल, ते. मग असे असताना वरची फळी काय म्हणेल याची पत्रास तुम्ही बाळगण्याची गरज काय? त्या फळीकडेही एक डोळा लावून ठेवण्याचे कारण काय? तुमचे साहित्य पूर्णपणे व्यावसायिक रीतीचे आहे ना? मग असू द्या की! तशा साहित्याला वरच्या फळीची मान्यता नाही मिळाली तर त्याबद्दल बोटे मोडणे, हा दुटप्पीपणा झाला. तुमचे साहित्य वाचून वरच्या फळीतील वर्ग त्यावर पसंतीची मोहोर उमटवत नसेल तर तो त्याचा प्रश्न.

सगळ्यांना रुचेल, सगळेच मान्यता देतील, सगळ्यांनाच दर्जेदार वाटेल असे लिखाण उपजणे ही खूपच अवघड गोष्ट. त्यामुळे या वरच्या-खालच्या फळ्या राहणारच. त्या फळ्यांवरील मंडळींनी विनाकारण एकमेकांचा दु:स्वास करू नये, इतकीच अपेक्षा. आधीच नको इतकी कप्पेबाजी झाली असताना त्यात भर टाकण्यात शहाणपण ते काय?

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com