19 October 2019

News Flash

पुढले शंभर दिवस..

राजस्थानात काँग्रेसने भाजपला एकूण मते व मतांचे प्रमाण या दोन्हीत मागे टाकले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पी. चिदम्बरम

या विजयाने माझे कुठले गैरसमजही झालेले नाहीत, भाजप त्यांच्या हाती असलेली कायदा, वटहुकूम, आश्वासने, छापे, खटले ही आयुधे वापरून पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करतील. पुढले शंभर दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत..

‘काँग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पनाच मुळात कल्पित आणि अवास्तव आहे. तरीही भाजपने- विशेषत: या पक्षाच्या दोघा नेत्यांनी, म्हणजेच नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देशाच्या निवडणूक नकाशावरून काँग्रेस पक्षाला पुसून टाकण्याचे हे भ्रामक स्वप्न लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालविला. काँग्रेसने अनेकदा या संकल्पनेतील पोकळपणा दाखवून दिलेला आहे. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही काँग्रेसमुक्त भारत या प्रक्षोभक घोषणेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. मात्र भारतातील लोकांनीच भाजपच्या या मनसुब्यांना आक्षेप घेतला आहे, असे आताच्या परिस्थितीत तरी म्हटल्यावाचून राहवत नाही.

संधी येताच मतदारांनी भाजपच्या मनसुब्यांना परखड उत्तर दिले. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तीन राज्यांत लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निर्णायक कौल दिला. या तीनही राज्यांत काँग्रेसची थेट भाजपशी लढत होती. लोक कदाचित माझ्या ‘निर्णायक’ या शब्दाला आक्षेप घेतील; पण मी विचारपूर्वकच हा शब्द वापरला आहे. आताच्या निकालांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले असता तो शब्द वापरणे सयुक्तिक आहे असे मला वाटते.

निर्णायक कौल

निवडणूक निकालांचा साकल्याने विचार करावा लागेल त्यासाठी काही मुद्दे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने कुठल्याही पक्षापेक्षा जास्त जागा जिंकल्या. काँग्रेसने ४३ टक्के मते घेत ९० पैकी ६८ जागा खिशात टाकल्या, या राज्याच्या स्थापनेनंतरचा तेथील काँग्रेसचा हा मोठाच विजय म्हणावा लागेल.

राजस्थानात काँग्रेसने भाजपला एकूण मते व मतांचे प्रमाण या दोन्हीत मागे टाकले आहे. मतांच्या एकूण संख्येचा विचार केला तर काँग्रेसला १३,९३५,२०१, तर भाजपला १३,७५७,५०२ मते मिळाली. मतांच्या टक्केवारीचा किंवा प्रमाणाचा विचार करता काँग्रेसला ३९.३ टक्के, तर भाजपला ३८.८ टक्के मते पडली. याशिवाय काँग्रेसने पाच जागा मित्रपक्षांना दिल्या होत्या, तेथे १,८४,८७४ मते मिळाली, तीही काँग्रेसच्याच खात्यात जमा करावी लागतील. मध्य प्रदेशात काँग्रेसने भाजपपेक्षा एक जागा कमी लढवली होती. तरी जास्त म्हणजे ११४ जागा मिळाल्या, तर भाजपला १०९ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांना साधारण सारखीच म्हणजे काँग्रेसला  १५,५९५,१५३, तर भाजपला १५,६४२,९८० मते मिळाली.

काँग्रेसने या तीन राज्यांतील शर्यत कुठपासून सुरू केली होती किंवा काँग्रेसकडे आधी जागा किती होत्या याचा विचार केला असता, या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपवर काँग्रेसने मिळवलेला विजय निर्णायकच म्हणावा लागेल. बहुजन समाज पक्षाने (बसप) जर काँग्रेसशी युती केली असती तर जनतेने आणखी निर्णायक कौल दिला असता. राजस्थानात बसपने सहा जागा जिंकल्या, त्यात त्यांना चार टक्के म्हणजे १४,१०,९९५ मते मिळाली. मध्य प्रदेशात बसपने दोन जागा जिंकल्या, तेथे पाच टक्के म्हणजे १९,११,६४२ मते त्यांना मिळाली. दोन पक्षांची युती झाली असती तर मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या ११४ जागांत आणखी २९ जागांची भर पडली असती.

निर्णायकतेमागील कारणे

खूप झाली आकडेवारी, नाही का? मग आता आपण आकडेवारी बाजूला ठेवून काही प्रश्न स्वत:लाच विचारू  या. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे काँग्रेसला निर्णायक कौल का मिळाला असावा. हिंदी पट्टय़ात काँग्रेसच्या विजयाची अनेक कारणे आहेत, त्यात शेतक ऱ्यांची दुरवस्था, बेरोजगारी, महिला व दलित, अल्पसंख्याक यांच्यातील असुरक्षितता या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. माझ्या मते हिंदी पट्टय़ाच्या बाहेरही हेच घटक निर्णायक ठरतील. केंद्रातील भाजप सरकार ही नकारात्मक लाट २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत थोपवू शकणार का, हा लाख मोलाचा प्रश्न आहे.

अगदी सखोल पातळीवर विचार करायचा तर माझ्या मते इतरही अनेक कारणे काँग्रेसच्या विजयास कारणीभूत ठरली आहेत. सामान्य नागरिकाला फक्त रोजीरोटीची व रोजगाराची चिंता असते असे समजणे चुकीचे आहे. जनतेला इतर समस्यांचीही चिंता असते. ‘योगी’ आदित्यनाथ यांनी या निवडणुकीत भाजपचा प्रचार केला होता. भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे हे मुख्यमंत्री. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच त्यांनी न थकता प्रचार केला. मोदी यांच्यापेक्षा त्यांनी जास्त सभा घेतल्या. त्याचा परिणाम काय झाला, याचा विचार करू या. माझ्या मते असे लोक जेव्हा गोसंरक्षण, राम मंदिर, रामाचा भव्य पुतळा उभारणे, राज्ये व शहरांचे नामांतर करणे, मुस्लीम नेत्यांवर राज्यात बंदी घालणे असे विषय मांडतात तेव्हा तेथे आशेचा – विकासाचा – सुरक्षेचा कुठलाही संदेश जात नाही. उलट सततचा संघर्ष, हिंसाचार, दंगली, ध्रुवीकरण, समाजाचे विभाजन याला प्रोत्साहन मिळून सामान्य लोकांच्या मनात भयाची भावना निर्माण होते. गरीब लोकांनी जे मतदान केले त्यात या भयातून बाहेर पडण्याची असोशी दिसते. लोक दारिद्रय़ात राहू शकतात. विकासाची आश्वासने पाळली नाहीत तरी त्यांना फार बिघडत नाही, पण जेव्हा सतत संघर्ष, हिंसाचार यांच्या भयाची टांगती तलवार असते तेव्हा त्यांना जगणे नकोसे वाटू लागते. त्यातून त्यांना सुरक्षेचे वातावरण हवे असते. तीच त्यांची मुख्य गरज असते.

भय संपवा

गरीबच नव्हे, तर इतर मतदारांवर आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा असाच परिणाम झाला. मोदी व शहा या जोडगोळीने अखेरच्या टप्प्यांमध्ये जी काही प्रचारभाषणे केली, त्यामुळे तर या भयात आणखीच भर पडली. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यावर असुरक्षित वातावरणाचा परिणाम होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. गेल्या आठवडय़ात उद्योग जगतातील काही नामवंत व्यक्ती, काही बँकर्स यांनी माझ्याशी हस्तांदोलन करून काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी दबक्या आवाजात शुभेच्छा दिल्या. एक सुशिक्षित महिला तिची ट्रॉली ढकलत माझ्यापर्यंत आली व निवडणूक निकालाबाबत आनंदाने भरभरून बोलली, काँग्रेसला तिने शुभेच्छा दिल्या. काही ज्येष्ठ नागरिकांनी भोजनाच्या वेळी काँग्रेसच्या विजयाच्या  बातमीने आनंद झाल्याचे मला अगदी थांबवून आवर्जून सांगितले. २०१९ मध्ये काँग्रेसच विजयी होईल अशी आशाही व्यक्त केली. राजकीय परिस्थितीचे निरीक्षण करणाऱ्यांमध्ये सर्वात सजग व कठोर लोक म्हणजे पत्रकार, त्यांनीही मला मुलाखतीसाठी विचारणा केली. अर्थात त्यांच्या मालकांना याबाबत काय वाटते हे मला माहिती नाही.

अर्थात या विजयाने माझे कुठले गैरसमजही झालेले नाहीत, भाजप त्यांच्या हाती असलेली कायदा, वटहुकूम, आश्वासने, छापे, खटले ही आयुधे वापरून पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भाजप संपला असे म्हणण्याची चूक मी करणार नाही. काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करतील, आताच्या योजनांमध्ये आणखी पैसा ओततील. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल हे त्यांना काटय़ासारखे सलत होते, कारण बँकेच्या निधीला ते हात लावू देत नव्हते. आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या अतिरिक्त निधीवर डल्ला मारण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती सरकारने निर्माण करून ठेवली आहे.

आताच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने निर्णायक बाजी मारली आहे. आता पुन्हा मुसंडी मारण्यासाठी भाजपच्या हातात शंभर दिवस आहेत. विरोधकांकडेही तेवढेच दिवस आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांचा निकाल हा आपल्या राज्यघटनेचे व त्यात विदित केलेल्या मूल्यांचे भवितव्य ठरवणार आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in 

ट्विटर : @Pchidambaram_IN

First Published on December 18, 2018 1:01 am

Web Title: bjp will do anything to win the lok sabha elections p chidambaram