13 August 2020

News Flash

रूपाकार, उपयोगिता आणि वास्तव

आपण चुकून एखाद्या गॅरेजमध्ये तर आलेलो नाही ना

दैनंदिन आयुष्याशी संबंधित गोष्टींचे रूपाकार, त्यांची उपयोगिता यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा समाजाच्या आर्थिक-सामाजिक अंगांशी असलेला संबंध कलावंत विलग करून आपल्यासमोर उलगडतो!

आपण चुकून एखाद्या गॅरेजमध्ये तर आलेलो नाही ना, असाच प्रश्न समोर दिसणारे दृश्य पाहून डोक्यात येतो. आपल्या समोर असतात ते आतमध्ये असलेल्या सर्व यंत्रणा वेगळ्या केलेले आणि त्या सर्व यंत्रणांसह अधांतरी टांगून ठेवलेले फॉक्सवॅगनच्या बिटल गाडीचे अवशेष. क्षणभर आपल्याला आठवण होते ती, गाडीच्या मॅन्युअल बुकची. यामध्ये गाडीतील विविध यंत्रणा नेमक्या कुठे जोडल्या जातात व गाडी नेमकी कशी तयार होते, त्याची रेखाचित्रे दिलेली असतात. वापरकर्त्यांला गाडी नेमकी कळावी, यासाठीही ही योजना असते. पण आपण समोर पाहतो ते विलक्षण असते. रेखाचित्रात दिसणारे ते सर्वस्पेअर पार्ट्स, त्या सर्व यंत्रणा स्वतंत्रपणे काढून मात्र रेखाचित्राप्रमाणेच नेमकेपणाने अधांतरी टांगलेल्या असतात. गॅरेजमध्ये असे उद्योग कुणी करीत नाही. शिवाय आजूबाजूला सारे काही स्वच्छ असते. मग ही कलाकृतीच आहे तर.. असा विचार डोक्यात येतो आणि आपण त्या कलाकृतीचा अर्थ शोधू लागतो. या सोबत आणखी दोन छोटेखानी फिल्म्सही इथेच सादर केलेल्या असतात. त्या पाहताना हळूहळू आपल्याला त्याचा अर्थ उलगडत जातो.

02-lp-art

फॉक्सवॅगनच्या जगप्रसिद्ध बिटल या गाडीची निर्मिती नाझी जर्मनीच्या कालखंडात झाली. किफायतशीर किमतीतील चांगली गाडी म्हणून ती नावाजलीही. मात्र ७० च्या दशकात युरोप-अमेरिकेमध्ये सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आल्यानंतर फॉक्सवॅगनने बिटलची निर्मिती मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये करण्यास सुरुवात केली. याचा मेक्सिकोच्या जीवनावर मोठाच प्रभाव पडला. कारण या गाडीतील मेकॅनिक्स अतिशय साधे, सोपे, सुटसुटीत होते. कुणालाही गाडीतील सर्व यंत्रणा वेगळ्या काढून त्याची जुळणी करणे सहज शक्य होते. सहज शक्य असलेल्या अनेक गोष्टींच्या, बनावट गोष्टी लगेचच तयार होतात. झालेही तसेच. याचे बनावट स्पेअर पार्ट्स तयार झाले. अल्पावधीतच मेक्सिकोमधील परवडणारी गाडी म्हणून ती नावारूपाला आली. तिला मेक्सिकोतील आधुनिकतेचा मानही मिळाला. तिचा तो रूपाकार, उपयोगिता आणि वास्तव यातून समोर मांडण्याचा प्रयत्न कलाकाराने केलेला असतो. त्यातील एका फिल्ममध्ये तर या कलावंताने एक पांढऱ्या रंगाची बिटल गाडी फॉक्सवॅगनच्या कारखान्यासमोर खेचत आणून पुरलेली दिसते.

दामिआन ओर्टेगा या समकालीन कलावंताची ही कलाकृती. जे न देखे रवी.. असेच कलावंतही पाहतो. म्हणजे बिटल गाडी आपणही पाहिलेली असते. पण मेक्सिकोच्या सामाजिक-आíथक परिस्थितीमधील बदलांशी तिचे असलेले नाते अशा प्रकारे गाडीतील यंत्रणा उलगडून दाखवता येईल, असा विचार किती जण करतात? ओर्टेगा अशाच प्रकारच्या संकल्पनात्मक शिल्प आणि मांडणीशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. तो वापर करीत असलेल्या गोष्टी आणि विषय हे दोन्ही मेक्सिकोवासीयांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधितच असतात. आभासी वास्तव नावाचे त्याचे एक मांडणीशिल्पही असेच प्रभावी आहे. एका भल्या मोठय़ा टेबलावर एकावर एक ठेवलेली, मात्र त्याचे एकच टोक दुसऱ्या तेलाच्या िपपाच्या एकाच टोकाला जोडलेली आणि स्वत:भोवतीच तोल सावरत, त्या अवस्थेत गोलाकार फिरणारी तीन िपपे असे हे मांडणीशिल्प आहे. अर्थव्यवस्था, तिचे तोल सावरणे, तिची गती किती खरी, किती खोटी? तिची वास्तविकता यावर प्रकाश टाकणारी आणि विचार करायला लावणारी अशी कलाकृती.

ओर्टेगाचे तिसरे शिल्प म्हणजे. त्याने सुमारे सात वर्षांपूर्वी विकत घेतलेले मक्याचे कणीस होय. ते विकत घेतले. त्याच वेळेस त्यावर असलेल्या दाण्यांवर त्याने विशिष्ट आकडे टाकले होते. आता या कणसाला सात वष्रे झाली. साहजिकच आहे की, त्यातील काही दाणे सुकून पडून जातात. ते त्याने तसेच खाली पडलेल्या अवस्थेत ठेवलेले असतात. त्यावर टाकलेले आकडे पाहायला मिळतात. यातून भंग पावत जाण्याचा कालखंड आणि त्याचा टिकाऊपणा अशा दोन्ही विरोधाभासात्मक गोष्टी कलावंताला सांगायच्या असतात.. कधी तो आपल्याला मग दोन मजली इमारतीच्या घरांमधील वास्तव इमारतीचा उभा छेद घेऊन दाखवतो तर कधी वळ्या असलेल्या पाइपला गाठी मारून त्यातून सिमेंट सोडून ते सुकल्यावर तो पाइप फेकून देतो आणि मग ती वळीदार गाठ कलाकृती म्हणून सादर करतो. ओर्टेगो करतो काय? तर तो दैनंदिन आयुष्याशी संबंधित गोष्टींचे रूपाकार, त्यांची उपयोगिता यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा समाजाच्या आíथक-सामाजिक अंगांशी असलेला संबंध तो विलग करून आपल्यासमोर उलगडतो! याच त्याच्या विचार आणि सादरीकरणामध्येच त्याचे समकालीनत्व दडलेले आहे!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:25 am

Web Title: damian ortega
Next Stories
1 ‘हाता’ळणी!
2 रिक्तपण..
3 अनित्य आणि शून्यता!
Just Now!
X