News Flash

वाढता वाढे असहिष्णुता..

भारतीय समाजाबद्दलच्या काही समजुती पूर्वापार जोपासल्या गेल्या आहेत.

शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता असे चित्रण करणारे गोविंद पानसरे, अंधश्रद्धांविरोधात मोहीम चालविणारे नरेंद्र दाभोलकर आणि मूर्तिपूजेला विरोध करणारे एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. हत्या ही कायद्याच्या कक्षेत येणारी बाब होय. पण अशा प्रकारचे गुन्हे करूनही गुन्हेगार जेव्हा मोकळे राहतात तेव्हा ती बाब केवळ कायदा व सुव्यवस्थेची राहत नाही. ..आपण कायदा वा घटनेच्या कक्षेत येऊ शकत नाही, असा विश्वास या धर्माध व्यक्ती वा शक्तींमध्ये कसा निर्माण होतो?

भारतीय समाजाबद्दलच्या काही समजुती पूर्वापार जोपासल्या गेल्या आहेत. त्यातील एक रूढ समजूत म्हणजे आपला समाज हा सहिष्णू आहे. त्याचे वर्तन नेहमी सहिष्णुतेचे राहिले आहे. द्वेष, भेदभाव, अत्याचार आणि हिंसाचार याचे दाखले आपल्या इतिहासात आढळतात. हे सर्व झाकण्यासाठी सहिष्णुतेच्या समजुतीचे पांघरूण घातले जाते.
अस्मितेचा मुद्दा उपस्थित झाला की असहिष्णुतेचे प्रत्यंतर प्रकर्षांने येते. केवळ धार्मिक अस्मिताच नव्हे, तर जात, गोत्र, भाषा आणि प्रदेश अशा प्रकारच्या अस्मितांचा प्रत्यय असहिष्णुतेतूनच जाणवतो.
सुधारकांचा गौरव, सुधारणांना नकार
संत रामानुज, ई. व्ही. रामस्वामी (पेरियार) तसेच महात्मा फुले वा राजा राममोहन रॉय यांच्या कार्याचा आपण गौरव करतो. त्यांचे जीवितकार्य भारतीय समाजाच्या सहिष्णुतेचे निदर्शक असल्याचे आपण मानतो. या सुधारकांना त्यांच्या मतांचा प्रसार करण्यासाठी आपल्या समाजाने अवकाश उपलब्ध करून दिला, अशी आपली समजूत असते. या समाजसुधारकांनी घेतलेली भूमिका वा मांडलेला विचार फार थोडय़ांना मान्य झाला ही वस्तुस्थिती आपण सोयीस्करपणे विसरतो. समाजसुधारकांच्या कार्याचा गौरव करीत असतानाच त्यांनी पुरस्कारलेल्या सुधारणा धुडकावून लावायच्या ही आपली पापक्षालनाची रीत आहे की काय, अशी शंका मला येते.
दलितांना मज्जाव करणारी मंदिरे अद्यापही आहेत. पेरियार यांनी काही रूढी आणि अंधश्रद्धांविरोधात मोहीम चालविली होती. प्रत्यक्षात त्या रूढी आणि अंधश्रद्धा आणखी रुजल्या असल्याचे चित्र दिसते. यापैकी काही रूढी (किंवा नवरूढी) तर विघातक ठरत आहेत. शीख आणि हिंदू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांचे विवाह होण्याचा आणि ही जोडपी सुखाने नांदण्याचा एक काळ होता. पंजाब आणि इतरत्र अशी उदाहरणे अपवादात्मक नव्हती. ख्रिस्ती नाडर आणि हिंदू नाडर यांच्यातील विवाह ही तामिळनाडूतील सर्वसाधारण गोष्ट होती. आज जर एखाद्या हिंदू मुलाने वा मुलीने मुस्लीम मुलाबरोबर वा मुलीबरोबर मैत्री केली तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते, अशी स्थिती देशाच्या काही भागांत आहे. धार्मिक साहचर्याची अनेक उदाहरणे देशात दिसतील. मात्र, यापेक्षा धार्मिक असहिष्णुतेची आणि विद्वेषाची उदाहरणे जास्त आहेत, हे कटुसत्य आहे.
असहिष्णुता वाढत चालली आहे, असे मानण्याजोगी स्थिती सध्या आहे. आपण किती गोष्टींवर बंदी घातली आहे याकडे लक्ष द्या. गोमांस, जीन्स, पुस्तके, शिव्या, स्वयंसेवी संघटना, संकेतस्थळे, इंटरनेट सेवा.. वाढत्या भेदभावाचीही उदाहरणे आहेत. मुस्लीम उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकत नाहीत, एकटय़ा राहणाऱ्या महिलेला भाडय़ाने घर मिळणे अवघड ठरते, काही घरे फक्त शाकाहारी असणाऱ्यांनाच भाडय़ाने दिली जातात वा विकली जातात.. असहिष्णू भूमिका घेणारे काही गट आता चळवळींत परिवर्तित होत आहेत- उदा. घरवापसी, लव्ह जिहाद..
बाबरी मशीद पाडली गेली असहिष्णुतेमुळेच. ‘आतापर्यंत लिहिला गेलेला इतिहास हा डाव्यांनी केलेला बनाव आहे,’ असे जाहीरपणे सांगितले जाते ते असहिष्णुतेतूनच. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे भारतातील मुस्लीम समाजापुढील आव्हानांचा वेध घेणारे, विचार मांडणारे आणि अंतर्मुख करणारे भाषण चुकीचे असल्याचे मानले जाते, ते असहिष्णुतेच्या भावनेतूनच.
असहिष्णुता आणि हिंसाचार
वाढती असहिष्णुता ही अपरिहार्यपणे हिंसक स्वरूप धारण करते. तालिबान आणि इस्लामिक स्टेट (आयएस) या असहिष्णू आणि हिंसक चळवळी असल्याचे आपण मानतो. या चळवळींनी बामियान बौद्धमूर्ती आणि पालमिरा ही प्राचीन वारसास्थळे उद्ध्वस्त केली, याकडे आपण लक्ष वेधतो. मात्र, चर्च आणि पबवर होणाऱ्या हल्ल्यांकडे आणि त्यामुळे होणाऱ्या हिंसाचाराकडे आपले क्वचितच लक्ष जाते. तरुण जोडप्याला समाजातून बहिष्कृत करण्याच्या आणि प्रेमसंबंध असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाळीत टाकण्याच्या प्रकारांकडे आपण कानाडोळा करतो. वाढती असहिष्णुता आता वैचारिक क्षेत्रालाही ग्रासू लागली आहे. निरीश्वरवाद निषिद्ध ठरतो आहे. अंधश्रद्धांना आव्हान देणे अशक्य ठरत आहे. धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता असे शिवाजी महाराजांचे चित्रण करणे मुश्कील ठरले आहे. चमत्कारांचे पितळ आता उघडे पाडता येत नाही. शार्ली एब्दोची व्यंगचित्रे वर्तमानपत्रात पुन्हा छापता येत नाहीत. ती व्यंगचित्रे छापल्याबद्दल शिरीन दळवी या संपादिकेस दडपशाहीला सामोरे जावे लागले. भोंदूपणा उघड करणाऱ्या सानल एडामुरुकू याला धमकावण्यात आले. शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता असे चित्रण करणारे गोविंद पानसरे, अंधश्रद्धांविरोधात मोहीम चालविणारे नरेंद्र दाभोलकर आणि मूर्तिपूजेला विरोध करणारे एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. हत्या ही कायद्याच्या कक्षेत येणारी बाब होय. पण अशा प्रकारचे गुन्हे करूनही गुन्हेगार जेव्हा मोकळे राहतात तेव्हा ती बाब केवळ कायदा व सुव्यवस्थेची राहत नाही. हा केवळ गुन्हेगाराला शोधून काढण्याचा, त्याच्याविरोधात खटला चालविण्याचा आणि त्याला कायद्यानुसार शिक्षा करण्याचा प्रश्न राहत नाही. यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या कृत्यांमुळे उपस्थित होतो. तो म्हणजे, आपण कायदा वा घटनेच्या कक्षेत येऊ शकत नाही, असा विश्वास या धर्माध व्यक्ती वा शक्तींमध्ये कसा निर्माण होतो? आपण गुन्हा केला तरी आपल्याला काही बाधा होणार नाही, आपल्यावर खटला चालविला जाणार नाही आणि समजा तसा तो चालविला गेला तर आपल्याला कठोर शिक्षा होणार नाही, असा विश्वास या घटकांना का वाटतो?
अधोरेखित कारणे
या प्रश्नांची उत्तरे बहुविध स्वरूपाची आहेत. पहिले कारण म्हणजे सरकारमध्ये विशेषत: सरकारच्या कार्यकारी व्यवस्थेत या धर्माध शक्तींबाबत सहानुभूती बाळगणारे अनेक जण आहेत. हे सहानुभूतीदार धर्माधांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात कुचराई तरी करतात वा निष्क्रिय राहतात.
दुसरे कारण म्हणजे आपण कायदा वाकवू शकतो, असा विश्वास धर्माधांना वाटतो. तपासाऐवजी काही तरी गोलमाल कृती करणे, त्वरित न्याय प्रक्रियेऐवजी वेळकाढूपणे खटला चालविणे, तुरुंगवासाऐवजी दंडावर भागविणे, न्यायालयीन कोठडीऐवजी कैद्याची पॅरोलवर मुक्तता करणे, शिक्षा देण्याऐवजी माफी देणे आणि न्याय करण्याऐवजी दया दाखविणे यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीला बट्टा लागतो.
तिसरे कारण म्हणजे या कडव्या शक्तींना सामाजिक पाठिंबा मिळविण्यात यश मिळते. काही वेळा त्यांना संपूर्ण समाजाचा वा जातीचा पाठिंबा मिळतो. गुन्हा करणारे निनावी राहतात. त्यांची ओळख स्पष्ट करण्यास कोणी पुढे येत नाही.
चौथे कारण म्हणजे या धर्माधांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्यास त्यांना हौतात्म्याचे वलय प्राप्त होते. इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा गौरव काही जणांनी आपण शहीद भगतसिंग यांचा ज्याप्रमाणे गौरव करतो त्याप्रमाणे केला. बाबरी मशीद पाडणारे हिंदुत्ववाद्यांसाठी गौरवाचे प्रतीक ठरले. इस्लामी दहशतवादी हे जिहादी (ज्यांच्यासाठी स्वर्गाची दारे खुली आहेत) आहेत, असे मानले जातात.
उदारमतवादी विचार, बहुविधता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर वाढत्या असहिष्णुतेचा विपरीत परिणाम होतो. समाजाचे विघटन घडवू पाहणाऱ्या शक्ती या स्थितीचा पुरेपूर फायदा उठवतात. समाजघटक अधिकाधिक आत्मकेंद्री, बचावात्मक आणि प्रसंगी हिंसक भूमिका अवलंबू लागतात. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे समाजसुधारक सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करतात आणि त्याची सर्वोच्च किंमत त्यांना काही वेळा चुकवावी लागते. निर्भय, बळकट, धर्मनिरपेक्ष आणि घटनेशी कडवेपणाने बांधील असलेले राष्ट्रच वाढत्या असहिष्णुतेविरोधात आणि हिंसाचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेऊ शकते. या दोन्ही प्रवृत्तींमुळे वाढणाऱ्या धोक्याचा मुकाबला अशा प्रकारचे राष्ट्रच करू शकते.
अशा प्रकारच्या राष्ट्राची उभारणी आपण करीत आहोत, असे तुम्हाला वाटते का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 5:11 am

Web Title: p chidambaram article on murder of govind pansare narendra dabholkar m m kalburgi
Next Stories
1 आता मात्र आर्थिक धोरणे हवीत..
2 या साऱ्याचा अर्थ कोणी लावेल का?
3 आश्वासने अन् पूर्ततेतील अंतर
Just Now!
X