News Flash

अमेरिका, एड्स आणि कला !

एचआयव्ही एड्सने प्राण गमवावा लागलेल्या दुर्दैवी लोकांबद्दल ही कलाकृती बोलत असते.

02-lp-aidsगेल्या ३० वर्षांत एड्सच्या विकारामुळे अमेरिकन कलेमध्ये होत गेलेल्या बदलांचे व त्याच्या समाजावरील प्रभावाचे सिंहावलोकन करणारे प्रदर्शन सध्या अमेरिकेत चच्रेत आहे.

‘‘तो  आज जिवंत असता तर तुमच्यासोबतच या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला हजर राहिला असता. ती असती तर कदाचित प्रदर्शन पाहात असतानाच तुम्ही तिला टेक्स्ट मेसेज करत असता. ती आज असती तर एव्हाना कदाचित तिने लिहायला घेतलेले पुस्तक पूर्णही केले असते. तो असता तर त्याने तुमच्यासोबत आजही युक्तिवाद केला असता. तो असता आज तर कदाचित तो एड्स सोबत घेऊन जगत राहिला असता. ते असते तर कदाचित तुमच्यासोबत बाहेर सिगारेटी फुंकत बसले असते. ती असती तर कदाचित आज तिने एखादे असेच कलादालन सुरू केले असते. तो असता तर त्याने तुला कवेत घेतले असते या क्षणी. आणि कदाचित तो असता तर या चित्रामध्ये तोच दिसला असता..’’

संपूर्ण कॅनव्हॉसभर या व अशाच ओळी लिहिलेल्या असतात.. ती आज असती तर किंवा तो आज असता तर.. याचा अर्थच असा की, आज ते/ती आज हयात नाहीत.

एचआयव्ही एड्सने प्राण गमवावा लागलेल्या दुर्दैवी लोकांबद्दल ही कलाकृती बोलत असते. गेले काही महिने एड्सशी संबंधित १०० हून अधिक कलाकृतींवर अमेरिकेमध्ये सर्वाधिक चर्चा होते आहे. एड्स आणि कलाकृती असा विचारही फारसा होताना दिसत नाही. अशा वेळेस अमेरिकेत गेल्या ३० वर्षांत एड्सच्या विकारामुळे अमेरिकन कलेमध्ये होत गेलेल्या बदलांचे व त्याच्या समाजावरील प्रभावाचे सिंहावलोकन करणारे प्रदर्शन सध्या चच्रेत आहे.

05-lp-aidsअमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१च्या सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. सरकारने हे प्रकरण काही फारसे गांभीर्याने घेतलेले नव्हते. सरकार तर त्या विषयी बोलणेही टाळत होते. १९८५ साल उजाडेपर्यंत या विषयावर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली होती. १९८७ उजाडेपर्यंत तब्बल ४० हजार अमेरिकन नागरिक एचआयव्ही- एड्सला बळी पडले होते.

06-lp-aidsसमाजामध्ये एका बाजूस हे सारे सुरू असतानाच दुसरीकडे समाजाचाच एक भाग असलेले कलावंत हे सारे पाहात होते. तोपर्यंत एचआयव्ही झालेल्या मंडळींना समाजाने वाळीत टाकण्यास सुरुवात केली होती. असाध्य विकार असल्याने खरे तर सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक आहे अशा रुग्णांना; पराकोटीच्या तिरस्काराला सामोरे जावे लागले.  समाजातील एका माणसाला दुसऱ्या माणसाने वाळीत टाकणे हा महाभयंकर असा प्रकार होता. त्यातही अशा वेळेस की, जेव्हा त्याचे या भूतलावरील आयुष्य दिवसागणिक कमी होते आहे व त्याला सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही परिस्थिती पाहून कार्यकत्रे असलेल्या कलावंतांनी पुढाकार घेतला आणि याविषयावर बोलण्याची व समाजाने तो माणूस म्हणून समजून घेण्याची गरज आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी कलेचाच वापर करण्यास सुरुवात केली.

03-lp-aidsकलेसाठी कला असा की, जीवनासाठी कला असा कलावादी विरुद्ध उपयुक्ततावादी संघर्ष प्रत्येक पिढीमध्ये होत असतो. त्यावर चर्चाही होत राहाते. पण काही कलावंत असे मानतात की, कला ही कला असते. तिला असे कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीचा तिच्यावर परिणाम होत असतो.  कारण कलावंत हा एक संवेदनशील माणूस असतो. असेच संवेदनाशील कलावंत एकत्र आले आणि त्यांनी एड्स व सामाजिकता यावर आपल्या कलाकृतीतून भाष्य करण्यास सुरुवात केली.  काहींच्या बाबतीत ते थेट भाष्य होते, काहींचे सूचक तर काहींचे अमूर्तातून व्यक्त होणे.. प्रत्येकाची व्यक्त होण्याची परी वेगळी असली तरी त्यांचा उद्देश मात्र एकच होता.

07-lp-aidsरॉक हुस्का या प्रदर्शनाचे संकल्पक होते, समाजाशी संवाद साधण्यासाठी या प्रकल्पाला सुरुवात झाल्याचे ते सांगतात. हा संवाद दोन बाजूंनी होता. पहिला एड्सला बळी पडलेल्यांशी, त्यांना उमेद देण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूस समाजाला सांगण्यासाठी की, एड्स नेमका काय आहे; 08-lp-aidsत्याच्या वेदना काय असतात, शारीरिक व मानसिकदेखील. शिवाय माणूस म्हणून या विकारास दुसऱ्या माणसाला समजून घेणे किती व कसे महत्त्वाचे आहे. यामध्ये कुठेही आम्ही कला उपयोजित होऊ  दिलेली नाही. हा आविष्कार ललित कलेच्याच अंगाने जाणारा आहे. ही जाहिरात नाही. या कलाकृती आहेत. अनेकदा जाहिरातीपेक्षाही कलाकृती खूप काही सांगून जाते. कलाकार म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो असे वाटणारे सर्व कलावंत एकत्र आले आणि या कलाकृती साकारल्याचे हुस्का सांगतात.

अलीकडे या सर्व प्रयत्नांना ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कालखंडातील कलाकृती एकत्र करून १०० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन तयार करण्यात आले असून ते अमेरिकेतील शहरांमध्ये फिरते आहे. या प्रदर्शनाचे संयोजक असलेले युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोच्या दृश्यकला संशोधन विभागाचे संचालक जोनाथन डेव्हिड वाट्झ सांगतात, गेल्या ३० वर्षांच्या या प्रवासानंतर आपण कुठे आहोत आणि परिस्थितीत काही फरक पडलाय का, हेही या निमित्ताने ताडून पाहायचे आहे. या कलाकृती खूप बोलक्या आहेत. एड्स  झालेल्यांचे विदारक वास्तव,
जीवनाची वाताहात त्या दाखवून देतात.  आजही एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत वाढच होते आहे, हे भीषण वास्तव आहे आणि त्या भीषणतेला भिडणाऱ्या अशा या कलाकृती.

सहभागी कलावंतांमधील एक जोय तेरील म्हणतो, या कलाकृती साकारतानाच त्यांना कोणीही संग्रहालयात ठेवणार नाहीत किंवा विषय एड्सशी संबंधित असल्याने त्यांची विक्रीही होणार नाही, याची पूर्ण कल्पना कलावंतांना होती.  पण समाजाचे ऋण महत्त्वाचे होते. भावासारखाच असलेला मित्र गमावण्याचे दु:ख मला आहे. पण विकारग्रस्तांच्या दु:खाला पारावर नाही. ते आहेत तोवर त्यांना माणूस म्हणून जगता यायला हवे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आपले माणूस म्हणून असलेले कर्तव्यच. 04-lp-aidsतेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

या कलावंतांपैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या माध्यमांतून व्यक्त झाला आहे. चित्र, छायाचित्र, शिल्प, मांडणीशिल्प असे सारे काही यात आहे. एका छायाचित्रात उधळलेल्या रेडय़ांनी एकाला कडय़ावरून खाली लोटल्याचे. समाजाने लोटल्याची भावना व्यक्त करणारे. दुसऱ्या रेखाचित्रात फुलांच्या ताटव्यातून खुरटत जाणारे फूल छाटून वेगळे काढलेले दिसते.  एड्स वर्णभेद मानत नाही,  कृष्ण-गौर सर्वच वर्णींयांना तो भीषण विकार होऊ  शकतो, असे सांगणारे एक छायाचित्र आहे. तर विकार झाल्यानंतर अंगभर राहिलेले व्रण दाखविणारे एक छायाचित्र आहे तर त्या व्रणांची व्यथा व्यक्त करणारी दुसरी एक अमूर्त चित्रकृतीही आहे. प्रसारमाध्यमांचे लक्षही मग ‘टीआरपी’साठी एचआयव्हीग्रस्तांकडे जाते, याचे मार्मिक भाष्यही एका कलाकृतीत आहे.  रोमँटिसिझममधून फुलत चाललेला प्रवास नंतर मानवी कवटी किंवा सापळ्याच्या दिशेने कसा नेतो, तेही वेधक पद्धतीने एका चित्रात पाहायला मिळते.

एचआयव्हीची भयग्रस्तता तर आपल्याकडेही तेवढीच भीषण आहे. पण आपल्याकडे कुणी कलाकृतींमधून असे फारसे व्यक्त झालेले दिसत नाही. काही कलाकृती आहेत. पण अमेरिकेमध्ये जसे नामवंतांपासून सर्व कलावंत चळवळ म्हणून उभे ठाकले तसे आपल्याकडे झालेले दिसत नाही. आपल्याकडे तर एचआयव्हीनिमित्ताने मुंबईमध्ये एक सेक्स म्युझियम चांगल्या पद्धतीने उभारण्यात आले. त्यातून चांगल्या पद्धतीने लैंगिक शिक्षण दिले जावे, असा हेतू होता. ते होतेही कलात्मक व शास्त्रीय. त्याची हाताळणी उत्तम पद्धतीने केलेली होती. पण आपण ते बंद कसे पडेल, हेच प्राधान्याने पाहिले..  म्हणूनच आपले समकालीनत्व कमी पडत्येय!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com, twitter – @vinayakparab

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:33 am

Web Title: america aids and art
टॅग : Art
Next Stories
1 आदिम अंत:प्रेरणांचा अर्वाचीन शोध!
Just Now!
X