कृष्णधवल छायाचित्रांची एक मालिका.. व्यवस्थित पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यात वेगवेगळ्या स्थितीमध्ये असलेला हात दिसतो.. कधी तो आडवा आहे, कधी उभा.. तर कधी एखादी नृत्यातील मुद्रा दाखवावी त्या प्रमाणे. हे हाताचे व्यक्तिचित्र तर नव्हे?

हाताच्या या वेगवेगळ्या स्थितींमधून छायाचित्रकार आपल्याला नेमके काय सुचवू पाहत आहे.. असा विचार आपण करू लागतो. तोपर्यंत त्या हाताच्या मागे असलेल्या काळपट भागाकडे आपले लक्ष तेवढे गेलेले नसते. मध्येच एका छायाचित्रात हातात काही गोलाकार वस्तू पकडलेली असावी, असे वाटणाऱ्या एका छायाचित्राजवळ येऊन आपण थांबतो. खरोखरच त्या हाताने काही पकडलेले आहे हेही लक्षात येते. मग त्या हातामागे असलेल्या काळ्या रेशमी वस्त्राकडे आपले लक्ष जाते. व्यवस्थित निरखून पाहिल्यावर हेही लक्षात येते की, ते रेशमी वस्त्र परिधान केलेली व्यक्ती ही स्त्री आहे. तो हात पुरुषाचा आहे. हात तिच्या छातीवर असावा.. मग पुन्हा एकदा आपण मागे येतो. सर्व छायाचित्रे एका पाठोपाठ एक व्यवस्थित पाहतो; तेव्हा लक्षात येते की, कधी त्या हाताने घट्ट पकडलेले असते, कधी जोरदार पुढे ढकलण्याचा प्रयत्न तर कधी नाजूक हाताळणी.. कुणा एका स्त्रिच्या शरीरावरून ‘तो’ हात फिरतो आहे. या हातामधून, हाताच्या स्थितीतून, ‘हाता’ळणीमधून भावना व्यक्त होत आहेत.. भावना की, वासना? क्षणभर आपण थबकतोही!  विचार करायला लावणारी ही छायाचित्रे आहेत तालिआ चेत्रितची!

स्त्री- पुरुष संबंध किंवा माणसाचा मनोलैंगिक व्यवहार हा विषय तसा आदीम. आजवर अनेक कलावंतांनी हाताळलेला तरीही तालिआची ही ‘हाता’ळणी निश्चितच वेगळी ठरते, लक्षात राहते. त्यातील त्या काळ्या गडद रेशमी वस्त्रामध्ये एक ऋणभार भरून राहिलेला आहे आणि त्या पाश्र्वभूमीवर तो हात उठून दिसतो. हात आणि हाताळणीतून माणसाचा मनोलैंगिक व्यवहार छायाचित्रकाराने उलगडला आहे.

चेत्रितची हाताळणीच वेगळी आहे. एरवी अलीकडचे बरेचसे छायाचित्रकार विषयांच्या सादरीकरणासाठी संगणकाची मदत घेतात. खरे तर छायाचित्रामध्ये सॉफ्टवेअरच्या आधारे बरीच मोडतोड करतात आणि त्या माध्यमातून आपल्या कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतात. पण चेत्रित असे कधीच करत नाही ती म्हणते,  ‘‘जे आपल्यासमोर आहे, त्यातील काय दाखवायचे व कसे दाखवायचे हे छायाचित्रकाराच्या हातात असते. कारण छायाचित्राची चौकट तो किंवा ती निश्चित करत असते. चित्रकार एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील चित्रण करतो तेव्हा समोर दिसणारे सारे काही तो दाखवत नाही. त्याला आवश्यक वाटणाऱ्या गोष्टीच चित्रात दिसतात. तसेच काहीसे. पण छायाचित्रामध्ये समोर जे जे दिसते ते टिपले जाते. त्यामुळे चित्रचौकटीची निवड खूप काळजीपूर्वक करावे लागते.’’ चेत्रितचे हे म्हणणे आपल्याला पटते ते याच प्रदर्शनातील इतर दोन छायाचित्रे पाहताना. यातील पहिल्या छायाचित्रामध्ये दरवाजा पलीकडच्या आरशात चेहऱ्यावर केस आल्याने चेहराच न दिसणारी एक महिला दिसते. जे दिसते ते प्रतिबिंब असावे कारण छायाचित्रात अलीकडे तसेच केस फ्रेमच्या एका बाजूस अनफोकस्ड पाहायला मिळतात. तर दुसऱ्या छायाचित्रात मध्यभागी दरवाजावर पडलेली त्या महिलेची सावली आणि दरवाजाच्या एका बाजूस दरवाजाला पकडलेला हात, डोक्यावरील केसांचा काहीसा भाग आणि दुसऱ्या बाजूस बहुधा जिची सावली आहे, तीच प्रत्यक्षात पाठमोरी उभी असावी.. अशी दोन दृश्यचित्रे आहेत. यात व्यक्ती न दाखवता तिने खुबीने तिला जे दाखवायचे ते नेमके दाखवले आहे. या सर्वच मालिकाचित्रांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे हात!

चेत्रितची आणखी एक छायाचित्र मालिका विशेष गाजली, त्यावरील व्हिडीओही गाजला. ही व्हिडीओ कलाकृती यूटय़ूबवर उपलब्ध आहे, यामध्येही तिने स्त्री- पुरुष संबंध हाच विषय हाताळला आहे, पण इथली हाताळणी आहे ती थोडी तत्त्वज्ञानात्मक अंगाने जाणारी.. समकालीन! खरे तर तिची ती हाताची चित्रमालिकाही समकालीनच आहे. पण ही व्हिडीओ हाताळणी त्यापेक्षा दोन पावले पुढे जाणारी.. बऱ्याच दिवसांनी भेटलेले दोघे.. एक स्त्री एक पुरुष एकमेकांना पाहताच चित्रपटात दिसतात त्याप्रमाणे धावत येतात, मिठी मारतात.. आणि नंतर त्यांच्या देहबोलीतून जे व्यक्त होते त्यातून प्रश्न पडतात की, हे सारे भौतिक, क्षणभंगुर तर नाही ना? हे सारे पुढे कोणत्या दिशेने जाणार? याला प्रेम म्हणायचे? हे सारे समकालीन कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर येते आणि या आदीम विषयाचा आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडते!
विनायक परब –
response.lokprabha@expressindia.com  @vinayakparab