13 August 2020

News Flash

श्रीयुत मोदींचे बालाकोट स्वप्न

सध्या तिकीट खिडक्या, तिकीट दर आदी कशाचाच पत्ता नसल्याने अहमदाबाद मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यास तिकीट नाही, कुठले शुल्क नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पी. चिदम्बरम

लोकांना जे प्रश्न पडायला हवेत, पडलेही असतीलच आणि त्यांची साधी ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरेसुद्धा साऱ्यांना देता येतील, ते प्रश्नच नको म्हणून मग, हवाई दलाच्या उत्तुंग यशानंतर प्रत्येक भारतीयाला वाटणारा पक्षातीत अभिमान पक्षनिष्ठ व्हावा, राष्ट्रवादाचा फायदा सत्तेसाठी मिळावा, अशी स्वप्ने पाहिली जात आहेत..

निवडणूक आयोगाने रविवारी म्हणजे १० मार्च २०१९ रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. सरकारला अनुकूल अशी शेवटची कृती त्यातून त्यांनी पार पाडली असे मला वाटते. या निवडणुका जाहीर केल्यानंतर सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता यापुढे कोनशिला समारंभ नाहीत, वटहुकूम नाहीत, पैशाची तरतूद कमी असलेल्या योजनांची घोषणा नाही याचे लोकांना हायसे वाटले. पंतप्रधान मोदी यांनी १३ फेब्रुवारीला संसदेचे अधिवेशन संपल्यापासून उण्यापुऱ्या २७ दिवसांत किमान १५५ योजना व प्रकल्पांचे उद्घाटन किंवा कोनशिला समारंभ केले. या सगळ्या काळात काही योजनांचे टप्पे पूर्ण करून घाईगर्दीत त्यांचे उद्घाटन करण्यात आले. अहमदाबाद मेट्रोचा प्रकल्प अनेक दिवस रेंगाळला होता. हा प्रकल्प १४ मार्च २०१५ रोजी सुरू होऊनही त्यात फारशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे गुजरात सरकारचे खरे तर हसे झाले होते. त्यामुळे मोदी सरकारने अखेर काही तरी दाखवण्यासाठी प्रकल्पाचा काही भाग पूर्ण करून घेतला व या सेवेचे ‘अंशत:’ उद्घाटन केले. तेवढय़ासाठी त्या मेट्रोचा ६.५ किलोमीटरचा टप्पा घाईने पूर्ण करण्यात आला. मग ४ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी मोठय़ा अभिमानाने या टप्प्याचे उद्घाटन केले. हा टप्पा कसला? हा मेट्रो मार्ग साडेसहा किलोमीटरचा आहे, पण त्यात दोनच स्थानके येतात. त्यातील इतर स्थानके बांधण्याचे काम अजून चालू आहे. सध्या तिकीट खिडक्या, तिकीट दर आदी कशाचाच पत्ता नसल्याने अहमदाबाद मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यास तिकीट नाही, कुठले शुल्क नाही. मोफत प्रवासाची आनंदगाडी!

हो की नाही ते सांगा..

आता आपण गंभीर प्रश्नांकडे वळू या. यंदाच्या निवडणुकीत किमान ९० कोटी पात्र मतदार नवे सरकार निवडणार आहेत, त्यात मोदी सरकारची कामगिरी हाच मुख्य प्रश्न असणार आहे.

१. तुम्ही स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक आहात असे तुम्हाला वाटते का..  तुमचा धर्म व भाषा किंवा इतर कारणांवरून जमावाकडून मारले जाण्याची, मारहाण होण्याची किंवा भेदभाव होण्याची भीती तुम्हाला वाटत नाही का.. जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला छळाची किंवा विनयभंगाची भीती वाटत नाही का?

२. तुम्ही समाजमाध्यमांवर जे संदेश पाठवता किंवा मोबाइलवर जे संभाषण करता त्यावर सरकारची पाळत नाही, असा तुम्हांस विश्वास आहे का?

३. गेल्या पाच वर्षांत बरेच रोजगार निर्माण झाले असे तुम्हाला वाटते का? जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला लवकरच नोकरी मिळेल असे तुम्हाला वाटते का? (सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी- सीएमआयई-च्या निष्कर्षांनुसार फेब्रुवारी २०१९ अखेर ३१२ लाख पात्रताधारक भारतीय नोकरीच्या शोधात आहेत.)

४. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे जीवनमान सुधारले आहे असे तुम्हाला वाटते का?  तुमचे उत्पन्न वाढले आहे का? शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात का, तुमच्या मुलाने किंवा मुलीने शेतकरीच राहावे, यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्याल इतपत परिस्थिती सुधारली आहे का?

५. नोटाबंदी किंवा निश्चलनीकरण ही चांगली संकल्पना होती असे वाटते का? त्यातून तुम्हाला फायदा झाला असे वाटते का? देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चलनीकरणाचा फायदा झाला असे वाटते का?

६. वस्तू व सेवा कर योजना (जीएसटी) अनेक करांचे दर असताना तुम्हाला योग्य वाटते का? त्यात दर महिन्याला तीनदा विवरणपत्रे भरावी लागतात हे योग्य वाटते का? लघू व मध्यम उद्योगांना त्याचा फायदा झाला का? जीएसटी कायद्याचे पालन करून एखाद्या लहान उद्योजकाला व्यवहार करणे सोपे आहे असे तुम्हाला वाटते का? ज्या पद्धतीने जीएसटी लागू करण्यात आला, त्यामुळे उद्योजक व व्यापारी समाधानी आहेत असे तुम्हाला वाटते का?

७. मोदी यांनी २०१४ च्या प्रचारकाळात वारंवार बोलून दाखविलेली-  प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणे, वर्षांला दोन कोटी रोजगार निर्माण करणे, परदेशांतून काळा पैसा परत आणणे, ४० रुपये १ डॉलरच्या समान करणे, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढणे व देशातील जनतेला अच्छे दिन दाखवणे-  ही प्रमुख आश्वासने पूर्ण झालेली आहेत का?

८. जम्मू-काश्मीरमधील विशेषकरून काश्मीर खोऱ्यातील हिंसाचार थांबवण्यासाठी दंडशक्ती वापरून लष्करी मार्गाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनात कुठे तरी काही तरी चुकते आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?

९. देशातील अनेक बँकांना ठकवणारा विजय मल्या, पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारे नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे देशातून पळून गेले तेव्हा सरकारला त्यांच्या पलायनाची माहितीच नव्हती, यावर तुम्ही विश्वास ठेवता का?

१०. मोदी सरकारने केलेला राफेल करार हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होता आणि त्यात कुठल्या खासगी कंपनीला झुकते माप देण्यासाठी ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या भारत सरकारच्या उद्योगाला डावलण्यात आलेले नाही, असे तुम्हाला वाटते का? राफेल करारातील किमतीचा मुद्दा, विमानांची कमी करण्यात आलेली संख्या, माफ करण्यात आलेली बँकहमी, बदलण्यात आलेला विमाने देण्याचा कार्यक्रम, ऑफसेट भागीदाराचा पर्याय या साऱ्या आक्षेपार्ह मुद्दय़ांपैकी कशाचीही चौकशी करण्याची गरजच नाही असे तुम्हाला वाटते का?

११. सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग), सक्तवसुली संचालनालय (ईडी), प्राप्तिकर खाते यांच्या अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे असे तुम्हाला वाटते का? सीबीआयमधील अंतर्गत वादांमुळे या तपास-संस्थेची विश्वासार्हता वाढली असे तुमचे मत आहे का?

१२. अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, लखनऊ, मंगळूर, तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांच्या खासगीकरणाची कंत्राटे गुजरातमधील एकाच उद्योगसमूहाला देणे बरोबर आहे का, हा अगदी पारदर्शक व साधा सरळ निर्णय आहे, असे तुम्हाला वाटते का?

हे सगळे प्रश्न देशासमोर सध्या असलेल्या वास्तव परिस्थितीकडे, खऱ्या मुद्दय़ांकडे लक्ष वेधणारे आहेत.

जर तुम्ही नागरिक म्हणून या प्रश्नावर गंभीर असाल तर या खऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यावीत, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही हो किंवा नाहीमध्ये उत्तरे दिली तरी चालतील. पण या प्रश्नांकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही या प्रश्नांकडे दुर्लक्ष कराल, हीच मोदी सरकारची शेवटची आशा आहे. पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर तुम्ही देशापुढील प्रश्न विसरून राष्ट्रवादाच्या लाटांत वाहून जावे, अशीही मोदी सरकारची आशा आहे. आता भारतीय हवाई दल हे देशाचे असते. कुणा सरकारचे नसते. त्यामुळे या दलाच्या कारवाईनंतर, प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येणे साहजिक आहे. मुळात पुलवामा हल्ला हा सरकारच्या अपयशाचा भाग होता. बालाकोट येथील हवाई हल्ले ही भारतीय हवाई दलाच्या यशाची परिसीमा होती. परंतु खेदाने म्हणावे लागेल की, पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी सूड घेत केलेले हल्ले हा सरकारच्या अपयशाचा भाग होता.

मी वर जे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत त्याचे उत्तर बालाकोट किंवा पुलवामातील घटनाक्रमात नाही. त्यातून लोकांच्या मनातील बेरोजगारीचे भय जाणार नाही. शेतकरी त्यांच्या दुष्टचक्रातून मुक्त होणार नाहीत. लघू व मध्यम उद्योगांना ऊर्जितावस्था येणार नाही. देशाबाहेर पळालेले मल्या, नीरव मोदी, चोक्सी यांना परत आणता येणार नाही. आपल्या देशातील चौकशी संस्थांची स्वायत्तता टिकणार नाही, त्या निष्पक्षपाती उरणार नाहीत, काश्मीर खोऱ्यात शांतता नांदणार नाही.

तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक भाषणे ही बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यांभोवती केंद्रित झाली; कारण त्यामागे नागरिकांमध्ये राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करून त्यावर पोळी भाजून घेण्याचे षड्यंत्र आहे. बालाकोटमधील हवाई हल्ले आपल्याला विजयाकडे घेऊन जातील अशी त्यांची आशा आहे. पण भारतातील लोक शहाणेसुरते आहेत असा माझा विश्वास आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2019 12:30 am

Web Title: article by p chidambaram on mr modis balakot dream
Next Stories
1 ‘देशद्रोही’ वृत्तपत्रे!
2 रणभेरींचे दबके आवाज
3 वेदना, संताप आहे.. पण शहाणपण?
Just Now!
X