समकालीन समाजाच्या कथित कलामूल्यांना आव्हान देण्यासाठी चार्लीने आउटफोकस तंत्राचा वापर करून एक वेगळी सौंदर्यदृष्टी विकसित केली.

सारे काही नीटनेटके, दिसायला छान, नजरेला आणि सर्व संवेदनांना सुखावणारे, नयनरम्य असे काही म्हणजे सौंदर्य अशी सौंदर्याची एक ढोबळ व्याख्या केली जाते. पण काही जण हे नेहमीच रूढ परंपरांना आव्हान देत असतात. समकालीन चित्र-शिल्पकार आणि छायाचित्रकारही तेच करतात. ढोबळ सौंदर्यदृष्टीला दिलेले आव्हान किंवा त्या विरोधात केलेली बंडखोरी हीदेखील त्यांच्या समकालीनत्वाचा एक महत्त्वाचा भागच ठरते.

छायाचित्रामध्ये सुस्पष्टता असणे हा चांगल्या छायाचित्राचा एक महत्त्वाचा निकष मानला जातो. अनेकदा छायाचित्र आउटफोकस होते, त्यात सुस्पष्टता येत नाही असे छायाचित्र ढोबळ अर्थाने चुकलेले किंवा चुकीचे अथवा त्रुटी असलेले छायाचित्र मानले जाते. मात्र चार्ली मॅकक्युलर्सने याच आउटफोकस तंत्राचा वापर करण्याचे ठरवले आणि त्याची एक स्वतंत्र शैली निर्माण केली.

सौंदर्यदृष्टी ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय चार्लीची ही छायाचित्रे आपल्याला देतात. समकालीन समाजाच्या कथित कलामूल्यांना आव्हान देण्यासाठी त्याने या तंत्राचा वापर तर केलाच, पण दुसऱ्या बाजूस त्याने यातून एक वेगळी सौंदर्यदृष्टीही विकसित करून छायाचित्रांना एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. वस्तूचा मूळ आकार बदलणे म्हणजे त्यात विकृती निर्माण करणे किंवा विरूपीकरण करणे याचा वापर त्याने केला. विरूपीकरण म्हणजे वस्तूचा मूळ दृश्याकार बदलणे किंवा त्याला नसलेला असा विकृत आकार देणे. विरूपीकरण किंवा विकृत आकार ही चूक, वाईट बाब किंवा त्रुटी मानली जाते. त्यामुळे असे विकृत दृश्याकार काढून टाकण्यासाठी किंवा त्या संदर्भातील त्रुटी टाळण्यासाठी एरव्ही कलाकार प्रयत्नशील असतात. अचूकतेच्या दिशेने जाण्यामध्ये त्रुटी टाळणे महत्त्वाचे मानले जाते.

कलेच्या प्रांतात आजवर अनेकांनी एखादी नवीन कल्पना किंवा भावना; परिणामकारक पद्धतीने रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विरूपीकरणाचा वापर केला आहे. यालाच अनेकदा अमूर्तीकरण असेही म्हणतात. पण अमूर्तीकरण आणि विरूपीकरण यात एक सूक्ष्म भेदही आहे. पिकासोने विरूपीकरण अतिशय खुबीने वापरले. रडणारी महिला हे त्याचे गाजलेले चित्र याचाच प्रत्यय देणारे आहे. पण चार्लीच्या छायाचित्रातील विरूपीकरण हे अमूर्तीकरणाच्या जवळ जाणारे आहे. तसे करताना तो छायाचित्रामध्ये एक परिणामकारक वातावरणनिर्मिती करतो. या वातावरणनिर्मितीमध्ये व्यक्तिरेखा आपल्याला स्पष्टपणे नाही दिसली तरी फारसा फरक पडत नाही. कारण व्यक्तिरेखेचे अमूर्तीकरण (आउटफोकस) हे छायाप्रकाशाच्या माध्यमातून वातावरण जिवंत करते. एवढेच नव्हे तर छायाचित्रातील खोलीदेखील (डेप्थ) आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाही. गिरकी या शीर्षकाची ही सर्व छायाचित्रे बॅले नृत्याशी संबंधित आहेत. यातील तीन नíतकांच्या छायाचित्रात त्याचप्रमाणे नíतकांचे केवळ  पाय दिसणारे छायाचित्र आणि दोन नíतकांच्या तयारीच्या छायाचित्रांत ही खोली स्पष्ट जाणवते. एका छायाचित्रामध्ये दोन नर्तकांपकी नíतकेने गिरकी घेतलेली दिसते तर पुरुष नर्तक पुढे होऊन गिरकी घेण्याच्या तयारीत असल्याचे त्याच्या केवळ दिसणाऱ्या पायावरून लक्षात येते. यातही आउटफोकस अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, नर्तक- नíतका भेदही लक्षात यावा आणि त्यांचा रूपाकार आणि नर्तनाच्या निमित्ताने दिसणारे विविध रूपाकारही सहज लक्षात यावेत, अशी छायाचित्रांमधील रचना आहे. त्यामुळेच नर्तक कोण व्यक्ती आहे (म्हणजे स्त्री की पुरुष) किंवा त्याचा चेहरा कसा आहे, ते न कळण्याने चित्राच्या आस्वादामध्ये कोणताही फरक पडत नाही. हेच चार्लीने विकसित केलेल्या या नव्या तंत्राचे यश आहे.

चार्ली मॅकक्युलर्सने युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जआिमधून ललित कलेमध्ये पदवी संपादन केली. १९८५ पासून तो या व्यवसायात आहे. त्यातही काही वष्रे त्याने केवळ स्वत:च्या सौंदर्यदृष्टीचाच शोध घेतला. १९९३ ते २००० या सात वर्षांच्या काळात तर त्याने केवळ क्रीडा संस्कृतीशी संबंधित चित्रणच केले. याच काळात अटलांटा येथील बॅले नृत्य करणाऱ्या संस्थेशी त्याचे सूत जुळले आणि त्यातूनच हे गिरकी प्रदर्शन जन्मास आले.

त्रुटी समजल्या जाणाऱ्या विषयाचा वापर वातावरणनिर्मितीसाठी करून, एका बाजूस जुन्या सौंेदर्यमूल्यांना आव्हान देत दुसरीकडे नवीन सौंदर्यदृष्टी असलेली जाण निर्माण करणे, हे चार्लीचे महत्त्वाचे यश मानले जाते. सौंदर्यदृष्टी पाहणाऱ्याच्या नजरेत असते, हे विधान तो पुराव्यानिशी सिद्धच करतो!
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab