या देशाने वर्षांतील किमान एखादा दिवस हसण्यासाठी राखून ठेवला पाहिजे, असे आता मला वाटू लागले आहे. भारतासारख्या देशासाठी एखादाच दिवस पुरेसा नाही खरा, पण सुरुवात तर होऊ द्या.  हसू अनेक गोष्टींचे येते. आसपास घडणाऱ्या काही घटना, काही घडामोडी गमतीशीरच असतात. काही वेळा, अभावित चुकासुद्धा मौज वाटण्याचे कारण ठरतात. छापील व्यंगचित्रे, चित्रपट्टिका तसेच विनोद मला आवडतात, ‘डेनिस द मेनेस’चा तर मी चाहताच आहे. समाजमाध्यमांवरही बऱ्याच टिप्पण्या (किंवा ट्विप्पण्या!) आणि अनेक निरीक्षणे अशी असतात की, लिहिणाऱ्याच्या विनोदबुद्धीला दाद द्यावी! ‘मीम’ (‘मेमे’ नव्हे!) हासुद्धा गमतीचा विशेष नमुनाच.

काही विधाने किंवा काही घडामोडी तर अशा असतात की, त्यांना उचापतखोर किंवा इब्लिसच म्हणावे. तातडीची प्रतिक्रिया राग-संतापाचीच असते. मीसुद्धा नकारात्मक प्रतिक्रियाच देतो; पण आता मी असल्या इब्लिस विधाने वा घडामोडींमधील अज्ञानीपणा आणि मूर्खपणा ओळखून, त्यांवर हसण्यास शिकलो आहे. असल्या इब्लिस वाक्ताडनांच्या विषावरील उत्तम उतारा हा हसण्यातूनच मिळू शकतो.

आज ज्या २०१७ या वर्षांला आपण सारे निरोप देतो आहोत, त्या वर्षभरात तर असल्या इब्लिस घडामोडी ओसंडून वाहताना दिसतात. कबूल- काही घडामोडी इतक्या अत्यधिक इब्लिस होत्या की, त्यामुळे मी हताशही झालो, कधी काही घडामोडी शरम वाटवी अशा होत्या तर कधी संताप यावा अशाही होत्या, पण अखेर अती झाले की हसू येते, हे खरे ठरले.

धोकादायक वक्तव्ये

जे अधिकारपदांवर आहेत, त्यांच्या वक्तव्यांना असल्या वाक्ताडनांमध्ये अग्रक्रमच हवा, त्यांपैकी काही किस्से :

(१) गृह खात्यातील राज्यमंत्रिपद सांभाळणाऱ्यांना, नाताळदिनीच पार पडलेल्या त्यांच्या एका छोटेखानी कार्यक्रमाला एका डॉक्टरांची अनुपस्थिती (हे डॉक्टर काही दिवसांच्या रजेवर गेलेले असूनसुद्धा) फारच खटकली. मग या मंत्रीसाहेबांचा पारा चढला आणि गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांनी नक्षलवादीच व्हावे आणि ‘मग आम्ही त्यांना गोळ्या घालू,’ असे मंत्रीसाहेब म्हणाले. या मंत्रीसाहेबांना बहुधा, आताशा प्रतिहजार लोकांमागे डॉक्टरांचे प्रमाण फार वाढले आहे आणि डॉक्टरसंख्येची आता कत्तलच केल्याखेरीज ते कमी होणार नाही, असे कुणीसे सांगितलेले असावे.

(२) गाईंना जो मारेल त्याचे निर्दालन केले पाहिजे, असे वेदांमध्ये म्हटल्याचे राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीश महोदयांचे म्हणणे दिसले (आणि मला प्रश्न पडला की हा कोणता वेद असेल!) आणि तेवढय़ावरही न थांबता या महोदयांनी आणखी सूचना केल्या : गाय हाच राष्ट्रीय पशू म्हणून जाहीर करा आणि गाय मारणाऱ्याला जन्मठेपच देणारा कायदा करा. हे जर न्यायाधीशांच्याच मुखातून येत असेल, तर आपले तुरुंग किती भरून जातील विचार करा.

(३) ‘धोपटणं’ / ‘धोपाटणे’ किंवा बोलीरूपात ‘कपडे धुण्याचा धोका’ हे वस्तूचे नाव आहे हेही अनेक जण विसरले असतील, पण ही अशी ७०० धोपटणी मध्य प्रदेशातील एका मंत्रिमहोदयांनी ७०० नववधूंना विवाहाप्रीत्यर्थ भेट दिली. त्यांवर लिहिले होते, ‘ही भेट दारूडय़ा नवऱ्यांना चोपण्यासाठी; पोलीस हस्तक्षेप करणार नाहीत’. म्हणजे बघा, या मंत्रिमहोदयांनी एकाच फटक्यात महिलांचे सबलीकरण, दारूबंदी, लग्नसंस्था अबाधित राखणे आणि घरगुती बाबतींत (हाडे मोडली तरीही) पोलिसांची तटस्थता अशा केवढय़ा उद्दिष्टांची पूर्तीच करून टाकली.

अतीच करणारे आदेश

आदेश म्हणा किंवा निर्देश, फर्मान म्हणा, फतवे म्हणा किंवा सल्लावजा सूचना.. हे सारेदेखील इब्लिसपणाच्या उतरंडीवर बऱ्यापैकी वरच्या स्थानी होते :

(४) ‘स्त्रियांनी केस कापू नयेत, नवऱ्या मुलाने भिवया कोरू नयेत’ असा एक रीतसर फतवाच उत्तर प्रदेशातील ‘दारुल उलूम देवबंद’ने या वर्षांत काढलेला आहे. म्हणजे ब्यूटी पार्लरला भेट देणे हे निषिद्धच. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते या अर्थाची इंग्रजी म्हण येथे फारच खरी मानायची तर महिलांनो, सौंदर्यवर्धनदालनात- म्हणजेच ब्यूटी पार्लरमध्ये- अजिबात जाऊ नका, त्याऐवजी तुमच्या ‘ह्य़ांचे’च डोळे तपासण्यासाठी नेत्रतज्ज्ञाकडे न्या.

(५) मथुरा (पुन्हा ‘उ.प्र.’) या जिल्ह्य़ातील मादोरा या गावच्या ग्रामपंचायतीने, मुलींनी घराच्या चार भिंतींबाहेर मोबाइल फोन वापरल्यास त्यांना २१०० रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा नियम केलेला असल्याचे २०१७ मध्येच वाचावयास मिळाले. पण नेमके २१०० रुपयेच का? म्हणजे, ग्रामपंचायतीने ‘एकवीस-शे’ हीच रक्कम का बरे ठरवली असावी? आपण एकविसाव्या शतकात आहोत, म्हणून? की, एवढय़ा किमतीत सर्वात स्वस्त मोबाइल फोन (हँडसेट) मिळतो, म्हणून?

(६) ‘नाताळ साजरा करू नका’ असा इशारा ‘परिघावरील’ मानल्या जाणाऱ्या- आणि म्हणून जणू ज्यांचे म्हणजे गांभीर्याने घ्यायचे नसते अशा- एका हिंदुत्ववादी गटाने अलीकडेच दिला. या गटाला नाताळगीतांचा – ख्रिसमस कॅरल्सचा- तिरस्कार आहे का, की सारे नाताळतरू – ख्रिसमस ट्रीज- हा गट जाळून टाकणार आहे, की त्यांचा ‘क्षमा’ सर्वोच्च ख्रिस्ती मूल्यावरच विश्वास नाही, हे एकदा स्पष्ट झाले असते तर बरे झाले असते.. पण आपण त्यांना क्षमाच करू.

(७) दाऊदी बोहरा समाजाच्या सर्वोच्च प्रमुखांनी, या समाजातील सर्वानी ‘भारतीय शैलीचेच शौचकूप वापरावेत आणि काही निवडक जागीच विवाहसोहळे करावेत,’ असा आदेश त्या समाजासाठी काढलेला आहे. या विषयीच्या बातम्यांमध्ये, घरचे पाश्चात्त्य शैलीचे शौचालय फोडले जात असतानाची चित्रेही होती. पायखान्यात पाय खाली सोडावे की उकिडवे बसावे हाच जणू मोठा प्रश्न!

दुष्टबुद्धी नको रे..

‘इब्लिस’चा एक जुना अर्थ सैतानी किंवा दुष्टबुद्धीचा, असाही होतो. याही प्रकारातील उदाहरणे आहेत आणि ती गमतिशीर वगैरे मला तरी वाटत नाहीत :

(८) पाटणा येथील इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने सर्व कर्मचाऱ्यांवर ‘वैवाहिक माहिती पत्र’ संस्थेने ठरविलेल्या विहित नमुन्यात भरून देण्याची सक्ती केली. अविवाहित कर्मचारी ब्रह्मचर्यपालनच करणारे आहेत की नाही आणि विवाहित असल्यास पत्नींची संख्या किती, असेही प्रश्न म्हणे या ‘विहित नमुन्या’त होते. पण अशा विचारणा करणारे हे विहित नमुने केवळ पुरुष कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित होते किंवा कसे, हे कळू शकलेले नाही.

(९) केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलाला, एका पारितोषिक-विजेत्या मुलीला त्याने आलिंगन दिले म्हणून वर्गातून निलंबित करण्यात आले. गेले चार महिने या मुलाचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. हा मुलगा म्हणतो की (आनंदाने आलिंगन देणे) हा त्याचा हक्क आहे आणि तो हक्कासाठी लढणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कामी त्याचे समविचारी असू शकतात. त्यांनी या मुलाला शुभेच्छा तरी दिल्या पाहिजेत.

(१०) जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील एका खासगी शाळेत शिक्षक असणाऱ्या तरुण-तरुणीने लग्न केले, त्याच दिवशी या दाम्पत्याला (दोघांनाही) नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ‘यांच्या प्रेमप्रकरणाचा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होईल’ हे या कृतीमागे शाळा-व्यवस्थापनाने दिलेले कारण. या दाम्पत्याने प्रतिकार करताना, आमचा प्रेमविवाह नाही, ‘ठरवून’ केलेले लग्न आहे (म्हणजे प्रेमप्रकरण नाही) असे स्पष्टीकरण दिलेले आहे, ते बहुधा व्यवस्थापनाच्या समाधानासाठी.

(११) इब्लिसपणाच्या दुनियेचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे श्रीमान डोनाल्ड ट्रम्प! सिंहासनाधीश्वर राजाधिराजांच्या जन्मतिथीचे सोहळे दर वर्षी घालण्यापरती राजनिष्ठा ती कोणती? आणि नेमके हेच ‘हिंदू सेना’ नामक एका गटाने केले.. ट्रम्पमहाशयांचा वाढदिवस ७१ वा, म्हणून त्या दिवशी नवी दिल्लीतील जंतरमंतर भागात यांनी ‘राज तिलक’ सोहळा घडवून आणून नेमक्या सात किलो १०० ग्रॅम वजनाचा केकही कापला.

यावर मनसोक्त हसण्याखेरीज काय करणार.. असेच हसा, आणि मावळत्या इब्लिस वर्षांला निरोप देऊन २०१८चे स्वागत करू या! येते वर्ष शांततेचे आणि भरभराटीचे जावे, ही सदिच्छा.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in 

ट्विटर : @Pchidambaram_IN