X

सुराज्य आणि स्वराज

ठिकठिकाणी कायदा हातात घेणारे जमाव, तर इंटरनेटवर ‘ट्रोल’ म्हणजे जल्पकांच्या झुंडी. या झुंडी जर प्रत्यक्षात असत्या, तर त्यांनीही जिवेच मारले असते. ‘याकडे दुर्लक्ष करा, गांभीर्याने घेऊ नका,’ असे आपले गृहमंत्री सांगतात आणि भाजपचे अतिवरिष्ठ नेते अनेक जल्पकांना ‘फॉलो’ करतात..

दोन प्रकारचे जमाव सध्या देशात धुमाकूळ घालीत आहेत. एक जमिनीवरचे तर दुसरे आभासी जगातले. तसे पाहिले तर दोन्ही प्रकारच्या जमावांचे गुण सारखेच. गर्दीतील व्यक्ती अनामिकतेमागे लपूनछपून काम करतात, अगदी ‘दुखावल्या’ची किंवा विद्ध झाल्याची बतावणीसुद्धा जमावानेच करतात. त्यांना एकटय़ाने त्यांच्या कृतीची, शब्दांची जबाबदारी घेण्याची भीती वाटते. या सगळ्या कृत्यांपासून आपल्याला जिथे संरक्षण आहे अशा ‘मोकाट मुभे’च्या राज्याचे आपण नागरिक आहोत असे ते समजतात. (पाहा याच स्तंभातील २४ एप्रिल २०१८ चा लेख : ‘कायद्याचे नव्हे, ‘मोकाट मुभे’चे राज्य!’)

गेल्या चार वर्षांत हे दोन्ही प्रकारचे जमाव संख्येने व आकाराने वाढले. वास्तव जगात या जमावांनी जीन्स घालणाऱ्या मुलींवर, उद्यान किंवा बारमध्ये जाणाऱ्या जोडप्यांवर हल्ले केले. त्यांनी महंमद अखलाखसारख्या व्यक्तीला घरात गोमांस बाळगल्याच्या केवळ संशयावरून उत्तर प्रदेशात दादरी येथे ठेचून ठार मारले. दुधाचा धंदा करणारा पहलू खान हा गुरेवासरे खरेदी करून घेऊन जात असताना हरयाणातील अल्वर येथे त्याची जमावाने हत्या केली. गुजरातमध्ये ऊना येथे दलित मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली. आसाम, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व गुजरात या राज्यांतील अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे मुस्लीम, दलित, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींवर हल्ले झाले.

अलीकडच्या काही आठवडय़ांत केवळ अफवांच्या आहारी जाऊन ठिकठिकाणच्या जमावांनी, ‘मुले चोरत असल्या’च्या संशयावरून काही लोकांना ठार मारले. त्यातीलच एक सुकांता चक्रबर्ती. या तरुणाला त्रिपुरातील सब्रूम येथील अधिकाऱ्यांनीच अफवांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी नेमले होते; पण त्यालाही जमावाने ठेचून ठार मारले, यापेक्षा मोठी शोकांतिका असूच शकत नाही.

आभासी जगातील टोळ्या किंवा झुंडी वेगळ्या नसतात. त्यांचे नाव आहे ट्रोल (जल्पक). ते असहिष्णुता, हिंसक वृत्ती, उर्मटपणा, बीभत्सपणा असे सर्व गुण अंगी बाळगतात. त्यांची शस्त्रे म्हणजे द्वेषमूलक भाषणे व खोटय़ा-बनावट बातम्या. ते कदाचित तुम्हाला ठार मारणार नाहीत, पण ते जर खऱ्या वास्तवातील जमावाचे भाग असते तर त्यांनी तुम्हाला नक्कीच जिवे मारले असते, याबाबत मला शंका नाही.

अशाच अलीकडच्या घटनेत ट्रोल म्हणजे जल्पकांच्या जमावाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांत लक्ष्य केले. सुषमा स्वराज जेवढा काळ सार्वजनिक जीवनात आहेत तेव्हापासून भाजपच्या (त्याआधी जनसंघाच्या) सदस्या आहेत. सुषमा स्वराज या सुशिक्षित, नम्र, स्पष्टवक्त्या आहेत. भाजपच्या आदर्श हिंदू भारतीय महिलेच्या प्रतिमेशी स्वत:ला जोडताना त्यांनी पुरेशी काळजी घेतलेली आहे. त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या, २००९-२०१४ मध्ये त्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्याही होत्या, म्हणजे संसदीय लोकशाहीत त्यांचा पक्ष निवडून आल्यास त्या पंतप्रधानपदाचा स्वाभाविक पर्याय होत्या, यात शंका नाही.

भाजपने २०१४ मध्ये निवडणुका जिंकल्या; पण अतिशय अधिक ऊर्जास्रोत, राजकीय कौशल्य असेलली व्यक्ती पक्षात पुढे आली व तिने सुषमा यांच्या सत्ताधारी पक्षाचा नेता व पंतप्रधान होण्याच्या मार्गात ठिय्या दिला. सुषमा स्वराज यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यात त्यांची हार झाली. निवडणुकीनंतर पक्षात व नवीन सरकारमध्ये सन्मानाचे स्थान मिळण्यासाठी सुषमा स्वराज या एकाकी लढाई लढत राहिल्या; पण त्यांना देशाचे परराष्ट्र धोरण ठरवण्यात अगदी थोडीही भूमिका पार पाडण्याची संधी दिली गेली नाही, ते सगळे काम पंतप्रधान कार्यालयाने एकतर्फी पद्धतीने ताब्यात घेतले.

स्वराज यांनी मार्ग शोधला

श्रीमती स्वराज यांनीही चतुराई दाखवली व स्वत:साठी मार्ग प्रशस्त करीत गेल्या. त्यांनी त्यांचे एक वेगळे जग निवडले. परराष्ट्रमंत्री असतानाही त्या परदेशात अपहरण झालेले, तुरुंगात टाकले गेलेले, व्हिसा किंवा पासपोर्ट नाकारले गेलेले, भारतीय विद्यापीठ किंवा रुग्णालयात परवानगी नाकारले गेलेले अशा लहानसहान व्यक्तींना त्यांच्या परीने त्या मदत करीत राहिल्या. विदेश मंत्रालयाची ‘स्वदेशी’ ओळख यातून तयार झाली. मनात सद्हेतू घेऊन लोकांना मदत करणाऱ्या व उच्चपदस्थ असलेल्या अशा व्यक्तींची समाजाला गरज आहेच; त्यातूनच सुषमा स्वराज यांनी जनकल्याणाच्या दृष्टिकोनातून लोकांचे प्रेम मिळवले. विरोधी पक्षांशी संघर्षांची भूमिका सुषमा यांनी ठरवून टाळली.

अलीकडच्या एका घटनेत लोकसहकार्याची भूमिका घेऊन केलेली साधारण कृती सुषमा स्वराज यांना नको त्या वादात अडकवून गेली. आंतरधर्मीय विवाह केलेल्या एका जोडप्याला पासपोर्ट मिळत नव्हता. त्यांनी त्यांची तक्रार ट्विटरवर टाकली. नंतर स्वराज व परराष्ट्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देऊन संबंधित कार्यालयाला त्या जोडप्यास पासपोर्ट देण्याचा आदेश दिला. ज्या अधिकाऱ्याने पासपोर्ट नाकारला होता त्या अधिकाऱ्याची बदली करून चौकशी सुरू केली. कदाचित ही प्रतिक्रिया जरा जास्तच झाली हे मान्य केले तरी त्यात कुठलाही मत्सरी हेतू नव्हता; पण नंतर ट्विटरवर अनेकांनी त्यांच्याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. स्वराज यांच्यावर ‘ट्रोलधाड’ आली. कुठल्याही भाजप नेत्यावर झाली नव्हती अशा शिवराळ भाषेत त्यांच्यावर टीका झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर रोजच्या रोज असे ट्रोलिंग करणाऱ्यांनीच हे सगळे केले. ज्यांनी कुणी स्वाती चतुर्वेदी यांचे ‘आय अ‍ॅम अ ट्रोल’ हे पुस्तक वाचले असेल त्यांना या जल्पकांना कसे पैसे पुरवले जातात वगैरे माहिती असेल. आताच्या या घटनेत स्वराज यांची चूक झाली असेल तर ती एवढीच की, त्यांनी त्यांच्यावर हल्ला होईपर्यंत या जल्पकांना अनुल्लेखाने, दखल न घेता मारण्याचा प्रयत्न केला.

धक्का व शांतता

स्वराज यांनी यात ट्रोलपीडितेची भूमिका स्वीकारली, मान्य करून टाकली. त्यांनी काही ट्वीटसना लाइक केले, काही रिट्वीट केले. नंतर त्यांनी किती लोकांचा या ट्रोल्स म्हणजे जल्पकांना पाठिंबा आहे, असा प्रश्न करून ऑनलाइन जनमत चाचणी घेतली. त्यांना त्यातील निकालाने धक्का बसला असावा. ५७ टक्के लोकांनी त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली; परंतु ४३ टक्के लोकांनी जल्पकांची पाठराखण केली.

या सगळ्यातील महत्त्वाचा मुद्दा असा की, या अप्रिय अशा वादात एकाही सहकारी मंत्र्याने, पक्ष पदाधिकाऱ्याने जल्पकांचा निषेध केला नाही, स्वराज यांच्या बाजूने ते उभे राहिले नाहीत. काही दिवसांनंतर पश्चातबुद्धी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हळूच जाहीर केले की, ‘मी स्वराज यांच्याशी या प्रकरणावर बोललो. जल्पक वाईटच असतात; पण त्यांनी (स्वराज यांनी) त्यांचे मनावर घ्यायला नको होते; गांभीर्याने तर मुळीच घ्यायला नको होते.’

आता हे ट्रोल्स म्हणजे जल्पक हेच सत्ताधाऱ्यांचे नवे प्रचारक बनले आहेत. त्यांच्या टोळ्या एक किंवा दोन नेत्यांच्या भलाईसाठी (बाकीचे सारेच नेते असले काय नि नसले काय!) वापरल्या जातात. या जल्पकांचे अनुसरण खुद्द वरिष्ठ भाजप नेते करतात, त्यामुळे त्यांच्या (जल्पकांच्या) नादाला लागण्याचे धाडस कुणी करीत नाही.

गृहमंत्री राजनाथ सिंह, खरोखर जल्पकांना आम्ही गांभीर्याने घेऊ नये असे वाटत असेल तर तोच मापदंड लावून नैतिक पोलीसगिरी करणारे, कथित लव्ह जिहादचे विरोधक, गोरक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालणारे लोक, लोकांना अफवा व खोटय़ा माहितीच्या आधारे ठेचून मारणारे लोक यांनाही आम्ही गांभीर्याने घेऊ नये का?

जल्पकांच्या ट्रोलधाडी व समाजमाध्यमांचा गैरवापर यामुळे नागरी समुदाय, कायदा व सुव्यवस्था, न्यायदान व्यवस्था यांची घडी मोडली जाऊन खालची पातळी गाठली गेली आहे. या शाब्दिक हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी शब्दांची नव्हे कृतीची गरज आहे. जर खून व बलात्काराच्या धमक्या समाजमाध्यमांवर दिल्या जात असतील तर शब्दांनी भागणार नाही, कृतीच हवी आहे; पण कृती तर काही दिसत नाहीच, उलट अधिक शोचनीय बाब ही की, उच्च घटनात्मक पदांवर बसलेले लोक त्याला तत्परतेने व गांभीर्याने उत्तरही देत नाहीत. ही तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN