पी. चिदम्बरम

कोळिष्टक म्हणजे कोळी (स्पायडर) या कीटकाचे जाळे. त्याची वैशिष्टय़े आपल्या देशापुढील प्रश्नांशी मिळतीजुळती का ठरतात, याविषयी..

आपण घरात कोळी नावाचा कीटक पाहिला असेल. तो त्याची जाळी विणतो तीही आपल्या पाहण्यात अनेकदा आली असतील. तुम्ही जर आंतरजालावर ‘द स्पायडर्स वेब’ नावाने शोध घेतला तर तुम्हाला त्याच्याविषयी सहा गोष्टी ठळकपणे दिसतील. त्या मी येथे देत आहेच, पण तुम्हाला त्या बघताही येतील त्या पुढीलप्रमाणे-

१. कोळ्याचे जाळे हे साधे नसते. त्याने विणलेल्या जाळ्याला अर्थ असतो.

२. कोळ्याचे जाळे हे कुणाची शिकार चोरत नाही तर नवीन शिकारीला आकर्षित करते.

३. कोळ्याचे जाळे हे चमकदार असते त्याची काही कारणे आहेत.

४. कोळी भक्ष्याचा चोरटय़ासारखा वेध घेतो.

५. कोळी मोठा विचार करतात.

६. कोळी त्यांचे जाळे रोज बदलतात.

तुम्ही जर माझ्यासारखाच विचार करीत असलात तर तुम्ही म्हणाल, किती बरोबर आहेत या गोष्टी. भारत-चीन सीमेवर जी अनिश्चित परिस्थिती आहे त्याला हे सगळे तंतोतंत लागू आहे. करोनाविरोधातील लढाई, जी आपण हरत चाललो आहोत त्यातही हेच दिसून येते. देशाची अर्थव्यवस्था वेगाने घसरत चालली आहे त्याबाबत लोकांच्या मनात निराशेचे मळभ गडद होत आहेत. अशा परिस्थितीत बेरोजगारी वाढत आहे. या सगळ्या गंभीर वातावरणात राजस्थानातील दोन प्रमुख राजकीय पक्षांत जुंपली आहे. अर्थात एका पक्षाला सत्ता टिकवायचीय, दुसऱ्याला ती त्याच्या हातून हिसकावायचीय.

राजस्थान

राजस्थानात सध्या राजकीय वादळ घोंघावत आहे. सचिन पायलट या तरुणाच्या मनात काही महत्त्वाकांक्षा असणे साहजिक आहे. माझ्या मते त्यात गैर काही नाही. त्यात फक्त त्यांनी वार करण्यासाठी निवडलेली वेळ चुकीची आहे. राजस्थानसह देश तिहेरी आव्हानांना तोंड देत आहे. ही आव्हाने अभूतपूर्व अशीच आहेत. भाजपबाबत सांगायचे तर पक्ष व सरकार यांनी अर्थव्यवस्था व करोनाची गंभीर साथ यांच्यापुढे हात टेकून शरणागती पत्करली आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केली तेथे आपले वीस जवान धारातीर्थी पडले. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडीत आपल्या सरकारला फार काही साध्य झाल्याचे चित्र नाही. सीमेवरील खरी परिस्थिती सरकार लोकांना सांगायला तयार नाही. यातून जो अर्थ काढायचा तो लोक काढतीलच. सरकारी प्रवक्ते रोज विरोधाभासाच्या परिस्थितीत स्पष्टीकरणे देण्यात गुंतले आहेत. त्यांच्यात कुणाचा कुणाला ताळमेळ राहिलेला नाही. प्रवक्ते लव अगरवाल यांना अनुराग श्रीवास्तव जे बोलतात त्याचा अर्थ समजतो का, व श्रीवास्तव यांना अगरवाल काय बोलतात त्याचा अर्थ उमगतो का असा प्रश्न आहे, किंबहुना त्यांची परस्परविरोधी वक्तव्ये पाहून माझ्यासारख्याला बुचकळ्यात पडायला होते. भारतातील आर्थिक परिस्थिती पाहून सरकारच्या या दोन्ही प्रवक्त्यांना अर्थव्यवस्थेस हिरवे अंकुर फुटताना दिसत आहेत का, असेल तर त्यांनी तसे एकमताने सांगावे. कारण अर्थमंत्री सीतारामन यांना प्रत्येक आठवडय़ात अर्थव्यवस्था हिरव्या अंकुरांनी बहरताना दिसते आहे.

आता पुन्हा मूळ मुद्दय़ावर यायचे तर सचिन पायलट हे भाजपच्या मुशीत घडलेले नेते नाहीत. निदान सगळ्यांना यावर विश्वास असायला हरकत नाही, त्यामुळे त्यांनी आताच्या परिस्थितीत बंडाळी करून शक्ती वाया घालवण्यापेक्षा करोनाकाळात लोकांना मदत करण्यात आपले योगदान देण्याची गरज होती. राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यात मदत करायला हवी. त्यांच्यासमोर मोहनलाल सुखाडिया यांचे मोठे उदाहरण आहे. पायलट यांनी मोठय़ा शर्यतीची तयारी ठेवली असती तर जास्त चांगले झाले असते. मोहनलाल सुखाडिया यांच्याप्रमाणेच तेही मुख्यमंत्री होऊ शकले असते. माझ्या मते पायलट यांच्याकडे कुठलीच सकारात्मक चाल नव्हती, त्यामुळे त्यांनी शिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ते अथांग सागरात त्यांची नाव जिकडे वाटेल तिकडे हाक त आहेत. त्यांना कुठे जायचे याची काहीच माहिती नाही.

अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेकडे नीट बघा. आता तिच्या सांगाडय़ात काय उरले आहे, माझ्या मते तर काही नाही. आपण खोल खोल मंदीत बुडत चाललो आहोत. पूर्वी भाकीत केल्यापेक्षा फार लवकर आपली घसरण झाली आहे. पहिली तिमाही बघता बघता संपली आहे. त्यात आर्थिक मदत योजनेचा पत्ता नाही. वस्तू व सेवांची मागणी वाढवण्यासाठी कुठली उपाययोजना नाही. पतधोरणात्मक पातळीवर केलेले बदल हे आर्थिक वाढ पुन्हा रुळावर आणण्यास पुरेसे आहेत असा समज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करून घेतला आहे. पतधोरणात्मक बदल आर्थिक वाढ पुन्हा पूर्वीच्या मार्गावर आणण्यासाठी पुरेसे आहेत हे अर्थमंत्र्यांशिवाय केवळ सरकारचे आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमणियन, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना मान्य आहे. पंतप्रधानांचे भाषण जे लोक लिहून देत असतात त्यांनाही ते मान्य असावे असे दिसते. याचा अर्थ चार जणांना हे मान्य आहे. पण इतर कुणीही मान्य करायला तयार नाही. जर आपली अर्थव्यवस्था ढासळते आहे ही वस्तुस्थिती मान्य करून सध्याच्या राज्यकर्त्यांनी विचारपूर्वक फेरबांधणी केली नाही तर कुठल्याच जुजबी उपायांनी अर्थव्यवस्था सुधारणार नाही.

