02 July 2020

News Flash

लहानपण दे गा देवा!

जलविश्वात विभिन्न शरीररचना असलेल्या वंशांची समृद्धी आहे, पण एकमेकांत अगदी थोडे फरक असलेल्या जीवजातींची वानवा.

| August 1, 2014 02:06 am

जलविश्वात विभिन्न शरीररचना असलेल्या वंशांची समृद्धी आहे, पण एकमेकांत अगदी थोडे फरक असलेल्या जीवजातींची वानवा. उलट भूमीवर अगदी मोजक्या यशस्वी वंशांच्या जातींची रेलचेल आहे
पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी खोल समुद्रात उपजलेली जीवसृष्टी आधी सर्वदूर समुद्रात, मग गोडय़ा पाण्यात, तिथून जमिनीवर व शेवटी आकाशात फैलावली. या प्रवासात ती सतत जातींच्या, कुळींच्या, वंशांच्या आणि त्याबरोबरच जीवनशैलींच्या वैविध्याने नटत राहिली आहे. आज अंदाज आहे की, एकूण जीववंशांची संख्या चाळीस, तर जीवजातींची संख्या एक कोटी चाळीस लक्ष असावी. एक कळीचा प्रश्न आहे की, हे वैविध्य कुठे पसरले? कसे विभागले आहे? सागरात आणि जमिनीवर किती किती प्रमाणात आहे? यातले किती वंश, किती जाती, हिरव्या वनस्पतींसारख्या उत्पादक आहेत? किती प्राण्यांसारख्या भक्षक आहेत? किती गांडुळे, बुरशांसारखे कुजवण्याचे काम करणाऱ्या विघटक आहेत? आश्चर्य म्हणजे जरी जीवसृष्टी सागरात अब्जावधी वष्रे नांदत आहे आणि जमिनीवर केवळ ४४ कोटी वष्रे, तरी जलचरांच्या जातींची संख्या अवघी १५ लक्ष, तर भूचरांची एक कोटी पंचवीस लक्ष आहे. जरी वनस्पती साऱ्या ऊर्जाचक्राचा आधार आहेत, तरी त्यांच्या केवळ तीन लक्ष जाती आहेत, ऊर्जाचक्रात-पदार्थचक्रात जीवांच्या अवशेषांपासून खनिजे परतवणाऱ्या विघटकांच्या २८ लक्ष, तर भक्षक प्राण्यांच्या तब्बल एक कोटी नऊ लक्ष.
पण जाती हे काही वैविध्याचे एकमेव माप नाही. जीवतरूला उत्क्रान्तीच्या ओघात फुटत राहिलेल्या फांद्या-डहाळ्यांसारखे वैविध्य बहरले आहे. जीवतरूच्या बुंध्यापासून फुटल्या आहेत बॅक्टेरिया, आíकया व आपल्यासारखे प्रगत प्रपेशीय जीव अशा तीन महाशाखा. वनस्पती, प्राणी आणि बुरशा या प्रपेशीयां7च्या तीन शाखा. या शाखांना फुटलेल्या मोठय़ा फांद्या म्हणजे फायलम अथवा वंश. प्रत्येक वंशाची काही विशिष्ट इतरांहून खूप वेगळी शरीररचना आहे. उदाहरणार्थ, संधिपाद वंशात कोळी, किडे, खेकडे, िझगे समाविष्ट होतात. आपण आहोत पृष्ठवंशीय. आपल्या वंशातल्या मासे, पक्षी, सस्तन पशू अशा तीनही वर्गाच्या शरीररचनेत पाठीचा कणा, परांच्या, पंख-पाय किंवा दोन पायांच्या जोडय़ा असे भरपूर साम्य आहे. एकाच वर्गात मोडणाऱ्या सर्व पक्ष्यांची शरीररचना तर खूपच एकासारखी एक आहे. या वर्गीकरणातली सर्वात खालची पायरी आहे जाती. उदाहरणार्थ कावळा आणि जंगली कावळा या दोन जातींत रंगरूपात थोडाच फरक आहे. पहिला जास्त दाट मनुष्यवस्ती पसंत करतो, तर दुसरा जास्त वृक्षाच्छादित परिसर.  
