ही छायाचित्रे ज्या वर्गवारीत छायाचित्रकाराने टिपली आहेत ते लक्षात घेतले तर ती केवळ वेगळा प्रयोग न राहता त्यांचा प्रवास समकालीनत्वाच्या दिशेने सुरू झाल्याचे लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समकालीन चित्र-शिल्प किंवा मांडणीशिल्प यांची वर्गवारी करणे हे समकालीन छायाचित्रांचा शोध घेण्यापेक्षा तुलनेने खूप सोपे काम आहे. मुळात छायाचित्रांच्या बाबतीत आजही या कलेला ललित कलेचा (फाइन आर्ट) दर्जा नाही, अर्थात ते एका अर्थाने साहजिकच आहे. कारण ज्या पद्धतीने छायाचित्रण केले जाते त्यात व ललित कलेमध्ये एक मूलभूत फरक आहे. त्यामुळेच आजवर छायाचित्रणाकडे परफॉर्मिंग आर्ट म्हणून पाहिले गेले. कॅमेऱ्यातून जे दिसते, ते टिपणे म्हणजे कलात्मक छायाचित्रण नव्हे.  ती केवळ  कारागिरी झाली. कलात्मक छायाचित्रणामध्ये कॅमेऱ्यामागचा माणूस महत्त्वाचा असतो. तो कलाकार असतो, समोरच्या दृश्यातील त्याला जे दाखवायचे ते कॅमेऱ्यातून टिपले जाणे इथे अपेक्षित असते; तेच तो साध्यही करतो, म्हणूनच त्याला कलाकार म्हटले जाते.

कोणत्याही कलाकृतीसाठी वापरले जाणारे रंग, रूप, आकार, चित्रचौकट, पोत आदी सारे निकष त्या छायाचित्राला कलाकृती म्हणून लागू होतात. असे छायाचित्र टिपणाऱ्यालाच कलावंत म्हटले जाते, अन्यथा तो केवळ एक छायाचित्रकार ठरतो. प्रत्येक छायाचित्रकार हा कलाकार असतोच असे नाही.

काही छायाचित्रकार हे मात्र सारे निकष पार करतात आणि ललित कलेच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. शाम मणचेकर, अश्विन मेहता ही त्यातीलच काही नावे. शाम मणचेकरांनी शैवालाचे चित्रीकरण करून त्यात साध्या डोळ्यांनाही न दिसणारे रूपाकार रसिकांना दाखवून दिले. त्यांचे एक छायाचित्र तर एवढे अप्रतिम होते की, संपूर्ण घनदाट जंगलामधून वाहणारी एक नदी एरिअल अंगाने टिपल्याचे भासमान व्हावे. शिवाय त्यांनी घेतलेला रूपाकारांचा शोधही केवळ अप्रतिमच होता. अश्विन मेहतांनी तर रंग उडालेल्या भिंती किंवा पत्र्यावरच्या गजांमधून रूपाकारांचा शोध घेतला होता. ही छायाचित्रे अस्सल ललित कलेच्या संकल्पनेलाच भिडणारी होती. त्यांना समकालीनत्वाचा दर्जाही सहज मिळाला होता. कारण त्यांनी पारंपरिक पद्धतीला पूर्णपणे छेद देत नव्याने प्रतिमांकन केले होते आणि हे प्रतिमांकन ललित कलेच्याच दर्जाचे होते. अर्थात असे असले तरी केवळ ललित कलेवर प्रेम करणारी मंडळी अशा प्रकारच्या छायाचित्रणालाही ललित कला मानतच नाहीत. अर्थात हा त्यांच्या दृष्टिकोनाचा भाग झाला. पण जगात अशा प्रकारच्या चित्रीकरणाला ललित कलेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अर्थात त्यासाठी खूप काटेकोर निकष लावले जातात. ललित कला म्हणून असलेला विरोध बाजूला ठेवून आपण छायाचित्रणाकडे पाहिले पाहिजे.

पारपंरिकतेला छेद देऊन समकालीन मांडणी करणारे ते समकालीन छायाचित्रण असे ढोबळ अर्थाने म्हणता येईल. पण खरे तर ही तारेवरची कसरतच असणार आहे. प्रस्तुत लेखामध्ये दिलेली छायाचित्रे ही आधुनिकतेच्या अंगाने नवी मांडणी करणारी छायाचित्रे आहेत. यातील खालच्या बाजूस टेकलेले दोन हात आणि वरच्या बाजूस दोन्ही बाजूंना योगासनांप्रमाणे समांतर दिसणारे पाय हे अ‍ॅड्रिन जॅस्झक याचे व्यक्तिचित्रणात्मक छायाचित्र आहे. शिवाय समोरच्या पानांवर दिलेली चार छायाचित्रे ही देखील व्यक्तिचित्रणात्मक म्हणूनच टिपलेली आहेत. यात नुकत्याच जन्मलेल्या एका बाळाचे नाळदेखील न तुटलेले एक छायाचित्र असून ते क्रिस्तिआन बर्थलोत याने टिपलेले आहे. सच्सा फ्रोमने टिपलेले छायाचित्र हे क्रीडापटूचे व्यक्तिचित्र आहे. डोगी वॅलेसने गाडीतील मुलीचे व्यक्तिचित्र टिपले आहे तर अदी डेकेलने नववधूचे व्यक्तिचित्रण केले आहे. ही सर्व व्यक्तिचित्रणे पारंपरिक व्यक्तिचित्रणापेक्षा वेगळी आहेत. पहिल्या छायाचित्रातील व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी ती नर्तक आहे आणि अ‍ॅथलीट नाही हे तिच्या पेहेरावावरूनच लक्षात येते. व्यक्तिचित्रणामध्ये चेहरा दिसलाच पाहिजे या समीकरणाला यात छेद दिला आहे. जे बाळ काही मिनिटांपूर्वीच जन्माला आले आहे, त्याचेही व्यक्तिचित्र असू शकते ही कल्पनाच वेगळी असून तसा नवा प्रकार बर्थलोतने हाताळला आहे. मग नुकताच झालेला जन्म हे त्याच्या अंगभर असलेले रक्त आणि न तुटलेली नाळ यातून लक्षात येते. क्रीडापटूच्या व्यक्तिचित्रणात क्रीडा प्रकारादरम्यानचेच भाव पाहायला मिळतात. यात क्रीडा प्रकार कोणता हे लक्षात येत नसले तरी वैशिटय़पूर्ण हेल्मेटमुळे क्रीडा प्रकारातील हे छायाचित्र असल्याचे लक्षात येते आणि त्याचे चेहऱ्यावरचे भाव, डोळे सारे काही क्रीडा प्रकारातील तो अभूतपूर्व क्षण नेमका टिपणारे आहेत. यात इतर कोणत्या गोष्टी न दाखवता छायाचित्रकाराने पारंपरिकता टाळली आहे. व्यक्तिचित्र म्हणजे कुणी तरी छान बसलेले, पोझ घेतलेले हे सारे पारंपरिक प्रकार या सर्व छायाचित्रकारांनी यशस्वीरीत्या टाळले आहेत. व्यक्तिचित्र तर प्रवासी मुलीचेही असू शकते हे वॅलेसने दाखवून दिले आहे. अगदी डेकेलने नववधूचे छायाचित्र टिपताना तिचा सुंदर चेहरा न दाखवता जाळीदार वस्त्रातून तो दाखविल्याने चेहऱ्यावर काहीसे ठिपके पाहायला मिळतात. तो चेहरा त्यामुळे तेवढा सुंदर वाटत नाही. पण समकालीन छायाचित्रकारांचे हेच वैशिष्टय़ असते. रसिकाला पाहायला काय आवडेल, याचा विचार ते करीत नाहीत. तर रसिकांनी जे पाहावे, असे त्यांना वाटते तेच ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग ते रसिकाला आवडले नाही तर त्यांना चालते.  शिवाय त्यातही सौंदर्य आहेच की, असेही त्यांचे म्हणणे असते. सुंदर गुळगुळीत म्हणजेच सौंदर्य ही व्याख्या समकालीन मंडळी आपल्याला बदलायला लावतात. ती पारंपरिक समीकरणांना छेद देतात.

रमिल गिल्वानोव्हने टिपलेल्या छायाचित्रात मोबाइलवर खेळणारी लहान मुलगी आताच्या पिढीचे वास्तव दाखवते, पण तिला आऊटफोकस करून छायाचित्रकार आपल्याला मांजराने मारलेली उडी दाखवतो. मुलीला आऊटफोकस केलेले असले तरी त्याचे महत्त्व आपल्या नजरेतून सुटत नाही आणि मांजराची उडी केवळ उडी म्हणून आपण पाहात नाही तर त्या खोलीत असलेल्या त्या वास्तवाचा एक तुकडा म्हणून आपण तो अनुभव घेतो. किमो मेत्सारन्ताने तर स्टुडिओमध्येच मांजरांचे एक व्यक्तिचित्र टिपले आहे. व्यक्तिचित्र हे माणसाचेच का असावे, प्राण्याचे का नाही, असा प्रश्न किमो उपस्थित करतो.

दाएसांग ली कझागस्तानमधील घोडय़ांच्या प्रशिक्षण केंद्रावर उभारलेल्या काच व रेलिंगच्या पाश्र्वभूमीवरून घोडा व त्याचा प्रशिक्षक जात असतानाचे छायाचित्र टिपतो. बारकाईने पाहिले तर लक्षात येते की, त्या काचेने आणखी एका अवकाशाचा भास त्याच छायाचित्रात निर्माण करून त्याला एक वेगळी मिती प्राप्त करून दिली आहे. अवकाश आणि मितीचा असा वेगळा प्रयोग म्हणजेही समकालीनत्व. जेम्स स्टिर्टनने आफ्रिकन गवताच्या समस्येचा शोध घेताना टिपलेले हे छायाचित्रही आपल्याला माणूसभर उंचीपेक्षा अधिक असलेल्या त्या गवताची उंची आणि त्यातील दोघांच्या उभ्या राहण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे छायाचित्राला प्राप्त झालेली मिती अशा नानाविध गोष्टी एकाच वेळेस आपल्याला दाखवते.

म्हटले तर ही छायाचित्रे केवळ एक वेगळा प्रयोग ठरतात. पण ती ज्या वर्गवारीत छायाचित्रकाराने टिपली आहेत ते लक्षात घेतले तर ती केवळ वेगळा प्रयोग न राहता त्यांचा समकालीनत्वाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या नजरेतून जगाला कशी दाखवता, त्यात नवता आणि आधुनिकता आणि पारंपरिकता आव्हेरणे किती आहे, यावर समकालीनत्व निश्चित होते!
विनायक परब –
vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab

मराठीतील सर्व समकालीन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photography
First published on: 11-03-2016 at 01:31 IST