25 February 2021

News Flash

आदर्श ‘आंदोलनजीवी’!

विचारी माणूस नेहमीच मतभेद व्यक्त करीत असतो, त्याचे बंडखोर मन त्याला स्वस्थ बसू देत नाही

(संग्रहित छायाचित्र)

 

पी. चिदम्बरम

मानवाला चांगल्यासाठी बदल हवा असेल तर त्यासाठी केली जाणारी चळवळीसारखी कृती कधीही दडपून टाकता येत नाही. फक्त त्याची आंतरिक ऊर्मी तितकी सखोल हवी.. जे लोक भाषण, लेखन, अभिव्यक्ती, मतभेद, निदर्शने, आंदोलने व चळवळी दडपून टाकतात, त्यांचा टिकाव लागत नाही!

मला अजून आठवते,  १९७० मधला तो काळ होता. सर्वोच्च न्यायालयाने माजी संस्थानांच्या संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा आदेश रद्दबातल केला होता. त्या वेळी एक तरुण वकील व मी तमिळनाडूत युवक काँग्रेसमध्ये सहभागी झालो होतो. तनखे बंद करण्याच्या निर्णयाविरोधातील निकालावर एक आंदोलन त्या वेळी युवक काँग्रेसने चेन्नईतील लॉर्ड मुन्रोच्या पुतळ्याजवळ आयोजित केले होते, त्यात आम्ही सहभागी झालो होतो. त्या वेळी आम्हाला अटक करण्यात आली व थोडय़ा वेळाने सोडून देण्यात आले. जेव्हा संस्थानिकांचे तनखे बंद करण्याची घटनादुरुस्ती करण्यात आली त्या वेळी आम्हाला असे वाटले की, आम्ही निदर्शने केली, त्यात आम्हाला अटक झाली त्यामुळेच सरकारने ही घटनादुरुस्ती केली. आम्ही आमचा विजय झाल्याचा दावा करून टाकला.

आमचे तेव्हाचे ते आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाविरोधात होते. त्या वेळी देशात इतरत्रही अशी अनेक आंदोलने झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमच्यावर त्या वेळी न्यायालयीन बेअदबीची कारवाई केली नव्हती. आम्हाला कुणी देशद्रोही म्हटले नव्हते. कुठल्याही पोलिसांनी आमच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला नव्हता. आजच्या परिस्थितीचा विचार करता ते आमच्या मन:पूर्वक धन्यवादांस पात्र आहेत.

मतभेद व आंदोलनाचे स्वरूप

विचारी माणूस नेहमीच मतभेद व्यक्त करीत असतो, त्याचे बंडखोर मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. महान न्यायाधीशांमध्येही मतभेद असतात. न्या. फ्रँकफर्टर, न्या. सुब्बा राव, न्या. एच. आर. खन्ना व इतर अनेक उदाहरणे त्यात देता येतील. मतभेद मांडणारा न्यायाधीश एखादाच असला तरी त्याला काही जण नंतर येऊन मिळतात. ते अल्पमतातील निकालही लिहितात. त्याचे वर्णन आपण कायद्याच्या संदर्भात पुढे चिंताजनक ठरणाऱ्या मुद्दय़ाबाबतचे आवाहन असे म्हणता येईल. पण तोच अल्पमतातील निकाल भविष्यातील बौद्धिक अभ्युदयाची आशा असतो. क्रीडा क्षेत्रातील मतभेद मुठी आवळून वगैरे व्यक्त होतात. उद्योग व्यापारात ते नियमानुसार काम किंवा संपाच्या रूपातून प्रकटतात.

राजकीय व सार्वजनिक क्षेत्रात हे मतभेद निषेधाच्या रूपात सामोरे येतात. काही निषेधांना मोठा पाठिंबा मिळून त्याचे आंदोलनात रूपांतर होते. काही वेळा हजारो लोक आंदोलनात सहभागी असतात. सर्व आंदोलक त्यांच्या उद्दिष्टांच्या प्रेमात असतात. काही जण झळ सोसण्यास तयार असतात. काही जण त्याग करतात, पण काही स्वार्थी असतात, काही जण धोरण ठरवतात. यात आंदोलनकर्त्यांचा शेवटचा जो प्रकार वर्णन केला आहे त्यांना पंतप्रधान मोदी यांनी ८ फेब्रुवारीला राज्यसभेत इंग्रजीतून बोलताना आंदोलनजीवी संबोधले. एक प्रकारे त्यांची निर्भर्त्सनाच केली.

महान आंदोलक

आदर्श ‘आंदोलनजीवी’चे विसाव्या शतकातील नि:संदिग्ध उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. त्यांनी आंदोलनासाठी महत्त्वाची कारणे व प्रश्न यांची निवड केली. मग तो नीळ लागवड कामगारांचा प्रश्न असो, मिठाच्या कराचा प्रश्न असो; त्यात त्यांनी नेतृत्व केले. ते शब्दांचे जादूगार होते. त्यांनी शब्दांच्या गुंफणीतून शक्तिशाली संदेश समाजाला दिले. ते होते ‘सत्याग्रह’ व ‘छोडो भारत’. प्रतीकांच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. मूठभर मीठ त्यांनी उचलले. खादीसाठी चरखा चालवला. हाताने विणलेले कापड व चरखा हे एक प्रतीक होते. त्यांनी ही नवीन शस्त्रे स्वातंत्र्यलढय़ात वापरली. बेमुदत उपोषण, दांडी यात्रा ही त्यांची आंदोलने गाजली. भजन, प्रार्थना सभा यांसारख्या मृदू शक्तींचा वापर त्यांनी केला. स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करताना त्यांनी विचारपूर्वक आखणी केली होती. ते मूळ आंदोलनजीवी होते. देशाचे राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचे नाव अभिमानाने घेतोच.

आजवरचा अनुभव पाहिला असता देशांच्या इतिहासास मतभेदी सुरांनीच आकार दिला. मतभेदातून नवे धर्म निर्माण झाले. मतभेदातूनच लाखो लोकांना स्वातंत्र्याची पहाट अनुभवता आली. लेनिनने झार निकोलसच्या हंगामी सरकारविरोधात बंड केले होते. त्या वेळी झार निकोलस-२ याला सिंहासन सोडावे लागले. त्यातून पहिल्या कम्युनिस्ट देशाचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतम, मार्टिन ल्यूथर, गुरू नानक यांनी मतभेद दर्शवले, त्यातून नवी धर्मरचना व नवे धर्म अस्तित्वात आले. एका सुधारणावादी धर्मव्यवस्थेचा पर्याय प्रत्येक वेळी पुढे आला. त्यांच्यासाठी बौद्ध धर्म, प्रॉटेस्टंट पंथ, शीख धर्म महत्त्वाचे होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी समाजव्यवस्थेवर मतभेदाचे सूर काढले. त्या चळवळीच्या ठिणगीचा वणवा झाला, त्यातून लाखो कृष्णवर्णीय अमेरिकनांना स्वातंत्र्य मिळाले; जे यादवीतून झाले नसते. मार्टिन ल्यूथर किंगचे आवडते शब्द होते ‘आय हॅव अ ड्रीम’, त्याचे ते आवाहन अमेरिकनांना पटले.

भारतासाठी जी तीन वर्षे भवितव्य बदलणारी ठरली ती सर्व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील होती. अनुक्रमे १९२०, १९३० व १९४२. या प्रत्येक वर्षी एक नवे देशव्यापी आंदोलन झाले. त्याचे नंतर चळवळीत रूपांतर झाले. चळवळीतून स्वातंत्र्यलढय़ाचे रूप घेतले. असहकार चळवळ नागरी आज्ञाभंग किंवा ‘सविनय कायदेभंग’ या चळवळीतून पुढे आली. त्यातून भारत छोडो आंदोलन उभे राहिले. तो वसाहतवादी ब्रिटिश सरकारवरचा अखेरचा घणाघात होता. आंदोलनाचा खरा अर्थ एखाद-दुसरे आंदोलन असा नसून चळवळ हाच आहे हे त्यातून सिद्ध झाले.

सरकारचे पितळ उघडे..

इतर देशातही लोकांनी चालवलेल्या लढय़ांच्या रूपातील अनेक आंदोलनांची रूपे दिसून येतात. व्हिएतनाम युद्धाविरोधात अमेरिकेत १९६८ मध्ये विद्यापीठांची आवारे व इतरत्र आंदोलनांचा आगडोंब उसळला होता. त्यातून अमेरिकी सरकारचे पितळ उघडे पडले. काही वर्षांतच अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाममधून माघार घेतली. त्यातून संयुक्त व्हिएतनामने जन्म घेतला. व्हेलवेट चळवळ, रोमानियन क्रांती (१९८९) यात झेकोस्लोव्हाकिया व रोमानियातील एकाधिकारशाहीच्या राजवटी उलथवण्यात यश आले. इजिप्तमध्ये २०११ मध्ये ‘अरब स्प्रिंग’ आंदोलन काहीसे अपयशी ठरले. मात्र या साऱ्या आंदोलनांतून, चळवळींतून एकच संदेश मिळतो, तो म्हणजे मानवाला चांगल्यासाठी बदल हवा असेल तर त्यासाठी केली जाणारी चळवळीसारखी कृती कधीही दडपून टाकता येत नाही. फक्त त्याची आंतरिक ऊर्मी तितकी सखोल हवी.

स्वातंत्र्याचा विजय

नागरिकांचे राजकीय व नागरी हक्क तसेच प्रसारमाध्यमांचे हक्क यांचा एकमेकांशी संबंध आहे. नागरी हक्कांमध्ये जो देश आघाडीवर आहे त्याचा प्रसारमाध्यम स्वातंत्र्यातील निर्देशांकही वर जात असतो. यातील निष्कर्ष तर्कसंगत आहे, कारण नागरी हक्कांची बाजू लावून धरण्याचे काम माध्यमेच करीत असतात. त्यांचे प्रतिबिंब त्यात असते, किंबहुना त्याचे विस्तारीकरणही माध्यमे करतात पण काही वेळा त्यात विकृतीही येऊ शकते. फिनलंड व इतर युरोपीय देश या निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहेत. चीन सगळ्यात तळाला आहे. भारत मध्यावर कुठेतरी आहे. भारताचा क्रमांक वरती येईल अशी आशा आहे, पण तो खाली जाण्याचीही भीती आहे. ‘एडिटर्स गिल्ड’ किंवा ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ला विचारा, ते खरी परिस्थिती सांगतील. दर पंधरा दिवसाला पत्रकारांना अटक होणे, माध्यम संस्थांवर छापे पडणे यांसारख्या घटना होत आहेत. पण शेवटी माध्यमांनाही काही वेळा सरकारपुढे शरणागती पत्करून बटिक होण्याची वेळ येते. मग सरकारचेच स्वर त्यांच्या कंठातून उमटू लागतात. रामनाथ गोएंका हे मात्र निर्भीड वृत्तपत्र मालक होते, त्यांनाही आपल्याला आंदोलनजीवीच म्हणावे लागेल..

शेवटी आंदोलनजीवींचाच विजय होईल. जे लोक भाषण, लेखन, अभिव्यक्ती, मतभेद, निदर्शने, आंदोलने व चळवळी दडपून टाकतील त्यांचा टिकाव लागणार नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर :  @Pchidambaram_IN

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2021 12:03 am

Web Title: ideal andolan jivi article by p chidambaram abn 97
Next Stories
1 संवेदनाहीन अर्थसंकल्प
2 याला म्हणावे.. ‘विश्वासघात’!
3 गोंधळ वाढवणारी धोरणे..
Just Now!
X