जरी भूचरांचे जातिवैविध्य जास्त आहे, तरी वंशांच्या पातळीवर जलचरांचे पारडे जड होते. सागरी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासात अनेक वेगवेगळ्या शरीररचनांचे वंश उपजले. आज पृथ्वीतलावर प्राण्यांचे ३२ वंश आहेत. यापैकी २१ आहेत शुद्ध जलचरांचे, प्राधान्याने सागरनिवासीयांचे, अकरांचे काही सदस्य पाण्यात, तर काही जमिनीवर वावरतात, तर एकच क्षुल्लक कृमींचा वंश केवळ जमिनीवर आढळतो. भूचरांतील सर्वाधिक वैविध्यप्रचुर कीटकसुद्धा निखळ भूचर नाहीत; त्यांच्या दहा हजार जाती पाण्यात बागडतात. आपल्या पृष्ठवंशीय वंशातल्या निम्म्या जाती आहेत पाण्यातले मासे, आपल्या सस्तन पशुवर्गातही देवमाशांसारख्या अनेक जाती पाण्यात जीवन व्यतीत करतात.
एवंच, सागर जीवजातींच्या पातळीवर दरिद्री, पण अगदी वेगवेगळ्या शरीररचनांच्या वंशांनी समृद्ध आहे. उलट भूमीवर एकमेकांपासून थोडकेच फरक असलेल्या जातींची रेलचेल आहे, तर वंशपातळीवरची वानवा. सागरातील वंशवैविध्य जीवसृष्टीला अत्यंत अनुकूल अशा परिसरात बहरले. जीवजंतूंच्या शरीरांचा ८० टक्के भार पाणीच असते आणि पाण्याच्या माध्यमातूनच सारी जीवरसायन यंत्रणा काम करीत राहते. जीवांच्या देहातल्या क्षारांचे प्रमाण हे समुद्रातल्या क्षारांच्या प्रमाणाशी मिळतेजुळते असते. तेव्हा सागरवासीयांना पाणी किंवा क्षार सांभाळण्याचे काहीच कष्ट पडत नाहीत. जीवजंतूंची घनता समुद्राच्या पाण्याइतपतच असल्यामुळे, ते विनासायास तरंगू शकतात, गुरुत्वाकर्षणाची काळजी नसते. शिवाय समुद्रात कलेवरांपासून बनलेले भरपूर अन्नकण उपलब्ध असतात. अशा जीवसृष्टीला पोषक परिसरात वेगवेगळ्या शरीररचनांचे प्रयोग सहज होऊ शकले, यातील नानाविध धाटणीचे, मुख्यत: समुद्रतळावर ठाण मांडून बसलेले वंश यशस्वीरीत्या टिकून राहिले; पण प्रवाळाच्या बेटांसारखे अपवाद सोडता सागराच्या सरधोपट विश्वात फारसे रचनावैविध्य आढळत नाही. म्हणून जलचरांना कावळा – जंगल कावळ्यांसारखे बारीकसारीक खुब्यांनी एकमेकांपासून वेगळेपण साधणे अवघड आहे आणि समुद्रात जातींच्या पातळीवर भूचरांच्या मानाने अगदी कमी वैविध्य नजरेस येते.
पाण्याबाहेर पडणाऱ्या जीवांना मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. विशेषत: पाणी मिळवणे व राखणे आणि गुरुत्वाकर्षणावर मात करीत शरीर सांभाळणे ही मोठी आव्हाने आहेत. या अडचणींवर मात करण्यात फक्त चार वंशांच्या शरीररचना यशस्वी ठरल्या आहेत : आपल्यासारखे कणखर पशू-पक्षी, सपुष्प वनस्पती, किडेमकोडे आणि बुरशा; पण या चारांच्या भरघोस यशातून भूतलावर अफाट रचनावैविध्य व रसायनवैविध्य निर्माण झाले आहे.
 समुद्रातले उत्पादक सायनोबॅक्टेरिया व एकपेशी शेवाळी जिथपर्यंत प्रकाश पोचतो त्या वरच्या थरांत सहजी तरंगत राहतात, त्यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. आज घनदाट अरण्यात जाणवणारी वनस्पतींमधली मुळे रोवण्यासाठी जागेपायी व प्रकाशासाठीची स्पर्धा अगदी अलीकडेच सुरू झाली, प्रथम ५० कोटी वर्षांपूर्वी सागरात उथळ खडकाळ समुद्रप्रदेशांत. इथे भल्या मोठय़ा ८० मीटर लांबीची पाती असलेल्या शेवाळ्यांची रानेच्या राने फोफावली. क्रमेण शेवाळी गोडय़ा पाण्यात वाढू लागली आणि ४४ कोटी वर्षांपूर्वी अधिक प्रगत वनस्पतींनी जमिनीवर पदार्पण केले. या वनस्पतींना पाणी सांभाळण्यासाठी व गुरुत्वाकर्षणाला सामोरे जाण्यासाठी पेशींच्या टणक आवरणाची आवश्यकता होती. ही गरज साखरेचे शेकडो रेणू एकत्र जोडून बनलेल्या सेल्युलोजच्या रेणूंनी पुरवली; पण एकदा सुरू झालेली स्पर्धा भडकतच राहिली आणि ज्या वनस्पती इतर स्पर्धकांहून उंच वाढतील त्यांची सरशी होऊ लागली. या चढाओढीत वनस्पतिशरीरांची निरनिराळी धाटणी उद्भवली व त्यायोगे भूमीवर अफाट रचनावैविध्य निर्माण झाले.
ताठ उंच वाढण्यासाठी वनस्पती सेल्युलोज, तिची बहीण हेमिसेल्युलोज व अल्कोहोलचे शेकडो रेणू एकत्र गुंफून बनलेले लिग्निन असे आणखी तीन प्रकारचे रेणू बनवतात. हे साऱ्या वनस्पतिसृष्टीचे प्रधान घटक आज भूतलावरील सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारे रेणू आहेत; पण हे पचवणे सोपे नाही, यात प्राण्यांची भूमिका नगण्य आहे. यात तरबेज आहेत बुरशा. वनस्पतींनी आपल्यावर हल्ला चढवणाऱ्या किडे-बुरशांचा प्रतिकार करायला चहातले टॅनिन किंवा मिरीला तिखटी देणारी अल्कलॉइड्स अशी रसायने बनवली. यातून वनस्पतींच्या रचनावैविध्याला पूरक असे रसायनवैविध्य बहरले. या द्विविध रचना-रसायनवैविध्यावर पोसले १५ लाख जातीच्या बुरशांचे आणि ८० लाख जातीच्या कीटकांचे अचाट वैविध्य. या मानाने फुलवाल्या वनस्पतींच्या फक्त दोन लाख सत्तर हजार जाती आहेत, तर साप-पक्षी-उंदीर-माकडे-माणसांसारख्या भूचर पृष्ठवंशीयांच्या अवघ्या २५ हजार.
तुकोबा म्हणाले होते, लहानपण दे गा देवा! अवनितलावर जरी िपपळ, देवदार, शार्क, मगरी, मोर, हत्ती, देवमासे डोळ्यांत भरतात, तरी वैविध्याचा खजिना आहेत साधेसुधे किडेमकोडे आणि बुरशा!     
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2014 2:06 am

Web Title: %e0%a4%b2%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%a3 %e0%a4%a6%e0%a5%87 %e0%a4%97%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be
Next Stories
1 मासे : जलजीवसृष्टीचे कणखर राजे
2 आपुली नवनवोन्मेषशालिनी अवनी!
3 विषाणू : सूक्ष्मांपासून अतिसूक्ष्मांकडे
Just Now!
X