‘नव-नाझीवादाचा संदर्भ.’ हा डॉ. क्रांतिकुमार शर्मा यांचा लेख (१० एप्रिल) वाचला. या निवडणुकीत युवावर्गाचा सहभाग हा घटक परिणामकारक ठरणार आहे. डावी-उजवी विचारसरणी आणि सध्याच्या आपल्या राजकीय पक्षांची ध्येय-धोरणे (असलीच तर!) याबद्दल आजचा बहुतांश युवावर्ग पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. या संकल्पनांची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख सुजाण मतदार होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत लाभदायक आहे. मतदान करणे सोपे असले तरी योग्य उमेदवाराची पारख करणे सोपे नाही, त्याचे भान तरुण मतदारांना येण्यासाठी हा लेख वाचणे हा एक शॉर्टकट म्हणून अत्यंत उपयुक्त आहे.   प्रस्तुत लेखात अतिउजव्यांचा  नावानिशी उल्लेख करण्याचे टाळले आहे. याचे कारण कळले नाही. पीपल्स वॉर ग्रुप, नक्षलवादी, माओवादी यांच्यासारख्या ‘खतरनाक’ पक्षांचा उल्लेख नावानिशी केला आहे आणि अतिउजव्यांचा उल्लेख टाळण्यामागे हे पक्ष अतिडाव्या पक्षांपेक्षा जास्त धोकादायक आहेत असे लेखकाचे मत आहे काय अशी शंका येते.   

हे आपल्याच न्यायिक आळसाचे दर्शन!
‘बलात्कारविरोधी कायदा सौम्य करण्याची मुलायम यांची मागणी’ ही बातमी (११ एप्रिल) वाचली. या वक्तव्यावर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. पण मुलायम यांच्या मुद्दय़ाचा नीट विचार केला तर त्यांची मागणी अवास्तव नाही. मुळात फाशी ही शिक्षा बलात्काराच्या गुन्ह्य़ाइतकीच अमानुष आहे, आणि आता तर बलात्कार या शब्दाची व्याख्या व्यापक केल्यामुळे या गुन्ह्य़ाखालील आरोपींची संख्याही वाढते आहे. मुलायम यादव यांनी आपल्या भाषणात, चांगले संबंध असलेल्या तरुण, तरुणीत बेबनाव झाल्यानंतर  मुलावर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात, या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. याचाही विचार झाला पाहिजे. स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक बळजबरीवर कडक शासन व्हायलाच हवे. पण शेवटी शिक्षेचा मूळ हेतू हा गुन्हेगाराच्या वर्तणुकीत सुधारणा करणे हे असेल तर आपल्याला अधिक अभिनव शिक्षा शोधाव्या लागतील, ज्या योगे समाजाच्या मुख्य प्रवाहात एक जबाबदार नागरिक म्हणून तो गुन्हेगार पुन्हा सामील होऊ शकेल. माझ्या मते फाशी हे समाजव्यवस्थेने गुन्हेगारी निर्मूलनासाठी शोधलेले एक सोपे उत्तर आहे, समाजशास्त्रज्ञ, सुजाण नागरिक, लोकप्रतिनिधी, न्यायाधीश यांनी आपल्या बुद्धीचा कस लावून शिक्षेच्या मूळ उद्देशाचा सन्मान होईल अशी शिक्षा सुचवावी.  मुलायम यांच्यावर होणारा हा शाब्दिक हल्ला हा आपल्याच कमतरतेचे आणि न्यायिक आळसाचे दर्शन घडवते.
गार्गी बनहट्टी, दादर

विवेकशून्य राजकारणाची विषवल्ली
मालाडमधील पर्जन्यवृक्षाच्या विष टोचून झालेल्या हत्येविषयीची बातमी (१० एप्रिल) वाचून संताप आला.  हे कृत्य करणाऱ्यांना शोधून काढणे अशक्य नाही. दाभोलकरांची हत्या आणि अशा वृक्षहत्या या आजच्या राजकीय पुढाऱ्यांच्या विवेकशून्य राजकारणाची विषवल्ली आहे. ती वाढते आहे. कारण सर्वच पक्षांचे पुढारी बिल्डर लॉबीच्या पशांमुळे ठार आंधळे झाले आहेत.  शासक विवेकशून्य झाले की समाजाचे अध:पतन वेगाने होते हे  नेत्यांना कधी कळणार? एक मोठा वृक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिसरातील १०० कुटुंबांचे पोषण करत असतो. आज संपूर्ण महाराष्ट्राचे वेगाने वाळवंटीकरण करणाऱ्या बिल्डर लॉबीकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर महाराष्ट्राचा चेहरा भेसूर झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रकाश बिद्री, धनकवडी,पुणे

म्हणावे तितके ते सोपे नाही
‘हुकूमशाहीचे मुसळ ..’ हे अशोक राजवाडे यांचे पत्र (लोकमानस, ११ एप्रिल) डोळ्यात  झणझणीत अंजन घालणारे वाटले. नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटली यांच्या धर्तीवर िहदूंची  संघटना बांधता येईल हा डॉ. मुंजे आणि हेडगेवार यांचा भ्रम होता.
मुसोलिनी किंवा हिटलर यांच्या विचारांशी जवळीक साधू पाहणाऱ्यांना त्या संघटनेतील आत्मसमर्पणाची भावना म्हणजे काय हेच माहीत नव्हते. आत्मसमर्पण करण्याची तयारी जेव्हा प्रखर होती त्या शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांच्या कुत्र्यानेही महाराजांच्या चितेत उडी मारून आत्मसमर्पण केले होते. पण १९३१ मध्ये मुसोलिनीला भेटणाऱ्या डॉ. मुंजे यांना मायदेशातील िहदूंची मने कधीच ओळखता आली नाहीत.
आता त्या काळातील डॉ. मुंजे काय आणि त्याच मुशीत तयार झालेले स्ट्रीट स्मार्ट मोदी काय फरक असा पडलेला नाही.
श्रीराम गुलगुंद, कांदिवली (प)

लोकांसोबत दत्ताजी..
ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिक दत्ताजी ताम्हणे हे कै. ना.ग. गोरे, कै. एस.एम.जोशी यांच्यासारख्या नेत्यांच्या तालमीत तयार झालेले नेते होते. ते दोन वेळा आमदार म्हणून, एकदा विधानसभेवर, तर एकदा विधान परिषदेवर निवडून गेले होते. ते कधीही आजच्या नेत्यांप्रमाणे पोलीस संरक्षणात फिरले नाहीत. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्वपक्षीय नेते पोलीस संरक्षणात हजर होते!  काही वर्षांपूर्वी मुलुंडच्या संभाजी मदानाचा लचका तोडून तेथे सी.एन.जी.चे स्टेशन बांधण्याचा घाट एका राजकीय नेत्याने घातला होता. त्या वेळी नव्वदी ओलांडलेले दत्ताजी ताम्हणे मदानाच्या बचावासाठी सामान्य मुलुंडकरांबरोबर उपोषणास बसले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी होऊन ते मदान वाचले.
शिरीष न. पुरोहित, मुलुंड (पूर्व)

माध्यमांची कृती अनिष्ट वृत्तींना खतपाणी घालणारी
नरेंद्र मोदी यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये विवाहित असल्याचा उल्लेख यंदा प्रथमच केल्याची बातमी वाहिन्यांवर चवीने चघळली जात आहे. मुळात विवाह ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे आणि  जोपर्यंत दोन व्यक्ती परस्पर संमतीने काही निर्णय घेत असतील आणि ज्यामध्ये कोणावरही अन्याय होत नसेल, तर माध्यमांना त्यामध्ये नाक खुपसण्याचा अधिकार कोणी दिला? जे ‘सेलिब्रिटी’ स्वत:चे लग्नच काय, बाळंतपण आणि घटस्फोटदेखील प्रसिद्धीसाठी बिनदिक्कतपणे वापरून घेतात त्यांची गोष्ट वेगळी आणि एखाद्या व्यक्तीने त्याच्या सार्वजनिक कार्यासाठी वैवाहिक आयुष्यात तडजोडी करणे वेगळे.  भारतीय समाज नतिकतेच्या मुद्दय़ावर, विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांशी निगडित नतिकतेबाबत नेहमीच दुहेरी मापदंड वापरीत असतो.  सत्तेच्या  बळावर बाहेरख्यालीपणा करणाऱ्या नेत्यांची या देशात कमी नाही. एका नगरसेविकांच्या मानसिक छळाची किंवा  महिला कार्यकर्तीच्या संशयास्पद मृत्यूची घटना राजकारण्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती दूषित आहे तेच सिद्ध करतात. अशा वेळी माध्यमांनी सवंगपणे बातम्या चघळणे हे कोणाच्या तरी खाजगी आयुष्यावर आक्रमण तर ठरतेच, पण समाजातील अनिष्ट वृत्तींना खतपाणी घालणारेदेखील आहे .
चेतन मोरे, ठाणे</strong>