X

त्यांना दुय्यम नागरिक म्हणणार?

आर्चबिशप कोटो व निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांच्या जीवनात वेगवेगळे मार्ग निवडले.

एक वेळ दुय्यम नागरिकत्व माथी मारा, पण माझ्या देशभक्तीवर शंका घेऊ नकाअसे ज्युलिओ रिबेरोंना म्हणावे लागते, अशी आजची स्थिती.. कारण आताच्या सरकारच्या काळात असहिष्णुताच जणू स्वाभाविक मार्ग आहे.. शिवराळपणा ही नवी परिभाषा आहे, तर द्वेष हे नवे शस्त्र आहे!

आर्चबिशप कोटो व निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांच्या जीवनात वेगवेगळे मार्ग निवडले. एक धर्मगुरू तर दुसरे पोलीस अधिकारी. आर्चबिशप कोटो हे दिल्लीच्या कॅथॉलिक चर्चचे प्रमुख धर्मगुरू. रिबेरो हे पोलीस सेवेतून बऱ्याच काळापूर्वी निवृत्त झालेले, पण मुंबईचे व पोलीस अधिकाऱ्यांचे नायक. येथे या दोघांचा उल्लेख  एकाच वेळी मी करतो आहे त्याची कारणे म्हणजे आर्चबिशप यांनी त्यांच्याच धर्मातील इतर धर्मगुरूंना ८ मे २०१८ रोजी लिहिलेले पत्र व रिबेरो यांनी एका प्रमुख वृत्तपत्रात २८ मे २०१८ रोजी  लिहिलेला लेख.

बंडाळी नव्हे; प्रार्थना..

आर्चबिशप यांनी ख्रिस्ती धर्मातील अन्य धर्मगुरूंना पाठविलेले पत्र हे बिगरराजकीय स्वरूपाचे होते व देशातील सध्याचे वातावरण सुधारण्यासाठी, देशहितासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यात होते. सद्य:स्थितीत आपल्या देशात राज्यघटनेने दिलेल्या लोकशाही तत्त्वांची बिनदिक्कत पायमल्ली होत आहे, त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा धागा उसवला जात आहे, अशा वातावरणात प्रार्थना करण्याशिवाय त्यांच्या हातात दुसरे काही नव्हते. ते एवढेच म्हणाले की, १३ मे २०१८ पासून आपण देशासाठी प्रार्थना मोहीम सुरू करू या. त्यांनी सहकारी धर्मगुरूंना दर शुक्रवारी उपवास करून प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. आत्मक्लेशाने दुसऱ्याच्याही चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची एक चांगली परंपरा ख्रिश्चन धर्मात आहे.

ते केवळ देशाच्या भल्यासाठी प्रार्थनेचे आवाहन होते; पण काही शहाण्यासुरत्या स्त्री-पुरुषांना त्यात बंडाळी दिसू लागली. भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. म्हणतात- ‘जातीय व धार्मिक भावना भडकावणे चुकीचे आहे. तुम्ही लोकांना योग्य उमेदवार किंवा पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करू शकता, पण कुठल्या पक्षाला मतदान करा व कुठल्या पक्षाला मतदान करू नका, असे जर सुचवत असाल तर ते दुर्दैवी व धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वात बसणारे नाही.’ मंत्री गिरीराज किशोर यांनी तर या प्रकरणात त्यांचे भौतिकशास्त्राचे प्रगाढ पांडित्य पणाला लावले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते. ‘मी कधी सामाजिक सलोखा नष्ट करणारे पाऊल उचललेले नाही, पण जर चर्च लोकांना पुढील निवडणुकीनंतर मोदी सरकार स्थापन होऊ नये यासाठी प्रार्थना करायला सांगत असेल तर मग दुसऱ्या धर्माच्या लोकांनी काय कीर्तन-पूजा करावी, अशी तुमची अपेक्षा आहे की काय..’ आर्चबिशप कोटो यांनी सांगितले की, जे मी म्हणालो नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले; पण तोवर, खोटे आरोप वारंवार करणाऱ्या भाजपच्या जल्पक-फौजेने (‘ट्रोल्स’नी) फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांतून कोटो यांच्यावर विखारी हल्ला आरंभला होता.

आर्चबिशप कोटो यांच्यावर असा अकारण हल्ला झाल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यावर एका मोठय़ा वृत्तपत्रात लेख लिहून आर्चबिशपांची बाजू नेमकी समजून देण्याची वेळ आली. हे सगळे करताना त्यांनी कुणाचा रोष ओढवेल याचा मुलाहिजा न बाळगता ठोसपणे मते मांडली. खरे तर असे करायची वेळ त्यांच्यावर कधी आली नव्हती. हा सगळा खोडसाळपणा करणाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. आर्चबिशप कोटो यांना धमकावणाऱ्या या नेत्यांना त्यांच्या पूर्वीच्या वाचाळ विधानांची व कृतींची आठवण करून दिली. आजच्या राजकीय परिस्थितीत जे अनेक लोकांच्या मनात आहे तेच रिबेरो यांनी या लेखात म्हटले आहे.

‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे आधीच्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारपेक्षा वेगळे आहे. वाजपेयींच्या काळात अल्पसंख्याकांच्या देशभक्तीबाबत शंका व्यक्त केली जात नव्हती. आता मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे हे सगळे माझ्यासारख्या अनेकांना खपवून घेता येणे कठीण आहे,’ असे रिबेरो यांनी त्या लेखात ठामपणे म्हटले आहे. रिबेरो त्या लेखात म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे पूर्वज हिंदू होते व साधारण चारशे वर्षांपूर्वी ते ख्रिस्ती झाले. हा हिंदू बहुसंख्याक  देश आहे हे ते मान्य करतात. त्याचबरोबर त्यांचे अनेक मित्र हिंदू असल्याचे नमूद करतात; परंतु ‘मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माने मला सत्य व न्यायासारखी मूल्ये शिकवली त्यामुळे त्या धर्माचा मला अभिमानच वाटतो. हिंदू व मुस्लीम व्यक्तीही त्याच्या किंवा तिच्या धर्माविषयी असे म्हणू शकते,’ असे रिबेरो त्या लेखात म्हणतात.

शरम वाटते..

रिबेरो शेवटी जो निष्कर्ष काढतात तो चटका लावून जाणारा व आपल्या सर्वाना शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. ते लिहितात, ‘मी दुय्यम दर्जाचे नागरिकत्व स्वीकारण्यासही तयार आहे, पण देशविरोधी म्हणून कुणी उगाचच हिणवलेले सहन करणार नाही.

मुस्लीम, ख्रिस्ती, दलित, आदिवासी यांच्यातील अधिकाधिक लोकांनी ते दुय्यम नागरिक आहेत, असा विचार सुरू करावा या दिशेने आपण वातावरण तयार केले ही या देशाची शोचनीय स्थिती आहे.’

रिबेरोंचे ते पत्र वाचून मला शाळा व महाविद्यालयात असतानाचे दिवस आठवतात. तो काळ असा होता की, तुमच्या मेजावर शेजारी बसलेला मुलगा किंवा तुमच्या वर्गातील मॉनिटर हा मुस्लीम किंवा ख्रिश्चन असला तरी कुणाला त्याचे काही वाटत नसे, किंबहुना ती बाब पुसटशीसुद्धा कुणी लक्षात घेत नसे. मद्रास ख्रिश्चन माध्यमिक शाळा स्कॉटिश मिशनरींनी स्थापन केली. कुरुविला जेकब हे त्या वेळी २५ वर्षे मुख्याध्यापक होते. विद्यार्थी बहुतांश हिंदू होते, ख्रिश्चन व मुस्लीम मुलेही होती. आमचा वर्गप्रमुख विद्यार्थी हा सहा वर्षे मुस्लीमच होता. आज या गोष्टी मला यानिमित्ताने आठवतात. आम्ही त्या काळी कुणाचा धर्म लक्षातही घेत नसू किंवा कुणावर अविश्वासाचे ते वातावरण नव्हते. त्या वेळी अनेक मुलांनी नीतिशास्त्राऐवजी बायबलचे वर्ग निवडणे पसंत केले होते. त्या वेळी धर्मातराचे एकही प्रकरण घडलेले नव्हते. महाविद्यालयात असताना आम्हाला आयरिश व रोमन कॅथोलिक सोसायटीचे सदस्य असलेले शिक्षक होते. फ्रान्सिस कॉयल यांचे निरीक्षण करून मी अचूक इंग्रजी बोलायला व लिहायला शिकलो, पण त्यासाठी माझे व इतर कुणाचे धर्मातर करण्यात आले नव्हते.

हा देश जसा हिंदूंचा आहे तसाच मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी यांचाही आहे. त्यांनी उद्योग, साहित्य, कला, संगीत, क्रीडा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मोलाची कामगिरी केलेली आहे. तुम्ही डोळे मिटा आणि नावे आठवून पाहा. तुम्हाला विविध क्षेत्रांतील अशी वेगवेगळी नावे सापडतील ज्यांनी फार मोठी कामगिरी देशासाठी केली आहे.

रास्त भीती

जर धार्मिक अल्पसंख्याकांना आपल्या समाजात वावरताना भीती वाटत असेल, त्यांना आपण या देशाचे दुय्यम नागरिक आहोत असे वाटत असेल तर आपला लोकशाही देश आहे असे म्हणवून घेण्याचा अधिकार तर आपल्याला नाहीच व प्रजासत्ताक राष्ट्राचे बिरुद मिरवण्याचेही कारण नाही. रिबेरो यांनी त्यांच्या लेखात हेच म्हटले आहे की, ‘जर देशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या मनात भीती पेरली गेली किंवा तशी भावना त्यांच्या मनात रुजली तर माझी मातृभूमी ही (हिरव्याऐवजी) भगवा पाकिस्तान आहे, त्याहून वेगळी नाही असेच मी म्हणेन.’ रिबेरो यांच्या या म्हणण्यात काहीच चूक नाही, असे मला वाटते.

नरेंद्र मोदी व त्यांच्या साथीदारांची देशात जी राजवट आहे त्यात आणि वाजपेयी यांच्या तत्कालीन भाजप सरकारमध्ये फरक आहे. वाजपेयींचे सरकार समाजातील सर्व घटक मग ते धार्मिक अल्पसंख्याक किंवा कुणीही असोत यांना बरोबरीचे स्थान देणारे होते. आताच्या सरकारच्या काळात असहिष्णुताच स्वाभाविक मार्ग आहे हे अंगवळणी पडत चालले आहे. शिवराळपणा ही नवी परिभाषा आहे, तर द्वेष हे नवे शस्त्र आहे. लोकांच्या मनात भीती पेरणे हे धोरण बनले आहे. समाजात दुही माजवून ध्रुवीकरण करीत राजकारण करणे ही निवडणुका जिंकण्यासाठीची नवी युक्ती ठरली आहे.

पण माझी आशा अजून जिवंत आहे याचे कारण सांगतो. अलीकडे लोकसभेच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यात उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकदलाच्या श्रीमती तबस्सुम हसन या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. जोपर्यंत आर्चबिशप कोटो व निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांच्यासारखे लोक लिहीत राहतील, बोलत जातील, तबस्सुम हसन यांच्यासारख्या महिला निवडून येत राहतील तोपर्यंत भारतातील लोकशाही सुरक्षित आहे असे मला वाटते.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

First Published on: June 5, 2018 1:56 am