करोना विषाणू

करोना विषाणूमध्ये मी वर ज्या कोळी नावाच्या कीटकाचे वर्णन केले आहे त्याचे हे सर्व गुण आहेत. हा करोना विषाणू कोळ्यासारखाच सहजपणे देशाच्या सर्व भागांत पोहोचला आहे. भारत हा खंडप्राय देश आहे तरी बहुतांश भागांत आता त्याचे अस्तित्व आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा त्याने व्यापला आहे. प्रत्येक देशातील लोकसंख्येची रचना, हवामान, लोकांच्या सवयी, आरोग्याच्या पायाभूत सुविधा, उत्पन्न, तयारी, सरकारची प्रशासकीय क्षमता याला हा विषाणू पुरून उरला. भारतीय लोकांना मात्र खुद्द पंतप्रधान मोदी यांनी असे आश्वासन दिले होते की, या विषाणूविरोधातील लढाई आपण २१ दिवसांत जिंकू. त्यांनी करोनाविरोधातील लढय़ाची तुलना महाभारतातील युद्धाशी केली. त्यांनी २१ दिवसांत करोनाला हटवण्याचे जे चुकीचे आश्वासन दिले होते ते आजच्या वैद्यकशास्त्रातच नव्हे तर मध्ययुगीन श्रद्धांमध्येसुद्धा बसणारे नव्हते. करोनाविरोधात कुठलेही शस्त्र नाही हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे. टाळेबंदी हा त्यावरचा उपाय नाही. जोपर्यंत गुणकारी सिद्ध झालेली लस येत नाही तोपर्यंत करोना हटणार नाही. शिवाय नुसती लस येऊन उपयोग नाही. तिचे वितरणही महत्त्वाचे आहे. सर्वाना ती मिळाली तरच करोनाला आळा बसणार आहे. काही लोकांनी पुढे काय होईल ते केंद्र व राज्य सरकारांवर सोडले आहे. ज्या लोकांना परवडते आहे ते विलगीकरणात आहेत. ज्यांना परवडत नाही ते भीतीच्या सावटाखाली आहेत. कालांतराने मृत्युदराच्या विविध आकडय़ांची आपल्याला सवय होऊन जाईल. ते नित्यनूतन वास्तव बनून जाईल. पत्त्यांच्या संचातील जोकर काही कामाचा उरलेला नाही. सरकारला टाळेबंदी लावणे व ती उठवणे या दोन गोष्टींचा नाद लागला आहे. फेफरे भरल्याप्रमाणे सरकार कधी टाळेबंदी लावत आहे, कधी उठवत आहे. सरकारने कितीही जाळी बदलली तरी त्याचा काही उपयोग होताना दिसलेला नाही.

चीन

चीन हा भूतकालीन कृतींशी मेळ असलेले वर्तन करणारा एक कोळीच आहे. कोळ्याचे सर्व गुण त्याला लागू आहेत. त्याशिवाय तो मोठा विचार करून शिकारीला आकर्षित करून घेतो. चीनचे नेते क्षी जिनपिंग यांच्यासमवेत सहा वर्षांत १८ भेटी झाल्या, मोदी व जिनपिंग यांच्यात तीन शिखर बैठका झाल्या. पण त्यातून काहीच साध्य  झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपस्वी किंवा विरक्त नाहीत. त्यांच्यात अहंगंड आहे, प्रत्येक पंतप्रधानाला तो असतो. भाजपची मोठी स्वप्ने आहेत त्यासाठी मोठय़ा योजनाही आहेत. क्षी जिनपिंग यांनी अनौपचारिक चर्चात मोदी यांची खरी ताकद कितपत आहे हे जोखले. त्यानंतरच्या काळात उच्चस्तरीय आर्थिक व व्यापार संवादात जिनपिंग यांचा वरचष्मा राहिला. परस्परांच्या देशात गुंतवणूक, जागतिक मंचाचे मोकळे अवकाश, दोन्ही देशांत सांस्कृतिक व लोकपातळीवर विनिमयाचे २०२० हे वर्ष असे सगळे आभासी वातावरण जिनपिंग यांनी मोदी यांच्यासमोर साकारले, त्याला मोदीही भुलले. नंतर जानेवारी २०२० मध्ये त्यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला भारतात घुसखोरी करण्यास पुढे चाल दिली. चीनने आधी तैवान, दक्षिण चीन सागर व हाँगकाँगमध्ये आग लावली, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या गुलाबी जाळ्यात काही देशांना ओढले. पाकिस्तानच्या मदतीने चार देशांचा मित्रगट तयार केला, त्यात पाकिस्तान, तुर्कस्तान, इराण व चीन हे समाविष्ट आहेत. भारतात सीमेवर जे घडले ती चीनसाठी अशीच एक आगीची ठिणगी होती. चीनने लावलेल्या आगीमध्ये कोण कोण होरपळेल हे सांगता येत नाही, पण चीन मात्र अधिक शक्तीने उभा राहील. तुम्हीच स्वत:ला विचारून पाहा की, जे काय बोलतील याचा कुणी अंदाज देऊ शकत नाही त्या ट्रम्प यांच्याशिवाय कुणा तरी जागतिक नेत्याने भारतात चीनने केलेल्या घुसखोरीचा किंवा आक्रमणाचा निषेध केला आहे का. जर चीन हा कोळी असेल तर भारत हा शिकार आहे. ही शिकार कोळ्याच्या जाळ्याकडे आकर्षित झाली आहे.

चीनच्या रूपातील हा कोळी काही विश्रांती घ्यायला तयार नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN